गेल्या आठवड्यात तिरकीट तोमय्याने केलेला स्त्रीलंपटपणा आणि त्याची लिंगपिसाट विकृती सार्या. जगाने पाहिली. मराठी महिलांबाबत त्याने काढलेले हीन आणि अभद्र स्वरूपाचे उद्गारही ऐकले. त्याचे हे चाळे पाहून देशातील लोकांचा संतापही अनावर झाला. मात्र त्यांचे नेते गप्प होते. त्यामुळे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या भडकला आणि त्याने सर्वांना गाठून त्यांच्या प्रतिक्रिया गुपचूप टेप करून माझ्याकडे पाठवून दिल्या. त्यात तिरकीटला गाठून घेतलेली त्याची स्वतंत्र प्रतिक्रियाही आहे.
– बोला, तिरकीटजी, एकूण किती व्हिडीओ क्लिप्स बाहेर आल्या?
– हा माझा खासगी मामला आहे. तो माझी बदनामी करण्यासाठी टेप केला असेल तर त्याला मी घाबरत नाही. दुसर्याला ब्लॅकमेल करून आज महाराष्ट्रात माझ्यामुळेच पक्षाचा इतका विस्तार झाला हे तुम्हीच काय, पंतप्रधानही नाकारू शकत नाहीत. मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले हे खरे असले तरी मी त्याचा पुरेपूर आनंद लुटला. आनंद त्यागात नाही, तर भोगात आहे ही माझी फिलॉसॉफी आहे.
– पण तुम्ही जे केले ते…
– माझ्या नकळत पकडले गेले. पण माणसाची निर्मितीच ज्या गोष्टीतून होते तिला तुम्ही त्याज्य कसे मानता?
– इंद्रियसुखाला चटावलेल्या तुमच्यासारख्या लंपट आंबटशौकीनाने तत्वज्ञान शिकवू नये. मी तुमच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतो.
– नमस्कार फोडणवीस साहेब. तुमच्या तिरकीट…
– थांबा. मी विधानसभेत यावर योग्य उत्तर दिलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि कुणाचीही गय केली जाणार नाही.
– पण या प्रकाराने तुमच्या पक्षाची अब्रू गेली त्याचे काय?
– काही अब्रू बिब्रू जात नाही. दुसर्याची बदनामी करण्याचे प्रकार सगळीकडेच सुरू असतात.
– पण हे प्रकार तर इतके भयानक, गलिच्छ आणि विकृतीचा कळस आहेत. तुम्हाला दोन महिन्यांपासून हे प्रकार माहीत होते असं म्हणतात.
– अजिबात नाही. खोटं आहे ते.
– त्या क्लिप्स बनावट आहेत, असं तर आपल्याला म्हणायचं नाही ना?
– त्या तज्ज्ञांकडे तपासायला दिल्या आहेत. तेच योग्य तो निर्णय देतील.
– म्हणजे तोमय्यांना आणि तुमच्या पक्षाला अनुकूल असाच ना. पण, लाखो लोकांनी जे बघितलंय ते खोटं तरी कसं म्हणणार?
– या तुम्ही.
– नमस्कार छप्पन्नखुळेजी. त्या तिरकीट सो…
– आमचा पक्ष संस्कारनिष्ठ आणि संस्कृतीनिष्ठ आहे. दुसर्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त करण्याला मी अमानुषपणा म्हणतो. ही एक विकृती आहे. मी त्या वृत्तीचा निषेध करतो.
– पण याच तोमय्यांनी खोटेनाटे आरोप करून, ईडी लावून कितीजणांना बदनाम केलं, शिक्षा भोगायला तुरुंगात पाठवलं. जे नमले त्या भ्रष्टाचार्यांना पक्षात प्रवेश करायला लावून त्यांचं शुद्धीकरण केलं. या पापांचं तुम्हाला काहीच वाटत नाही?
– ते पाप नव्हते, तर तो विरोधकांना लावलेला चाप होता. मी म्हणेन तिरकीटजी आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं… आता जा तुम्ही.
– नमस्ते चीपक फेसरकरजी. त्या किरी…
– समजलो. खरं म्हणजे त्या दानवेंनी मलाही एक ३८ क्लिप्सचा पेन ड्राईव्ह द्यायला हवा होता. कारण माझ्या सदर विषयाच्या डीप अभ्यासामुळे मला बारकावे ज्ञात आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यातील एकाच गोष्टीचा काही लोक फार बाऊ करतात. हे योग्य नाही.
– म्हणजे तुम्ही त्या कामपिसाटाचे समर्थन करता?
– मुळीच नाही. ते एक प्रतीक आहे. दोष त्यांचाही नाही आणि त्याचे छायाचित्रण करून ते दाखवणार्यांचाही नाही. ही घटना अभ्यासनीय आहे.
– अहो, अभ्यासनीय नाही तर असभ्य आणि मानवातल्या पशुतुल्य प्रवृत्तीचं उदाहरण आहे. मी त्या शेलारमामांना गाठतो.
– नमस्कार शेलारमामा. अहो हे चाललंय काय! त्या कि…
– मला नको त्या विषयावर बोलायला लावू नका.
– का नको? हेच जर विरोधी आमदारांपैकी एखाद्याच्या बाबतीत घडलं असतं तर तुम्ही आकाशपाताळ एक केलं असतं.
– हे बघा. तोमय्याचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे हे सर्वांना माहीत आहे. तरीही मी त्यावर भाष्य करणार नाही.
– पण त्यांच्या कृत्याने तुमच्या भाजपची अब्रू चव्हाट्यावर आली त्याचं काय?
– मी पक्ष आणि नेत्याचं खासगी जीवन यात तफावत मानतो. प्रत्येकाचे कर्म तो तो निस्तरेल.
– असं बोलून तुम्ही हात झटकताय. त्या कृत्याचे तुमच्या पक्षावर किती गंभीर परिणाम होतील याची कल्पना आहे ना तुम्हाला! सांगा ना वरिष्ठांना की हाकलून द्या त्यांना पक्षातून. या भक्षकाला का पाठिशी घालता?
– मी कुणालाही पाठिशी घालत नाही. आमचा एवढा लेचापेचा पक्ष नाही. त्याची मुळं खोलवर पसरत आहेत.
– कळलं त्या क्लिपवरून. त्या प्रवीण मजूरभाऊंना गाठतो. नमस्कार प्रवीण भाऊ.
– माझ्या दृष्टीने ही फार गंभीर घटना नाही. हे सगळं प्रीप्लॅन्ड आहे. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. त्याचा मी निषेध करतो. हा मोठा कट आहे एवढे निश्चित. आता पोर्हेताईंकडे तो पेन ड्राईव्ह दिला आहे. त्या काय तो निर्णय देतील.
– बरं झालं तुम्ही त्यांचं नाव घेतलंत. जातोच त्यांच्याकडे.
– नमस्कार ताई. पेन ड्राईव्ह पाहिलात का तुम्ही?
– मी पाहिला नाही आणि पाहणारही नाही.
– तुम्ही नेहमी स्त्रीवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवता. तुमची प्रतिक्रिया ऐकायला सारा महाराष्ट्र उत्सुक होता. पण तुम्ही साफ निराशा केलीत.
– हे पहा, मी सभागृहाची…
– कळले… आता तुम्हीही धरणार आळीमिळी गुपचिळी!