शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी आहे… त्यानिमित्त विशेष लेख!
– – –
दिल्लीत राहणारे एक प्रथितयश इंग्रजी माध्यमाचे मराठी पत्रकार २०२२ साली महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटायला आले होते. भेट झाल्यावर माझ्याशी बोलताना ते अगदी पैजेच्या सुरात ते म्हणाले की ४० आमदार गेल्यावर विचारधारा आणि दिलेला शब्द वगैरे काही नसतं. उद्धव ठाकरे हेही नक्कीच शिंदे सरकारसोबत जाणार आणि पक्षाची फूट थांबवणार. त्यांना मी अतिशय आत्मविश्वासाने सांगितलं की उद्धवजींचा नीतीश कुमार होणार नाही (तेव्हा नीतीश कुमार भाजपासोबत गेले होते). त्या पत्रकाराने अत्यंत नम्रपणे पण ठामपणे माझं म्हणणं खोडून काढलं… आमच्यापैकी कोण बरोबर ठरणार, याचं उत्तर काळाच्या कुपीतच दडलेलं होतं. या घटनेला आणि भेटीला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. उद्धवजी आजही तमाम वैयक्तिक आणि राजकीय आव्हानांशी दोन हात करत खमकेपणाने टिकून आहेत, एवढंच नाही तर विरोधकांच्या ‘इंडिया’ एकजुटीत भारतीय लोकशाही वाचवण्याच्या प्रक्रियेचाही ते एक प्रमुख घटक आहेत. तेव्हा खरोखरच पैज लावली असती, तर ती आज मीच जिंकली असती.
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असं रसायन आहे जे २०१९ सालापासून मराठी असणं हे नेमकं काय असतं याचं जिवंत उदाहरण बनून बसले आहेत. राजकारणात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उंचीच्या नेत्याचा सुपुत्र असल्यावर काही गोष्टी आपोआपच सोबत येत असतात. कार्यकर्त्यांचा राबता म्हणा, हांजी होजी करणारे म्हणा आणि सत्य सांगण्याऐवजी केवळ तरफदारी करणारे म्हणा, असे अनेक लोक ओघानेचे आसपास येणारच. हे केवळ शिवसेना या एकाच पक्षाला लागू होत नाही. संपूर्ण भारतीय राजकारणाचा गाभाच जिथे हुजरे आणि मुजरेगिरीवर टिकला आहे, तिथे वेगळं काय होणार? पण अशा माहौलात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपलं सत्व जपलं, स्वाभिमान जपला आणि निर्णयाचं पक्केपण दाखवून दिलं. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी हे दाखवून दिलं आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानाच्या काळातही हे जपून ठेवलं.
मे २०२२ला जेव्हा शिवसेना बंडाला सामोरी गेली आणि मविआचं सरकार पडलं, तेव्हा लेखक आणि सारा महाराष्ट्र या उदात्त गोष्टीचा साक्षी ठरला की क्षणात उद्धवजी आणि त्यांच्या परिवाराने वर्षा या मुख्यमंत्री निवासाचा भव्य प्रासाद तात्काळ सोडला. तेव्हा रस्त्यारस्त्यावर जमलेली गर्दी पाहिल्यावर कोणाच्याही लक्षात आलं असेल की सरकार पाडण्याचा प्रयोग हा जनविरोधी आणि महाराष्ट्रविरोधी आकसापोटीच झाला होता. उद्धवजी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून किती लोकप्रिय होते, त्यावरही हे शिक्कामोर्तबच होते.
उद्धव ठाकरे हे नेमकं काय रसायन आहे, या नेत्याचा पोत काय आहे, याचं विश्लेषण राजकीय अंगाने आणि किस्से-कहाण्यांचा अंगाने नक्कीच करता येईल. पण असं विश्लेषण हे त्यांना न्याय देणारं ठरणार नाही. मला असं स्पष्ट वाटतं की या लेखनप्रपंचाला न्याय देण्याकरता या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण हे मनोवैज्ञानिक पद्धतीनेच करायला हवं.
आक्रमक पक्षाच्या, आक्रमक नेत्याचा मृदुभाषी मुलगा असण्यापासून ते हिमालयाची सावली बनण्यापर्यंत उद्धवजींच्या स्वभावाचे अनेक आडाखे लोकांनी बांधले आहेत. पण मला असं वाटतं की उद्धव बनणं काय असतं हे जाणून घ्यायचं असेल, तर त्यांच्या आयुष्यातील चार टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत. एक २००३, दुसरा २०१२ आणि तिसरा २०१९ आणि चौथा हा २०२२. या टप्प्यांतूनच राजकीय वारस ते स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्त्व हा प्रवास उद्घृत होतो. या चार टप्प्यांपैकी दोन टप्पे हे बाळासाहेबांच्या निधनानंतरचे आहेत, हे जाणणंही महत्वाचं आहे. आणि इथेच आपल्याला उद्धव ठाकरे हे २.० व्हर्जनमध्ये आलेले दिसतात.
२००३ साली पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनल्यावर शिवसेना पक्षातील बरेच नेते बाळासाहेबांच्या शैलीच्या पार्टीत काम करायची सवय झालेलेच होते. २००५ला नारायण राणेंनी पक्ष सोडला. त्यानंतर काही काळातच राज ठाकरे यांनीही शिवसेनेला राम राम ठोकला. बाळासाहेब नसताना आणि त्यांच्या पिढीतले अनेक नेते वयोवृद्ध झाले असताना आणि उद्धवजींच्या वयाच्या नेत्यांनी पक्ष सोडला असताना या पक्षाला तारायची कसरत त्यांनाच करावी लागणार होती. उद्धव यांच्या नेमस्त शैलीमुळे आता त्यांच्या काळात पक्ष संपला, पक्ष संपला अशा अनेक वल्गना प्रसारमाध्यमांमध्ये आणि विरोधकांमध्ये झाल्याच. पण या सगळ्या विरोधाच्या माहौलमध्ये आपत्तींसमोर झुकतील ते उद्धव ठाकरे कसले!
२०१२ साली बाळासाहेब गेले तो पक्षासाठी अत्यंत कसोटीचा काळ होता. उद्धवजींनी पक्षाची धुरा सांभाळून जवळजवळ दशक लोटलं होतं. पण साथी, छोटा भाऊ आणि १९८९पासून झालेल्या युतीचा सहकारी मित्र म्हणून जाणला जाणारा भाजप पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठी स्वप्नं पाहात होता. आणि या शत-प्रतिशत भाजपाच्या स्वप्नांच्या आणि वल्गनांच्या ऐरावताच्या पायाखाली चिरडलं जाणार होतं प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व. तरीही उद्धव यांनी आपली सहयोगी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे वठवली. २०१४च्या लोकसभेच्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा विजयानंतर भाजप युतीमधल्या मोठ्या भावाच्या भूमिकेत अगदी सहज शिरला. राज्यातले चारही पक्ष स्वतंत्र लढले. अशा परिस्थितीत प्रचंड स्पर्धा असताना ६३ जागा शिवसैनिकांच्या पाठबळावर जिंकून आणण्याचं कर्तब उद्धवजींनी करून दाखवलं. नंतर युतीत राहून सुद्धा आणि कायम दुय्यमपणाची वागणूक सहन करावी लागत असताना शिवसेनेने हा कठीण संसार कायम भाजपाला आरसा दाखवत पार पाडला.
राजकीय विश्लेषणाच्या क्षेत्रात एक बरंच प्रचलित वाक्य आहे. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. अशा परिस्थितीत उद्धवजी स्वत:ला आणि त्यांच्या पक्षाला ‘एकला चलो रे’ची साद घालत शक्यतांची भीमउडी घ्यायला तयार करत होते. २०१९मध्ये जे झालं तो याच भीमउडीचा आविष्कार होता. दिल्लीपुढे न झुकणार्या मराठी बाण्याचा, कावेबाजांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा आणि केवळ युद्ध नाही तर तहातही बुलंद राहणार्या महाराष्ट्राचा हा खाक्या होता. हाच खाक्या दाखवून कोविडच्या काळात केंद्रात विरोधी सरकार असतानाही राज्याचा डोलारा सांभाळता सांभाळता कोविडचा प्रसार रोखण्याचं कामही उद्धवजींनी लीलया सांभाळलं. प्रशासनाचा अनुभव नसला तरी सहकार्यांना एकत्र घेऊन अशक्यसम वाटणारा मविआचा प्रयोग शक्य करून दाखवण्याचं काम उद्धवजींनी केलं.
हे सरकार दिल्लीश्वरांना खुपलं नसतं तरच नवल. ऐन रात्री घात केला गेला आणि ४० विश्वासू शिलेदारांना फोडून नवीन सरकार स्थापन झालं. पक्ष, नेता आणि नाव सगळं लंपास करायचा प्रयत्न झाला. आजारपणाचा त्रास कमी होता म्हणून की काय, ज्या सहकार्यांना राजकारणात तारून नेलं, अशाच लोकांकडून उद्धवजींना विश्वासघाताला सामोरं जावं लागलं. इतकं होऊन सुद्धा स्थितप्रज्ञ बनून स्मितहास्याने आणि धैर्याने त्यांनी सगळ्याचा सामना केला.
पक्षाची आणि त्याच्या विचारांची इतकी मोठी नवमांडणीही विरळीच. शिवसेनेला आता खर्या अर्थाने राष्ट्रीय केलं जातंय. हिंदुत्वाचीच गोष्ट करायची तर आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि टाळ कुटणारं नाही हे राजकीय परिणामांची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे आणि धर्माच्या नावावर मतांची पिकं काढणार्यांना चांगली चपराक दिली आहे. अर्ध्याहून अधिक आमदार-खासदारांची फौज विरोधकांच्या दावणीला गेली असताना पक्षाला भविष्याशी जोडणं हे फक्त आपल्या लोकांच्या आणि आपल्या कुवतीवर प्रचंड विश्वास असणारी व्यक्तीच करू शकते.
शिवसेना हा पक्ष बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात उद्धवजींचा वाढदिवस अनेक बदलांची नांदी घेऊन येणारा आहे. राष्ट्रगाडा हाकायला महाराष्ट्रात यशस्वी होणं हे पुढच्या लोकसभेत आवश्यक असणारच आहे. अशात ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा बी कुणाची’ हा आशावाद एकनिष्ठ शिवसैनिकांना ते देत आहेत.
राजकीय पक्ष आणि विचारधारा या फक्त निवडणुकीमागून निवडणुका जिंकण्यासाठी नसतात. आपल्या लोकशाहीत भविष्यात कसा समाज हवा आहे हे नक्की करायला अगोदर कसे राज्यकर्ते हवे आहेत, हे नक्की करणं खूप महत्वाचं असतं. कारण जिंकण्यासाठी जमीन सुपीक असो वा नसो, लोकसेवेचा वारसा तुटला आणि व्यक्तिपुजेला बांधला गेला की सगळं संपलंच. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि उन्मत नीरोंचा फिडेल खेचून घेण्यासाठी सौम्य पण निश्चयी, सर्वसमावेशक आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेच्या कक्षेच्या बाहेर येणारं नेतृत्व देशाला अत्यंत गरजेचं आहे आणि हे नेतृत्वगुण दाखवून भविष्यातला समाज बांधण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज त्यांचे यश राजकीय असो किंवा लोकांमध्ये उद्धवजींबद्दल असणारी आस्था असो, ही वारसाहक्काने आलेली कमाई नाही तर स्वत:च्या बळावर कमावलेली आपकमाई आहे. म्हणूनच ऊर्दू भाषेतला हा शेर उद्धवजींना चपखल बसतो,
गिरते हैं शहसवार ही मैदाने जंग में,
वो तिफ्ल क्या गिरें
जो घुटनों के बल चले
भविष्य असो किंवा इतिहास असो… तो लढणार्यांच्याच नावे लिहिला जातो… गुडघे टेकणार्यांच्या नव्हे; महाराष्ट्राचा भावी राजकीय इतिहास उद्धवजींच्या नावाने लिहिला जाईल, हे निश्चित.