□ बिहारमध्ये आरक्षण ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय हायकोर्टात रद्द.
■ आता महाराष्ट्रात काय होणार? किती दिवस हे सरकार संवेदनशील मुद्द्यांवर थापेबाजी करत राहणार? किती दिवस कोंबडी झुंजवणार, महाराष्ट्राचं नुकसान करणार?
□ पदवीधर निवडणुकीच्या मतदारयादीतून शिवसेनेच्या १२ हजार मतदारांची नावे बाद.
■ आणि वर निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा केला की त्यावर हे चौकशा बसवणार, नोटिशी पाठवणार… निवडणूक आयोग काही आकाशातून पडलेला नाही, जनतेला तोही उत्तरदायी आहेच.
□ मोदींपेक्षा जास्त मतं आमच्या सुप्रियाला मिळाली – शरद पवारांचा चिमटा.
■ वाराणसीमधले भाजपचेच कार्यकर्ते सांगतात की शेवटच्या क्षणी जमवाजमव केली नसती तर कदाचित मोदी वायकरांच्या रांगेत येऊन बसले असते. मोदींपेक्षा शहा, शिवराज मामा यांची कामगिरी दमदार आहे त्यांच्याच पक्षात… तेही बायॉलॉजिकल असून.
□ मोदी युक्रेन युद्ध थांबवू शकतात, पण पेपरफुटी थांबवू शकत नाहीत – राहुल गांधी यांनी पुन्हा ठोकले.
■ मोदी असं काही करू शकतात, यावर आता त्यांच्या भक्तांचाही फारसा विश्वास राहिलेला नाही. ‘वॉर रुकवा दी पापा’ ही जाहिरात तर विनोदाचा विषय म्हणूनच लोकप्रिय झाली होती. पेपरफुटी कसली थांबवतायत ते?
□ ४,३०० कोट्यधीश हिंदुस्थान सोडणार.
■ …आणि तिथे जाऊन इकडच्या लोकांना देशभक्ती शिकवणार? इतक्या अतिप्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या महासत्तेला सोडून कुठल्या तरी चिरकुट देशांमध्ये जाऊन वसण्याची त्यांना का अवदसा आठवत असेल?
□ पराभवाच्या भीतीने मिंध्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकाही तीन महिने पुढे ढकलल्या.
■ विधानसभा निवडणुका तर होतीलच. तिथे यांना गाशा गुंडाळून हाकलून देणार आहेतच लोक. त्यानंतर काय करणार? आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलत राहणार आहेत हे लोक?
□ सरकार नेमके करतेय काय? – बालसुधारगृहातील सुरक्षेच्या प्रश्नावरून हायकोर्ट संतापले.
■ हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला गेली दोन वर्षं पडलेला आहे… हायकोर्टाला आत्ता पडलाय!
□ मुंबई महापालिकेत ५२ हजार कर्मचार्यांची पदे रिक्त; कारभार चालणार कसा?
■ ते निवडणुकीच्या कामात निवडणुका झाल्यावरही गुंतलेले होते, ते तरी आले का परत? की आता विधानसभा निवडणुकीनंतरच परत येणार?
□ भाजपच्या दोन गटांमध्ये राडा; व्हिडिओ व्हायरल.
■ इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये कधी ना कधी खड्डा खणणाराही पडतोच… दुसर्यांच्या घरांना आगी लावणार्यांचं घर जळताना पाहण्यात मौज वेगळीच असते.
□ रस्त्यांवरील अतिक्रमण हे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे – हायकोर्टाने फटकारले.
■ रस्त्यांवरचे खड्डेही त्यांच्यामुळेच पडतात, त्याचं काय? रस्ते हे अधिकारी आणि पुढार्यांच्या समृद्धीचे महामार्ग आहेत, असं म्हणतात ते काय उगाच?
□ बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी पुराव्यांमध्ये हेराफेरी केली – उच्च न्यायालयात पुणे पोलिसांची कबुली.
■ का बिचार्यांना छळता? अशा कोणत्या हाय प्रोफाइल केसमध्ये पोलिस हे करत नाहीत? हाच रिवाज आहे. यावेळी प्रकरण दाबता आलं नाही, हा काय पोलिसांचा दोष?
□ वाढवण बंदराविरोधात संताप; सरकारचा पुतळा जाळला.
■ तरीही बंदर केलं जाणारच. असले महाप्रकल्प रेटताना लोकांची समजूत काढणं, त्यांना न्याय्य नुकसान भरपाई देणं, त्यांच्या हिताच्या, जगण्याच्या आड येणारं काहीही घडू न देणं, याच्या जबाबदार्या घेणं या सरकारने कधी स्वीकारलं होतं, जे आज स्वीकारतील?
□ मुंबईत अजूनही नाल्यांची साफसफाई बोंबललेलीच.
■ आता पावसाळाभर बोंबलण्याशिवाय कोणी काही करू शकत नाही. मग पुन्हा पुढच्या उन्हाळ्याच्या अखेरीस हजारो कोटी रुपये नाल्यांमध्ये अर्पण केले जातील आणि उपनाल्यांनी टक्केवारीच्या रूपात बाहेर पडतील.
□ राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका; ठोठावला तीन हजार रुपयांचा दंड.
■ शहाण्याला शब्दांचा मार. नार्वेकरांपुढे तो फजूल आहे… ते कमालीचे निगरगट्ट आहेत, मनाला लावूनही घेणार नाहीत.
□ अटल सेतूला तीन महिन्यांतच भेगा; रस्ता एक फूट खचला.
■ मोदी की गॅरंटी म्हणतात ती हीच!
□ कारखानदारांच्या केमिकल लोच्यामुळे भिवंडीची कामवारी नदी फेसाळली; प्रशासनाचे दुर्लक्ष.
■ नदीच्या जागी अजून फेसाळलेलं का होईना पाणी आहे, उंच इमारती उभ्या राहिलेल्या नाहीत पात्र बुजवून, हीच केवढी मोठी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टी पण लक्षात घ्या.
□ मतदार ओळखपत्रांचे पोते टेम्पोतून पडले; कल्याण पालिकेची अशीही बनवाबनवी.
■ ओळखपत्रं तरी खरी होती की बनावट?
□ नीट-नेट परीक्षेतील घोटाळ्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कठोर कारवाई करणार.
■ विरोधी पक्षांनी रेटा लावला नसता तर प्रधानजी ‘कुठे काय, काहीच घडलेलं नाही’ असा कांगावा करत बसले असते. आपणहून चुका स्वीकारण्याइतका मोठेपणा त्यांच्या परिवारात शिकवला जात नाही.
□ वायकरांचा विजय अवैध घोषित करा; निकाल स्थगित करा – हायकोर्टात याचिका दाखल.
■ वायकर पुढची पाच वर्षं जिथे कुठे जातील, तिथे तिथे लोक निवडणूक चोरलेला खासदार आला, हेच म्हणणार आहेत… यापेक्षा ती निवडणूक रद्द झालेली बरी!