प्रबोधनकार पुण्यात स्थिरावले तो काळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा होता. छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर या वादाने परस्परद्वेषाची परिसीमा गाठली होती. तेव्हा केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुण मराठा नेत्यांचं नेतृत्व पुढे आलं आणि प्रबोधनकार जणू त्यांचे मार्गदर्शक बनले.
– – –
१९२५ सालच्या एप्रिल महिन्यात प्रबोधन पुण्यात पुन्हा एकदा सुरू झाला. खर्या अर्थाने पुणे हे प्रबोधनकारांचं कार्यक्षेत्र बनलं. पुण्यात येण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. पण योगायोग असे घडले की ते पुण्यात स्थिरावले. विरोध आणि अडचणींवर मात करून त्यांनी पुण्यावर आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. प्रबोधनकार सांगतात तसं त्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत आडवा विस्तव जात नव्हता. खरा जातीयवाद त्या काळीच उफाळलेला होता.
अशा काळात ब्राह्मणेतर आंदोलनातले आघाडीचे विचारवंत म्हणून महाराष्ट्राला माहीत असलेले प्रबोधनकार पुण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणेतर आंदोलनात नवा उत्साह आला आणि दिशाही मिळाली. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर हे तरुण ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करत होते. प्रबोधनकार पुण्यात पोचल्यानंतर लगेचच दोघांच्याही प्रबोधनकारांसोबत प्रबोधन कचेरीत रोजबैठका होऊ लागल्या. त्यांच्यासोबत अस्पृश्यांचे नेते पांडुरंगराव राजभोज असायचेच, पण आश्चर्य म्हणजे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव रामभाऊ आणि श्रीधरपंत हे दोघेही या बैठकींना नेहमी येऊ लागले. त्यामुळे ठाकर्याने टिळकांच्या पोरांना नादाला लावलं, असं पुणेकर म्हणू लागले. पण प्रबोधनकारांनी या कुणालाच आपल्याकडे बोलावलं नव्हतं. आपण बरं आपलं काम बरं, असा त्यांचा खाक्या होता. पण या बैठकांमुळे आणि प्रबोधनमधल्या दमदार मांडणीमुळे प्रबोधनकारांकडे या चळवळीचं वैचारिक नेतृत्व आपोआप आलं.
फक्त पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी कंपूचं वैचारिक नेतृत्व इतिहासाचार्य वि. का. राजवाडे करत होते. प्रबोधनकारांनी `कोदण्डाच्या टणत्कार’मधून त्यांच्याशी थेट पंगा घेतला होता. या आणि त्यानंतर आलेल्या पुस्तकांमधून त्यांनी राजवाडेंच्या इतिहासलेखनाची ब्राह्मणी मांडणी साधार खोडून काढली होती. त्यानंतर प्रबोधनने वेदोक्त विरुद्ध ब्राह्मणोक्त वादावर बहुजनांची बाजू जोरकसपणे घेतली होती. लोकमान्य टिळकांवर घणाघाती टीका करत शाहू महाराजांची थोरवी ठामपणे सांगितली होती. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कोनशिला ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातून उभारण्यात आली. त्याच्या वादातही प्रबोधनकार ब्राह्मणेतर बाजू घेऊन लढले होते. छत्रपती शाहू महाराजांचा प्रबोधनकारांवर मोठा प्रभाव होता. ब्राह्मणेतर चळवळीत त्यांनी शाहू महाराजांचं नेतृत्वच स्वीकारलं होतं. छत्रपती शाहू हा प्रबोधनकारांना जेधे-जवळकारांशी जोडणारा महत्त्वाचा सेतू होता. कारण त्यांच्या जडणघडणीतही शाहू महाराजांचंच योगदान महत्त्वाचं होतं.
केशवराव जेधेंचा जन्म १८९६ सालचा. म्हणजे ते प्रबोधनकारांपेक्षा अकरा वर्षांनी लहान. कान्होजी जेधेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संग्रामात हिरीरीने भाग घेतला होता. तसेच त्यांचे वंशज असणारे केशवराव जेधे आणि त्यांचे थोरले बंधू बाबूराव जेधे हे छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या संग्रामात आघाडीवर असत. शाहू महाराजांचं बाबूरावांवर विशेष प्रेम होतं. ते पुण्यात आले की बाबूरावांना भेटतच. एकदा शाहू महाराजांनी पुण्यात असताना वडिलांचं श्राद्ध करायचं ठरवलं, तेव्हा पितर म्हणून बाबूराव आणि त्यांच्या सहकार्यांना जेवायला बोलावलं होतं. जेधेंच्या एकत्रित कुटुंबाचं जेधे मॅन्शन हे घर तेव्हापासूनच सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचा बालेकिल्ला बनलं होतं.
जुन्या वळणाच्या ब्राह्मण पुरोहितांनी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्रांनी पूजा करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेतली. मंडालेतला कारावास भोगून पुण्यात आलेल्या लोकमान्य टिळकांनी ब्राह्मणांचं समर्थन केलं. त्यामुळे नव्याने सुशिक्षित झालेला बहुजन समाज छत्रपती शाहूंच्या नेतृत्वात अस्मितेच्या लढाईला सज्ज झाला. राजकारणापासून फटकून राहणार्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या अनुयायांना या संघर्षामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या रुपाने राजकारणात यावं लागलं. लोकमान्य टिळकांना देशभरात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व म्हणून मान्यता मिळत असतानाच त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे पुण्यात ब्राह्मणेतर चळवळीने त्यांना आव्हान दिलं. या काळात होणार्या वैचारिक घुसळणीत केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर हे पुण्यात राहणारे दोन तरुण शाहू महाराजांकडे ओढले गेले.
दिनकरराव जवळकर यांना समाजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. त्यांचा जन्म १८९८चा. म्हणजे ते प्रबोधनकारांपेक्षा तेरा वर्षांनी लहान. ते जेधे मॅन्शनमधून चालणार्या ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय होते. त्याच काळात १९१८ साली पटेल बिलाचं प्रकरण पुढे आलं. आंतरजातीय लग्नांना कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून वल्लभभाई पटेलांचे थोरले भाऊ विठ्ठलभाई पटेल यांनी कायदेमंडळात विधेयक मांडलं होतं. ब्राह्मण आणि क्षत्रियांची बीजं धर्मदृष्ट्या अशुद्ध होतील म्हणून केसरीकारांनी त्याला विरोध केला. टिळकवाद्यांनी किर्लोस्कर थिएटरात शंकराचार्यांच्या न्ोतृत्वात पटेल बिलाला विरोध करण्यासाठी मोठी सभा घेतली. त्यामुळे जेधे मॅन्शनमधल्या कार्यकर्त्यांनी
किर्लोस्कर थिएटरातच सभा घेऊन पटेल बिलाला समर्थन करण्याची सभा घेण्याचं ठरवलं. पण टिळकवादी ब्राह्मणी गुंडांनी ती सभा उधळून लावली. तिथे टिळकांचा गायकवाड वाडा आणि जेधे मॅन्शन यात पहिली ठिणगी पडली. जवळकरांनी पटेल बिलाच्या मुद्द्यावर प्रणयप्रभाव नावाचं नाटक लिहिलं होतं. टिळकवाद्यांनी त्याचेही प्रयोग होऊ दिले नाहीत.
याच दरम्यान टिळक विलायतेतून परतले असताना त्यांच्या अनुयायांनी त्यांना पुणे शहरातर्फे मानपत्र देऊन सन्मान करायचं ठरवलं. त्याला विरोध करणारी सभा जेधे मॅन्शनमधे झाली. या काळात मवाळ आणि ब्राह्मणेतर हे जहालांविरुद्ध एकत्र लढत होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रँग्लर परांजपे अशी ज्येष्ठ मंडळी तेव्हा जेधे मॅन्शनमधल्या सभांना नियमित हजेरी लावत होती. पुणे महानगरपालिकेने १४ वर्षाखालील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा प्रस्ताव आणला. टिळकवाद्यांनी त्यालाही विरोध केला.
त्यांचं म्हणणं होतं की हा निर्णय फक्त मुलग्यांसाठीच असावा, मुलींसाठी नाही. त्यावर महर्षी शिंदेंनी मोहीम चालवली. प्रस्तावावर लोकमत आजमावण्यासाठी झालेल्या सभेत लोकमान्य टिळकांसमोर ब्राह्मणेतर तरुणांनी गोंधळ घातला. टिळकांवर अंडी आणि भज्या फेकण्यात आल्या. त्यानंतर सोलापूरमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अधिवेशनातही या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला.
याच काळात शिवस्मारक समितीत टिळकवाद्यांना घेण्यावरून ब्राह्मणेतरांमध्येच वाद रंगला. त्यात केशवराव जेधेंच्या नेतृत्वात तरुण मंडळी थेट बड्या मराठा संस्थानिकांच्या विरोधात उभी राहिली. ब्राह्मणेतर पक्षाची जुनी मंडळी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर लढण्यास उत्सुक नव्हती. पण तरुणांना मात्र हा प्रश्न महत्त्वाचा वाटत होता. ते जेवणाच्या सर्वजातीय पंगती आयोजित करत होते. महर्षी शिंदे आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यांसाठीच्या लढ्याला सक्रिय समर्थन देत होते. शिवाय प्रस्थापित विरुद्ध नवे असाही संघर्ष होता. प्रबोधनकारांनी तो असा मांडला आहे, अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव वगैरे पुढारी मंत्रीपदाचा डाग लागल्यामुळे जनता संपर्काला असून नसून सारखे झाले होते. बामणेतरांचे पुढारी सरकार दरबारात मंत्री म्हणून कारभार पाहू लागले म्हणजे बहुजन समाजात सर्वांगीण उत्कर्ष हा हा म्हणता होईल, हा एक सिद्धांत सर्व सभांतून घोषणेसारखा बडबडला जात असे. लठ्ठे, जाधवराव, कूपर, कंबळी वगैरे अर्धा डझन बामणेतर पुढारी मंत्रीपदाची बिरुदे लेवून आंग्लाई कारभारात बसली आणि त्या घवघवत घोषणेचा बहुजन समाजाचा संपूर्ण भ्रमनिरास झाला! चळवळ जवळजवळ निर्नायकी होत असताना जेधे आणि जवळकर हे दोन तरुण मराठे चळवळींच्या अग्रभागी येऊन ठाकले. आंदोलनाला एक न्याराच लढाऊ रंग चढला.
दिनकरराव जवळकर यांच्या लेखणीची धार लक्षात आल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना बाबूराव यादव या विश्वासू सहकार्याच्या मार्फत कोल्हापुरात बोलावून घेतलं होतं. त्यांच्या लेखणीला राजाश्रय मिळताच ती तेजाने तळपू लागली. ‘तरुण मराठा’ नावाचं वृत्तपत्रं ते चालवत. जवळकरांची लेखणी इतकी जहाल होती की त्यामुळे ब्राह्मणांनी धसका घेतलाच, पण ब्राह्मणेतर पुढार्यांनाही ती पचली नाही. औंधच्या पंतप्रतिनिधींनी ब्रिटिश अधिकार्यांकडे `तरुण मराठा’तल्या ब्राह्मणविरोधी लिखाणाविरुद्ध तक्रार केली. त्यामुळे शाहू महाराजही अडचणीत आले. त्यांनी ब्रिटिश अधिकार्याला पत्र लिहून सांगितलं की त्यांनी जवळकरांना कोल्हापूर सोडण्यास सांगितलं आहे. पण शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर जवळकर कोल्हापुरात असावेत. पण त्यानंतर ग्वाल्हेर, इंदूर अशा संस्थानांमध्ये काही काळ घालवून ते पुण्यात पोचले. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज हे ब्राह्मण ब्राह्मणेतरांचं लोकोत्तर नेतृत्व तोवर काळाच्या पडद्याआड गेलं होतं. भीषण जातिवादाचं वातावरण पुण्यात तापलं होतं. त्यात केशवराव जेधेंसारख्या उत्तम संघटकासोबत जवळकरांसारखे अतिजहाल लेखक आणि वक्ते जोडले गेले.
जवळकरांनी पुण्यात आल्यावर आधी ‘तरुण मराठा’ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. काही अंक काढलेही. त्यानंतर जेधे जवळकरांनी मिळून मजूर नावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण तेव्हा प्रेस अॅक्टची फारच कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे गरज पडल्यास तुरुंगात जाण्याची तयारी असलेल्या व्यक्तीकडे नावापुरती मालकी देण्यात येत असे. त्यानुसार कम्पोझिटर असणार्या रामचंद्र नारायण लाड यांचं नाव मालक, मुद्रक, प्रकाशक म्हणून ‘मजूर’वर छापून येत असे. पण त्यात प्रामुख्याने दिनकरराव जवळकरच एकटाकी लिहीत. त्यांची भाषा भलतीच तिखट होती. जशास तसं उत्तर देण्यासाठी ते प्रसंगी शिवराळ आणि बदनामीकारक टीकाही करत. त्याला उत्तर देण्यासाठी ब्राह्मणी कंपूने नेहमीचा मार्ग अवलंबला. टिळकभक्त गणपतराव नलावडे या बहुजन नेत्यांच्या नावाने `संग्राम’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण त्यात नानासाहेब गोखले, ह. वि. जोशी असे ब्राह्मण लेखकच नलावडेंच्या नावाने लिहीत.
‘मजूर’ आणि ‘संग्राम’मधला संघर्ष हा त्या काळातल्या चर्चेचा विषय होता. `संग्राम’ चित्रशाळेच्या अद्ययावत छापखान्यात छापला जात असे. तर ‘मजूर’ साधं सिलेंडर मशीन तीन रुपये भाड्याने घेऊन छापलं जात असे. प्रबोधनकारांनी त्यांच्यातल्या संघर्षाची ही मस्त गाेष्ट सांगितली आहे, ती अशी, दोन्ही पत्रे दर शनिवारी सकाळी बाहेर पडत असत. त्यात मौज अशी की त्या दिवशीच्या संग्रामातल्या अग्रलेखाला त्याच दिवशी मजूरचा अग्रलेखी ठणठणीत टोला हाणलेला असायचा. सगळ्या पुण्याभर हा एक तर्कवितर्कांचा आणि अचंब्याचा प्रश्न झाला होता. चित्रशाळेतले मराठी कंपोझिटर किती झाले तरी बामणेतरी चळवळीचे अभिमानीच असणार. संग्रामचा अग्रलेख कंपोज होऊन त्याच्या फायनल प्रुफाच्या दोन प्रती ते काढीत. त्यातल्या एकीचा चोळामोळा गुंडाळा करून खिडकीबाहेरच्या गल्लीत टाकून देत. मजूर छापखान्यात प्रभाकर चित्रे नावाचा चलाख तरुण होता. रात्री आठ वाजता काळोख पडला म्हणजे तो सायकलवर येऊन गल्लीतले ते कागदाचे भेंडोळे उचलून पसार होत असे. प्रुफ हस्तगत झाल्यावर मग हो काय, जवळकर एका बैठकीत एकटाकी जबाबाचा मजकूर लिहून मोकळा होत असे.