पाक्षिक प्रबोधनच्या कचेरीत गोळा झालेल्या तरुणांनी स्वाध्यायाश्रमाची चळवळ सलग दोन वर्षं केली. प्रबोधनकारांच्या प्रेरणेतून या चळवळीने काय घडवलं, याचा शोध घेतल्यास बरंच काही हाती लागतं.
– – –
प्रबोधनकारांनीच दादरमध्ये स्वाध्यायाश्रम आणि गोविंदाग्रज मंडळासारख्या उपक्रम उभे केले. प्रबोधनकारांचे जुने मित्र इतिहासकार वा. सी. बेंद्रे सांगतात तसं अशा उपक्रमांचं नेतृत्व करावं किंवा त्याच्या संस्थात्मक व्यवस्थेच्या कटकटीत स्वतःला गुंतवून घ्यावं, अशी त्यांची मानसिकता नव्हती. ते कार्यकर्त्यांना एकत्र आणत. त्यांना प्रेरणा देत. विचारांना वळण देत आणि त्यातून कामं उभी राहत. त्यामुळे त्याचं श्रेय प्रबोधनकारांना मिळालं नसलं तरी अशी अनेक कामं त्यांनी आयुष्यभर शांतपणे घडवून आणली.
प्रबोधनकारांच्या स्वाध्यायाश्रमातल्या कार्यकर्त्यांची नावं पाहिली तर ती प्रामुख्याने चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातल्या तरुणांची दिसतात. या तरुणांमधे प्रबोधनकारांच्या वैचारिक नेतृत्वामुळे चैतन्य उभं राहिलं. `समाजसेवा` या मासिकाच्या प्रबोधनकार ठाकरे अमृतमहोत्सवी विशेषांकाच्या संपादकीयात हे योगदान नोंदवलेलं आहे, `कायस्थ समाज स्वतःभोवती व्यक्तिगत स्वार्थाचा कोष करून राहात होता. त्याला त्या कोषांतून बाहेर काढून विशाल जीवनाची विस्तारित क्षितिजें दाखविणें जरूर होतें. नाहीतर तो समाज नामशेष झाल्यावाचून राहणार नाही हें भविष्य लक्षांत घेऊन श्री. ठाकरे यांनी दि. ३ एप्रिल १९२१ रोजीं या समाजासाठी इंग्रजीमध्यें बुलेटिन काढण्यास सुरवात केली. जातीयतेचा आरोप पत्करूनही त्यांनी स्वजातीकरतां हें पत्रक काढलें. पण त्याचा उद्देश जातीय भावना वाढविणें हा नसून जातीय भावनेची कुंपणें ओलांडून विशाल जीवनांत समाजाला आणून सोडणें हाच होता. अशा तर्हेचा धाडसी प्रयत्न अन्य कोणी केल्याचें आमच्या ऐकिवांत नाही. त्या बुलेटिनमधील पुढील वाक्यावरून त्याचें उदात्त स्वरूप स्पष्ट होईल, `India expects every man to do his duty. Can we, the members of the historical C.K.P., community, stand with folded hands and look indifferently like cold stone statues on the world-wide turmoil which perceptibly surrounds us? Have we become unpatriotic as to let pass various numerous national activities without putting in a due share of our respective duties?`
१९२१ सालापासूनच त्यांनी या बुलेटिनमधून वैचारिक परिवर्तनाचीही गरज वारंवार सांगितली. जुन्या रूढी सोडून आधुनिक विचार अंगिकारण्याचा आग्रह त्यांनी मांडला. वा. सी. बेंद्रे यांनी प्रबोधनकारांवर लिहिलेल्या लेखात या काळात त्यांनी घडवलेल्या बदलांविषयी लिहिलंय, `ठाकरेंनी जातीय संघटनेंत लक्ष घातल्यानें कांहीं क्रांतिकारक घटनाही घडून आल्या. या जातिधर्माच्या सोळा संस्कारांत जे भिक्षुकवर्गाकडून अत्याचार होत असत, त्यांना आळा घातला. कै. गजानन भास्कर वैद्य यांच्या वैदिक विवाह पद्धतीचा जातींत प्रसार करून परिणामकारक बदल घडवून आणला. त्यामुळे मुख्य अडचणींच्या बाबींबरोबर लग्नसमारंभांत जो बराच अपव्यय होत होता, तो थांबवून मानापानाच्या भानगडींचाही परिहार केला. त्याचप्रमाणे हुंड्याच्या व्यापारी मनोवृत्तीपासून ज्ञातिसमूहाला परावर्तित केले. त्याचबरोबर दादरकर चां. का. प्रभूंत एक प्रकारची जातीय संघटनेंतील आपुलकीची भावना जागृत करवून राममारुती कार्यालय, दादर सभा वगैरे कार्ये यशस्वी करण्यांत पुढाकार घेणार्या मित्रांना साह्य करून त्यांना कार्यक्षम राखलें.`
पण स्वाध्यायाश्रमाचं एक महत्त्वाचं योगदान प्रबोधनकारांनी स्वतःच आत्मचरित्रात जाता जाता लिहिलेल्या वाक्यात नोंदवलंय. ते लिहितात, `डॉ. आंबेडकरांच्या सहाय्यकांतली बहुतेक मंडळी स्वाध्यायाश्रमाच्या तालमीतच तयार झालेली होती.` ज्येष्ठ संपादक श्री. शं. नवरे यांनीही महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात हे श्रेय प्रबोधनकारांना दिलं आहे, `पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या `समाज समता संघा`ला निष्ठावंत कार्यकर्ते पुरविण्याचे काम मुख्यतः स्वाध्यायाश्रम याच संस्थेने केले.` बाबासाहेबांचं सुरुवातीचं कार्य प्रामुख्याने मुंबईतल्या दादर परळ परिसरात आणि आजच्या रायगड जिल्ह्यात दिसतं. या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपींची वस्ती चांगली होती. बाबासाहेबांच्या महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासूनच्या कार्यक्रमात या सीकेपी तरुणांनी साथ दिली होती. त्यामुळे या चळवळीत टिपणीस, चिटणीस, कारखानीस, कर्णिक, दोंदे, देशमुख अशी सीकेपींची आडनावं आढळून येतात.
प्रबोधनकारांचे एक मित्र रं. ग. कुलकर्णी यांनी याविषयी नेमकं काय घडलं ते थोडं जास्त सविस्तर लिहिलंय, `कायस्थ प्रभूंनी एकादी नवी चालरीत अमलांत आणली तर ब्राह्मणेतर त्यांचे अनुकरण बिनदिक्कत करीत किंवा कायस्थ प्रभूंच्या पावलावर पाऊल टाकून एखादी जीर्ण रूढी मोडून काढण्याचें धाडस करीत. म्हणून प्रबोधनकारांनी जेव्हां भिक्षुकशाहीवर बेडर हल्ले चढविण्यास सुरवात केली, तेव्हां ब्राह्मणेतर बहुजन समाजाला मनापासून आनंद झाला आणि धीर आला. डॉ. आंबेडकरांच्या सुरवातीच्या चळवळींना गावोंगावचे कायस्थ प्रभू पाठिंबा देत आहेत असं पाहूनच तेथील महारमांगांना अवसान येत असे असा पुष्कळांचा अनुभव आहे.`
या तरुणांमधलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आचार्य मोरेश्वर दोंदे. परळच्या आर. एम. भट शाळेचे दीर्घकाळ प्राचार्य असलेले दोंदे मुंबईचे महापौरदेखील होते. स्वाध्यायाश्रमाच्या कामातूनच ते पहिल्यांदा सार्वजनिक कार्याशी जोडले गेले. तेव्हापासूनच ते प्रबोधनकारांचे जवळचे स्नेही होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हे दोघे खांद्याला खांदा लावून लढले. प्रबोधनकार दादरहून सातार्याला गेल्यानंतर ते बाबासाहेबांच्या कामाशी जोडले गेले आणि त्यांचे निष्ठावंत अनुयायीच बनले. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त होते. प्राथमिक शिक्षकांचं त्यांनी उभं केलेलं संघटन आजही महाराष्ट्रभर कार्यरत आहे. राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी असलेल्या २५ हजार ग्रंथांची क्रमवार नोंद करण्याचं किचकट कामही त्यांनी केलं. विशेष म्हणजे त्यांनी बाबासाहेबांच्या सोबत नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली. बाबासाहेबांच्या महानिर्वाणाच्या प्रसंगी ज्या निवडक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भाषणं केली, त्यात आचार्य दोंदेही होते.
दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये प्रबोधनची कचेरी उभी राहिली आणि त्यातून स्वाध्यायाश्रमाची चळवळ सुरू झाली, हे आपण पाहिलंच. पण काही समकालीन लेखकांनी प्रबोधनकारांवर लिहिलेल्या लेखांत असंही म्हटलंय की दादरमध्ये त्यांच्याभोवती तरूण गोळा झाले आणि त्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीतून प्रबोधन पाक्षिकाची सुरुवात झाली. प्रबोधनकारांचं बस्तान दादरमध्ये बसल्यानंतर तरूण त्यांच्याभोवती गोळा होत होतेच. त्यातून प्रबोधनला बळ मिळालं हे मात्र नक्की. प्रबोधन दादरमध्ये असताना दोन वर्षं सुरळीत सुरू राहिलं, याचं योगदान स्वाध्यायाश्रमातल्या तरुणांना नक्कीच द्यावं लागेल.