हे व्यंगचित्र आहे १९७९ सालातले. इंदिरा गांधी यांनी राजकारणात येणे काँग्रेसच्या अनेक ढुढ्ढाचार्यांना आधीपासून आवडले नव्हते. त्यांनी इंडिकेट-सिंडिकेटचा खेळ रचून त्यांची वाट रोखण्याचा प्रयत्न केला. पण, इंदिरा गांधी त्यांना पुरून उरल्या. पंतप्रधानपदावर पोहोचल्या. पाकिस्तानचे दोन तुकडे करून, बांगलादेशाला जन्म देऊन त्या अफाट लोकप्रियतेच्या लाटेवरही स्वार झाल्या. मात्र, या काळात बोकाळलेल्या अराजकसदृश परिस्थितीला आळा घालण्यासाठी त्यांनी योजलेला आणीबाणीचा उपाय त्यांच्यावरच उलटला आणि जनता पक्ष नावाच्या समाजवादी, जनसंघ आणि काँग्रेसमधील असंतुष्ट यांच्या कडबोळ्याने त्यांना पराभूत केलं. मात्र, या सगळ्यांमधील अंतर्विरोधांमुळे हे सरकार अल्पजीवी ठरले आणि इंदिरा गांधी यांच्यावरच जनतेने पुन्हा भरवसा ठेवला. या काळात कर्नाटकाचे नेते देवराज अरस यांच्या अरस काँग्रेसमध्ये जमा झालेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले, त्याचे खास बाळासाहेबांच्या नजरेतून आणि कुंचल्यातून घडणारे हे व्यंगरूप दर्शन. त्यात त्यांनी इकडच्या कुक्कुटपालन केंद्रातून तिकडच्या कुक्कुटपालन केंद्रात उड्या मारून जाणार्या कोंबड्यांच्या स्वरूपात नेते दाखवले आहेत. अर्स यांच्याच कर्नाटकात आता पुन्हा हाच प्रयोग घडताना दिसतो आहे. फरक इतकाच की कर्नाटकात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या आणि अतिशय खुनशी अशा भारतीय जनता पक्षाला खिंडार पडले आहे आणि जगदीश शेट्टर यांच्यासारखा बलाढ्य नेता थेट काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाला आहे… ईडी आणि सीबीआयच्या खुराड्यात आणि डालग्यात झाकलेली इतर राज्यांमधली कोंबडीही अशाच प्रकारे मूळ घरी पळ काढणार आहेत लवकरच.