एपिक चॅनल पाहिलंत का मंडळी टीव्हीवरचं? छान माहितीपूर्ण कार्यक्रम असतात वेगवेगळे, ठराविक वेळी म्हणजे आपापल्या आवडत्या कार्यक्रमांऐवजी वेगळ्या वेळी काही बघावसं वाटलं ना, तर इथे नक्की काहीतरी सापडतं. असंच परवा मी बघत असताना म्हैसूरपाकाच्या जन्माची गोष्ट लागलेली. म्हैसूरच्या राजाने काही विशेष निमित्तासाठी आचार्याला उपलब्ध आहे त्याच साहित्यात पण आजवर न खाल्लेली मिठाई बनवायची आज्ञा केली म्हणे. आचारी तरबेज तर होताच; त्याने फक्त साखर, तूप, पाणी आणि बेसन वापरून जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणारी वडी बनवली. महाराज त्याच्या पाककलेवर अतोनात खूष झाले आणि त्याच्या सन्मानार्थ त्या पदार्थाला आपल्या राज्याचंच नाव बहाल केलं, म्हैसूरपाक!!
त्या आचार्यांनी एवढ्या सहज बनविला म्हणजे हा पदार्थ बनवायला सोप्पा असेल असं वाटून जातं, नाही का? तसं नाहीये मात्र. मला आठवतं, अगदी लहानपणापासून आजी भेटली की आमच्या मागण्यांमधली एक मागणी असायची म्हैसूरपाक बनवायची!! तिने बनवलेल्या म्हैसूरपाकाला तोडच नाही. वर म्हटल्यापेक्षा एक घटक जास्त असायचा नं त्यात, तिचं निरपेक्ष प्रेम हो!! म्हैसूरपाक बनविणे आणि त्याचबरोबर तो शिकण्याची गोष्ट सांगणे या तिच्याही आवडीच्या गोष्टी!! अरे सोळा वेळा चुकले मी म्हैसूरपाक बनवताना, पण सतराव्यांदा जो जमला तो आजवर कधीच नाही चुकला!! अगदी नैवेद्याच्या वाटीच्या प्रमाणाने करायचा, म्हणजे चुकला आणि दगड बनला तरी फार वाया नाही जात, साहित्य, वेळ आणि मेहनतही!! आजही म्हटलं तर नक्की खटपट करेल आजी आणि तिच्या हातचा म्हैसूरपाक खाणार्याला आगळेच समाधान देईल हे नक्की!!
साहित्य खरंच फार काही लागत नाही. एक वाटी बारीक हरबरा डाळीचं पीठ, बेसन हो, छान बारीक दळलेलं किंवा मग बारीक चाळणीनं चाळलेलं घ्यावं. त्याच वाटीनं एक वाटी साखर, थोडंसं पाणी आणि दोन वाट्या साजुक तूप. बाहेर तुपाऐवजी सर्रास तेल किंवा अर्धं तेल अर्धं तूप वापरतात म्हणे. साखर बुडेल एवढं पाणी घालून पाक बनवायला ठेवायचा, एकतारी लागतो पाक. तो होईपर्यंत बेसनात थोड पातळ तूप मिसळून पातळसर व गुठळ्याविरहीत पेस्ट बनवायची. बाकी तूप पातळ करून मंद गॅसवर तापत ठेवायचं, वापरताना ते कडकडीत गरम हवं. एकतारी पाक बनला की त्यात बेसनाची पेस्ट हळूहळू मिसळायची, मिश्रण सतत ढवळायंच बरं का!! मग त्यात पळीने एक-एक पळीभर कडक तापलेलं तूप घालत राहायचं. सुरुवातीला तूप शोषलं जातं बेसनात आणि बेसन फुलत जातं. बेसन जाळीदार होऊन त्याचा रंगही पालटायला लागतो आणि तूप सुटायला सुरुवात होते. त्यावेळी पटकन ते सगळं मिश्रण स्टीलच्या चाळणीवर ओतायचं आणि थोडं निवलं की वड्या पाडायच्या. चाळणीवर वड्यांचं मिश्रण ओतण्याचा फायदा म्हणजे जास्तीच तूप नितरून जातं आणि म्हैसूरपाक खुटखुटीत नि कमी तुपकट होतो. या नितरलेल्या तुपाचा पुनर्वापर कोणत्याही दुसर्या पक्वान्नात सहज होतो.
बेसनाचे लाडू-वड्या वगैरे सगळेच पदार्थ छानच लागतात, पण मग साधारण त्याच घटकांपासून बनलेल्या ह्या म्हैसूरपाकाची काय विशेषता? जरुरीपेक्षा जास्त घातलेलं तूप हा सोडून देतो, मात्र त्या अलिप्तपणात कटुता तर नाहीच पण जास्त गोडवाच भरलेला असतो!!
संसारात राहतांना माणसालाही विविध गोष्टी कमावाव्या, सांभाळाव्याही लागतातच की. पण त्यात किती गुरफटायचं आणि त्यातून कधी सहज बाहेर पडायचं हा विवेक अतिशय आवश्यक ठरतो. तुपामुळेच घडणारा म्हैसूरपाक जरी तुपालाच बाजूला सारत असला तरी त्यात कृतघ्नता नसते, तर मला हवं तेवढं पुरेपूर मिळालंय, आता इतरांसाठीही त्याचा वापर व्हावा हीच वृत्ती भासते मला. स्वार्थाला मागे सारत मनातला गोडवा, प्रेमाचा ओलावा कायम टिकवून ठेवत, नि:स्वार्थवृत्ती जपण्याची शिकवण देतो हा म्हैसूरपाक. एकदा का नि:स्वार्थता बाणावली की आत बाहेर काही वेगळं उरतच नाही, जाळीदार वडीच्या आतवर भरलेला गोडवाच इतरांना सुखावतो नं, त्याचवेळी स्वत:च्या आजवरच्या कष्टांचं चीज होतं नाही का? स्वत:बरोबर किंवा स्वत:पेक्षाही जास्त समोरच्याचा विचार करता यायलाही कृपेचीच गरज असते हे खरं असलं तरी मनाला जाणीवपूर्वक वळण लावणंही अशक्य नसतं! एक तीळही सातजणांत वाटून खावा असं सांगणारी आपली संस्कृती या नि:स्वार्थतेलाच जोपासते आणि दानाचं महत्त्व सांगते. असं म्हणतात की कर्णाने जेव्हा सोन्याची कवचकुंडलं दान केली ना, तेव्हा त्याचं तेज आणखीनच वाढलं. देणारा हात हा कायमच श्रेष्ठ ठरतो. अन्न, रक्त, वस्तू अशा दानांच्या अनेक पर्यायांबरोबरच निरपेक्ष प्रेमाच्या दानाचं महत्त्व अपरंपार आहे.
माताजी श्री सारदादेवी येणार्या जाणार्या प्रत्येकालाच या प्रेमाच्याच बंधनात बांधतात की अगदी आजही. त्या प्रेमाबरोबर मनातला गोडवा नकळत समोरच्याच्या मनात पाझरतो आणि आयुष्याचं सोनं होतं. घेतल्याने एकपट आनंद होत असेल तर दिल्याने दुप्पट होतो हे निश्चित! मात्र दानाचा अहंकार नको, परतफेडीची अपेक्षा नको आणि हा देणारा हात कधीच आखडता नको होऊ देऊस रे भगवंता! बघ मग सर्वांचंच आयुष्य कसं मधुर होईल. म्हैसूरपाकासारखंच!!