लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत यांचा केसरीच्या ट्रस्टींशी झालेला संघर्ष हा मुळात अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी होता. तो इस्टेटीसाठी नव्हता, तर केसरी ताब्यात घेण्यासाठी होता. त्यासाठीची आपली क्षमता सिद्ध करण्यासाठीही होता. या संघर्षात प्रबोधनकार श्रीधरपंतांच्या पाठीशी ठाम उभे असलेले दिसतात.
– – –
टिळक काय किंवा गांधी काय, दोघांनीही आपापल्या परीने आपल्या कुटुंबीयांसाठी करायची ती कर्तव्ये केली, परंतु तरीही त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, तसेच समाजाच्याही त्यांच्याकडून आदर्श पालक म्हणून असलेल्या अपेक्षा सामान्य पालकांकडून असलेल्या अपेक्षांपेक्षा जास्तच होत्या, असं डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ते श्रीधरपंत बळवंत टिळकांचा शोध घेताना लक्षात ठेवावं लागतं. या अपेक्षांमधूनच गायकवाड वाड्यात महाभारत उभं राहिलं. तेव्हा दोन्ही बाजूंना सामंजस्याचं गीतारहस्य सांगण्यासाठी कुणीही नव्हतं.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर श्रीधरपंतांचं आयुष्यच बदलून गेलं. त्याचं कारण होतं ते लोकमान्यांनी केलेलं मृत्यूपत्र. ते विलायतेला जाताना कोलंबो मुक्कामी घाईघाईने केलं होतं. लोकमान्यांची केसरी मराठा संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत होतीच, पण या वर्तमानपत्रांचा महाराष्ट्रावर पडणारा प्रभाव जास्त महत्त्वाचा होता. लोकमान्यांचं मृत्यूपत्र त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस यांच्याकडे होतं. त्यानुसार ते स्वतः, लोकमान्यांनतर केसरीचे संपादक बनलेले साहित्यसम्राट न.चिं. केळकर आणि लोकमान्यांचेच थोरले जावई विश्वनाथ केतकर वकील हे मुख्य ट्रस्टी बनले. त्यांनी टिळकांच्या दोन्ही मुलांना वडिलांच्या इस्टेटीतला काही भाग दिला, पण केसरी मराठा वृत्तपत्रांमध्ये स्थान दिलं नाही. हा कळीचा मुद्दा बनला.
खरं तर सज्ञान आणि लायक असतील तर मुलांना ट्रस्टी बनवावं असा उल्लेख लोकमान्यांनी केला होता. सार्वजनिक ट्रस्ट बनवताना आपल्या मुलांना ट्रस्टी बनवावं असं लिहिणं शिष्टसंमत नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचे शब्दप्रयोग स्वाभाविक होते. पण लोकमान्यांची दोन्ही मुलं सामाजिक सुधारणावादी होती. त्यांना केसरीत स्थान मिळाल्यास केसरी लोकमान्यांच्या विचारांपासून दूर जाईल अशी भीती या ट्रस्टींना होती. त्यापेक्षाही आपलं यावरचं नियंत्रण संपेल, असंही त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी टिळकांची मुलं ही ट्रस्टी बनण्यासाठी कशी लायक नाहीत, हे सांगण्यासाठी वातावरणनिर्मिती करायला सुरवात केली. त्याची सगळी साधनं या ट्रस्टींच्याच हातात होती. ट्रस्टींनी टिळकांच्या मृत्यूनंतर पंधरवड्यातच गायकवाड वाड्यातील केसरी मराठाची कचेरी आणि छापखाना ताब्यात घेतला. दोन्ही मुलांना वृत्तपत्रांत कोणताही रस नव्हता आणि जबाबदारी घेण्याची तयारीही नव्हती, असं केळकरांनी जगाला सांगितलं. या दोघांना साधं केसरीच्या संचालक मंडळावरही घेतलं गेलं नाही.
खरंतर दोन्ही मुलांची महाविद्यालयीन शिक्षण सुरू असलं तरी श्रीधरपंतांनी ट्रस्टी बनण्यासाठी आवश्यक लिखाणातली लायकी आधीच सिद्ध केली होती. राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा, या विषयावर श्रीधरपंतांनी फर्ग्युसन कॉलेजच्या मासिकात लिहिलेला लेख गाजला होता. होमरूल चळवळीत देशाचं नेतृत्व करणार्या डॉ. अॅनी बेझंट यांनीही त्याची दखल घेतली. पुढेही ते लिहित राहिले. त्यांनी लेख लिहिले, कविताही केल्या. त्यांच्या या लिखाणामुळे ते महाराष्ट्रभर अनेक मोठमोठ्या लोकांना माहीत असावेत असं दिसतं. लोकमान्य टिळकांच्या शेवटच्या आजारपणात थेट छत्रपती शाहू महाराजांनी श्रीधरपंतांना पत्र पाठवून लोकमान्यांना मिरजेच्या कोरड्या हवेत हवापालटासाठी घेऊन येण्याची सूचना केली होती. महाराजांनी स्वतः दरबारातले जबाबदार लोक श्रीधरपंतांकडे पाठवले होते आणि त्यासाठी मिरजेतल्या बंगल्यात व्यवस्थाही करायला सुरवात केली होती. मात्र हे वैचारिक विरोधकाचं आदरातिथ्य काळाला मान्य नव्हतं.
आधुनिक विचारांच्या रामभाऊ आणि श्रीधरपंतांनी टिळकांच्या मृत्यूनंतरच्या होणार्या धार्मिक कर्मकांडावर विश्वास नसल्याचं सांगत त्यातील काही बिनडोक कर्मकांडं करण्यास नकार दिला होता. त्यामुळे ती कर्मकांडं भाचे धोंडोपंत विद्वांस यांनी केली. तेव्हा सनातनी टिळकवादी हादरल्याचं न.चिं. केळकरांनी नोंदवलं आहे. अशा सडेतोड भूमिकांमुळे ही मंडळी टिळक बंधूंना केसरीच्या ट्रस्टवर घेण्यास उत्सुक नव्हतीच. त्यात केतकर वकिलांची भूमिका महत्त्वाची ठरली. तुमच्यापैकी कुणी ट्रस्टी होणं बरं दिसणार नाही, असं त्यांनी टिळक बंधूंना सांगितलं. आईवडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांसमान असणार्या थोरल्या भावोजींवर टिळकपुत्रांनी विश्वास ठेवला होता. शिवाय मृत्यूपत्रासंबंधी काही वाद झाल्यास त्यांचं म्हणणं अंतिम मानावं, असं लोकमान्यांनी मृत्यूपत्रातच नमूद केलं होतं.
पण तिथेच पहिली फसवणूक झाल्याचं टिळक बंधूंना खूप उशिराने कळलं. श्रीधरपंतांनी लिहिलंय, आपल्या कायदेपटुत्वाचा उपयोग आमचे हितसंरक्षणाचे कामी करणे हे ज्यांचे पहिले कर्तव्य होते असे आमचेच एक प्रतिष्ठित नातेवाईक आम्हाला उडाणटप्पू ठरवून लौकिकदृष्ट्या शक्य तितक्या खोल गाडून टाकण्यास उत्सुक होतील, ही त्यावेळी कल्पनाही नव्हती. कट्टर सनातनी असलेल्या केतकरांनी टिळक बंधूंना केसरीतून बाहेर काढण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली. पण त्याची सुरवात धोंडोपंत विद्वांस यांनी केली असल्याचं दिसतं. माझा व्यासंग हे पुस्तक श्रीधरपंतांनी त्यांच्या आईला सत्यभामाबाईंना अर्पण करताना लिहिलंय, तुला छळणारी सोनेरी टोळी आता आमचेवरही उलटली. मुलं लहान आणि पत्नी आजारी असल्यामुळे लोकमान्यांनी सहा वर्षांच्या तुरुंगवासासाठी मंडालेला जाताना घराची जबाबदारी विद्वांस यांच्यावर सोपवल्याचं आपण पाहिलंच. त्यामुळे श्रीधरपंतांच्या दृष्टीने आईला छळणार्या सोनेरी टोळीत विद्वांस असल्याचं स्पष्टच आहे. विद्वांस यांच्या कन्या सुमती भट यांनी हे नोंदवलंही आहे, त्यांचा राग हा मुख्यतः बाबांवर होता. श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाईंच्या आठवणी शब्दबद्ध करणार्या मृणालिनी ढवळे यांनीही हे लिहून ठेवलं आहे, धोंडोपंत कितीही कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष असले तरी आपल्या खासगी, घरगुती आणि वैयक्तिक बाबींत त्यांचा वरचढपणा टिळकपुत्रांना खपत नसे. पण वडिलांच्या समोर आपली नापसंती व्यक्त करणं त्यांना अवघड वाटे. त्यामुळे लोकमान्यांच्या मृत्यूनंतर प्रथम टिळकांच्या मुलांनी काय केलं असेल तर ते म्हणजे धोंडोपंतांना वेगळं बिर्हाड करायला सांगितलं.
प्रत्येक छोट्यामोठ्या गरजांसाठी ताटकळत ठेवणार्या धोडोंपंतांविषयी टिळक बंधूंना राग होताच. आता तर त्यांनी केसरीच ताब्यात घेतला होता. पण केसरीचा भाग सोडून गायकवाड वाड्यात टिळक कुटुंब राहत होतं. त्यामुळे कचेरीचा भाग ट्रस्टींच्या ताब्यात, तर राहण्याचा भाग टिळक बंधूंच्या ताब्यात अशी गायकवाड वाड्याची फाळणी झाली होती. विद्वांसांना घराबाहेर काढल्यामुळे केसरी कंपू हादरला होता. उद्या केसरी हातात आल्यास हे काय करतील, हे त्यांना दिसलं असावं. त्यामुळे विशेषतः श्रीधरपंत ट्रस्टवर घेण्यास लायक नसल्याचं सिद्ध करण्यासाठी ते हात धुवून पाठीशी लागले. त्या काळातले विद्वानाग्रणी म्हणून प्रसिद्ध असणारे न.चिं. केळकर यांनी खरं तर समतोल भूमिका घेणं अपेक्षित होतं. पण त्यांनी उत्तम लिहिणार्या श्रीधरपंतांना केसरीपासून लांब ठेवण्यात सर्वाधिक आग्रही भूमिका घेतल्याचं दिसतं.
मात्र, श्रीधरपंतांना केसरीत स्थान मिळायला पाहिजे होतं, असं त्यांच्या मित्रांना वाटत होतं. ते योग्यच होतं. श्रीधरपंतांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघर्षाचं सार मांडलं आहे, माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादकवर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता… त्यांना केसरीत जागा मिळाली नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. केसरीत जागा मिळाली असती तरीही केसरी कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते, कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केसरी कंपूला असती तर बरे झाले असते.
सुरवातीला दोन तीन वर्षं टिळक बंधूंना आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सुगावाच लागला नाही. ट्रस्टींनी उभ्या केलेल्या संभ्रमाच्या जाळ्यातून बाहेर यायला १९२४ साल उजाडावं लागलं. या काळात त्यांचा केसरीशिवाय इतर विचारांच्या लोकांशी संबंध येऊ लागला. त्यांच्या लक्षात आलं की ते फसवले गेले आहेत आणि त्यांचा केसरी कंपूशी संघर्ष सुरू झाला. केसरीचे ट्रस्टी सर्वच बाबतीत साधनसंपन्न होते. त्यांना टक्कर देणं म्हणजे दगडावर डोकं फोडण्यासारखं होतं. त्यामुळे संवेदनशील मनाचे श्रीधरपंत अस्वस्थ होत आणि प्रबोधनकारांपाशी त्यांना आधार मिळे.
प्रबोधनकार लिहितात, त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे बापू नेहमी वैतागलेला असायचा. काही संतापजनक घटना घडली का तडक तो माझ्या बिर्हाडी धुसफुसत यायचा. खरे म्हणजे तो उसळला म्हणजे रामभाऊच त्याला जा जाऊन बस ठाकर्याकडे म्हणून पिटाळायचा. पुष्कळ वेळा सकाळीच आला तर दिवेलागणीनंतर घरी जायचा. माझ्याकडेच जेवायचा आणि ग्रंथवाचन करीत पडायचा. अर्थात वाड्यातल्या भानगडींची चर्चा माझ्याजवळ व्हायचीच. वारंवार तो म्हणे, केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवीन.
केसरी कचेरीत होणार्या त्रासाला कंटाळून लोकमान्य टिळकांचे चिरंजीव थेट प्रबोधनच्या कचेरीत जात, ही गोष्ट तो काळ बघता सामान्य नव्हती.