• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
March 28, 2025
in भाष्य
0

जीवनाच्या अंगणामध्ये आनंदाचे झाड लावायचे झाल्यास या झाडाच्या बिया कुठे मिळतील हो संतोषराव?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आधी सांगा अशा झाडाच्या बिया मिळाल्या तर त्या लावायला तुमच्याकडे अंगण कुठे आहे? कारण मोकळं अंगण दिसलं की त्याचा विकास करायला द्यायचा, असं पर्व आलंय. पण काही अतिशहाणे लोक त्याला ‘अडाणी’पणा म्हणतात… (आनंदाच्या झाडाच्या बिया तुम्हाला मिळाल्याचं तर त्या लावणार कधी? ते झाड उगवणार कधी? अहो त्याची फळं खायच्या आधीच कोणी तुमच्या झाडाचा विकास करायला घेतला, तर तुम्ही फक्त ‘आरे आरे’ करत राहाल. ‘कारे’ म्हणून पण विचारू शकणार नाही.)

दारू पिऊन रस्त्याने चालणार्‍यांना अटक करण्याची तरतूद करणारे विधेयक कोणातरी दोनतीन नेत्यांनी मांडले आहे विधिमंडळात… यांनी हे विधेयक मांडताना काय प्राशन केलं असेल?
– विनायक देशमुख, पाचोरा
मग काय त्यांनी ‘दारूचे उत्पादनच बंद करा’ असं विधायक मांडायचं? अहो, जर मुळावरच घाव घातला तर हे फांद्या छाटणारे छाटणार काय? त्यांना मांडू दे त्यांना हवं ते विधायक… तुम्हाला प्रश्न विचारायला, आम्हाला उत्तर द्यायला विषय तर मिळतो! राहता राहिला प्रश्न त्या दोन-तीन नेत्यांनी काय प्राशन केलं असेल? तर ते दोन-तीन नेते ‘ज्यांच्या’ ओंजळीने काय काय पितात, त्यांनाच विचारावं लागेल की त्यांनी त्या दोन-तीन नेत्यांना नक्की काय पाजलं होतं? (लोकसभा असो की विधानसभा… तिथे मांडली जाणारी विधेयकं, कोणीही विधायक स्वत:च्या डोक्याने मांडत नाही असं राजकीय विश्लेषक म्हणतात… म्हणून आम्ही पण म्हटलं.)

महिला दिनी बायकोला क्रिकेटची बॅट भेट दिली ते चूक झालं, असं माझा मित्र गण्या सांगत होता… असं त्याला का वाटलं असेल?
– सायमन रॉड्रिग्ज, कल्याण
तुमच्या गण्याचा त्याच्या लग्नानंतरचा पहिलाच महिला दिन असेल… त्याने बायकोला लाडाने क्रिकेटची बॅट भेट दिली असेल… नेक टू नेक मॅच झाली असेल.. आणि तुमच्या गण्याला कळलं असेल की अंपायरच्या हातात बॅट देत नाहीत! गण्याने त्याची चूक तुम्हाला सांगितली, पण म्हणून तुम्ही तुमच्या चुका त्याला सांगू नका… तुमचा गण्या तुमच्या चुकांचा व्हिडिओ बनवेल… फोन रेकॉर्ड करेल, फोटो काढून ठेवेल… आणि कधीतरी ते व्हायरल होईल… झालं ना काळजात ‘धस’?.. (प्रत्येक गण्या दिसतो तसा नसतो… आणि तो स्वत:च्या चुका सांगत नसतो… तर तो आपल्या लोकांचा डाटा सेव्ह करत असतो… हल्लीच्या दिवसांत कुठलीही गोष्ट नॉर्मली घेऊ नका… जसा आम्ही तुमचा हा नॉर्मल प्रश्न नॉर्मली घेतला नाही.)

आपल्या पंतप्रधानांनी सगळ्या देशवासीयांना रीलस्टार बनण्याचा संदेश दिला आहे… तुम्ही हे राष्ट्रकार्य कधी सुरू करताय?
– मोहिनी कांबळे, वाशीम
आम्हाला असं का वाटतं की तुम्ही हा प्रश्न तिरकसपणे विचारलायत? तसं असेल तर पंतप्रधानांचा संदेश तुम्ही तेव्हाच गंभीरपणे घ्याल जेव्हा प्रत्येक देशवासियांच्या खात्यात १५ लाख रुपये येतील… आणि तेव्हा आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून त्याची रील बनवू.

एक क्षण भाळण्याचा, बाकी सगळे सांभाळण्याचे असं व. पु. काळे म्हणाले आहेत… तुमचा पर्सनल अनुभव काय?
– महेंद्र गोंधळे, लातूर
गोंधळे तुम्ही असे गोंधळलाय का? प्रत्येकाचा हा अनुभव असतो… फक्त काही जण संभाळतात, काही जण पश्चाताप करत असतात… (आमचा आनंद याच्या मधला आहे) भाळतात मात्र सगळेच. तुम्ही कधी भाळलाच नसाल, तर एकदा चेक करून घ्या… म्हणजे, नक्की व. पु. काळे म्हणालेत की कोण म्हणालेयत, ते चेक करून घ्या हो…

तुमच्या घराला स्टोअररूम आहे का? त्यात तुम्ही किती रोकड ठेवली आहे? तुमच्या नकळत तुमच्या नोकरांनी तिथे कोट्यवधी रुपये ठेवलेले आहेत का? उद्या घराला आगबीग लागली तर तुमची पंचाईत व्हायला नको, म्हणून विचारतो आहे, गैरसमज नसावा.
– नसीर तांबोळी, इचलकरंजी
घरात ठेवण्याएवढी रोकड जर आमच्याकडे असेल तर आम्ही एखादी मोठी पार्टी जॉईन करू… पुढे काय करायचं, बातमी कशी दाबायची, फायर ब्रिगेडवाल्यांनी काय बोलायचं? पोलिसांनी काय सांगायचं? कोणाच्या न्यायालयात केस दाखल करायची? नुसते ताशेरे ओढून केस हळूहळू कशी थंड करायची हे सर्व ती पार्टी पाहून घेईल… तेव्हा मात्र, आपण यांना कुठल्या तोंडाने बोलायचं म्हणून तुमचीच पंचाईत होईल… (हल्ली लोक आजूबाजूला जे बोलतात तेच बोललोय, गैरसमज नसावा.)

Previous Post

अशी ही झापाझापी!

Next Post

एक मातृवृक्ष, एक पक्षी!

Next Post

एक मातृवृक्ष, एक पक्षी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.