जनसागर
लाटेमागून लाट उसळते
तरीही कोरोना संपेना
ओमायक्रॉनने केला कहर
सर्दी-खोकला थांबेना
काळ कोरोना भरतो रांजण
अजून पडती रोज बळी
प्रचारसभांना उसळे गर्दी
तिथून कोविडची पळापळी
कोरोनाचे मॉडर्न अवतार
दाखवती ती रूपे नवी
सरड्यासारखे रंग बदलती
पाहण्या दुर्बीण सूक्ष्म हवी
नरेंद्र मोदी
पूर्वीसारखी नाटकबाजी
आता मुळीच चालणार नाही
संपत आला भूलभुलैय्या
जनता आता भुलणार नाही
लोक विश्वास ठेवत नाहीत
माझ्यावर नि चॅनल्सवरही
सगळे विकत घेता येते, पण
इमान सोडून सारे काही
जनतेला तर नाही आवडत
मी केलेली लपवाछपवी
म्हणतात थापेबाजी नको
संपवा आता बनवाबनवी
नारायण राणे
ज्या साहेबांनी मोठे केले
त्यांच्याच फोटो काढून टाकला
माझा फोटो तसाच ठेवून
भिंतीत खिळा मोठा ठोकला
मिठास जागणे मुळी ना जमले
तो तर माझा स्वभाव नाही
सेना-काँग्रेसने हाकलले
भाजपची वाट बघतो भाई
सत्ता तिथे आम्ही घुसतो
तरीही मला वाळीत टाकतात
संशय येताच भाजपवाले
भल्याभल्यांना लांबच फेकतात
योगी आदित्यनाथ
अयोध्येच्या शिखरावरून
गोरखपूरला घेतली माघार
तेल गेले, तूपही जाईल
अरेरावीचा तुटला आधार
इतके दिवस डोळ्यात धूर
तळागाळातले आता दिसतात
मांडीला मांडी लावून जेवतो
लोक गालामध्ये हसतात
आता हवे सोशल इंजिनिअरिंग
त्याच्याशिवाय पर्याय नाही
नाहीतर गाशा गुंडाळण्याची
करावी लागेल लवकर घाई
मायावती
माझेच प्रयोग मोदी करतात
त्यांचे लाइट उशिरा पेटतात
जेव्हा दिसतो अंधार सारा
तेव्हा निकामी बॅटर्या गंजतात
सीएम झाल्यावर मीच माझे
हवे तितके पुतळे उभारले
जनतेलाही प्रेरणा मिळाली
पण हे भाजपवाले करपले
आता निवडणूक नाही लढणार
खात्री आहे नक्की पडणार
मते सर्वांची खाऊन खाऊन
समाधानाचा ढेकर देणार