• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तोडगा

- सई लळीत (विचारवंतीण)

सई लळीत by सई लळीत
January 29, 2022
in मी बाई विचारवंतीण
0
तोडगा

(टीप : तोडगा हा शब्द गारवा या शब्दाच्या धर्तीवर वाचावा… मजा येते.)

ट्रेंड हा नवीन शब्द अलिकडे फारच रुळलाय. सोशल मीडियावर हल्ली बरेच ट्रेंड असतात… गोष्ट/किस्से लिहिण्याचे… फोटोंचे… कवितांचे. इ. इ. नवीन विषयावर सगळेजण हिरीरीने लिहितात. सोशल मीडिया ढवळून निघतो… रोजचा रटाळपणा जातो… किंवा गेलाय असं सगळ्यांना वाटतं… मग एक दोन दिवसात परत सगळं रुटीन सुरु होतं (रटाळपणा असं म्हणू नये).
साप्ताहिक राशीभविष्यात हल्ली तोडगे सांगायचा ट्रेंड आलाय. तशा बर्‍याच फॅशनी इथे अधूनमधून अवतरत असतात. हल्ली काही ठिकाणच्या राशीभविष्यात प्रेमाबद्दल किमान एक ओळ आठवणीने यायला लागलीय. म्हणजे या आठवड्यात प्रेमीजन एकत्र येतील. नवनवीन स्वप्नं रचतील. विवाहासबंधी बोलणी सुरू होतील किंवा लव्हलाइफ या आठवड्यात खास नसेल… इ. म्हणजे भविष्याला मॉडर्न टच दिला आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा रुसवा काढाल, किंमती वस्तू भेट मिळेल, अशीही रंजक वाक्ये असतात. सोशल मीडियाचा वापर जेवढ्यास तेवढा ठेवा, वाहावत जावू नका, असंही एखाद्या राशीला असतं… खरं म्हणजे हे प्रत्येक राशीला हवं.
परवा एका ठिकाणी राशीभविष्य वाचत होते. आपल्या राशीचं भविष्य वाईट असेल तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आणि चांगलं असेल तर नाचत सुटायचं नाही. आपण एवढंच करू शकतो, हे एकदा मनाशी पक्कं करुन ठेवा. नाचून काय होणार? पायबिय मुरगळला तर चांगलं असलेलं भविष्य मुरगळायचं!
तर त्या राशीभविष्यात तोडगे सांगितलेले होते… जालिम तोडगे.
एका राशीला लिहिलं होतं, पैशाची आवक वाढवण्याकरता आठ किलो उडीद प्रार्थनापूर्वक नदीत सोडा… मी उडालेच.
अरे बाबा, उडदाचा रेट माहितेय का तुला? आठ किलो उडीद घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे एवढे? आणि उडीद वाहून जाताना शांतपणे बघत बसायचं? त्यांचा जीव वाचवायचा नाही? अरे एवढ्या उडीदांच्या इडल्या करून विकल्या तरी पैशाची आवक वाढेल, हे कसं कळत नाही तुला? तुला आठ उडीद म्हणायचं आहे का?
एका राशीसाठी लिहिलंय, प्रयत्नांना यश येण्यासाठी नदीतले पाच गोटे आणून पूजा करा आणि परत नदीत सोडून द्या (मी परत परत वाचून बघितलं)… हे वाक्य वाचून मला काय रिअ‍ॅक्शन द्यावी कळेना (रिअ‍ॅक्शन द्यावी असा आग्रह नसतो कुणाचा… की आपल्या तोंडावर कॅमेराही रोखलेला नसतो. तरीपण आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्यासाठी…). प्रयत्नांना यश येण्यासाठी असले निष्फळ प्रयत्न आपण करावेच का? आपण शापच रिकामटेकडे आहोत हे सिद्ध करण्यासाठी?
बरं एखाद्याने गोटे आणून पूजा केली (नैवैद्य दाखवायचा की नाही, हे पष्ट केले नाही), त्यांच्यातलं दैवत्व जागृत झालं की आपण त्यांना निर्विकारपणे नदीत सोडून द्यायचं? त्यांना काय वाटेल? ते कोपणार नाहीत? की त्यांच्यावर एखादी खूण करून किंवा त्यांना खुणेच्या जागी ठेवून अधूनमधून बघायला जायचं? सगळं डोक्यापलीकडचं आहे.
एका राशीला लिहिलंय की बाधा टाळण्यासाठी हनुमान मंदिरातला शेंदूर आणून रामाच्या पायावर लावावा… कशाला? रामाकडे वशिला लावायला? आणि हनुमानाने ऑब्जेक्शन घेतलं तर? सीता माईला साकडं घालायचं? माझ्या डोळ्यासमोर आलं की एक माणूस भर दुपारी रणरणत्या उन्हात हळूच हनुमान मंदिरातला शेंदूर काढतोय आणि रामाचं लक्ष नसताना हळूच पायाला म्हणजे पायाच्या नखाला लावतोय…नेलपेंटसारखा! अरे, बाधा टाळण्यासाठी मी हे सगळं करतोय, एवढं तरी सांगतोयस ना? का जातोस तसाच आपल्या भिरकीत भिरभिरत?
एका राशीला सांगितलंय की दुर्भाग्यनाशासाठी घरातला केरकचरा आणि कोळीष्टक काळ्या पिशवीत भरून चार रस्त्यावर सोडून द्या… काय सबंध? रस्ते खराब केले तर आपल्या भाग्याचा रस्ता कसा लख्ख होणार? आपल्या प्रिय भारतात ही कृती लाखो लोकं करतायत… त्यांच्या दुर्भाग्याचा नाश आपोआपच आधीच होत असेल? आणि जे भाविक श्रद्धेने निर्माल्य प्लॅस्टिक पिशवीत घट्ट बांधून सोडतायत किंवा देवादिकांच्या तस्बीरी, जुन्या मूर्ती सोडतायत… त्यांच्या भाग्याचं काय होतं मग? ते खूपच फळफळतं का? बरं, किती दिवस कोळीष्टकं काढायची? कोळ्यांना कोळिष्टकं करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा की नाही? त्यांना त्यांची स्पेस नको?
अजूनही बरेच तोडगे आहेत. अमुक तमुक फोटो लावा. निरांजन लावताना त्यात लवंगा टाका. शत्रूंचा नाश होईल (लवंगांचा वास शत्रूच्या नाकात जावून नाश झाला तर!). एका राशीला पचनाच्या किंवा पचनसंस्थेच्या तक्रारी होवू शकतात. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल असं वर लिहिलंय आणि खाली असलेला नारळ लाल कापडात बांधून जलप्रवाहित करा. काय तर्क चालेना. असोला नारळ बांधायला लाल कापड किती लागेल?… साधा नारळ नाही चालायचा? तेवढंच कापडही वाचेल. तोडगा तर्काच्या पलीकडे असावा अशी अट असते की काय? वाहता लाल खडक बघून जलचर घाबरणार नाहीत? आणि पाण्याची वाट लावून काय साध्य होणार? जलदेवतेचा कोप नाही होणार?
एक तोडगा छान आहे… भाग्यवृद्धीसाठी केळीच्या झाडाची पूजा करा आणि त्याला हळदीचे पाणी घाला. आमच्यात केळीचं झाड म्हणत नाहीत. केळीला पाणी घाला असं पण चाललं असतं. तरीपण ठीक आहे. म्हणजे केळीची पानं पिवळी पडणार नाहीत आणि वेâळी पिवळी धम्मक होतील. वा… मस्तच!
एका ठिकाणी लिहिलंय की मनोकामनापूर्तीसाठी बेलाच्या पानावर चंदनाचा टिळा लावून शंकराला अर्पण करा. म्हणजे शिक्का मारून अर्ज केला की लवकर देवाच्या लक्षात येईल.
असे बरेच तोडगे आहेत. सगळे सांगत बसले तर हा अंक भरून जाईल… आणि मग हा लेख रद्द करण्याशिवाय कोणताच तोडगा राहणार नाही.
मला सगळ्यात गंमत वाटते की यांना हे तोडगे सुचतात तरी कसे? हे पारंपारिक कुठे ऐकीवातले, अनुभवातले आहेत की नव्याने झालेला प्रतिभेचा अविष्कार आहे? प्रतिभेला धुमारे फुटतायेत? मी तरी हे नवीनच ऐकले आहेत.
काही तोडगे मानसिक आहेत. अमुक वाचा तमुक जप करा… काही निरुपद्रवी असतात… तुळशीला पाणी घाला, पिंपळाला पाच प्रदक्षिणा घाला, मुंग्यांना साखर खावू घाला (नशीब किती मुंग्यांना ते नाही सांगत… आणि प्रत्येकीला साखरेच्या किती वड्या तेही नाही सांगितलंय). ते ठीक आहे. अर्थात त्यालाही काळमर्यादा हवी. अशुभस्य काल हरणम हे तत्व यामागे असतं!
तर अशी ही गंमत आहे.
तुम्ही तोडग्यांची एवढी खात्री देताय तर पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी (क्रिकेटमध्ये नव्हे… कायमचा ताप संपण्यासाठी) एखादा तोडगा सांगा किंवा चीनचे दात घशात घालण्यासाठी काहीतरी जबरदस्त तोडगा सांगा किंवा… जावू दे… असं मी काहीही सांगणार नाही! असे बरेच राष्ट्रीय प्रश्न आहेत. मी आता डिटेलमधी सांगत बसत नाही. तसा माझा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास खूप आहे. पण त्याबद्दल परत कधीतरी. खूप खूप ह्याने लिहीन… तुम्ही फक्त वाचायची हिंमत दाखवा.
(तरूण मुलं व्यसनाधीन होवू नयेत, त्यांनी डिप्रेशनमधे जावू नये, शेतकर्‍यांचे शेतमालाचे व्यवहार फायद्यात चालावेत, विद्यार्थ्यांना स्वत:च्या मेरिटवर कसलाही अडथळा न येता, अवाजवी फिया न भरता पुढे जाता यावे आणि स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी कसलाही तकलादू तोडगा नसलेली व्यवस्था हवी आहे. ही इच्छा अतिरंजित या प्रकारात मोडायला लागली आहे. काय करनार?)
तोडग्यांची झळ परिसराला लागायला नको आणि कुणाचीबी कसलीही नुक्सानी न होता त्यांनी सबंधितांचं मनोबल उंचावलेलं राहू दे! बस्स… एवढीच विच्छा आहे.

Previous Post

वात्रटायन

Next Post

बाजरी : एक जुनं स्मार्ट फूड

Next Post

बाजरी : एक जुनं स्मार्ट फूड

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.