कॉलनीत मातृदिन साजरा होणार होता. मला त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून भाषण करावयाचे होते.
थोडी तयारी म्हणून युट्युबवरील काही भाषणे पहिली. एका वक्त्याने आपल्या भाषणाची सुरुवात खूप सुंदर केली होती. तो म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस, अन विशेष म्हणजे रात्री, मी ज्या एका अतिशय सुंदर बाईच्या बाहुपाशात व्यतीत केले आहेत, ती बाई माझी बायको नाहीये…’ या वाक्यानंतर थोडासा पॉज घेऊन तो वक्ता पुढे बोलला की,’… ती बाई म्हणजे माझी आई!’.
मला भाषणाची ही सुरुवात खूप आवडली आणि ती मी माझ्या भाषणात वापरण्याचे ठरविले. भाषणाला उभा राहिलो आणि मी म्हणालो, ‘माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस, अन विशेष म्हणजे रात्री, मी ज्या एका अतिशय सुंदर बाईच्या बाहुपाशात व्यतीत केले आहेत, ती बाई माझी बायको नाहीये…’
इतक्यात माझ्या समोरील टेलिप्रॉम्प्टर बंद झाला आणि मला पुढे काय बोलावे तेच आठवेना. मी ततपप करीत म्हटलं, ‘ती बाई कोण ते मला आता आठवत नाही!’
त्यानंतर स्टेजवर जो शेकडो चपलांचा वर्षाव झाला त्यातील पहिली चप्पल माझ्या बायकोची होती इतकंच आता मला आठवतेय!
अस्सा संताप आला त्या टेलिप्रॉम्प्टरचा! माझ्या हाती अधिकार असता तर सगळे देशद्रोही टेलिप्रॉम्प्टर ताबडतोब पाकिस्तानात पाठवले असते !!