सदाबहार, सुपरहिट ‘ब्रेक के बाद’
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेले ‘मार्मिक’ हे त्या काळातील एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक होते. बाळासाहेब स्वतः श्रेष्ठ दर्जाचे व्यंगचित्रकार असल्याने त्यांनी आजूबाजूला घडणार्या सामाजिक, राजकीय घटनांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून केलेल्या तिरकस भाष्यामुळे अगदी अल्पावधीत हे साप्ताहिक कमालीचे लोकप्रिय झाले होते. ६० वर्षांहून अधिक काळ त्याची वाचकांवर मोहिनी आहे.
हीरक महोत्सवानंतर ‘मार्मिक’चे रंगरूप बदलले आणि त्यात अनेक नवनवीन आकर्षणे निर्माण झाली. दर आठवड्याला वाचकांना ‘मार्मिक’ वाचण्याची एक प्रकारे चटकच लागली आहे. गौरव सर्जेराव यांची मुखपृष्ठे, सॅबी परेरा यांचे खुसखुशीत लेखन यांच्याबरोबरच ज्या सदराची वाचक आतुरतेने वाट बघत असतात ते म्हणजे खर्या अर्थाने ऑल राऊंडर रंगधर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे ‘ब्रेक के बाद’ हे सदर. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या बारा महिन्यात एकूण २६ लेख पुरू सरांनी ‘मार्मिक’साठी लिहिले. एक लेखक म्हणून इतके सातत्य ठेवणे हे किती जिकिरीचे असते हे प्रत्यक्ष लेखन करणार्या व्यक्तीलाच कळू शकते. दर आठवड्याला काय लिहायचे? आणि नुसतेच लिहायचे नाही तर ‘मार्मिक’सारख्या साप्ताहिकाच्या दर्जाला साजेसे लिहायचे. त्याचवेळी त्यात वैविध्य देखील जपायचे आणि शब्दांचे बंधन असताना ठरवून दिलेल्या शब्दमर्यादेत लेख वेळेत पाठवणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. अर्थात, पुरू सरांसारखा दांडगा अनुभव असलेल्या व्यक्तीने वयाच्या सत्तरीत देखील ही जबाबदारी स्वीकारून हे सदर प्रचंड यशस्वी केले आहे.
एखादी गोष्ट वाचायला घेतली की ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय बाजूला ठेवण्याची इच्छाच होत नाही, ते खरे लेखन अशी माझ्यापुरती धारणा आहे, आणि पुरू सरांचे लेखन या प्रकारातलेच आहे. त्यांनी लिहिलेला कुठलाही मजकूर, अगदी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट असो की ‘ब्रेक के बाद’सारखे सदर असो- संपूर्ण वाचून काढल्याशिवाय चैन पडत नाही इतकी सुरेख शब्दांची मांडणी पुरू सर नेहमी करत असतात. वर उल्लेख केलेले २६ लेख बघितल्यावरच कळतं की त्यात किती वैविध्य आहे. ‘मार्मिक’ वर्धापनदिनाच्या लेखापासून सुरू झालेली ही लेख मालिका सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, नाना पाटेकर, प्रशांत दामले, विजय चव्हाण, विजय कदम, जयवंत वाडकर, निर्मिती सावंत, रोहिणी हट्टंगडी, शिवाजी साटम, विजय पाटकर, मंगेश दत्त, दीपक शिर्के यांच्यासारख्या विविध प्रवृत्तीच्या कलावंतांच्या कारकीर्दीचा आढावा घेतानाच विजय केंकरे, कुमार सोहोनी यांच्यासारख्या यशस्वी दिग्दर्शकांचा, रवींद्र साठे, अशोक राणे, रघुवीर कुल, प्रकाश निमकर, हरी पाटणकर, निर्माते दिलीप जाधव, बी. वाय. पाध्ये यांच्यासारख्या पडद्यामागील महत्वाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांचा देखील परामर्श घेतात. कट्टर शिवसैनिक असल्याचा अभिमान त्यांच्या लेखांतून प्रकट होतानाच बाळासाहेबांविषयी असलेली आदरयुक्त भावना देखील ते सुरेख शब्दात व्यक्त करतात आणि डॉक्टर नितू मांडके यांच्याबदल असलेला जिव्हाळा देखील छान शब्दांत प्रकट करतात.
इतकी वर्षे नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्रात कार्य करत असताना या सगळ्या मंडळीबरोबर असलेला स्नेह, आदर आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हातचा काही न राखता मोकळेपणाने मांडणे हे पुरू सरांनाच जमू शकते. वाचकांच्या आग्रहास्तव हे सदर नव्या वर्षातही मुक्तपणे सुरू आहे, यातच त्याचे यश आहे.
– आशीर्वाद मराठे, महाड
वाईरकर, भडेकर, सोनारांचे रोचक अनुभव
‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्रांची रेलचेल असतेच. पण आपण आता प्रभाकर वाईरकर, ज्ञानेश सोनार या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांना कुंचल्याबरोबरच लेखणी हातात घ्यायला लावले आहे, ते फार उत्तम झाले आहे. वाईरकर व्यंगचित्रांमागची विचारप्रक्रिया उलगडून सांगत आहेत, तिचा नवोदित व्यंगचित्रकारांना फायदा होईल. सोनार यांच्या दिलखुलास स्वभावाने त्यांनी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींबरोबर स्नेहसंबंध निर्माण केले आणि ते निगुतीने जपले, त्यांचे ओघवते दर्शन त्यांच्या लेखणीतून होते आहे. वृत्तपत्रातल्या छायाचित्रांमागे केवढी मोठी उठाठेव असते, ते भडेकर यांच्या सदरातून समजून जाते. दृश्यकलांचा असा वेगळ्या प्रकारे वेध घेण्याचा प्रयत्न फार आवडला. कीप इट अप.
– वसुधा गोगावले, सिन्नर
हलक्याफुलक्या विनोदाची पखरण
रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच त्याच राजकीय बातम्या, भाषणबाजी, खून, बलात्कार, मारामार्या आणि कोरडी विश्लेषणे वाचून कंटाळलेल्या वाचकांना ‘मार्मिक’मध्ये हलक्याफुलक्या विनोदाचा उतारा मिळतो आहे. सॅबी परेरा ताज्या घडामोडींवर फार मार्मिक आणि चपखल भाष्य करतात. सई लळीत यांना हास्यसम्राटमध्ये पाहिल्याचं आठवतं. त्यांची खास शैली आहे. कमीत कमी शब्दांत त्या उत्तम विनोदनिर्मिती करतात. ‘नया है वह’ या सदरात वैभव मांगले वाचकांच्या प्रश्नांना खुसखुशीत आणि चुरचुरीत उत्तरं देतात. टोक्या आणि पोक्या यांची ‘टोचन’मधली जोडी तर आम्हाला जय-वीरूच्या जोडीसारखीच प्रिय आहे. हा प्रसन्न विनोदांचा शिडकावा असाच चालू ठेवा.
– रफीक शेख, सोलापूर
हसून हसून पोट दुखले…
अनंत अपराधी यांचं राशीभविष्य वाचून हसून हसून पोट दुखले. त्यासोबत त्यांचे स्केचही भनाट दिले आहे. धमाल!
– अनुजा जोशी
हसून हसून पोट दुखले…
अनंत अपराधी यांचं राशीभविष्य वाचून हसून हसून पोट दुखले. त्यासोबत त्यांचे स्केचही भनाट दिले आहे. धमाल!
– अनुजा जोशी
नायगावकरी स्टाईलचे भविष्य कडक…
‘मार्मिक’मधील राशीभविष्य आज वाचले. लई भारी, एकदम कडक! आणि ते भन्नाट व खास नायगावकरी स्टाईलचे आहे. माझी धनू रास. तिचे भविष्य वाचून मजा आली. अशोकजी यू आर ग्रेट!
पं. अनंत अपराधी जिंदाबाद!
– प्रशांत गौतम