नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचा वाढदिवस २३ जानेवारीला असतो. या दिवशी नवलकर सकाळी सात वाजता मातोश्रीवर जाऊन साहेबांना शुभेच्छा देत. तेथून परत येताना गिरगांव चौपाटीसमोरील नेताजींच्या पुतळ्याला हार घालून वंदन करीत आणि त्यानंतर घरी जमलेल्या शिवसैनिकांसोबत वाढदिवस साजरा करीत.
दै. ‘नवाकाळ’चे मालक संपादक नीळकंठ खाडिलकर हे नेताजींचे निस्सीम भक्त. नेताजींच्या पुतळ्याची साफसफाई व्हावी आणि त्यांच्या गळ्यात चंदनाची माळ असावी याकडे ते कटाक्षाने लक्ष देत. त्यांनी नवलकरांना विनंती करुन पुतळा आणि आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यास सांगितले. नवलकरांनी ते स्वतःच्या देखरेखीखाली व्यवस्थित करुन घेतले. ते काम बघण्यासाठी खाडिलकर स्वतः २३ जानेवारीला भल्या पहाटे पुतळ्याजवळ आले, तेव्हा नवलकरांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली आणि कामाची माहिती दिली. खाडिलकरांनी अशी अनेक जनहिताची कामे नवलकरांकडून करून घेतली आणि नवलकरही त्यांच्या प्रत्येक शब्दाला जागले.
सोबतच्या छायाचित्रात दिसतो आहे तो अग्रलेखाचा बादशहा भर रस्त्यात पदपथावर खुर्ची टाकून बसलेला पाहून अनेकांना त्यांचे नवल वाटले. खरे नवल तर हे होते की नवलकर त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री होते. सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून ते खाडिलकरांना भेटायला नाक्यावर आले होते.
असे हे नवलकरांचे ऐकावे ते नवल!
– घनःश्याम भडेकर