शंभर झळकावणारे फलंदाज आणि पाच विकेट पटकावणारे गोलंदाज यांची नावं ऑनर्स बोर्डवर जातात. सोनेरी असा तो ऑनर्स बोर्ड. खूप सारा इतिहास, संस्कृती आणि एकप्रकारचा अहं. टेनिसमध्ये विम्बल्डनला जे स्थान आहे ते क्रिकेटमध्ये लॉर्ड्सला आहे. भारत-इंग्लंड सामन्याला दीडशे वर्षांच्या त्या जोखडाची पार्श्वभूमी असते. अनेकदा इंग्लंडच्या सामन्यावेळी तीन गुना लगान देना होगाची आठवण काढली जाते.
—-
जसप्रीत बुमराहने लेगस्टंपच्या दिशेने झुकलेला चेंडू बर्न्सच्या बॅटची कड घेऊन ऑफसाईडच्या दिशेने हवेत गेला. सळसळत्या ऊर्जेचा मोहम्मद सिराज चेंडूच्या दिशेने सरसावला. सिराज झेल टिपण्याआधीच निम्मी टीम इंडिया लष्कराची विमानं कशी एकसाथ रोरावत जातात तसे सिराजच्या दिशेने सुटली होती. सिराजने झेल टिपला आणि त्यांच्या जल्लोषाला उधाण आलं. प्रेक्षकांनीही कल्ला सुरू केला. थोड्या वेळानंतर स्लो मोशनमध्ये टीम इंडियाची विमानं सुटताना पाहणं हा विलक्षण अनुभव होता. स्लो मोशनमध्येही एकटादुकटा खेळाडू दिसलाच नाही. अकराजणांची शरीरं एकवटून प्रचंड ऊर्जेचा लोळ तयार व्हावा तसं वाटलं. हे काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली. हे जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत इतकं त्या ऊर्जेचं स्वरुप बोलकं होतं. क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवरचा तो माहोल टीव्हीवर बघतानाही रोमांच जाणवत होता. पाचव्या दिवसाचा खेळ अंतिम टप्प्यात होता. इंग्लंडला २७२ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. ६० ओव्हर्स होते.
समीकरण बघता इंग्लंड ड्रॉ करणार हीच शक्यता प्रबळ दिसत होती. मात्र शेवटचे दोन तास मंतरलेले होते. ज्यांनी ते मिस केले त्यांना एकदम आपल्या विजयाची वार्ता मिळाली. क्रिकेटचं अग्निहोत्र अष्टौप्रहर सुरू असतं. भारतीय संघ सतत कुठेतरी खेळत असतो, जिंकत असतो. पण काही विजय मनात कोरले जातात. काही विजय नव्या पर्वाची नांदी असतात, काही विजय दणदणीत खेळाची ताकद दाखवणारे असतात. काही विजय ‘स्टेटमेंट’ होऊन जातात. परवाचा लॉर्ड्सवरचा विजय हा ठसठशीत स्टेटमेंट होतं- गुणकौशल्य, सातत्य, अभ्यास, विजिगीषु वृत्ती आणि अंगावर आलं तर शिंगावर घेऊ या उक्तीचं प्रत्यय घडवणारा होता.
हा विजय जिथे साकारला त्या जागेचं स्थानमहात्म्य भारतीय संघासाठी खूपच मोलाचं. इंग्रजांनीच क्रिकेट जगाला दिलं. त्या इंग्रजांच्या क्रिकेटविश्वाचा गड म्हणजे लॉर्ड्स. तिथे मेरलीबोन क्रिकेट क्लब आहे. या क्लबची खास अशी परंपरा आहे.
लॉर्ड्सची गॅलरी. इथलं म्युझियम.
लॉर्ड्स मैदानावरचा प्रसिद्ध असा स्लोप. शंभर झळकावणारे फलंदाज आणि पाच विकेट पटकावणारे गोलंदाज यांची नावं
ऑनर्स बोर्डवर जातात. सोनेरी असा तो ऑनर्स बोर्ड. खूप सारा इतिहास, संस्कृती आणि एकप्रकारचा अहं. टेनिसमध्ये विम्बल्डनला जे स्थान आहे ते क्रिकेटमध्ये लॉर्ड्सला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला राष्ट्रवादाची किनार असते. पाकिस्तानला हरवलं की युद्धात ठेचलं त्यांना असंच जणू वातावरण असतं. भारत-इंग्लंड सामन्याला दीडशे वर्षांच्या त्या जोखडाची पार्श्वभूमी असते. अनेकदा इंग्लंडच्या सामन्यावेळी तीन गुना लगान देना होगाची आठवण काढली जाते. आपलं स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. अनेक क्षेत्रात आपण जोरदार भरारी घेतली आहे. क्रिकेटविश्वात भारत ही महासत्ता आहे. पण अजूनही इंग्लंडला हरवलं की साहेबाला लोळवला ही भावना मनाच्या सांदीकोपर्याशतून उसळी मारून वर येते.
१९८३ मध्ये महाशक्तिशाली वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का देत भारतीय संघाने लॉर्ड्सवरच वर्ल्डकप जिंकला. तो विजय स्टेटमेंट होतं. त्या विजयाने भारतीय क्रिकेट नावाचं पर्व सुरू झालं. बलाढ्य अशा शक्तीचाही पाडाव होऊ शकतो या विचाराला बळ देणारा विजय होता. तुम्हाला इंग्रजी बोलता येत नसेल, देशांग्ल राहता येत नसेल, फार पैसेही नसतील पण तुमचा खेळ बोलत असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही याची ग्वाही देणारा विजय होता. कपिल देव यांच्या १७५ धावांच्या त्या ऐतिहासिक खेळीचं चित्रण होऊ शकलं नाही पण जिगरबाज म्हणजे काय असतं याचं ती खेळी मूर्तीमंत उदाहरण होती. अनेक छोट्या छोट्या महत्त्वपूर्ण खेळींनी सजलेला असा तो विजय होता. क्रिकेटच्या पटलावर भारताच्या ताकदीची चुणूक दाखवणारा विजय होता. इंग्रजांच्या भूमीत, त्यांच्या बालेकिल्ल्यात वेस्ट इंडिज नावाच्या सामर्थ्यवान फौजेला निष्प्रभ करणारा तो विजय विलक्षण मानला जातो. असंख्य पुस्तकांमध्ये या विजयाचं वर्णन आहे. तो विश्वविजयी प्रवास आता रुपेरी पडद्यावरही येतो आहे.
या संस्मरणीय विजयानंतर तीनच वर्षात आपण लॉर्ड्सवर कसोटी जिंकलो होतो.
लॉर्ड ऑफ लॉर्ड्स अशी बिरुदावली मिळालेले दिलीप वेंगसकर यांनी शतकी खेळी साकारली होती. चेतन शर्मा यांनी डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली होती. कपिल देव यांनी कर्णधाराला साजेशी कामगिरी करत भारतीय संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला होता.
त्यानंतर अशाच एका प्रसन्न संध्याकाळी लॉर्ड्सवर भारतीय संघाने इतिहास रचला होता. तारीख होती १३ जुलै २००२. त्या काळात वनडेत तीनशे धावा करणं संघांच्या अंगवळणी पडलं नव्हतं. इंग्लंडने ३२५ धावांचा डोंगर उभारला होता. आपली सुरुवात चांगली झाली मात्र घसरण होऊन आपण १४६/५ असे होतो. यानंतर युवराज सिंग-मोहम्मद कैफ जोडीने जे केलं ते अद्भुत असं होतं. युवी-कैफ जोडीच्या पराक्रमी भागीदारीपेक्षा लॉर्ड्सच्या गॅलरीत दादा अर्थात सौरव गांगुलीने टीशर्ट काढून केलेला जल्लोष आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे. लॉर्ड्सवरची शिष्टाचाराची परंपरा लक्षात घेता असं काही करणं धाडसी होतं. पण या टॉपलेस सेलिब्रेशनला संदर्भ होता. काही महिन्यांआधी इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्यावर होता. वनडे मालिकेतला शेवटचा सामना मुंबईत होता. आपण तो सामना आणि मालिका गमावली. जिंकल्यावर इंग्लंडच्या अँड्यू फ्लिनटॉफने टीशर्ट काढून विजय साजरा केला होता. उदास भारतीय चाहते, वानखेडेवर पसरलेली शांतता आणि मैदानावर गोर्यापान लालबुंद अशा फ्लिनटॉफने केलेला जल्लोष गांगुलीने लक्षात ठेवला.
फ्लिनटॉफला जशास तसे उत्तर देण्याची गांगुलीची कृती स्टेटमेंट होती. तुम्ही मुंबईत येऊन जिंकून शर्ट काढून नाचता- मी क्रिकेटच्या पंढरीत जिंकून टीशर्ट काढू शकतो. संकोच, भीड, अवघडलेपण हे आपल्या धमन्यांमध्येच भिनलेलं. गांगुलीने टीशर्ट उतरवताना हे सगळं भिरकावून दिलं. थर्ड वर्ल्ड कंट्री वगैरे काही नाही- आम्ही तुमच्याइतकंच चांगलं खेळून जिंकू शकतो हे गांगुलीच्या सेनेने दाखवून दिलं.
यानंतर २०१४ मध्ये धोनीच्या नेतृत्वात आपण लॉर्ड्सवर कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. अवघड अशा खेळपट्टीवर दर्जेदार गोलंदाजीसमोर अजिंक्य रहाणेचं सुरेख शतक, भुवीची स्विंग गोलंदाजी, मुरली विजयचं हुकलेलं शतक आणि इशांत शर्माने बाऊन्सर टाकून घायाळ करणं हे सगळं २०१४च्या विजयाचं वैशिष्ट्य होतं. हे सगळं असलं तरी ती शांतीत क्रांती होती.
सात वर्षांनंतर परवा टीम इंडियाने जो आवाज दिला तो दगडी देवळाच्या गर्भगृहात घुमत राहतो तसा क्रिकेटविश्वात घुमत राहील. आधुनिक क्रिकेटचा कोहली हा अनिभिषिक्त शिलेदार आहे. मैदानावर कोहलीचा वावर त्याच्या अंडर-१९मधल्या अवताराची आठवण करून देणारा असतो. प्रत्येक छोटी गोष्ट तो दिल्ली स्टाईल आक्रमक पद्धतीने साजरी करतो. चीत्कारतो. मूठ घट्ट करून येस्स करतो. प्रेक्षक थंड पडू लागले तर तुमचा आवाज पोहोचत नाही, आवाजी पाठिंबा द्या असं सांगतो. प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या जवळ जाऊन बोलंदाजीही करतो. समोरच्या मंडळींनी काही सुनावलं तर प्रत्युत्तर द्यायला जराही कचरत नाही. पंचांशी हुज्जत घालतो. अनिमेटेड वाटावं असं कोहलीचं रुप असतं. परवा कॉमेंट्रीदरम्यान हर्षा भोगले यांनी भन्नाट वर्णन केलं. ते म्हणाले, मैदानावर कोहलीची ऊर्जा पाहिली की वाटतं, कोहलीला जनरेटरला जोडलं तर एखादं शहर उजळून निघेल. परवाच्या विजयात कोहलीने ही ऊर्जा अन्य दहाजणांमध्ये पसरवली होती. तुम्हाला हवी तशी फिल्डिंग लावतो, तुम्हाला जसं आक्रमण करायचं आहे तसं करा, शिव्या घालायच्या आहेत-मी घालतो. रिव्ह्यू घ्यायचाय- आपण घेऊ. शंभर टक्के जीव ओतून खेळू आणि यांना चीतपट करू अशी कोहलीची आणि पर्यायाने भारतीय संघाची देहबोली होती.
अंगावर आलं तर शिंगावर घेणं बूमरँगसारखं उलटूही शकतं पण भारतीय संघाने चोख खेळ केला. या मॅचमधले काही प्रसंग अनेक वर्ष चर्चेत राहतील. जसप्रीत बुमराहने चाळिशीत आलेल्या जेम्स अँडरसनला बाऊन्सर टाकून हैराण केलं. अँडरसनने शिव्या दिल्या. बुमराहने त्याच्या पाठीवर हात ठेऊन प्रकरण तिथेच संपवण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसनचा वाचाळपणा सुरूच राहिला. पाचव्या दिवशी बुमराह बॅटिंगला आल्यावर इंग्लंडने याची परतफेड करायचं ठरवलं. दोनदा चेंडू बुमराहच्या हेल्मेटवर आदळला. बुमराहला बाऊन्सरने घायाळ करण्याच्या नादात इंग्लंडने मॅचची लय गमावली ती कायमचीच. असा घायाळ होत नाही म्हटल्यावर बोलून उकसवण्याचा प्रयत्न केला. स्वत: गोलंदाजी करतानाही बुमराहला चिडलेलं, संतापलेले आपण पाहिलेलं नाही. आपण बरं आपलं काम बरं हा त्याचा खाक्या आहे. बुमराहला उकसवणं इंग्लंडला चांगलंच महागात पडलं. बुमराह-शमी एकत्र आले तेव्हा इंग्लंडने मॅचवर घट्ट पकड मिळवली होती. भलते अहंकार कुरवाळण्यात इंग्लंडचं घाऊक नुकसान झालं.
आपल्या दुसर्या डावादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने जमिनीवर लोळण घेत गुडघ्यात डोकं घातलं तो क्षण पुरेसा बोलका होता. जसप्रीत बुमराहने तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात शॉन मार्शला टाकलेला स्लोअरवन गाजला होता. ट्वेन्टी-२० प्रकारात फलंदाजाला टोलेबाजीपासून रोखण्यासाठी हे अस्त्र वापरलं जातं. बुमराह कसोटीतही हे अस्त्र परजतो. परवा बटलर-रॉबिन्सन जोडी चिवटपणे प्रतिकार करत सामना अनिर्णित करणार असं चित्र असताना बुमराहने स्लोअरवनवर रॉबिन्सनला माघारी धाडलं.
रॉबिन्सन हा चेंडू खेळताना ज्या पद्धतीने फसला ते अनेक वर्ष लक्षात राहील.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ पराभूत होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बेंचस्ट्रेंथ म्हणजे सक्षम राखीव फळीच नाहीये. मुख्य खेळाडूंना पर्याय असतील असे खेळाडू त्यांच्या व्यवस्थेत तयार झालेले नाहीत. जे आहेत ते तांत्रिकदृष्ट्या परिपक्व नाहीत. त्याचवेळी भारताकडे पर्यायी दोन संघ तयार आहेत. भारताच्या विजयात आठ विकेट्ससह योगदान देणारा मोहम्मज सिराज हा गेली काही वर्ष इंडिया ए संघाकडून खेळतोय. सिराजचं यश चमत्कारातून निर्माण झालेलं नाही. पडद्यामागे कार्यरत माणसांचा, व्यवस्थेचा या विजयात मोठा वाटा आहे. अनेक वर्ष फिरकी गोलंदाजी ही आपली ताकद होती, आजही आहे. या सामन्यात रवीचंद्रन अश्विन संघाबाहेर होता. चार वेगवान गोलंदाजांसह आपण खेळलो. या चौघांनीच परवा १० विकेट्स काढल्या.
क्रिकेटचाहत्यांच्या अनेक पिढ्या ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, आफ्रिका, इंग्लंड यांच्या वेगवान गोलंदाजांचं नैपुण्य अनुभवण्यात गेल्या. आपले वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत आहेत असं चित्र आता उभं राहिलं आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचं योगदान मोलाचं आहे.
लहानपणी, अगदी तरुण वयातही खात्यापित्या घरच्या वाटणार्या कोहलीने मधल्या काळात स्वत:ला अमूलाग्र बदललं. फिटनेस हा त्याच्या आयुष्याचा भाग झाला. भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसचं महत्त्व प्रत्यक्षात आणण्यात कोहलीचा वाटा मोलाचा आहे. पाच दिवस खेळल्यानंतरही शेवटच्या तासात आपले वेगवान खेळाडू आग ओकत होते. क्षेत्ररक्षक तितकेच चापल्यपूर्ण होते. समोरचा तुम्हाला आदर देत नसेल तर तुम्ही त्याला आदर देऊ नका हे कोहलीचं सूत्र आहे. नडायला घाबरू नका पण त्याचवेळी तुमचं काम बोललं पाहिजे यावर कोहलीचा भर असतो. लॉर्ड्सवरचा विजय कोहली विचारांचा-मानसिकतेचा विजय होता.
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने छान सांगितलं होतं. गांगुली म्हणाला होता भारतात जिंकणं सोपं आहे. कुंबळे-हरभजनकडे चेंडू सोपवा, ते काम फत्ते करतात. खरी कसोटी परदेशात असते. तिथे कस लागतो. परवाचा विजय अनुभवताना गांगुलीचे शब्द किती खरे आहेत याची जाणीव झाली.
महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मालिकेआधीच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची भारतीय संघासाठी ही सर्वोत्तम संधी असेल असं म्हटलं होतं. नॉटिंगहमला आपण विजयाच्या वाटेवर होतो, तिथे पाऊस आडवा आला. लॉर्ड्समध्ये शेवटच्या दोन तासात खणखणीत खेळाच्या बळावर भारतीय संघाने यजमानांना गुडघे टेकायला लावले. मालिकेत आघाडी मिळालेय पण अजूनही तीन कसोटी बाकी आहेत. लॉर्ड्सवर पेटवलेली विजयाची मशाल अशीच तेवत राहायला हवी.