एकदा एक कुटुंब त्यांच्या चारचाकी गाडीतून फिरायला चालले होते, वडील गाडी चालवत होते. जाताना त्यांच्या गाडीला २-३ गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या, ते बघून मुलगा वडिलांना म्हणाला, ‘बाबा… स्पीड वाढवा ना.’
बाबांनी स्पीड वाढवला व पुढील १-२ गाड्यांना ओव्हरटेक केले.
पुन्हा एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले व पुढे निघून गेली म्हणून त्या मुलाने पुन्हा भुणभुण सुरू केली, ‘बाबा… स्पीड वाढवा ना!’
बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात अजून १-२ गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केले म्हणून पुन्हा तो मुलगा म्हणाला, ‘बाबा… स्पीड अजून वाढवा ना.’
तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले व म्हणाले की ‘बाळा, आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे, ज्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत त्या जास्त ताकदीच्या आहेत, त्यांची बरोबरी करायला आपण गेलो तर आपल्या गाडीचे नुकसान होईल, त्यापेक्षा ज्या गाड्यांना आपण मागे टाकले आहे त्यांच्याकडे बघ आणि समाधान मान रे…’
यावर तो मुलगा म्हणाला, ‘बाबा हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळतंय, मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का नाही कळत?’