मोदी आल्यापासून एक गोष्ट चांगली झाली हे आपण मान्यच केले पाहिजे. ते म्हणजे आपण आपली तुलना पूर्वी आपल्यापेक्षा विकसित देशांशी करायचो आता मागास देशांशी करतो. म्हणजे पेट्रोल महाग झाले, रोजगार गेले, अर्थव्यवस्था ढासळली, महिलांवरचे अत्याचार वाढले, सरकारने दिलेले काम नाही केले तरी आपण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि अफगाणिस्तान किंवा एखाद्या मागास राष्ट्राकडे पाहून त्यात लोक कसे असुरक्षित आहेत आणि आपली स्थिती त्यांच्यापेक्षा कशी चांगली आहे असे मानून आपली अधोगती झाली तरी काहीच नाही बोलायचे असे धोरण झाले. खरं तर पूर्वीची सगळी सरकारे, सगळे नेते नेहरू, इंदिरा, मनमोहन वगैरे मूर्ख होते, जे तेव्हा आपली तुलना पाकिस्तान वगैरेशी करत नव्हते. तिकडे पाकिस्तानमध्ये तर भारताच्या तुलनेत काहीच होत नव्हते. तरीही हे नेहरू नवीन धरणे, वैज्ञानिक संस्था, उद्योगधंदे वगैरे उभारत बसले. ते मनमोहन सिंगही मूर्खच… पूर्ण जग मंदीत होते आणि यांनी भारताला आणि अनेक राष्ट्रांना त्यातून वाचवले. अरे जगातील सगळ्यात कंगाल आणि गरीब देशापेक्षा तर आपण बरे आहोत ना हे समाधान मानून चालायचे होते ना. म्हटलं कोणी काही तर सरळ जपानवर अणुबॉम्ब पडल्यामुळे ते कसे मागे राहिले, जर्मनीत कसे कोट्यवधी ज्यू मारले गेले, कसे चीनमध्ये भूकमारीने लाखो लोक मेले ते सांगायचे ना?
पण, सगळेच मूर्ख…
खरं तर त्यावेळचे विरोधक म्हणजे मोदी, शहा, स्मृती इराणी वगैरेही मूर्ख होते, जे त्या काळच्या कमी महागाईवरही खूप गोंधळ घालत होते आणि सत्तेत असलेले त्यांना मागास देश दाखवण्याऐवजी त्यांना समजावून सांगत होते. पण आता मात्र सत्तेत आल्यावर ते हुशार झालेत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, संरक्षण यासारख्या मूर्ख गोष्टींवर प्रश्न विचारल्यावर सरळ मागास देशांकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, अरे आपण त्यांच्यापेक्षा तर बरे आहोत ना?
– संकेत मुनोत