माझा मानलेला परममित्र पोक्या याची होणारी वाग्दत्त वधू पाकळी काल पोक्याला घेऊन माझ्या घरी आली. त्यांनी फॉरेनच्या टूरवरून माझ्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या. त्या देण्याच्या निमित्ताने त्यांचा हा दौरा होता. त्या भेटवस्तूंत माझा पिण्याचा फेव्हरिट उंची स्टॉक होताच. त्याशिवाय त्यांनी उत्तमोत्तम घाणेरड्या, अश्लील आणि विकृतीचा अर्क असलेल्या शिव्या देणारा एक रोबोट आणला होता… आश्चर्य म्हणजे तो पुरुषी नव्हे तर युवतीच्या चेहर्याचा, साधारण पाच फूट ३ इंच उंचीचा खोक्यात बंद केलेला रोबोट होता. त्याच्या तोंडात त्यांनी मराठी भाषेत प्रचलित असलेल्या नव्या-जुन्या शिव्यांचा स्टॉक अपलोड केला होता.
मी त्यांना प्रश्न केला की मी शिव्या देणारा माणूस नाही. हा पोक्याही शिव्या देत नाही. मग तुम्ही माझ्यासाठी ही असली घाणेरडी गिफ्ट का आणली? शिवाय या रोबोटचा चेहरा युवतीचा आहे. अशी भाषा जर ही रोबोटवाली युवती बोलत असेल, तर त्याने माझी करमणूक तर होणार नाहीच, पण लज्जेने मान खाली जाईल.
-टोक्या तू या शिव्या न ऐकताच तुझ्या कॉमेन्ट्स देतोयस, प्रत्यक्षात ऐकशील तर तुझ्या ज्ञानात भर पडेल. बर्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते त्यालाच. आम्ही फक्त या स्त्रीरूपी रोबोटचं बटन ऑन करतो आणि मग तुला हवं तर कानात इयर फोन घालून तू तिच्या तोंडातून बाहेर पडणारे शिव्यांचे फवारे ऐक.
-हं. कर सुरू.
त्यांनी बटण ऑन केलं आणि ते दोघेजण माझ्या चेहर्यावरचे बदलणारे आणि संतापाचे भाव बघून तोंडावर रुमाल घेऊन हसत होते. अर्ध्या तासाने ते ऐकणं असह्य झाल्याने मी स्वत:च त्या रोबोचा स्विच ऑफ केला.
-पोक्या, पाकळी हे सारं भयानक आहे आणि तेही एका स्त्री रोबोटच्या तोंडून ऐकणं हे तर भयानक आहे. मराठी भाषेला लाज आणणारी अशी अश्लील, ग्राम्य, लिंगवाचक आणि मैथुनसूचक शब्दांची उतरंड असणारी ही शिव्यारडी रोबोट अगदी सहज बोलल्यासारखी तोंडातून हे गटाराचं सांडपाणी का बरं ओकत असेल? तिच्या आईबापांनी मित्र-मैत्रिणींनी तिच्यावर चांगले संस्कार केले नसतील का?
-अरे, टोक्या ती थोडीच पाकळीसारखी जिवंत स्त्री आहे? ती तर रोबोट स्त्री आहे. तिच्यावर चांगले संस्कार करणारी शाळा,
कॉलेजे अजून घडलेली नाहीत. उघडणारही नाहीत. रोबोटच कशाला माणसांतही ग्राम्य, अश्लील आणि ऐकताना लाज वाटेल अशी शिव्या देणारी माणसं असतात. गावागावात, शहराशहरात, पाणवठ्यावर एकमेकींचा शिव्याशाप देऊन उद्धार करणार्या बाया आपण पाहात नाही का? त्यात आयमायचा उद्धार सर्वात जास्त होतो. आपण आयुष्यात कधी ऐकल्या नसतील अशी शिव्याशापांची बरसात तिथे होत असते. लिंगवाचक शब्दांची तर उतरंडच तिथे पाहायला मिळते. प्रत्येक गावात फिरून अशा शिव्यांचा संग्रह गोळा केला ना, तर त्यावर पीएचडी म्हणजे डॉक्टरेक्ट मिळवता येईल, नव्हे महाराष्ट्रात एकाने ती मिळवलीही आहे. मराठी भाषेतला पहिला शिलालेख म्हणजे एक अत्यंत ओंगळवाणी शिवी आहे, हे मराठीच्या अभ्यासकांनाही ठाऊक आहे़ गावाप्रमाणे शहराप्रमाणे शिव्यांची भाषा बदलते. त्यात नवनवीन आधुनिक शिव्यांची भर पडतेय आणि आता सोशल मीडियातल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या साधनांमुळे एखाद्याला ट्रोल करणे आणि हे ट्रोलयुद्ध हीन पातळीवरील भाषा वापरून त्यात आपण किती माहिर आहोत हे दाखवणे हे आता कॉमन झालं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि आविष्कारस्वातंत्र्याच्या नावाखाली एखादी दुय्यम दर्जाची छछोर नटीही हे दाखवू शकते हे आपण अलीकडे पाहिलं आहे. दोन वर्षापूर्वीपासून तिचे हे विकृतीचा कळस असलेले उद्योग सुरू आहेत. आता मात्र तिने कहर केला आणि काय केलं हे तुलाही माहीत आहे. अशावेळी तिच्या वक्तव्याला ट्रोल करणारे टपलेलेच असतात. त्यांनीही तिच्याप्रमाणेच, जितक्या खालच्या पातळीवर येऊन करता येईल तितकी तिची चंपी केली. पण तिची दोन वर्षापूर्वीची ट्रोलनाक्यावरची हिस्ट्री बघितली आणि ऐकली तर तिला लिंगवाचक शब्दांचा उल्लेख करून आणि केलेली ट्रोलपंजरी वाचून त्याला उत्तरे देण्यात एक विकृत समाधान मिळतं असा माझा आणि पाकळीचा निष्कर्ष आहे.
-पोक्या असं जर तुला वाटतं ना, तर ती रोबोटबाई कोठडीतून बाहेर आल्यावर तिला माझ्या वतीने ही रोबोटची सप्रेम भेट दे. म्हणजे तिच्या ज्ञानात अफाट भर पडेल आणि नव्या दमाने नवा विचार करत दुसर्यांना ट्रोल करताना तिच्या ट्रोलना अणुकुचीदार धार येईल.
-टोक्या, तू म्हणतोस ते मान्य आहे. पण जिभेला हाड नसलेल्या, मानसिक विकृतीच्या शिकार झालेल्या दुय्यम नटीच्या बाजूनेही स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या आणि स्वार्थासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या तिच्यासारख्याच मनोवृत्तीच्या तथाकथित लीडर बाया उतरल्या आहेत. या बायांचा पूर्वेतिहास ज्यांना माहित आहे त्यांना त्यांनी कुठून कुठे आणि कशासाठी बेडूकउड्या मारल्या आहेत हे ठाऊक आहे. पण म्हणतात ना, घाण चिवडण्याची सवय एकदा लागली ना मग त्यांना कपड्यांना, अंगाला आणि विचारशून्य मेंदूला लागलेल्या डागांची कल्पना नसते. ज्या गोष्टी चारचौघात उघडपणे बोलू नयेत अशा गोष्टींच्या चर्चा या बायांनी किंवा पुरुषांनी आपसात केल्या तरी त्याला कोणी हरकत घेणार नाही. पण सोशल मीडियातून केल्या तर मात्र आपण समाजापुढे कसला आदर्श घालून देत आहोत याचा सारासार विचार त्यांनी करायला हवा.
-पोक्या याचाच मला राग येतो. जणू एका निष्पाप मुलीला छळण्यासाठी सरकार जिवाचं रान करीत आहे, असं चित्र समाजासमोर उभं करून त्या मुलीचा उद्दामपणा, कोडगेपणा आणि मानसिक विकृती झाकण्याचा यांचा प्रयत्न आहे. कोणतीही सुसंस्कृत स्त्री अशा तर्हेची भाषा वापरणार नाही, अशी भाषाच तिने वापरली आहे. समाजात जातीय विद्वेषाची कीड कशी पसरेल आणि त्याचा मनमुराद आस्वाद आणि आनंद घेत आपली ट्रोल मशीन कशी जोरात चालवता येईल यावर तिचा कटाक्ष आहे.
-ठीक आहे, आम्ही विदेशातून आलेला ही स्त्री रोबोट तिलाच तिच्या आवडीचा खेळ म्हणून भेट देणार आहोत, तुझ्या विनंतीवरून.