या व्यवसायात मोठं व्हायचं असेल तर आपला इगो आधी बाजूला ठेवावा लागतो, तुमचं चांगलं काम आणि शांत स्वभाव हेच तुम्हाला पुढील ऑर्डर मिळवून देतात. एक चांगला कॅमेरा आणि कलात्मक दृष्टी असेल तर हा व्यवसाय तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करू शकता हे या धंद्याचे वैशिष्टय आहे. कितीही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तरी ‘फोटोग्राफीचा फोकस माणसाची कलात्मकता’ हाच राहील.
– – –
पुण्यात एका मित्राला भेटायला गेलो होतो, त्याच्याशी गप्पा मारताना कळलं की कोविडकाळात त्याची नोकरी गेली. पण, त्याने एका वर्षांपूर्वी फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण केला आणि आज त्याला चांगली कामे मिळत आहेत. मी म्हटलं ‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या ‘मार्मिक’मधील सदरामध्ये तुझा व्यवसाय प्रवास आणि फोटोग्राफी व्यवसायात मराठी मुलांना संधी किती आहे, यावर लेख करूया का? त्यावर तो म्हणाला, ‘मी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, इथून जवळच वारज्याला माझ्या सरांची फोटोग्राफी इन्स्टिट्यूट आहे, तू त्यांच्याशी बोल. त्यांना या व्यवसायात अठरा वर्षे झाली आहेत. म्हणजे ते अगदीच नवखे नाहीत आणि आमच्या काळी असं होतं, आता धंद्यात काही राम राहिला नाही असं सांगणारे, फार जुने व्यावसायिकही नाहीत.‘
माझ्या मित्राला इतक्या कमी कालावधीत पुन्हा आपल्या पायावर उभं करणार्या सरांना एकदा जाऊन भेटावं या हेतूनं मी ‘पिक्सल स्कूल इन्स्टिट्यूट‘मध्ये गेलो. तिथे वेगळ्या संदर्भात परिचित असलेल्या जितेश पाटील यांना पाहून धक्काच बसला… त्यांच्या व्यवसायाविषयी अंधुकशी कल्पना होती आधी… पण, त्यांची ही झेप माहिती नव्हती.
जितेश यांच्याशी गप्पा सुरू झाल्या, ते बोलू लागले, ‘‘माझं बालपण औरंगाबादमध्ये गेलं, वडील गोविंद पाटील हे एपीआय कंपनीत मेन्टेनन्स विभागात कामाला होते. सुरुवातीपासूनच कंपनीची आर्थिक स्थिती दोलायमान होती. आपल्याकडे दर काही दिवसांनी सण येतात तसे माझ्या बाबांच्या कंपनीत दर काही दिवसांनी संप होत असायचे. त्यामुळे आई सुषमा हिने घरची आर्थिक जबाबदारी उचलली. मी देखील कॉलेज शिक्षणाचा भार कुटुंबावर पडू नये यासाठी बारावीची परीक्षा पार पडल्यावर सुट्टीत स्मोकिंग जो’ज पिझा शॉपमध्ये काम केलं. महिनाअखेरीस दहा हजार रुपये पगार हातात आला, तेव्हा मनात हिशेब केला, आपल्याला दिवसाला तीनशे रुपये म्हणजेच तासाला चाळीस रुपये मिळाले. पण आपण नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय केला तर यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. हा वयात विचार मनात यायचं कारण म्हणजे मी लहानपणापासून व्यवसायात यशस्वी झालेल्या व्यक्तींची आत्मचरित्रं वाचायचो. नोकरी न करता धंदा करावा हा संकल्प बालवयात मनात रुजायला माझी साहित्याची आवड कारणीभूत ठरली. कुणा नातेवाईकाकडे गेलो तर मी काय खाऊ मिळणार यापेक्षा त्यांच्याकडे कोणते पुस्तक वाचायला मिळेल या कल्पनेने आनंदी व्हायचो. वाचनाच्या आवडीतूनच अनेक सवंगडी मिळाले, या मित्रांपैकीच एक असलेल्या चंद्रवदनने सीसीटीव्ही कॅमेरा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या कंपनीसाठी मी मार्केटिंग करू लागलो. त्याच काळात औरंगाबादमध्ये फोटोग्राफी इन्स्टिट्यूट चालविणार्या बिपिन गोजे यांच्याशी ओळख झाली. कलेच्या क्षेत्रात जाण्याचं माझं स्वप्न फोटोग्राफीतून पूर्ण होईल असं त्यांच्याशी बोलताना वाटलं. पण या स्वप्नाचा पहिलाच टप्पा खर्चिक आणि माझ्या आवाक्याबाहेरचा होता. फोटोग्राफी कोर्सची फी १५ हजार रुपये होती. मी गोजे सरांना म्हणालो की मला कोर्सला प्रवेश हवा आहे, पण माझ्याकडे फी द्यायला पैसे नाहीत. मी तुमच्याकडे फुकट काम करीन आणि पैसे मिळाले की मी तुमची फी देईन. ते हो म्हणाले. दुसर्या दिवसापासून मी त्यांच्याकडे झाडलोटीपासून सर्व प्रकारची कामे करू लागलो.
कोर्सच्या चौकशीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून फोन येत असत, पण गोजे सर तेलगू भाषिक असल्यामुळे त्यांना इंग्रजी, तेलगू आणि हिंदी याच भाषा बोलता येत असत. त्यामुळे बर्याचदा मीच त्या मुलांशी, त्यांच्या पालकांशी बोलायचो, त्यांना कोर्सबद्दल माहिती द्यायचो. सर माझ्या कामावर खूश होते. त्यांनी इतर विद्यार्थ्यांसोबत मलाही शिकवायला सुरुवात केली. ते उत्तम शिकवत. कॉलेजचा अभ्यास आणि फोटोग्राफी शिक्षण यामुळे माझं शेड्यूल अगदी बिझी होऊन गेलं होतं. मी सकाळी साडेआठ वाजता क्लासला जायचो, ते थेट रात्री आठ वाजता घरी परतायचो. त्यामुळे फोटोग्राफी एके फोटोग्राफी हाच माझा दिनक्रम झाला होता.
क्लासला इतर मुलं त्यांचा कॅमेरा घेऊन यायची. मला मात्र कधीतरीच सरांचा कॅमेरा हाताळायला मिळायचा. फोटोग्राफीत थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलला फार महत्त्व आहे. मला कॅमेरा हवा आहे हे घरी आईबाबांना कळत होतं, पण आर्थिक विवंचनेमुळे त्यांचाही नाइलाज होता. कॅमेरा हातात नसेल तर नुसतं पुस्तकी शिक्षण घेऊन काही होणार नाही, हे दिसत होतं. फोटोग्राफी शिकण्याचा हा खर्चिक नाद सोडून मी पैसे मिळविण्यासाठी दुसरा कामधंदा शोधत होतो.
नेमके तेव्हाच वडिलांचे मित्र मजित पटेल हे अगदी देवासारखे धावून आले आणि म्हणाले, ‘‘मी जितेशला लहानपणापासून पाहतोय. हा मुलगा खूप मेहनती आणि हुशार आहे. माझी खात्री आहे की एक दिवस हा खूप यशस्वी होईल, याचं शिक्षण थांबवू नका.‘‘ हे सांगून त्यांनी वडिलांना चाळीस हजार रुपये बिनव्याजी दिले, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ती तारीख होती ९ जुलै २००३. पंचवीस हजार रुपयाचा मी कॅमेरा घेतला आणि पंधरा हजार रुपये गोजे सरांच्या इन्स्टिट्यूटची फी भरली. २००३ साली ही रक्कम आजच्या मानाने खूप मोठी होती. फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण झाला.
आता माझ्या हातात स्वतःचा कॅमेरा होता. मी काढलेले फोटो चांगले येतात असं मित्र म्हणायचे. क्लासमधील शिक्षण पूर्ण झाले होते. फी दिल्यानंतरही तिथल्या नोकरीचा पगार मिळत नव्हता, त्यामुळे बाहेर पडलो. फोटोग्राफीचे शिक्षण आयुष्यभर चालणार होतं, पण त्यासोबत पैसे मिळवणे ही माझी गरज होती. त्या काळात मोठे फोटोग्राफर्स लग्नाच्या ऑर्डरला शिकाऊ फोटोग्राफर्सना असिस्टंट म्हणून घेऊन जात असत. तिथं एक्सपोजिंग म्हणजे ३६ फोटो (एक रोल) काढला की त्याचे शंभर रुपये मिळायचे. आता तुम्ही विचाराल की फक्त ३६ फोटो का?, नगावर पैसे मिळणार असतील तर आजच्यासारखे दोनशे-पाचशे फोटो का नाही काढायचे? याचं उत्तर असं आहे की त्या काळात क्लिक केल्यानंतर येणारा फोटो चांगला आला नाही तर फोटोग्राफरचे, फिल्म आणि प्रिंट मिळून एका फोटोचे आठ रुपयाचं नुकसान व्हायचं. त्यामुळे प्रत्येक क्लिक करताना हा अँगल बरोबर आहे ना, प्रकाश योग्य आहे ना, हा विचार करावा लागायचा. त्या काळात फोटो काढल्यापासून ते धुवून येईपर्यंत उत्कंठा वाढलेली असायचा. कॅमेरात रोल भरताना, प्रिंट करताना चुकून काही गडबड झालीच तर त्या क्षणाला जिवंत करण्याचा दुसरा काहीच पर्याय नसायचा. मला वाटतं तो काळ खरचं ‘क्षण टिपण्याचा‘ होता. आज डिजिटल युगात सगळं इन्स्टंट दिसत असल्यामुळे एका क्लिकचं महत्त्व कमी झालं आहे.
फोटोग्राफीचा थोडा सराव झाल्यावर ठरवलं की आता डेअरिंग केल्याशिवाय आपल्या आयुष्यात बदल घडणार नाही. फोटो स्टुडिओत फोटो काढायला येणार्या लोकांकडून बाहेरच्या ऑर्डर्स मिळतात. घरून फोटोग्राफी करणार्यावर कुणी लगेच विश्वास टाकून कामं देत नाहीत. म्हणूनच स्वतःचा फोटो स्टुडिओ टाकायचा निर्णय घेतला. पैशांची जमवाजमव सुरू असतानाच वडिलांची कंपनी कायमची बंद झाली. पीएफचे दीड लाख रुपये त्यांना मिळाले. असं म्हणतात की वाईटातून चांगलं घडतं; बाबांची नोकरी गेली पण त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईतून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी माझा ‘लाइट स्टाईल‘ या नावाने औरंगाबादमधे पहिला फोटो स्टुडिओ सुरू झाला.’
पासपोर्ट फोटो हे आमच्या स्टुडिओच्या धंद्यातील तारणहार. कारण सरकारी काम असो, शाळेचा फॉर्म असो की परदेशवारी, या सगळ्याला पासपोर्ट साइझ फोटो लागतातच. सणाचे दिवस, वाढदिवस असला की फॅमिली फोटो काढण्यासाठी लोक अक्षरशः गर्दी करायचे. विवाह मंडळ आणि नातेवाईकांना देण्यासाठी लग्नाळू मुलामुलींना घेऊन त्यांचे पालक फोटो काढायला यायचे. त्या फिल्टर नसलेल्या जमान्यात ‘वृंदा खाकी पावडर’ आणि सफेद छत्रीमधून परावर्तित होणार्या प्रकाशाने अनेक गहूवर्ण उजळ होत असत. यांच्यापैकी कोणाचं लग्न जमलं की फोटोग्राफरचा चांगला पायगुण समजून त्यांच्या परिचयातील उपवर गोतावळाही फोटो काढायला यायचा. चांगला फोटो काढणारा मुलगा अशी अगदी कमी काळात माझी ओळख निर्माण झाली. लग्न, मुंज, बारसं यांच्या ऑर्डर्स मिळत होत्या.
मी इतरांपेक्षा काय वेगळं करू शकतो याचा विचार नेहमी करायचो. पहिल्यापासूनच मला फॅशन फोटोग्राफीत खूप रस होता. पण औरंगाबाद शहरात प्रोफेशनल मॉडेल मिळणे कठीण होते म्हणून मी आजूबाजूच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांना
भेटून सांगायचो की मला गॅदरिंगमध्ये एक स्टॉल लावू द्या, कॉलेज गॅदरिंगमध्ये बक्षीस मिळवणार्या मुलां-मुलींचे मी फ्री पोर्टफोलिओ फोटो काढून देतो. फ्री या शब्दात मोठी जादू असते. विजेत्यांचे फोटो काढले की त्यांचे मित्र-मैत्रिणी आपसूकच माझे ग्राहक बनायचे. जे चांगलं दिसतं ते पाहिलं जातं, असा फोटोधंद्याचा नियम आहे. कोणत्याही फोटो स्टुडिओत बाहेर डिस्प्लेला छान दिसणार्या मुलामुलींचे फोटो लावलेले दिसतात. काही स्टुडिओत हे फोटो पार अगदी पिवळे पडेपर्यंत, वर्षानुवर्षे बदलले जात नाहीत; मी मात्र दर पंधरा दिवसांनी डिस्प्ले फोटो बदलत असे. फोटो लावलेली मुलं अनेक मुलामुलींचे क्रश असायचे, त्यांचे फोटो पाहायला, अनेक मुलं स्टुडिओत यायची. काही जण तर माझा नवीन फोटो काढून, डिस्प्लेला तिच्या फोटोच्या बाजूला लाव असं सांगायचे. व्यवसायासोबत माझं कॉलेज शिक्षण देखील सुरू होतं. मी स्टुडिओ सुरू केला तेव्हा या धंद्यात मोठी स्थित्यंतरे घडत होती. डिजिटल कॅमेरे नुकतीच यायला सुरुवात झाली होती, कोडॅकसारखी महाकाय कंपनी बुडत चालली होती. बदल केला नाही तर आपण धंद्यातून बाहेर फेकले जाऊ हे कळत होतं. इतर प्रस्थापित फोटो स्टुडिओंनी काळाची पावले ओळखून कात टाकायला सुरुवात केली होती. भांडवल कमी असलं तरीही ग्राहकांची मागणी पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असते. मलाही स्टुडिओसाठी डिजिटल कॅमेरा आणि कम्प्युटरची गरज भासू लागली होती. त्यासाठी बँकेतून पर्सनल लोन घेतलं.
धंदा वाढत होता पण आर्थिक ताळेबंद बसत नव्हता. २००५ ते २००८ या तीन वर्षांत एक लोन फेडायला मी दुसरे लोन काढत होतो, आणि ते फेडायला तिसरे… हळूहळू या दुष्टचक्रात मी अडकत चाललो होतो. बँकेचे वसुली एजंट्स स्टुडिओमध्ये रोज येऊन बसायला लागले. त्यांच्या भीतीने मी स्टुडिओत थांबायचो नाही. फोटो काढायला येणारे ग्राहकही माझी वाट पाहून कंटाळून निघून जायचे. मग एक दिवस विचार केला की किती दिवस हे असं मरत मरत जगायचं? वसुली एजंट्सना फोन करून सांगितलं की मला तुमचे पैसे बुडवायचे नाहीत, पण तुम्ही मला रोज त्रास दिलात तर मी काम कसं करणार आणि तुमचे पैसे कसे फेडणार? त्यावेळी त्यांनी माझं ऐकलं आणि मला एक महिना वेळ दिला. नशिबाने त्या महिन्यात माझ्याकडे चांगल्या ऑर्डर्स आल्या. महिना पूर्ण होण्याआधीच मी बँकेचे हप्ते फेडू शकलो.
यातून मी एक गोष्ट शिकलो की व्यवसाय करताना फक्त उलाढालीकडे लक्ष देऊन चालत नाही, तर प्रॉफिट किती मिळतंय याकडेही लक्ष ठेवावं लागतं. २००८ साली चार वर्षांचा ताळेबंद मांडताना असं दिसलं की मला मिळणार्या प्रॉफिटपैकी ऐंशी टक्के प्रॉफिट बाहेरच्या ऑर्डर्समधून तर वीस टक्के प्रॉफिट स्टुडिओमधून मिळतोय, पण ऐंशी टक्के खर्च मात्र स्टुडिओचा होत होता. त्यामुळे स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि घरून फोटोग्राफी सुरू केली. हा निर्णय किती योग्य होता, हे मला एका वर्षात दीड लाख रुपये कर्ज फेडलं तेव्हा कळलं.
धंदा वाढत होता, पण एकसुरी कामाचा आता कंटाळा आला होता. प्रगती करायची असेल तर औरंगाबाद सोडून मुंबई-पुण्यात बस्तान बसवायला हवं, असे विचार मनात घोळू लागले होते. पण मुंबई-पुण्यात व्यावसायिक ओळखी नसलेल्या मुलाला ग्लॅमर क्षेत्रात काम कोण देणार, हा प्रश्न होता. तेव्हा फेसबुकवर मराठीतील अनेक वेगळ्या क्षेत्रातली माणसं (पीआर टीम न ठेवता) स्वतः बोलत होती, लिहीत होती. मला उमेश कुलकर्णी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे या कलाकारांशी संवाद साधताना नवीन पिढीचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजून घेता आलं.
औरंगाबाद सोडून पुण्यात व्यवसाय करू शकतो का याची चाचपणी करण्यासाठी पुण्यातील काही फोटोग्राफर्सना भेटलो, तेव्हा त्यांनी सल्ला दिला की पुण्यात एवढी कॉम्पिटिशन आहे की तुझा इथे निभाव लागणार नाही, मुंबईला ग्लॅमर इंडस्ट्री आहे, तू तिथे जाऊन नशीब आजमावून पहा. ते ऐकून मुंबईला गेलो, प्रस्थापित अभिनेत्यांना भेटण्याआधी या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करून दाखवायला हवं, यासाठी मॉडलिंग करणार्या नवीन होतकरू अभिनेत्यांना जाऊन भेटलो, तेव्हा फार मजेशीर अनुभव आले. सिरीयलमधे लहान भूमिका करणारे कलाकार सुद्धा मी प्रचंड बिझी आहे असं सांगून, सेलिब्रिटी मुखवटा घालून भेटायचे आणि माझे फोटो काढणार तर मला पैसे किती देणार हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा. या कलाकारांना भेटून त्यांच्या ओळखीने ग्लॅमर दुनियेत काम मिळेल, पैसे मिळतील या अपेक्षेने मी आलो होतो; आता हीच मंडळी पैसे मागतात म्हटल्यावर मुंबईला रामराम करून पुन्हा औरंगाबादमधे येऊन काम करू लागलो.
काही वर्षांनी गोजे सरांचा फोन आला, ‘पुण्याला मी नवीन इन्स्टिट्यूट सुरू करतोय, ती तू सांभाळ,‘ अशी त्यांनी ऑफर दिली. मी पुण्याला शिफ्ट होतोय असं घरी सांगितलं तेव्हा लहान बहीण राजलक्ष्मीने ‘तू आईबाबांची काळजी करू नकोस, तू तुझी स्वप्न पूर्ण कर‘ असा पाठिंबा दिला. मग तीनच दिवसात औरंगाबादमधील सर्व काम मार्गी लावून पुण्याला सेटल होण्याच्या तयारीने आलो. इन्स्टिट्यूटची जागा पाहिली, काम सुरू केलं, पण वीस दिवसातच गोजे सरांचं फायनान्सरशी काहीतरी बिनसलं आणि त्यांनी इन्स्टिट्यूट बंद करण्याचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. पण त्या दिवशी मी शांतपणे विचार केला की आता औरंगाबादला जाऊन पुन्हा त्याच प्रकारचं काम करण्यात काही पॉइंट नाही आणि दुसर्याची इन्स्टिट्यूट जर मी सांभाळू शकतो तर माझी स्वतःची इन्स्टिट्यूट का उभारू शकत नाही? वयाच्या एकोणिसाव्या वर्षी पहिला फोटो स्टुडिओ सुरू करताना भीती वाटली नव्हती, तर आज का वाटावी? त्यानंतर आठच दिवसात एका बँकेकडून ७० हजार रुपये कर्ज घेतलं आणि कोथरूडला चाळीस हजार रुपये डिपॉझिट भरून साडेअकरा हजार रुपये भाड्याने टू बीएचके फ्लॅट घेतला. आणि अशा प्रकारे २०१० साली ‘लाइट स्टाईल‘ फोटोग्राफी इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली.
पहिल्या महिन्यात तीन विद्यार्थी मिळाले आणि त्या महिन्याचा खर्चाचा प्रश्न सुटला. मार्केटिंगसाठी ‘कोथरूड मित्र’ या लोकल वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि फोटोग्राफी शिकायला येणार्या मुलांची संख्या वाढू लागली. जागेच्या भाड्याचे पैसे सुटत होते. या काळात मला काही मित्रांकडून, माझ्या विद्यार्थ्यांकडून फोटोग्राफीच्या ऑर्डर्स येत होत्या. पण लग्नाच्या ऑर्डर घ्यायच्या नाहीत असा विचार करूनच मी औरंगाबादवरून पुण्याला आलो होतो, त्यामुळे ते काम मी माझ्याकडे शिकणार्या विद्यार्थ्यांनाच देत असे.
क्लासमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना जनसंपर्क वाढविण्याचा सल्ला मी नेहमी देत असतो. जास्तीत जास्त फोटो काढून ते इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट करायला हवेत, तुमचं काम पाहूनच तुम्हाला काम मिळेल. वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, फॅशन, पोर्टेट, लग्नाचे फोटो, फोटोग्राफीविश्वात सर्वात चर्चेत असलेली प्री वेडिंग शूट, औद्योगिक, फीचर फोटो, फोरेन्सिक फोटो, नेचर फोटोग्राफी, क्रीडा, इंटिरिअर फोटोग्राफी… इतक्या विविध क्षेत्रांत फोटोग्राफरना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अगदीच काही नाही जमलं तर नवीन मुलांनी या व्यवसायात पदार्पण करताना इव्हेंट फोटोग्राफर म्हणून सुरुवात करायला हरकत नाही. याची सुरुवात साखरपुड्यापासून होते, मग त्याच जोडप्याचं लग्न, डोहाळे जेवण, बारसे, पहिला वाढदिवस, मुंज… ही कामं मिळतात. अशी पंचवीस कुटुंबं जोडली, तरी बर्यापैकी कमाई होऊ शकते.
मी इव्हेंट करत नसल्यामुळे क्लास संपला की उरलेल्या वेळात अॅड एजन्सीज, गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स यांना भेटत होतो. धंदा करताना काम मागायची लाज वाटता कामा नये. तुम्हाला किती चांगले फोटो काढता येतात हे लोकांना कळायला, आधी तुमचं काम सतत लोकांसमोर दिसायला हवं.
एक दिवस सुष्मिता सेनच्या फॅशन शोला शो डायरेक्टर अतुल केळकर यांच्यासोबत ओळख झाली. ते पुण्याला आले तेव्हा त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी विचारलं की याआधी फॅशन इंडस्ट्रीत कुठे काम केलं आहेस? कोणत्या मॉडेलचे फोटो काढलेस? मी म्हणालो, मी अजून फार काम केलेलं नाही, पण काम करण्याची इच्छा आहे. ते म्हणाले की सध्या काही काम नाहीये, काही असेल तर कॉल करतो (अशी आश्वासने ऐकण्याचीही सवय करून घ्यावी लागते). चार महिने उलटून गेल्यावर त्यांचा फोन आला, ‘उद्या बालेवाडी पुणे येथे फॅशन शो आहे, तुला यायला जमेल का? माझ्या फोटोग्राफरला काही अडचण आली आहे.’ मी म्हटले, ‘एका अटीवर येईन, तुमच्या फॅशन शोमधील मॉडेल्सचे पोर्टफोलिओ काढण्याची संधी मला द्या.’ ते हो म्हणाले. नंतर भेट झाल्यावर फॅशन शोचे फोटो आवडल्याचं केळकर सरांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘तू पहिल्याच प्रयत्नात एखाद्या प्रोफेशनल फॅशन फोटोग्राफरसारखे फोटो काढलेस. हे कसं जमवलस?‘
मी म्हणालो, ‘माझ्याकडे कोणतेही प्रोफेशनल मॉडेल्स नव्हते, तेव्हा मी वेगवेगळ्या मासिकातले फोटो बघून त्या फोटोंचं ‘रिव्हर्स इंजीनियरिंग‘ करायला सुरुवात केली. ही मॉडेल मंडळी कोणते कपडे घालतात, वेगवेगळ्या ड्रेसवर ते कशा प्रकारचा मेकअप करतात, मॉडेलिंग करताना कोणत्या प्रकारचं लायटिंग आवश्यक असतं याचा अभ्यास मी करत होतो. फेसबुकच्या माध्यमातून मी फॅशनविश्वातील अनेक लोकांशी बोलत होतो. काही ड्रेस डिझायनर, मेकअप आर्टिस्ट यांच्याशी मैत्री झाली. ज्या दिवशी आपल्याकडे काम येईल तेव्हा आपण एकत्र काम करू या विचाराने आमची टीम तयारच होती. हा शो शूट करताना मी माझी हीच टीम घेऊन आलो होतो, त्याचा मला खूप फायदा झाला.‘ पहिला मॉडेल पोर्टफोलिओ मी इथेच बनवला.
यानंतर फॅशन क्षेत्राचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले, यातूनच सकाळ ग्रूपच्या मंजिरी फडणीस मॅडमनी मला तनिष्का मासिकात कव्हर फिचर करायची संधी दिली. सोनाली कुलकर्णी (छोटी) या अभिनेत्रीसोबत मी दोन कव्हर्स केले. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. खरे सेलिब्रिटी प्रोफेशनल असतात. त्यांना कळतं की आपले फोटो चांगले येण्यासाठी फोटोग्राफरला त्याच्या मनासारखं काम करू द्यायला हवं. फॅशन फोटोशूट करताना लाइट किंवा बाकीच्या गोष्टींची तयारी करताना वेळ लागतो तेव्हा ही मंडळी शांत बसून आम्हाला आमचं काम करू देतात.
मी इन्स्टिट्यूट सुरू केली ती कोथरूडची जागा धंदा उभारणीसाठी योग्य होती, पण आता व्यवसाय वृद्धी करताना पुणे शहरापासून लांब वाटत होती. कोणताही व्यवसाय करताना लोकेशन फार महत्त्वाचं असतं. डेक्कन हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने इथे इन्स्टिट्यूट असणं सर्व दृष्टीने सोईचं होतं. जागेच्या शोधात असताना नारायण पेठेतील सातववाडा इमारतीत साडे पाचशे स्क्वेअर फीट जागा मिळाली. या जागेचे इंटिरियर मीनाक्षी पोरे ही आर्किटेक्ट मुलगी करत होती. माझ्या स्टुडिओची मांडणी करताना तिने माझ्या मनात कधी घर केलं याचा मला देखील पत्ता लागला नाही. १८ डिसेंबर २०१४ला आम्ही लग्न केलं. लग्नानंतर व्यवसायात चढउतार येत असताना घराची एक आर्थिक बाजू मीनाक्षीने समर्थपणे सांभाळली, त्यामुळे आजवरच्या माझ्या यशात तिचा मोलाचा वाटा आहे. नारायण पेठ हे पुण्यातील एकदम सेंट्रल प्लेस असल्यामुळे माझ्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थीसंख्या चांगली वाढू लागली होती. माझ्याकडे शिकायला येणार्या विद्यार्थांचे वय कमीत कमी सात वर्षे आणि जास्तीत जास्त सत्तर आहे. समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे, अल्पशिक्षित आणि उच्चशिक्षित असे अनेक विद्यार्थी येतात. कुणी हौस म्हणून कोर्स करतात, तर कुणी पार्टटाईम व्यवसाय म्हणून. फोटोग्राफीसंबंधी बेसिक गोष्टी शिकवून झाल्या की या व्यवसायात कोणत्या फील्डमधे काम करायचं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला त्या त्या धंद्यातील अर्थकारण कसं चालतं याची माहिती मी देतो. फोटोग्राफी हा व्यवसाय एकटा माणूस करू शकत नाही, या धंद्याला टीम लागतेच. म्हणूनच नवीन विद्यार्थी असिस्टंट बनून कोणाही फोटोग्राफरच्या टीममधे सामील होऊ शकतो. या व्यवसायात मोठं व्हायचं असेल तर आपला इगो आधी बाजूला ठेवावा लागता. एखाद्या इव्हेंटमधे आयोजक ओरडले, तर दुर्लक्ष करून विषय तिथेच सोडायचा असतो. तुमचं चांगलं काम आणि शांत स्वभाव हेच तुम्हाला पुढील ऑर्डर मिळवून देतात. एक चांगला कॅमेरा आणि कलात्मक दृष्टी असेल तर हा व्यवसाय तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करू शकता हे या धंद्याचे वैशिष्ट्य आहे. कलेच्या या क्षेत्रात कुणीही सर्वज्ञानी नाही. रोजच्या अनुभवातून शिकत जाण्याची ही कला आहे. कितीही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तरी ‘फोटोग्राफीचा फोकस माणसाची कलात्मकता’ हाच राहील. असं मला वाटतं. आज काळाची गरज ओळखून आम्ही वारजे येथील मोठ्या जागेत इन्स्टिट्यूट शिफ्ट केली. फोटोग्राफीसोबतच ड्रोन कॅमेरा,
सिनेमॅटिक शूटिंग… अंतर्भूत असलेली व्हिडिओ फोटोग्राफी आम्ही शिकवतो, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.‘
फोटोग्राफी क्षेत्रात मराठी माणसाने पूर्वीपासूनच अटकेपार झेंडे रोवले आहेत. मागील पिढीतील गौतम राजाध्यक्ष, जगदीश माळी, या पिढीतील अतुल कसबेकर, अविनाश गोवारीकर… यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटविला आहे. आजही अनेक मराठी मुलं या व्यवसायात दिसतात, पण जास्त कमाई असणार्या मोठ्या इव्हेंटमध्ये मात्र मराठी मुलं फारशी दिसत नाहीत. भारतात वर्षाला अंदाजे एक करोड लग्नं होतात, त्यांचं बजेट पाच लाख ते पाच करोड इतकं असतं, तुम्ही तुमच्या कामाची क्वालिटी आणि जनसंपर्क वाढवत पाच करोड बजेट असलेल्या लग्नातील फोटोची ऑर्डर मिळवीन, असा संकल्प करायला हवा; तरच तुम्ही या धंद्यात प्रगती करू शकता. काही मुलं इतरांच्या तुलनेत अगदी कमी पैशात काम करायला तयार होतात, पण दर पाच वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलामुळे तुम्हाला नवीन कॅमेरा आणि इतर उपकरणे विकत घ्यावी लागणार आहेत हेही लक्षात ठेवा. फोटोग्राफीचा धंदा म्हणजे कला आणि व्यवसाय यांचं मिश्रण आहे, ज्याला याचा ताळमेळ जमला तोच इथे यशस्वी झाला.