किती काम केलं या माणसाने आयुष्यात, असे कोणी एखाद्या माणसाबद्दल गौरवोद्गार काढले की मला वाटतं, घरोघर मरमर काम करणार्या बायकांचं नाव असं कधी नावाजलं जात नाही. त्यावर कधी ग्रंथ निघत नाही. आयुष्यभर निष्ठेने काम करणार्या एखाद्या कामाला वाहून घेतलेल्या माणसाबद्दल मला आदरच आहे. पण बाईला असं सर्वस्व झोकून काम करता येत नाही. किंवा केलंच तर थोडासा अपराधी भाव तिच्या मनात राहतो. कारण स्त्री ही कुटुंबातले भावनिक बंध दृढ किंवा मजबूत राहावेत म्हणून धडपडत असते.
जिला रात्री काय भिजत टाकायचं याचा घोर सकाळपासून असतो, कधी विसरलीच तर तीन वाजता धाडकन जाग येते आणि काहीतरी पाण्यात पटकन ढकललं जातं. एक लिटर दूध नासलं तर मनातून दिवसभर तरी रुखरुख असते. लागोपाठ दोन दिवस दूध ओतू गेलं तर भयंकर अपराधी वाटायला लागतं, अशी घरातली बाई असते.
मला वाटतं, मीच जमिनीपासून छताला भिडतील एवढ्या पोळ्या आजतागायत लाटल्या असतील. भाकर्या, आंबोळ्या, थालीपिठं, घावणे वगैरे तत्सम मंडळींचा साधारण तेवढाच ढीग असेल. साधारण एक लहान तलाव भरेल एवढी आमटी आजवर ढवळली असेल. एक बारा बाय बाराची खोली भरेल एवढ्या भाज्या चिरल्या असतील. त्याआधी त्या निवडल्या असतील. धुतल्या असतील. चिरल्या असतील. बाजारातून थोडीफार घासाघीस करुन निवडून पारखून आणल्या असतील. बाजाराचा दिवस व्रत असल्यासारखा वर्षानुवर्षे चुकवला नसेल. कांदे पाच पन्नास पोती चिरले असतील. म्हणजे माझ्या डोळ्यांमधून किती लिटर किंवा किती बॅरल पाणी वाहिलं असेल… तुम्ही नुस्ता विचार करा.
ही झाली माझ्या छोट्या, चार माणसांच्या कुटुंबाची गोष्ट! एकत्र कुटुंबातील जेवणी खावणी, सणवार, आलं गेलं यांचा रगाडा तर विचारायलाच नको. रोजच किमान दोन पंगती बसतात. यातच बाळंतपणं, मुलांना सांभाळणं, लहानाचं मोठं करणं, त्यांची आजारपणं, वृद्ध लोकांची सेवासुश्रुषा… अशी कामांची रास वाढतच जाते.
घरातल्या बाईच्या श्रमाचं मोल केलं जात नाही. आयुष्यभर त्या रगाड्यात भरडल्या जातात. काहीजणी तर अक्षरशः हुतात्मा होतात. अमक्याची बायको किंवा तमक्याची आई एवढीच ओळख त्यांची कोणतरी कुठेतरी करुन देतं, बस्स… त्यापरते काहीच नाही.
यापेक्षा घरी काम करून शेतात राबायला जाणार्या बायकांची परिस्थिती जरा बरी म्हणायची. विशेषतः कोल्हापूर पट्ट्यातल्या बायका. घरी पाणी आणता आणता त्या भाजी आणि भात करून घेतात… सकाळी सहा वाजता. मग वीसभर भाकरी बडवतात आणि गठुळं डोक्यावर ठेवून शेतात जातात. मग दिवसभर शेतात राबतात. बरं एवढंच की जरा निसर्गाच्या सानिध्यात त्या येतात. दिवसभर घरात कोंडून राहायला नको. आजुबाजूच्या चार बायका काम करता करता मनं मोकळं करायला भेटतात.
आम्ही कणकवलीहून जेव्हा कोल्हापूरला जायला निघतो, तेव्हा घाट चढून वर गेलो की लगेचच थोड्या वेळात शेतावर काम करणार्या बायकांची लगबग दिसायला लागते. कोण शेण टाकतेय, कोण शेणी थापतेय, कोण भात कापतेय, कोण वारवतेय! सगळ्यांच्या साड्या एकजात हिरव्या. हातात रुतलेला हिरवा चुडा. यांना दुसरा रंग आवडतच नाही की झाडासारखे हिरवे कपडे त्यांना आवडतात कोण जाणे. युनिफॉर्म असल्यासारख्या हिरव्या साड्या. गेली चाळीस वर्षं मी हे दृश्य बघतेय. काहीही फरक नाही. (कोकणातल्या बायका रोज अशी हिरवी साडी नेसत नाहीत. डोक्यावरून पदर नसतो आणि केसात फूल हमखास असतं. कोकणातल्या लोकांवर बराचसा मुंबईचा प्रभाव आहे.)
कोकणात अजून एक दृश्य हमखास दिसतं. गावात रस्त्याचं किंवा पुलाचं वगैरे काम करण्यासाठी कर्नाटकातील माणसं मजुरीला येतात. गावातच देवळाजवळ किंवा ग्रामपंचायतीजवळ त्यांच्या झोपड्या अचानक रुजुन याव्यात तशा वस्तीला येतात. पुरुष, बायका, मुलं सगळी असतात. दिवसभर काम करून झालं की दुकानात यायचं, तिथून धान्य विकत घेऊन लगेचच बायका गिरणीत यायच्या. कमरेवर बहुधा काळंसावळं, गुटगुटीत, चांदीचे दागिने घातलेलं लेकरू असायचं. बायका गिरणवाल्याकडून सुपं घ्यायच्या, धान्य पाखडून निवडून लगेचच दळायला द्यायच्या. दळण घेऊन हसतमुखाने झोपडीत गेल्या की थोड्या वेळात तिथून धूर दिसायचा… आणि विस्तवावर टम्म फुगलेल्या भाकरींचा ढीग लागायचा. भगुण्यात काहीतरी झणझणीत रटमटत असायचंच. म्हणजे घराची पूर्ण जबाबदारी अधिक देशाच्या विकासाला हातभार! या कामाची तुलना जेसीबीच्या कामाशी होऊच शकत नाही. कारण या सगळ्या मागचा जिव्हाळा आणि प्रेम जेसीबीत कुठून येणार?
असो. सहज लिहिलंय सगळं… तिला तिच्या कामाचं पैशात रूपांतर नको असतं. फक्त घरातल्यांना जाणीव असली म्हणजे झालं.
काल परवाच एक चांगली बातमी येवून थडकली… भारतीय महिला निकहत झरीनने मुष्टीयुद्धात सुवर्ण पदक खेचून आणलं आहे. ही पाचवी भारतीय महिला आहे. ज्या समाजात बर्याच प्रमाणात बुरखा/ हिजाबाची सक्ती केली जाते, त्या समाजातल्या स्त्रीने असं घवघवीत यश मिळवणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. भारतीय स्त्री केवळ मनानेच नाही तर शरीरानेही खंबीर आहे, हेच यातून सिद्ध होत आहे.
तुम्हाला वाटेल की महिला दिन जवळपास न्ासताना ही असं का बोलत आहे? पण मला वाटतं, मनातली गोष्ट व्यक्त करायला महिला दिनाची का वाट बघायला हवी? मी किंवा तिने व्यक्त होणंच जास्त महत्वाचं आहे.
बाकी सर्व ठीक. लग्नाचा जोरदार सीझन सुरू आहे. कोरोनाच्या काळात साध्या पद्धतीने झालेल्या लग्नांचा आता वचपा निघतोय. हळदी खेळल्या जाताहेत. जेवणावळी झोडल्या जाताहेत. नवरा बायकोच्या, सासवासुनांच्या नव्या जोड्या तयार होताहेत. आशीर्वाद भरभरून दिले घेतले जात आहेत. कालचक्र वेगाने सुरू आहेच. त्याचा वेग तसुभरही कमी व्हायस तयार नाहीये…
…नमस्कारासाठी खाली वाकलेल्या मुलीला, छान संसार कर, स्वत:ला कमी समजू नकोस आणि जास्तीही नको, असा मी भरघोस आशीर्वाद दिला.