मित्रांचे, नातेवाईकांचे व्हॉट्सअॅप ग्रूप म्हणजे हल्ली रणमैदानं झाली आहेत… राजकीय धुमश्चक्री चालते तिथे. अशा ग्रूप्समध्ये वावरायचं तरी कसं? काही टिप द्या.
– बाळकृष्ण रेंदाळकर, कवठे महांकाळ
खूप वेळ असेल आणि चांगलं काम करायची इच्छा नसेल तर राहा की ग्रूपमध्ये…
आपल्या देशात ज्या वेगाने याच्याखाली ते, त्याच्याखाली हे असं सापडत चाललंय. ते पाहता काही दिवसांनी उपग्रहांवरून काढलेल्या फोटोत सगळा देश उकरून काढलेला दिसेल… किती खोल आणि काय काय उकरत जायचं आपण?
– ज्योती म्हाकवेकर, कणकवली
पाहा आता तुम्हीच… आणि बोध घ्या.
उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही आणि पावसाळ्यात पुराचं नाकातोंडात पाणी ही आपली परिस्थिती कधी बदलेल हो!
– रवींद्र ताजणे, नायगाव
आपल्या राज्यकर्त्यांना नियोजन या शब्दाचा अर्थ कळला की बदलेल.
सिनेमा, नाटकाच्या निमित्ताने तुम्ही परदेश दौर्यावर गेला असालच. कोणता देश आवडला? तिथे सगळ्यात जास्त काय आवडलं?
– शोभा मुरकुटे, सत्पाळा
सगळं युरोप छान आहे… शिस्त आणि हवामान…
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, तर त्यांना भेटल्यावर तुम्ही त्यांच्याशी सर्वात आधी काय बोलाल?
– दिलावर शेख, साकीनाका
का अजून काम करताय सर???
माझ्या मुलाला भविष्यात माफिया गुंडांचा गँग लीडर तरी बनायचंय किंवा राजकीय पुढारी तरी… त्याला कोणत्या ‘व्यवसाया’त जाण्याचा सल्ला द्याल?
– शांताराम साळुंके, रेवदांडा
गँग लीडर… तिथे किमान इज्जत तरी आहे.
डिजिटल माध्यमांच्या या युगात नाटक टिकून राहील का? त्यासाठी नाटकवाल्यांनी काय पथ्य पाळलं पाहिजे?
– रॉनी डिसिल्व्हा, अहमदनगर
नवनवीन विषय आणि प्रयोग… नाटक माध्यमाची बलस्थानं ओळखायला पाहिजेत… जे आपल्याकडे होत नाही.
तुमचा सर्वात आवडता परदेशी अभिनेता कोण? तो का आवडतो?
– शंतनू साठे, वाई
टॉम हँक्स… अतिशय सुंदर आणि सहज काम
मिसळ कोल्हापूरची भारी, नाशिकची भारी की पुण्यातली भारी?
– संदेश सोनार, साखरपा
मला मिसळच आवडत नाही
अलीकडे लोकांना कोणत्याही वस्तूत शिवलिंग, गणेशाकृती किंवा असं काहीतरी परमेश्वरस्वरूप सापडायला लागलं आहे. चराचरात परमेश्वर पाहू शकणार्या या लोकांना हाडामांसाच्या माणसात ईश्वर का दिसत नसेल?
– सुयोग आंबेकर, भूम
बहुतांश धर्म अंधश्रद्धाच पसरवण्याचं काम करतात… तुम्ही विचार करा आणि मुलांना तसं शिकवा.
आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार्या मुलांकडे लोक अतिशय तिरस्काराने पाहतात. वानप्रस्थाश्रम ही सुंदर कल्पना जन्माला घालणार्या देशात हा अट्टहास का?
– मीनल कांबळे, इगतपुरी
आपला समाजच ढोंगी आहे… त्याला काय करणार कोण??
काही लोकांसाठी तरी टकमक टोकावरून कडेलोटाच्या शिक्षेला परवानगी मिळावी, असं मला वाटतं… तुम्हाला वाटतं का कुणाला तेलाच्या कढईत लोटावं किंवा हत्तीच्या पायी द्यावं असं?
– जयराम काशीकर, पिंपळगाव बसवंत
नाही…
मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सध्या जो अमर्याद राजकीय नंगानाच सुरू आहे, तो पाहून प्रभू रामचंद्रांच्या मनात काय विचार आला असेल?
– प्रवीण वनमाळी, नागपूर
कलियुग म्हणतात ते हेच आहे… असंच म्हणतील ते.
स्टेजवर आवेशात गेलात आणि संवाद विसरलात, असं कधी तुमच्या बाबतीत झालं आहे का? काय करता अशावेळी?
– राधिका टिपणीस, सिंदखेड राजा
हो झालाय की… पण सावरून घेणं यालाच तर प्रयोग म्हणतात.