‘नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसल्यामुळे त्यांना आता हिंदुत्व आठवले आहे. त्यामुळे दादर पूर्वच्या हनुमान मंदिर तोडण्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा खोटा देखावा केला. त्याचे हे हिंदुत्व नकली आहे,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली. शिवसेनेने कधीही भाजपाप्रमाणे निवडणुकीपुरता आणि मतांसाठी हिंदुत्वाचा कधी वापर केला नाही. तर मराठी माणसाच्या हितरक्षणाबरोबरच राष्ट्ररक्षणार्थ व्यापक हिंदुत्वाचा प्रसार सतत केला.
१९६८ साली कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरून वाद उपस्थित झाला होता. या किल्ल्यावर हिंदूंना पूजाअर्चा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती. सरकारच्या या धोरणाचा स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांनी विरोध केला. तेव्हा पोलिसांनी १४४ कलम पुकारले आणि शिवसैनिकांना मज्जाव केला. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष वसंतराव मराठे हे पोलिसांना न जुमानता दुर्गाडी किल्ल्यावर पोहोचले. बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की दुर्गाडी किल्ला हा हिंदूंची वास्तू असून या ठिकाणी बांधकामासाठी लावलेले १४४ कलम आम्ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे दूर करू. नुकतेच कोर्टाने दुर्गाडी किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या मालकीची असल्याचा निकाल दिला आहे.
‘मार्मिक’ साप्ताहिकाला २४ वर्षे पूर्ण झाली तेव्हा १२ ऑगस्ट १९८४च्या अंकात ‘स्वातंत्र्य टिकवणारी पिढी उभी केली’ या अग्रलेखात त्यांनी स्पष्टपणे हिंदुत्वाची भूमिका विशद केली. आज आम्ही हिंदुत्वाचे, हिंदूधर्म रक्षिण्याचे पाऊल उचलले आहे. आम्ही त्याचा प्रचार सभांमधून करतो. आमच्या हिंदुत्वाचे भजन काहींना कानठळ्या बसवणारे वाटते. पण देशातील हिंदू एक दिवस एकटवणारच. विराट शक्ती जेव्हा जन्म घेते, तेव्हा भल्याभल्यांना दाती तृण धरून शरण यावे लागते. हा इतिहासाचा दाखला आहे. हिंदू धर्म टिकला तरच देश टिकेल, देश टिकला तरच हिंदू म्हणून आपल्या न्याय्य हक्कांचे रक्षण बंधुभावाने होईलच होईल. म्हणून टीकेचे धोंडे तुडवीत सैनिकांच्या चालीने आगेकूच करा, असे आवाहनही त्यांनी केले.
डिसेंबर १९८७ साली मुंबईत विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवली आणि जिंकलीही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येते हे बाळासाहेबांनी प्रथम दाखवून दिले. या आधी हिंदू महासभा, जनसंघ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या. परंतु शिवसेनेसारखे देदीप्यमान यश त्यांना मिळाले नाही. पार्ल्याच्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर तत्कालीन भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांची भेट घेऊन शिवसेना-भाजप युतीची गळ घातली. पुढे काय घडले हा इतिहास आहे.
या निवडणूक प्रचारात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विषय सभांतून मांडला. दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी भडकाऊ भाषणे केली आणि हिंदू धर्माच्या नावावर मते मागितली म्हणून बाळासाहेबांवर केस दाखल करण्यात आली. हा खटला तब्बल बारा वर्षे चालला. मग १९९९ साली बाळासाहेबांचा मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतला गेला. बाळासाहेबांना सहा वर्षे मतदान करण्यास बंदी घालण्यात आली आणि निवडणूकही लढवता येणार नाही असा अध्यादेश राष्ट्रपतींनी काढला. हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली म्हणून एखाद्या व्यक्तीचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याची ही पहिलीच आणि एकमेव घटना होती. हिंदुत्वाच्या लढ्यासाठी न्यायालयाचा निर्णय एका शिस्तप्रिय, देशप्रेमी, जागरूक नागरिकाप्रमाणे बाळासाहेबांनी शिरसावंद्य मानला.
१९९० साली अयोध्येत राम मंदिर उभे राहावे म्हणून भाजपासह इतर हिंदू संघटनांनी मागणी केली. रामजन्मभूमीसाठी रथयात्राही निघाली. २५ सप्टेंबर १९९० रोजी ‘सौगंध राम की खाते है, मंदिर अयोध्या में बनाऐंगे’ अशी घोषणा देत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी सोमनाथ मंदिराच्या परिसरातून रथयात्रेची सुरुवात केली. मुंबईत रथयात्रा पोहचली, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी इतर हिंदू संघटनांप्रमाणे मुळमुळीत भाषणे न करता हिंदूंमध्ये अंगार फुलवणारे, नवचैतन्य निर्माण करणारे, जाज्जवल्य हिंदुत्वाची मशाल पेटवणारे भाषण केले. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराला विरोध कराल, तर सारा हिंदुस्थान पेटून उठेल असा इशारा दिला. राममंदिराची उभारणी म्हणजे हिंदू राष्ट्राची पायाभरणी. हिंदूंच्या वाटेला जाल तर खबरदार, असा इशारा धर्मांध मुस्लिमांना देण्यास ते विसरले नाहीत.
अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाली. सात डिसेंबरपासून देशात सर्वत्र हिंसाचाराचा आगडोंब उसळला. मुंबईत तणाव निर्माण झाला. नंतर दंगल उसळली. कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली. पण जबाबदारी कुणी घेत नव्हते. भाजपचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, शिवसैनिकांनी मस्जिद पाडली. मुंबईत पत्रकारांनी शिवसेनाप्रमुखांना यासंबंधी खुलासा विचारला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तो ताडकन् उत्तरले, ‘‘शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर अशा शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमानच आहे.’’ देशभर ही बातमी पसरली. तेव्हा देशातील एकमेव ‘हिंदू नेते’ म्हणून हिंदूंनी आणि वृत्तपत्रांनी संबोधले.
हिंदुत्वाचे ‘बाळकडू’ ब्ााळासाहेबांना घरातूनच मिळाले आहे. प्रबोधनकारांच्या बहुजनवादी हिंदुत्वाने सामाजिक परिवर्तनाचा धडा घालून दिला. १९२१ साली त्यांनी मुंबईतील गजानन वैद्य यांच्या ‘हिंदू मिशनरी चळवळीत’ ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मपरिवर्तनाला विरोध करून आळा घातला. नंतर त्यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकातून हिंदूंमधील बहुजनांना जागृत केले. मुंबईतील दादर येथील मारुती मंदिर, अस्पृश्यांसह अठरापगड हिंदू जातींसाठी खुले करण्यात पुढाकार घेतला. तिथे मारुती स्तोत्र म्हटले. भाजपवाल्यांसारखे ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याचे फक्त नाटक केले नाही. सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू केला. हुंडाविरोधी चळवळ केली. अंधश्रद्धा व बालविवाह अशा हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांवर प्रहार केला.
शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडीजानव्यात अडकणारे नव्हते. त्यांना मंदिरात घंटा बडविणारा हिंदू नको होता, तर धर्मांधांना बडवणारा हिंदू हवा होता. हिंदू धर्म हा देशाचा प्रधान धर्म आहे याची जाण हिंदूंसह अहिंदूंनीही ठेवावी, ‘हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व’ असे त्यांचे ठाम मत होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी बहुजनवादी हिंदुत्वाचा पाया रचला, तर त्यावर शिवसेनाप्रमुखांनी कडवट हिंदुत्वाचा कळस चढवला. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्र व देशातील मंदिरांचे रक्षण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक प्रबोधनकार ठाकरे आहेत.
८० वर्षांपूर्वी मराठी हमालांनी एकत्र येऊन दादर पूर्व येथे हनुमान मंदिराची स्थापना केली होती. या हनुमान मंदिरामध्ये दादर-मुंबईचेच नव्हे, तर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो हनुमान भक्त, प्रवासी दर्शन घेत होते. अशा प्रसिद्ध हनुमान मंदिरास बेकायदा ठरवून केंद्रातील भाजपा सरकारने बुलडोझर चालवण्याचा फतवा रेल्वे मंत्रालयातर्फे काढला. बुलडोझर अंगावर घेऊ, पण हनुमान मंदिराला हात लावून देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला. महाआरती करण्याचाही इशारा दिला आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवसैनिक आणि हनुमान भक्तांसह महाआरती केली. ‘बजरंग बली की जय’चा नारा घुमला. दादर पूर्व भागात हिंदुत्वाचा गजर घुमला.
आपल्या मंदिरांचे रक्षण करताना दुसर्या कोणत्याही धर्माबद्दल द्वेष पसरवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अनेक मंदिरे वाचवल्याचे त्या-त्या ठिकाणचे पुजारी विश्वस्त अजूनही अभिमानाने सांगत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. जेव्हा आदित्य ठाकरे वाराणसी दौर्यावर गेले होते तेव्हा योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारने कॉरिडोरच्या नावाखाली मंदिरे, प्राचीन मूर्ती तोडल्याची माहिती तेथील पुरोहितांनी दिली. निवडणुका जिंकण्यासाठी हिंदूंच्या मतासाठी भाजपावाले हिंदुत्वाची जपमाळ ओढतात. निवडणुका होऊन सत्तेत आल्यानंतर मंदिरावर बुलडोझर चालवतात. भाजपाचे हे बेगडी हिंदुत्व आहे. मंदिरांना खरा धोका भाजपापासूनच आहे.
गेल्या महिन्यात बांगलादेशमध्ये जो अराजकाचा डोंब उसळला, त्यात जात्यंध बांगलादेशवासीयांनी अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. हिंदु पुजारी, हिंदु धर्मगुरू यांच्यावर हल्ला केला. हिंदूंची घरे जाळली. त्यांना बेघर केले. हिंदूंनी बांगलादेश सोडून जावे म्हणून जिहाद पुकारला. तिथे चोहोबाजूने हिंदूंचे खच्चीकरण होत असताना केंद्रातील भाजपा सरकार मात्र मूग गिळून बसले. हिंदुस्थानात हिंदूंच्या मंदिरावर बुलडोझर चालवणार्या भाजपा सरकारची बांगलादेशात रणगाडे घुसवण्याची हिंमत झाली नाही. अशा कठीण परिस्थितीत इंदिरा गांधी यांची आठवण येते. १९७१ साली त्यांनी हिंमत दाखवून बांगलादेशात रणगाडे घुसवून तेथील सर्वधर्मीय नागरीकांना संरक्षण दिले होते. पाकिस्तानातही रणगाडे घुसवण्याची हिंमत दाखवली होती.
‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ भाजपाचा हा नारा फक्त निवडणुकीपुरता आहे. बांगलादेशसमोर बोटचेपे धोरण असते. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव मिस्त्री यांनी बांगलादेशच्या प्रशासनाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. महमद युनूस यांची भेट घेऊन बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखावे अशी विनंती केली. त्यानंतरही तेथील हिंदुंवरील अत्याचार थांबले नाहीत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतरही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्याचा इव्हेंट केला नव्हता. ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हे उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आहे. ‘घर पेटवणारे नव्हे तर घरातील चूल पेटवणारे’ शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना निर्णय घेतले. हिंदुत्व कृतीतून दाखवून दिले. २०१९ साली शिवसेनेने काँग्रेसबरोबर जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली, तेव्हा विरोधकांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले अशी बांग दिली. अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कधीही अल्पसंख्याकांचे लांगुलचलन केल्याचे एकही उदाहरण नाही. कोविड काळात सर्व जाती-धर्माच्या लोकांना वैद्यकीय व इतर मदत देऊन त्यांचे रक्षण केले. ते मानवधर्माला जागले. हेच खरे त्यांचे हिंदुत्व.
प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘पुरोगामी हिंदुत्व’ होते. बाळासाहेबांचे ‘कडवट हिंदुत्व’ होते. हे महाराष्ट्र व देशाने पाहिले. उद्धव ठाकरे यांचे ‘सर्वसमावेशक हिंदुत्व’ आहे, तर आदित्य ठाकरे यांचे बेरोजगारांना रोजगार देणारे ‘प्रॅक्टिकल हिंदुत्व’ आहे. हिंदू धर्मातील रुढी-परंपरा यांचे अवडंबर न माजवता आणि परधर्माची अवहेलना न करता हिंदू धर्माचे रक्षण करणारे सर्वसमावेशक हिंदुत्व शिवसेनेचे आहे. हे कथलाचे नव्हे तर बावन्नकशी सोन्याचे हिंदुत्व आहे. तेव्हा शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. भाजपामधील बाटग्यांनी तर नाहीच नाही!