□ मुंबई केंद्रशासित करण्याची कर्नाटकातील काँग्रेस आमदाराची मागणी; महाराष्ट्रात संताप.
■ कर्नाटकात सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे, सीमावर्ती भागाबाबत सगळ्यांची भूमिका एक असते आणि तिथे विरोधकही सरकारची पाठराखण करतात… महाराष्ट्र त्या बाबतीत कायमच दुर्दैवी राहिला आहे… शिवसेना सोडल्यास इतर पक्षांनी सीमावासीयांना कधीच वार्यावर सोडले आहे…
□ राम मंदिर बांधले म्हणजे हिंदूंचा नेता होता येत नाही – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत.
■ हे रोज सकाळी उठून काही ना काही बोलत असतात. काल काय बोललो होतो, ते वाचतात आणि आज त्याच्या उलट काहीतरी बोलतात. यांच्या वैचारिक परिवाराला एकंदर गोंधळ माजवण्याची आणि सगळं काही आम्हीच बोलून ठेवलेलं आहे, हे दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे हे काही सिरियसली घेण्याचं कारण नाही. मुळात राममंदिर मोदींच्या काळात बांधलं गेलं इतकंच. त्याच्या लढ्याशी मोदींचा काहीच संबंध नव्हता आणि नाही.
□ मराठी माणसे घाणेरडी! मच्छी-मटण खातात – कल्याणमध्ये परप्रांतीय अधिकार्याची मुजोरी.
■ तो महाराष्ट्रातल्या पर्यटनाला चालना देणार्या विभागात महत्त्वाच्या पदावर आहे, लायकी नसताना राज्य सरकारचा दिवा लावून, कमरेला पिस्तूल लावून फिरतो आणि कल्याणचे मराठी पोलीस त्याची बडदास्त ठेवतात, हे चित्र अधिक भयंकर आहे. मराठी माणूस कधीतरी या सगळ्याचा विचार करणार आहे का?
□ मिंधेंची पाठराखण करण्यात राज्य शासन, महापालिकेची दमछाक – हायकोर्टाने घेतले फैलावर.
■ काय फरक पडतो हायकोर्टाने फैलावर घेऊन. कोर्टाच्या बोलण्याने कुणाला भोकं पडत नाहीत. जिथे लाजलज्जा कोळूनच प्यायलेले लोक आहेत, तिथे काय परिणाम होणार?
□ २४ जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा; अन्यथा आमरण उपोषण – मनोज जरांगे यांचे सरकारला निवेदन.
■ जरांगे यांना आता सरकार का किंमत देईल? त्यांच्या आंदोलनाचं प्रयोजन संपलेलं आहे. त्यांना हुशारीने वापरून घेतलं गेलं आहे. आता त्यांचा प्रभाव सरकारच्या दृष्टीने संपल्यात जमा आहे.
□ कब तक सहे एक अपमान हम – भुजबळांचे अजित पवार गट सोडण्याचे संकेत.
■ केवढी ती मंत्रिपदाची लालसा! या वयात त्यांनी आपल्या संस्थांमध्ये संघटनात्मक, शाश्वत उभारणीचं काही काम करायला हवं, मार्गदर्शक मंडळात स्वखुशीने जायला हवं… तर मानसन्मान टिकून राहील.
□ मुंबई-गोवा महामार्गाला मुहूर्त कधी? विधानसभेत शिवसेनेचा सरकारला सवाल.
■ उत्तर काय मिळालं? उत्तर काहीही मिळालं असलं तरी खरं उत्तर काय असणार? गिनीज बुकात नाव जाईल या महामार्गाचं लवकरच. अखिल विश्वातला सर्वाधिक काळ बांधला जात असलेला महामार्ग म्हणून.
□ खोट्या घोषणांपेक्षा राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून द्या – अंबादास दानवे यांची सरकारवर टीका.
■ काहीही काय अपेक्षा करता अंबादासजी! इथून सगळं गुजरातला पाठवायचं, जे शिल्लक आहे ते दिल्लीश्वरांच्या मालकाच्या घशात घालायचं, या कामासाठी इतक्या कालाकांड्या करून नेमलंय सरकार, ते काय सर्वसामान्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी?
□ मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवा – नाना पटोले.
■ मतपेट्या रातोरात आणि हातोहात बदलण्याची सगळी यंत्रणा सेट झाली की मग अचानक एका रात्री आठ वाजता येऊन देशातल्या सगळ्या निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची घोषणा करतील ते… तेव्हा काय कराल नाना! मतपत्रिकेवर निवडणुका हा फार पुढचा विषय झाला. मतदारयाद्यांपासून निवडणूक आयोगाच्या कामकाजापर्यंत अनेक मुद्दे आहेत, ते पक्ष म्हणून चिकाटीने लावून धरायला हवेत आधी.
□ महिला वाढल्या तर दोन लग्ने करण्याची परवानगी द्यावी लागेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत.
■ काय पण उपाय! आपल्या पुरुषप्रधान, मनुवादी परिवाराच्या एकंदर विचारधनाला साजेसाच! कधी तरी बायकांना विचाराल का त्यांना काय हवंय ते? त्या काय गायीम्हशी, कोंबड्या आहेत का त्यांच्याबद्दल परस्पर निर्णय घ्यायला? की नव्या पोथ्या रचून हेही त्यांच्या गळ्यात उतरवाल?
□ मुंबईत प्रदूषणाची आणीबाणी – हायकोर्टाने व्यक्त केली चिंता.
■ मुंबईची फुप्फुसं विकासाच्या नावाखाली निकामी करणार्यांच्या हातात सरकार आहे… एकदा इथे स्मशानशांतता करून गाढवाचा नांगर फिरवला की सुरतेचा सूड पूर्ण होईल बहुतेक.
□ धारावीचा पुनर्विकास अदानीकडेच! – कंत्राटाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.
■ मालकांच्या मालकांशी कोणी पंगा घेतो काय? एवढं पेपरवर्क मजबूत तर असणारच ना!
□ केईएम रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी – आमदार अजय चौधरी यांचा आरोप.
■ केईएम इतर सरकारी हॉस्पिटलांपेक्षा वेगळं नाही. सगळीकडेच ही लागण झाली आहे. सरकारी हॉस्पिटलांची सगळी विश्वासार्हता मातीत मिळाल्याशिवाय खासगी डॉक्टरांचं भलं कसं होणार?