नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष करण्याऐवजी तेवढे देवाचे नाव घेतले तर स्वर्ग मिळेल अशा अर्थाचे एक वादग्रस्त विधान त्याच संसदेत केले, जी मुळात डॉ. आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांनंतर साकारलेल्या राज्यघटनेनंतर खर्या अर्थाने अस्तित्त्वात आली आहे. स्वर्ग असतो का नसतो आणि चुकून असला तरी कसा असतो कोणास ठाऊक, पण या देशातील बहुसंख्य पददलित धार्मिक जाचाचे एक दोन नाही, तर हजारो वर्षे बळी ठरले होते. ते जिवंतपणी ज्या यातना भोगत होते त्यांना नरकयातना ही उपमा देखील कमी ठरावी. त्या जनतेला त्या नरकातून बाहेर काढून या देशातच समान हक्काच्या स्वर्गाची कवाडे आंबेडकरानी स्वहस्ते उघडून दिली. म्हणून कोटी वेळा नाम जपले तरी आंबेडकरांचे उपकार फिटणार नाहीत.
भारतीय जनता पक्षाचे अघोरी मनुवादी सत्तेत आल्यानंतर काहीही बरळत आहेत, मनुस्मृतीवर आधारित कायदे आणि समाज बनवायची दिवास्वप्ने पहात आहेत; पण हे होणे नाही, कारण या मनुवाद्यांना आणि त्या मनुस्मृतीला कायमचे हद्दपार करण्याची पुरोगामी चळवळ ही फार आधीच दस्तुरखुद्द डॉ.आंबेडकरांनी उभी केली होती. त्यांनी बर्याच वेळा हिंदू धर्मातील अनेक प्रथांचा, विशेषकरून अस्पृश्यतेचा जाहीर निषेध केला आणि अनेक आंदोलने केली. चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश आणि त्याकाळात सर्वात गाजलेली घटना म्हणजे मनुस्मृतीचे दहन, ही या चळवळीतील काही ठळक उदाहरणे.
मनुस्मृतीचे दहन या घटनेकडे एका वेगळ्याच कोनातून पाहिले तर त्यातून सध्याच्या पुरोगामी विचारांच्या आंदोलकानी निषेध कसा करावा यासाठी तो एक परिपूर्ण अभ्यास ठरेल. मी थोडक्यात ती घटना पुन्हा इथे मांडतो. २५ डिसेंबर १९२७ला महाडमध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वज्ञात आहे. सदर दहनासाठी आंबेडकरांना पोहोचूच न देण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच तेव्हाच्या सरकारने कोणतेही सार्वजनिक मैदान उपलब्ध करून दिले नव्हते. तेव्हा फत्तेखान या मुसलमान कार्यकर्त्याने स्वतःच्या खाजगी जमिनीवर हा कार्यक्रम करण्याची तयारी दाखवली. बाबासाहेबांना प्रवासाच्या रस्त्यात दगाफटका होण्याची शक्यता होती. त्यामुळेच रस्त्याने न जाता बाबासाहेब ‘पद्मावती’ या बोटीने रायगड जिल्हयातील दासगाव बंदरावर पोहोचले. हे बंदर निवडले कारण त्यापासून कार्यक्रमस्थळ पाच मैलांवर होते आणि गरज पडली तर चालत जाऊन कार्यक्रमाला पोहोचणे शक्य होते. या बोट प्रवासात दासगावच्या स्थानिक कोळी बांधवांनी उत्साहाने मदत केली. मनुस्मृती जाळायची नाही तर तिचे विधीवत् दहन करायचे ठरवले होते. यासाठी चंदनाची चिता बनवली होती व ही वेदी बाबासाहेब बसणार त्या व्यासपीठासमोर बनवली होती. तिथे तीन खांबांवर तीन फलक लावले होते आणि त्यातील एका फलकावर मनुस्मृतीची दहनभूमी, दुसर्या फलकावर अस्पृश्यता संपवा आणि तिसर्या फलकावर ब्राम्हणवाद गाडा असे लिहिले होते. या दहनासाठीची संपूर्ण तयारी ही अण्णासाहेब ऊर्फ गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे हे बाबासाहेबांचे ब्राम्हण कार्यकर्ते पाहात होते. दहन हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे करायचे होते. एक पुस्तक जाळायला बाबासाहेबानी फार काळजीपूर्वक कार्यक्रम आखला होता, कारण धार्मिक भावनांचा उद्रेक होऊन दंगली पेटू नये याकडे कटाक्ष होता.
बाबासाहेबांच्या आगमनानंतर मनुस्मृतीदहनाचा ठराव अण्णासाहेब ऊर्फ गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे या ब्राम्हणाने मांडला व त्यास अस्पृश्य समाजाचे नेते पी. एन. राजभोर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बाबासाहेब, सहस्त्रबुद्धे व इतर पाच दलितांनी हा दहनविधी पार पाडला. हल्ली ज्या थिल्लरपणे पुतळे, प्रतिमा, पुस्तके जाळून आंदोलन करण्यात येतात, ते करणार्यांनी बाबासाहेबांनी आखलेल्या व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अमलात आणलेल्या कार्यक्रमांकडे एकदा पाहावे.
यानंतर बाबासाहेबांनी भाषण केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली. जर मनुस्मृती म्हणजेच ब्राम्हणवादाचे दहन करून बदल नाही घडला तर ब्राम्हणवादी जाळावे लागतील असा सज्जड दम बाबासाहेबांनी दिला. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात एकच फोटो ठेवला होता, तो होता त्याकाळातील स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांचा.
अस्पृश्यता निवारणासाठी मनुस्मृतीदहन करायला जमीन मुसलमानाने दिली, ठराव ब्राम्हणाने मांडला, तो नीट पार पडावा म्हणून बहुजन राबले, गांधींचा फोटो तिथे होता, बाबासाहेबांना बोटीने कोळीबांधव घेऊन आले. बाबासाहेब आंदोलन किती काळजीपूर्वक आखायचे आणि सर्व घटकांना एकत्र घेत ते कसे हाताळायचे हे इथे दिसून येते. ते एक आंदोलनाचे नेते म्हणून किती मोठे होते हे या एका कार्यक्रमाकडे बघितले तर कळते.
बाबासाहेबांच्या आंदोलनाचे नेतृत्वगुण फारसे मांडले जात नाहीत. ते परत मांडण्याचा प्रयत्न. आज आंदोलन उथळ व प्रचारकी होत चालले आहे. ते तसे न होता परिणाम करणारे व्हायचे असेल तर या ऐतिहासिक घटनेचे स्मरण असावे.
– संतोष देशपांडे