‘प्रेम’ आणि ‘लग्न’ या प्रवासात आनंदाचे क्षण आठवावे लागतात. पण दु:खाचे क्षण हे कायम साथसोबत करतात. जोडीदाराला पारखण्यात बराच वेळ जातो खरा, पण प्रेमविवाहाचा डाव हा कधी-कसा-कुठे उलटेल याचा भरवसा नाही. या नाजूक नात्यात एकमेकांना जाणून घेणं आणि त्यात परिपक्वता येणं म्हणजे दिव्यच असतं. नियोजनबद्ध, चौकटीतलं जगणं तसं अशक्यच पण विश्वासानं समजून- उमजून वाटचाल केली, तर वळणावरले वैयक्तिक, भावनिक, गुंतागुंतीचे अडथळे दूर होण्यास मदतच होते.
‘आजच्या ‘लग्नाळू’ नाटकांच्या परंपरेतलं ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ हे नाटक नावाप्रमाणेच तिघा प्रेमवीरांच्या कथानकातून ‘भावनिक अनुबंध’ मांडतेय. नाटककार ऋषिकांत राऊत आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या दोघांनी याची मांडणी केली आहे.
शहरापासून दूर असलेल्या ‘बोगनव्हिला रिसॉर्ट’मध्ये हे नाट्य घडतं. तिथे विवेक नावाचा तरुण, जो या रिसॉर्टचा मालक आहे, त्याच्या हाती याची सारी सूत्रे आहेत. अनेक तरुणींशी त्याचा ‘संवाद’ आहे. बिनधास्त स्वभावामुळे सुंदरींशी फ्लर्ट करून नंतर त्याने सोडूनही दिलंय. योगायोगानं या ‘रिसॉर्ट’शी तो जुळला गेलाय. त्याचं मन अजूनही कॉलेजशीच जुळलंय. त्याचा एक जिवलग दोस्त आहे अमित, जो विवेकला या उद्योगात मदत करतोय. लग्न लवकर करण्यासाठी त्याची आई मागे लागली आहे. ‘लग्न कधी करणार?’ या एका प्रश्नाने तो कायम चिंतेत आहे. इथे ‘रिसॉर्ट’मध्ये पडेल ते काम करून मित्राला सोबत करतोय.
या ‘रिसॉर्ट’मध्ये एका प्रेमवीर जोडीचे आगमन होते. आरती आणि प्रकाश. दोघेही ग्रामीण बाज असलेले. ‘हनिमून’ करण्यासाठी त्यांनी या जागेची निवड केलेली. दोघांची सतत भांडणे सुरू आहेत. त्यातून मनोरंजन होतंय. आरती स्वतःला ‘मॉड शहरी’ समजतेय. ‘रील’ काढून ती सतत फॉरवर्ड करतेय. खाजगी आयुष्य जगापुढे त्यातून येतंय, पण तिला त्याची जराही चिंता नाही. नेमक्या याच प्रकारामुळे नवरा प्रकाश कमालीचा कंटाळला आहे. दारुचे दोन घोट मारून अखेर त्यातून तो सुटका करण्याचा प्रयत्नही करतोय. हनिमून सूटमध्ये वेळ घालविण्यापेक्षा बाहेरच गायब होतो खरा, पण त्यावरही ‘रील’ काढून आरती जगापुढे ‘नवरा कुठे दिसला का?’ म्हणून व्हायरल करतेय. एकदम नमुनेबाज दांपत्य. मूळचा शेतकरी असलेला प्रकाश या निमित्ताने शहर आणि गाव यामध्ये अडकलेला. आजच्या तरुणाईच्या अधांतरी मानसिकतेची व्यथा मांडतो. ती लाख मोलाची.
शलाका नावाची एक विवाहित तरुणी इथे प्रगटते. योगायोगानं ती मालक विवेकची कॉलेजमधली मैत्रीण असते. कॉलेजच्या आठवणींना या भेटीमुळे उजळा मिळतो. शलाकाचं लग्न झालंय. नवरा पक्का दारुडा. सततच्या भांडणामुळे घटस्फोटाची केस सुरू आहे. त्यांना कौशिक नावाचा मुलगा असून तो शाळेच्या ‘हॉस्टेल’मध्ये राहातोय. नवरा-बायकोच्या भांडणात मुलाचा कोंडमारा होतोय. त्याला सांभाळायचा शलाका प्रयत्नही करतेय. ती जरी शांततेसाठी इथे आली असली तरीही ती अशांत आहे. त्यात भर म्हणजे विवेक पुन्हा एकदा तिच्याभोवती फेर्या मारतोय. ‘फ्लर्ट’ करण्यात तो उस्ताद असला तरी ‘शलाका’ आज एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे, याचे भान विवेकला नाही. तो अजूनही लग्न, प्रेम यात गुंतलाय.
या रिसॉर्टमध्ये आणखीन एक प्रेमप्रकरण आहे. अमित आणि प्रियाचं! अमितचं प्रियावर मनापासून प्रेम आहे. पण प्रियाला नोकरी महत्त्वाची. तिचे प्राधान्य लग्न नव्हे तर नोकरी आहे. तिला सर्वोच्च पदावर पोहचायचं आहे. प्रमोशन आणि नोकरी टिकविण्यासाठी तिच्याकडे ‘बॉस’ने शारारिक सुखाची मागणी केलीय. तिची कोंडी झालीय… असे हे तिसरे प्रकरण!
यातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र अस्तित्व असणारी कथाच आहे. त्याला काही उपकथानकांचे संदर्भ आहेत. यातील सहाही भूमिकांवर स्वतंत्रपणे नाट्य मांडता येतील, येवढी त्यात ताकद आहे. त्यामुळे तीनही गोष्टी एकत्रितपणे गुंतवताना नाटककाराची तशी तारेवरची कसरतच झालीय. काहीदा तर ती गुंडाळणं भाग पडलंय. दुसरं म्हणजे यातील विषयाचा मूळ गाभा गंभीर, शोकात्मतेकडे झुकणारा. तो हलक्याफुलक्या संहितेतून उलगडणे कठीण. पण कडू गोळी गोड वेष्टनात देण्याचे कसब असल्याने हे आव्हान नाटककार ऋषिकांत राऊत यांनी ताकदीने पेलले आहे.
विवेक आाणि शलाका यांचे प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहचते का? नवरा आणि मुलगा यांचे पुढे काय होते? मानसिक तोल ढासळलेली प्रिया काय करते? प्रिया-अमित यांच्या प्रेमाचा शेवट कसा काय होतो? आरती आणि प्रकाश यांचा ‘हनिमून’ पूर्ण होतो की भांडणात तो संपतो? याच्या उत्तरासाठी प्रत्यक्ष नाटक बघणं उत्तम.
दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव हे स्वतः लेखक आणि अभिनेते असल्याने त्यांनी प्रत्येक भूमिका सजवली आहे. नाटक, सिनेमा, मालिका या तीनही माध्यमांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. त्याचा परिणाम नाटकाच्या सादरीकरणावर झालाय. नाट्य कुठेही रेंगाळत नाही किंवा कृत्रिम वाटत नाही. गंभीर आशयातही विनोदाची फवारणी चांगली आहे. ‘हसू आणि आसू’ याचा समतोल हा दिग्दर्शक म्हणून उत्तम सांभाळला आहे. चिठ्ठ्या उचलून कथा-व्यथा मांडण्याचा प्रसंगही बोलका झालाय. हा ‘हटके’ खेळ रंगलाय.
पडदा उघडताच नजरेत भरतो तो ‘बोगनव्हिल रिसॉर्ट.’ शंभर टक्के वातावरणनिर्मिती करणारे देखणं नेपथ्य. अभ्यासपूर्ण, तपशिलासह याची सारी मांडणी केली आहे. रिसॉर्टच्या खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, छप्पर कमानी, बैठक, पायर्या, रिसेप्शन काऊन्टर, लॉबी आणि फुलझाडे, हे सारे काही अस्सल वाटते. नेपथ्याच्या अभ्यासकांनी याला जरूर भेट द्यावी. नेपथ्य हालचालींना कुठेही मारक ठरणार नाही, याचीही दक्षता यात घेण्यात आली आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांच्या या रिसॉर्टला पडदा उघडताच टाळ्यांची दाद मिळते, यातच सारं काही आलं. आजकाल अशी दाद दुर्मिळ झाली आहे. नेपथ्यकारांची परंपरा उंचाविणारे हे ‘रिसॉर्ट’ अप्रतिमच!
सहा कलाकारांची पूर्ण तयारीची ‘टीम’ ही या नाटकातील जमेची बाजू. विवेकच्या भूमिकेत अभिनेता सुयश टिळक याने तरुणींशी ‘फ्लर्ट’ करणारा तरुण चांगला रंगविला आहे. बिनधास्त, बेधडक स्वभावाच्या विवेकची दु:खाची झालरही तेवढीच मनाची ठाव घेते. देहबोली शोभून दिसते. कॉलेज मैत्रिण शलाका (सुरुची आडारकर) हिच्यासोबतचे प्रसंग भूतकाळ जिवंत करतात. अभिनयातली सहजता दिसते. शलाकाचा हॉटेलमध्ये असणार्या मुलाशी फोनवरला संवाद हृदयस्पर्शी. एका कोंडीत सापडलेली विवाहित तरुणी तसंच मुलासाठीची तळमळ लक्षात राहाते.
‘सफरचंद’ नाटकात चमकलेली आणि अनेक मराठी हिंदी मालिका, चित्रपट यातून गाजलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने एकच धम्माल उडविली आहे. ‘रील’च्या नादी लागून जो वेडेपणा आरती करते तो रसिक एन्जॉय करतात. बोलीभाषा शोभून दिसते. गेटअप चांगला. व्यंगचित्राप्रमाणे ‘आरती’ हशे वसूल करते. ‘प्रकाश’च्या भूमिकेतून पूर्णानंद वांढेकर याने तिला सोबत केलीय. बायकोच्या वेडेपणाला कंटाळलेला नवरा म्हणून प्रसंग रंगतदार झालेत. शेतकर्याचं दु:ख हे देखील प्रभावीपणे संवादातून पेश केलेत. ही ‘हनिमून’ला आलेली जोडगोळी कसदार अभिनयातून कहरच करते!
लग्नासाठी एका पायावर उभा असलेला अमित हा रोहित हळदीकर याने झोकात उभा केलाय. प्रियाच्या प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. ‘रिसॉर्ट’ची जबाबदारी सांभाळतांना सोबत प्रेम प्रकरण सुरूच आहे. अनेक बारकावे चांगले टिपले आहेत. शर्वरी कुळकर्णी-बोरकर हिची प्रियाची भूमिका ही ‘शोकात्म’ आहे. शून्यात नजर, नोकरीची चिंता देहबोलीतून नजरेत भरते. शेवटाकडे तिचा आत्मघाताचा प्रयत्न हादरून सोडणारा आहे. अभिनयातील बारकावे जमले आहेत. पात्ररचना अचूक ठरली आहे. त्यामुळे या सहाजणांच्या जीवनातील घटना या त्यांच्या वर्तनातून नेमकेपणाने प्रगट होतात. व्यक्तिरेखांमध्ये चांगलाच रंग त्यामुळे भरला जातोय. ढोबळ किंवा कृत्रिम व्यक्तिरेखा वाटत नाहीत.
अन्य तांत्रिक बाजूही समर्पक आहेत. ज्या नेपथ्यासोबत चांगल्या जुळल्यात. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना वेळ-काळ याचे दर्शन घडविते. सावलीतून दिसणारा आत्मघाताचा क्षण काळजाचा ठोका चुकवितो. अजित परब यांचे संगीत आवश्यकतेनुसार आहे. शरद सावंत यांची रंगभूषा तसेच मृणाल देशपांडे यांची वेशभूषा ही मस्तच. सारं काही रिसॉर्ट स्पेशल आहे. त्यामुळे एकूणच सादरीकरणात भरच पडली आहे.
यातील युगुलांबद्दल रसिकांना जवळीक वाटणे तसे स्वाभाविक आहे. त्यांच्यात असलेली निरागसता महत्वाची ठरते. हनिमून आहे किंवा रिसॉर्टमध्ये मुक्काम आहे म्हणून कुठेही तसा भडकपणा नाही. उलट जगण्यातील, विचारांची विसंगती अधिक अधोरेखित केली जाते आणि व्यक्ती म्हणून त्यांची कथा प्रभावीपणे आकाराला येते.
मराठी रंगभूमी मग ती व्यावसायिक असो वा प्रायोगिक, कायम बदलत्या काळाचे प्रतिनिधित्व करते. समाजमनाचा आरसा म्हणून त्यातील विषयांकडे बघितले जाते. सूर्याची पिल्ले, पुरुष, चारचौघी, वाडा चिरेबंदी, वस्त्रहरण… या एकेकाळी गाजलेल्या दमदार नाटकांची हजेरी आजही रंगभूमीवर आहे. त्यासोबत रंगप्रवाहात विषामृत, वरवरचे वधूवर, पाहिले न मी तुला… अशा किमान पाच सहा नव्या नाटकांचीही गर्दी झालीय. लग्नाळू विषयातील तोचतोचपणाने रसिक कंटाळलेले नाहीत. त्यातील काही नाटके निश्चितच सशक्त, प्रेरणादायी, आशयपूर्ण आहेत. विषयाचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा ‘प्रयोग’ दिसतोय जो कौतुकास्पदच.
आजच्या या ‘लग्नाळू’ प्रवासात टिपिकल विषयापलीकडे जाऊन काही वेगळा विचार नव्या संवेदनांसह मांडण्याचा आणि उत्कट अनुभव रसिकांना देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न या ‘टीम’ने केला आहे.
ज्याची त्याची लव्ह स्टोरी
लेखक : ऋषिकांत राऊत
दिग्दर्शन : प्रियदर्शन जाधव
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : अजित परब
प्रकाश : शीतल तळपदे
वेशभूषा : मृणाल देशपांडे
रंगभूषा : शरद सावंत
निर्माते : चंद्रकांत लोकरे
निर्माती संस्था : एकदंत क्रिएशन