हे मुखपृष्ठचित्र आहे बरोब्बर ६० वर्षांपूर्वीचं… १९६४ या वर्षाला निरोप देऊन १९६५ या वर्षात प्रवेश करत असतानाचं. एक वर्ष म्हणजे मानवी जीवनाचं एक चक्र असं मानलं जातं. ३१ डिसेंबरला जख्ख म्हातारं झालेलं आदलं वर्ष पुढच्या वर्षाच्या बालकाकडे जगाची धुरा सोपवतं, अशा कल्पनेवरचं व्यंगचित्र बाळासाहेब जवळपास दर वर्षअखेरीच्या अंकात रेखाटायचे. त्यात ते जुन्या वर्षाला काय रूप देतात आणि ते नव्या वर्षाला काय सांगतं, याची वाचकांना उत्सुकता असायची. इथे बाळासाहेबांनी १९६४ला एका खंगलेल्या, मरणासन्न म्हातार्याचं रूप दिलंय आणि तो १९६५ सालाला सांगतो आहे की सामान्य माणसाला अन्नपाणी नाही, महागाई वाढते आहे आणि पुढारी माजत चालले आहेत. ६० वर्षांपूर्वीची देशाची परिस्थिती, जगाची अन्नधान्य परिस्थिती आणि देशाचं स्थान फार वेगळं होतं. इतकी वर्षं उलटल्यानंतर आणि भारत विश्वगुरू बनल्याचे बनावट ढोल पिटले जात असतानाही दुर्दैवाने देशाची खरी परिस्थिती तीच आहे… किंबहुना अधिक वाईट आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बड्या कंपन्यांवर, भांडवलदारांवर, थैलीशहांवर, व्यापार्यांवर, श्रीमंतांवर लावला जाणारा कर कमी होत आला आहे आणि सर्वसामान्य माणसावर लादले जाणारे कर वाढले आहेत… लाडक्या बहिणी आपल्याच पैशातून मिळणार्या लाचेपोटी मत विकत आहेत, ८० टक्के जनतेला स्वस्त धान्यपुरवठ्यावर जगवावं लागतंय… पण धार्मिक विद्वेषाची नशा चढलेल्या सर्वसामान्य माणसाला आपली आज दयनीय अवस्था आहे, हेच दिसेनासं झालं आहे… श्रीमंतांचे चौकीदार त्याचे उरले सुरले कपडेही फेडून घेणार आणि आपण हे देशहितासाठी करतो आहोत, या गैरसमजातून तो मात्र नव्या वर्षातही भोंगळा नाचत राहणार, अशीच चिन्हे आहेत.