सायबर स्पेसमध्ये असणार्या तंत्रज्ञानाचा किती घातक वापर केला जातो, याची अनेक उदाहरणं आपण या सदरात पाहिलेली आहेत. या जालात वावरताना फार सावध राहावे लागते. पण, कोणतेही तंत्रज्ञान वाईट नसते. ते वापरणारे लोक चांगला किंवा वाईट वापर करत असतात. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारेही होऊ शकतो. फक्त त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची…
चार वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली. सांगलीमध्ये विशाल धस नावाचा एक तरुण राहात होता. अभ्यासात प्रचंड हुशार असणारा विशाल एक दिवस एकाएकी घरातून अचानकपणे निघून गेला. या प्रकारचा धक्का बसल्यामुळे आई-वडिलांनी अन्नपाण्याचा त्याग केला. या घटनेमुळे घरातील वातावरण बदलून गेले होते, प्रत्येकाच्या चेहर्यावर चिंता दिसत होती. आपला मुलगा अचानक असा का निघून गेला, ही आई-वडिलांना समजण्यापलीकडची गोष्ट होती.
त्यांनी विशालच्या मित्रांकडे याबाबत चौकशी केली, तेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या मनातली वादळं समजली. विशालला मेडिकलला जायचे होते. पण त्याला काही केल्या प्रवेश मिळत नव्हत. त्यामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्ये आला होता. इथे राहून काही उपयोग नाही, आपण घर सोडून जाणार आहोत, अशी कल्पना त्याने मित्रमंडळींना दिली होती. विशालच्या निघून जाण्याचे खरे कारण समजल्यानंतर आई-वडिलांना मोठा धक्का बसला. विशालचा शोध लागावा, म्हणून काही नातेवाईकांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. विशालला शोधून काढण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरु होते.
आई-वडील देखील देशातल्या विविध भागात असणार्या त्याच्या मित्रांकडे त्याचा शोध घेत होते. त्यांना माहीत असणार्या ठिकाणचे आश्रमही त्यांनी पालथे घातले होते. दोन ते तीन महिने विशालचे वडील त्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडत विविध भागांत फिरत होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. त्यामुळे ते हताश झाले होते. काय करावे, ते त्यांना सुचत नव्हते. दरम्यान, विशालच्या वडिलांना त्याचा एक मित्र भेटला. त्याने विशालच्या वडिलांना सल्ला दिला की, सायबर पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न केलात तर विशालचा शोध नक्की लागू शकतो, त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्यांनी तो सल्ला तत्काळ मानला आणि थेट सायबर पोलीस ठाणे गाठून तिथे आपली कैफियत सांगितली.
चार वर्षांपासून मुलगा गायब झालेला आहे, त्याला शोधून काढण्यासाठी तुमच्याकडून काही मदत झाली तर बरे होईल, असे सांगत त्यांच्याकडे दयेची याचना केली. सायबर पोलिसांनी देखील दोन पावले पुढे टाकत विशाल याला शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारले. पोलिसांनी गुगल सर्चवर विशालचे पूर्ण नाव टाकले. तेव्हा, त्याचे फेसबुकवर अकाउंट असल्याचे आढळून आले. या अकाऊंटवर काही अॅक्टिव्हिटी नसायची. मित्रांच्या, नातेवाईकांच्या मेसेजेसना विशाल उत्तरे देत नसे. मेसेंजर, वॉल, सगळे काही जणू बंदच होते. तरीही, पोलिसांनी मेसेंजरवर एक मेसेज पाठवून त्यात एक लिंक पाठवली. संपूर्णपणे अनोळखी नंबरवरून आलेला हा मेसेज असल्याने की काय, विशालने त्यावर क्लिक करून उत्सुकतेपोटी ती लिंक उघडली, तेव्हा तो पोलिसांच्या जाळयात अलगद आला. ज्या कॉम्प्युटरवरून त्याने फेसबुकचे अकाउंट ओपन केले होते, त्याचा आयपी अॅड्रेस सापडला होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा तो एका जर्मन कंपनीचा पत्ता असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या कंपनीमधल्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विशालबाबत चौकशी केली, तेव्हा आपल्याकडे विशाल नावाची व्यक्ती काम करत नसल्याचे सांगितले. पोलीस गोंधळात पडले, चक्रावले. मात्र, त्यांनी तरीही आणखी सखोल चौकशी केली, तेव्हा कळले की या जर्मन कंपनीच्याच प्रिमायसेसमध्ये आणखी एक जर्मन कंपनी होती. तिथल्या मनुष्यबळ विभागाने आपल्याकडे विशाल नावाची व्यक्ती नोकरी करत असल्याचे सांगितले. त्याची शिफ्ट उद्या असून तो सकाळी नवी मुंबईमधल्या वीर चौकातून सकाळी दहा वाजता कंपनीत येण्यासाठी बस पकडेल, असेही सांगितले.
पोलिसांनी विशालच्या वडिलांशी संपर्क साधला आणि सकाळी दहा वाजता वीर चौकात असणार्या एसटीडी बूथजवळ येण्यास सांगितले. पोलिसांनी दिलेल्या वेळेला विशालचे वडील तिथे आले, बसमध्ये चढण्याच्या तयारीत असलेला युवक आपला मुलगाच आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि अखेर बापलेकांची भेट झाली. चार वर्षांपासून विशालला विविध मार्गांनी शोधणार्या त्याच्या वडिलांना सायबर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अवघ्या सहा दिवसांमध्ये आपला मुलगा सापडला होता.
विशालने सुरुवातीला निराशेपोटी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता, पण ते कृत्य करण्याची त्याची धडगत झाली नाही. आपल्याला आता आईवडिलांकडे, समाजात तोंड दाखवायला जागा नाही, अशा विचारात असणार्या विशालने एका खासगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांपासून घरापासून दूर राहून तो नोकरी करत जगत होता. पण घरच्या मंडळींची विशालला शोधायची धडपड आणि सायबर पोलिसांचे प्रयत्न यामुळे त्याला शोधण्यात यश मिळाले होते.
हे लक्षात ठेवा…
पोलिसांनी ज्या प्रकारे विशालचा शोध घेतला होता, त्याला ओपन सोर्स इंटेलिजन्स असे म्हणतात. माहिती-तंत्रज्ञानचा योग्य प्रकारे उपयोग केला तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपल्या घरात असा प्रसंग कधी ओढवू नये, पण कोणी बेपत्ता झाल्यास सायबर पोलिसांच्या मदतीने आपण त्याचा शोध घेऊ शकतो. कधी कधी त्याला एका फटक्यात यश मिळू शकते. कधी कधी त्याला वेळ देखील लागू शकतो. पण, हा प्रयत्न नक्कीच करून पाहायला हवा. तंत्रज्ञानाची ही उजळ बाजू अनुभवायला हवी.