मला चित्रपट पाहायला अतिशय आवडतात. लॉकडाऊन काळात ओटीटी माझी जीवनरेखा होती. इतकी की आज मी मला सर्टिफाईड ओटीटी जंकी म्हणू शकते. तर अनेक प्रकारचे फिरंगी चित्रपटमालिका मी अतिशय आवडीने बघते. गेले अनेक वर्षे बघत आहे. इतकी की आता पुढे काय होऊ शकते हे मी बरेचदा अचूक सांगते. असो.
तर इतकी वर्षे परदेशी मालिका चित्रपट बघून माझ्या अस्सल भारतीय मनाला नेहमी काही प्रश्न पडतात. डोक्याला शॉट देणारे प्रश्न…
अमेरिकन, ब्रिटिश किंवा तत्सम चित्रपटात सकाळी न्याहारी करताना टेबलावर सर्व पदार्थ असतात. ज्यूस, कापलेली फळे, काळीकुट्ट कॉफी, पुन्हा कोणीतरी पॅनकेक करत असते आणि प्लेटमध्ये ती चळत ठेवून त्यावर मेपल सिरप (फिरंगी काकवी) ओतले जाते. अथवा तव्यावर अंडी फोडून शिजवली जातात. मग हाकाटी होते, ब्रेकफास्ट इज रेडी!!!
मग माणसे किंवा पोट्टी दाणादाण जिन्यावरून येतात. ओ आय एम सो लेट म्हणत ज्यूस ग्लास उचलून अर्धा पितात, कॉफी कप घेतात आणि एखादा पॅनकेक उचलून चालू पडतात. माझ्या तद्दन देशी मध्यमवर्गीय मनाला प्रश्न… एक तर ज्यूस आणि कॉफी एकत्र का पितात? आणि असं करायचं तर इतके शिजवायचे आणि मांडायचे का?
अगडबंब फ्रीजमध्ये प्लास्टिक कॅनमधील गार ढोण दूध अथवा ज्यूस थेट तोंडाला लावतात आणि परत फ्रीजमध्ये तसेच ठेवतात. नाहीतर ते थंड दूध कॉर्नफ्लेक्स अथवा तत्सम गोष्टीवर ओतून दोन चमचे खावून सोडून देतात. तेच रस्त्यावर खाताना… कागदातील रोल दोन चार चावे घेवून थेट कचर्याच्या डब्यात. हॉटेल सॉरी रेस्तराँमध्ये जेवत असतात, काहीतरी घडते, झाले! वाइन अर्धी सोडून, जेवण तसेच अर्धे मुर्धे टाकून चालते होतात. अरे, निदान ताटातील तरी खा चांडळांनो किंवा बांधून तरी घ्या…
मोठ्या टेबलावर भरलेली टर्की नायतर कोंबडी असते, बाकी सर्व सलाड बिलाड, मॅश पोटाटो… सर्व बसलेले असतात, काही वाद होतो, की काहीही, उठले जेवण अर्धे टाकून… आता ते आवरणार कोण, तुझा बाबा?
आपल्या देशी सीरिजमध्ये पण असेच काही असते. शुद्ध संस्कारी भारतीय घर… पण न्याहारी काय तर ब्रेड बटर… डोक्यावरून पदर घेतलेली शालीन सून, खाल मानेने ब्रेडला बटर चोपडून अदबीने देत असते. यांना दुसरे पदार्थ दाखवता येत नाहीत का? गेला बाजार निदान इडली, अथवा हिंदी फिल्मवाल्यांचे लाडके परोठे… मराठी मालिकांत पण हेच… फोडणीचा भात, थालपीठ, पोहे मिळत नाहीत का?
या मालिकेतील सुना अथवा बायका भाज्या चिरताना वांगी, शिमला असल्या सोप्प्या भाज्या चिरतात. केळफूल, घेवडा अगदी निदान मेथी यांना दिसतच नाही… बरं तुकडे कसे तर हे मोठ्ठ्या आकाराचे.
आता तुम्ही म्हणाल की तू चित्रपट नाहीतर मालिका बघ की, ही नसती उठाठेव का?
पण डोक्याला शॉट होतोच ना यार..
अन्न वाया घालवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि त्यातही मराठी मध्यमवर्गीय जनतेसाठी ते अशक्य… अरे दुधाची पिशवी आणि श्रीखंड डबा चाटून पुसून ठेवणारे टॉप सीडेड आम्ही!!!
हे झालं जेवणाविषयी…
दुसरे आणखीन असते.
कोणत्यातरी नातेवाईक किंवा कुटुंबातील माणसाविषयी बोलणे चालू असते. दार उघडे… आणि पाठ दाराकडे… की ती व्यक्ती येऊन ऐकणार म्हंजे ऐकणार!! अरे मेल्यांनो, निदान दार तरी बंद करा… तेच फोनबद्दल… अनेक गुपिते असणारा फोन असा उघड्यावर ठेवून जातात की यांच्या हितशत्रूंनी बघायलाच हवे. नक्की काय तर्कशास्त्र असू शकेल सांगा बरं?
मला जुने चित्रपट आठवतात. मराठी हिंदी दोन्ही… हे असे डिटेल्स फार वास्तव दाखवले जायचे. ‘दो बिघा जमीन’मधले दरिद्री शेतकर्याचे जेवण जसे असावे तसेच दाखवले होते. ‘साधी माणसं’ चित्रपटात लोहाराच्या घरात जशा पितळ्या किंवा ताट हवे तसेच दाखवले होते.
मला हल्लीच्या सिनेमा-मालिकांमधल्या या डोक्यात जाणार्या गोष्टींचा कार्यकारण भाव अजून उमगलेला नाहीये. आता म्हणाल की असे सर्व तपशील कसे दाखवणार? अरे अगदी सविस्तर तपशील नको, पण काही तारतम्य असावे. आपल्याकडे अजून ते प्लॅस्टिक जारमधील दूध-ज्यूस आले नाहीयेत किंवा फार प्रचलित नाही हे नशीब.
गंमत काय की एरव्ही आम्हाला म्हंजे अमेरिका वगळून बाकी देशांना घाण राहतात, म्हणून नाव ठेवणारे हे लोक उष्ट्या-खरकट्याचाही काहीही विधिनिषेध बाळगत नाहीत. भांड्यात शिजत असलेला पदार्थ डावाने घेतात, चाटतात आणि तो उष्टा डाव परत त्याच भांड्यात. भारतीय कुटुंबात धरणीकंप होईल, बाप्पा.
होते काय की असले काही दिसले की माझे विचित्र डोकं तिथेच अडकून बसते.
आम्हाला उठता बसता पर्यावरणाचे धडे देणारे हे देश स्वतः किती प्रदूषण करतात हे बघत नाहीत. आम्ही भारतीय हॉटेलमधील जेवणाचे डब्बे स्वच्छ धुवून कोथिंबीर, मिरची ठेवायला वापरतो आणि टिश्यू पेपरची मिजास आमच्याकडे नसते हो. स्वच्छ जल वापरतो.
एका बाईकवर चारजण जातो, हागल्या पदल्याला गाडी काढत नाही की उठता बसता प्लास्टिक बाटल्या/ खोके फेकत नाहीत.
आता शेवटी ते फिरंगी… आम्हा संस्कारी भारतीयांची ही सवय त्यांना लागणे कठीण…
पण तरीही ते टेबलावर तसंच पडलेलं जेवण (आणि ती महागातली वाईन) कोण संपवणार हा प्रश्न माझ्या डोक्यात कायम कुरतडत राहतो हे नक्की राव!!!