२ फेब्रुवारी २०२३ रोजी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी कार्टूनिस्ट कंबाईन एका जागतिक प्रदर्शनाचं आयोजन करत आहे. २ आणि ३ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे हे प्रदर्शन खुले असेल. कार्टूनिस्ट कंबाईन ही १९८३ साली बाळासाहेबांनीच शिवसेना भवन येथे स्थापन केलेली मराठी व्यंगचित्रकारांची संस्था. त्याचे विद्यमान अध्यक्ष संजय मिस्त्री यांच्याशी ‘मार्मिक’चे तरुण व्यंगचित्रकार आनंद अंकुश यांनी केलेल्या गप्पा.
– – –
आनंद अंकुश : सर, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन तुम्ही व्यंगचित्रकार झालात. बाळासाहेबांच्या अनेक वेळा तुमच्या भेटी झाल्या. कार्टूनिस्ट कंबाईनविषयी काही सांगाल का?
मिस्त्री : जय महाराष्ट्र.१९८३ साली दादरला आस्वाद हॉटेलजवळ मला माझे मित्र ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस अगदी घाईघाईत भेटले. म्हणाले, ‘आताच बाळासाहेबांना भेटून आलोय. आपण एक व्यंगचित्रकार मित्र मेळावा घेतोय. दहा बारा व्यंगचित्रकार असतील. आपल्याला व्हॉलंटीयर्स लागतील. तू लवकर ये.’
मी पावणे पाचलाच गेलो. त्यावेळी दिलीप घाटपांडे यांनी शिवसेना भवनाचा हॉल उघडून दिला. मग आम्ही तरुण उत्साही व्यंगचित्रकार कामाला लागलो. सतरंजी अंथरणे, चहापाणी व्यवस्था करणे अशी कामे करू लागलो. बरोबर सहा वाजता बाळासाहेब आणि श्रीकांतजी आले आणि स्टेजवर न बसता आमच्यासोबत सतरंजीवरच बसले. आम्ही त्यांना स्टेजवर बसायचा आग्रह केला, तेव्हा म्हणाले, ‘मीही व्यंगचित्रकारच आहे. व्यंगचित्रकारांमध्येच बसणार.’ त्यानंतर व्यंगचित्रकारांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘आपण एक संस्था काढू. त्यासाठी नावे सुचवा.’
शिवसेना हा मराठी माणसांचा पक्ष असल्यामुळे व्यंगचित्रकारांनी संस्थेसाठी मराठी नावे सुचविली. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘आपल्याकडे परदेशी, इतर भाषिक व्यंगचित्रकारही यायला हवेत. म्हणून आपण इंग्रजी नांव देऊया- कार्टूनिस्ट कंबाईन.’ बाळासाहेबांनी विकास सबनीस यांना संस्थेचा लोगो बनवायला सांगितला आणि अशी कार्टूनिस्ट्स कंबाईनची सुरुवात झाली.
आनंद अंकुश : या संस्थेचे कार्य काय आणि उद्देश काय?
मिस्त्री : या संस्थेचा प्रमुख उद्देश व्यंगचित्रकला टिकून राहावी, दर्जेदार व्यंगचित्रं तयार व्हावीत, हा आहे. रसिकामध्ये व्यंगचित्रकलेविषयी प्रेम, समज वाढावी, नवीन व्यंगचित्रकार तयार व्हावेत, असे काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो.
आनंद अंकुश : कार्टूनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष म्हणून काय प्रयोग केलेत?
मिस्त्री : बाळासाहेबांना काय अपेक्षित होतं, ते त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकलेले आहे. त्याचा विसर पडू न देता काम करतो. व्यंगचित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही जागतिक स्तरावर व्यंगचित्र स्पर्धा घेतो. त्याची भव्य प्रदर्शने भरवतो. भव्य बक्षीसे ठेवतो. त्यामुळे आपोआप रसिक व्यंगचित्रकलेकडे वळतात. त्याचबरोबर व्यंगचित्र साक्षरता निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन अनेक जेष्ठ व्यंगचित्रकारांच्या भेटी घडवून आणतो. त्यांच्या मुलाखती घ्यायला लावतो. शि. द. फडणीस, ज्ञानेश सोनार, विजय पराडकर, अबीद सुरती, सुरेश सावंत, चारूहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर अशा ग्रेट व्यंगचित्रकारांच्या जाहीर मुलाखती घेतल्या आहेत आपण. काही मुलाखतींचे रेकॉर्डिंग, डॉक्युमेंटेशनही केलं. महाराष्ट्राबाहेरील, देशाबाहेरील व्यंगचित्रकारांच्या मुलाखती आम्ही घेणार आहोत. या कामासाठी बाळासाहेब राष्ट्रीय स्मारकाचे सचिव सुभाषजी देसाई यांनी मोलाची मदत केली आहे.
आनंद अंकुश : बाळासाहेबांचीही तुम्हाला साथ असायची…
मिस्त्री : आमच्या कार्टूनिस्ट कंबाईनच्या प्रत्येक कार्यक्रमाला बाळासाहेब आलेले आहेत. एवढंच नव्हे तर चार चार तास आमच्यासोबत व्यंगचित्रविषयक गप्पा मारत असत. हे त्यांचे मोठेपण होते.
आनंद अंकुश : तरुण व्यंगचित्रकार घडविण्यासाठी संस्था काय करते?
मिस्त्री : तरुणांनी या क्षेत्रात यावे म्हणून ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या जशा मार्गदर्शनपर जाहीर मुलाखती घेतल्या. तशाच यशस्वी तरुण व्यंगचित्रकारांच्याही जाहीर मुलाखती घेतल्या. त्यामध्ये निलेश जाधव, मार्मिकचे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव, सिद्धांत जुमडे, विवेक प्रभूकेळुस्कर, शौनक संवत्सर यांचा उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत भाग घेणारे, जागतिक बाजारपेठेत काम करणारे विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत यांनाही त्यांचे अनुभव शेयर करायला सांगितले.
आनंद अंकुश : २३ जानेवारी या बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त २ आणि ३ फेब्रुवारी २०२३ला सुप्रसिद्ध स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे बाळासाहेबांवर प्रदर्शन करताय त्याविषयी काही सांगा.
मिस्त्री : बाळासाहेबांवर जगभरातून आणि देशभरातून व्यंगचित्रे आली. अमेरिका, पोलन्ड, इराक, युक्रेन, चीन, रशिया, रुमानिया, इंग्लंड, ब्राझील अशा अनेक देशातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अप्रतिम, दुर्मिळ व्यंगचित्रे रसिकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळतील. त्यांचं पुस्तकही काढायचा विचार आहे. कारण हा दुर्मिळ संग्रह जतन करून ठेवायलाच हवा. प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडित, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, धनराज गरड, अतुल पुरंदरे, किशोर शितोळे, गजानन घोंगडे अशी हुशार, कल्पक व्यंगचित्रकार मित्रांची टीम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करणार आहोत.