साहिल कविता करतो. आपल्या कविता तो स्टेटसला ठेवतो. व्हॉटसअप ग्रूपवर टाकतो. फेसबुकवर टाकतो. इंस्टावर टाकतो. यू ट्यूबवरही अपलोड करतो अन् मग पाहात राहतो की आपली कविता कितीजणांनी लाईक केली? कुणी काही चांगली कमेंट केली आहे का? कविता लाईक करणार्यांची संख्या समाधानकारक वाटली तर साहिल खुश होतो, नाहीतर दुःखी होतो.
ऋतू तिचे डान्सचे रील बनवून इंस्टावर टाकते. लोक तिचे रील पहातात. लाईक करतात. तिला फॉलो करतात. पण
फॉलोवर कमी झाले, लाइक्स कमी झाले की ती अस्वस्थ होते. डिप्रेस होते. सोशल मिडियावर कौतुक न मिळाल्यास किंवा लोकप्रियता कमी झाल्यास काहीजणांची तर अशी अवस्था होते की प्रसंगी त्यांना मानसोपचार घ्यावे लागतात.
खूप लोकांना आपण आवडलं पाहिजे आणि आपले खूप चाहते असायला हवेत. दिवसागणिक आपल्या फॅन्सची संख्या वाढत राहिली पाहिजे; तसं झालं नाही तर ते आपण सहन करू शकत नाही अशी साहिल आणि ऋतूसारख्यांची अवस्था आहे.
साहिल आणि ऋतूला सोशल मीडियावर कौतुक हवं आहे. खरंतर कौतुक ही कुणाची गरज नाही? फार सोशल मीडियावर नसलेल्या सुनीती वहिनींचीही आहे. त्या सुग्रण आहेत. नवर्याकडून, मुलांकडून दोन कौतुकाचे शब्द यावेत अशी त्यांची अपेक्षा असते. नवरा आणि मुलं मिटक्या मारत जेवत राहतात, पण ‘आहाऽऽऽ एकदम टेस्टी झालंय जेवण’ अशी दाद द्यायला काही कुणाचं तोंड उघडत नाही. तोंड उघडतं ते फक्त खाण्यासाठी. आता सुनीती वहिनींनी काय करावं? त्यांच्या रेसिपीचे व्हिडिओज यूट्यूबवर टाकावेत का? तिथे लोक लाईक करतील, कमेंट करतील, सुनीती वाहिनीचं कौतुक करतील. कौतुक झालं की वहिनींना आनंद होईल. पण पुढे ते कमी होत गेलं तर त्यांची मनोवस्था साहिल आणि ऋतूसारखीच होईल का? शिवाय सोशल मीडियावर फक्त कौतुकच होतं असं नाही. निगेटिव्ह कमेंटही येऊ शकतात. त्याचाही मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्याला तर टीका नको असते. फक्त कौतुक हवं असतं. निगेटिव्ह कमेंट यायला लागल्या की मग कमेंट ‘टर्न ऑफ’ करून ठेवण्याची वेळ येऊ शकते. लोक चांगलं म्हणतील, कौतुक करतील तर हरकत नाही पण लोक नावं ठेवतील. चेष्टा करतील तर ते आपल्याला नको असतं.
आपण अनेक गोष्टी करायचा विचार करतो पण करत नाही, याचं कारण आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला जमलं नाही, यश आलं नाही तर लोक नाव ठेवतील, आपलं हसं होईल आणि ते आपल्याला सहन होणार नाही म्हणून आपण ते करत नाही, हेही आहे.
नैनाचंही गेली काही वर्षं तेच चाललं आहे. नैना शर्मिला बेनच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करते. हे ब्युटी पार्लर शर्मिला बेनचं असलं तरी नैनाच ते गेली काही वर्ष सांभाळते आहे. नैना खूप अनुभवी आणि चांगली ब्युटीशियन आहे. शर्मिलाबेनच्या पार्लरमध्ये तुटपुंज्या पगारात काम करत राहण्यापेक्षा ती स्वतःचं पार्लर सुरू करू शकते. तिला त्यासाठी पैसे उभे करता येतील. नैनाच्या मनात हा विचार कधी आला नाही असं नाही. शर्मिला बेनच्या पार्लरमध्ये येणार्या अनेक स्त्रियांनी, मुलींनीही तिला अनेकदा विचारलं आहे की तू तुझ्या कामात इतकी एक्स्पर्ट आहेस. तू तुझं स्वत:चं पार्लर का सुरू करत नाहीस?
नैनामध्ये स्वत:चं ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास नाही, जिद्द नाही. अपयश आलं तर लोक काय म्हणतील ही भीतीसुध्दा तिला वाटते. नैनाला वाटतं की आपण स्वतःचं पार्लर काढलं तर ते चाललंच पाहिजे. तू करून दाखवलंस असं म्हणत लोकांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारली पाहिजे. पण आपण अयशस्वी झालो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. आपली चेष्टा करतील. आपल्यात धमक नाही, दम नाही हे सिद्ध होईल.
साहिल, ऋतू, नैना, सुनीती वहिनी ही मंडळी असा विचार करतात की आपल्याला लोकांकडून कौतुक मिळायला हवे. दाद मिळायला हवी. आपण जे करू ते त्यांना पसंतच पडलं पाहिजे. पण साहिल, ऋतू, नैना, सुनीती वहिनी आणि आपण सार्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं कौतुक करणं एवढंच लोकांना काम आहे का? लोकांकडून सतत आपलं कौतुक होणं शक्य आहे का? लोकांनी कौतुक करायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे ना? ते आपल्या हातात आहे का? अन् आपण ज्या बाबतीत कौतुकाची अपेक्षा करतो ती आपली कृती खरोखर कौतुकास पात्र आहे का? आपल्याला आपल्या क्षमतांची, कला कौशल्यांची योग्य ओळख आहे का? आपण कौतुकास पात्र असूही, काहीजण आपलं कौतुक करतीलही; पण काहीजण टीकाही करतील, आपण त्याची फार भीती बाळगण्याची गरज आहे का? लोकांनी केलेली टीका आपण सहन करूच शकत नाही. मला टीका नको. फक्त कौतुकच हवं असं म्हणून चालेल का? अन् लोकांच्या कौतुकामुळेच आपली योग्यता ठरणार आहे का? लोकांनी आपलं कौतुक केलं नाही तर आपण दम नसलेले, कमअस्सल ठरतो का? अन् लोकांनी कौतुक केले म्हणून आपण खूप ग्रेट ठरतो का?
थोर मानसशास्त्रज्ञ कि. मो. फडके म्हणतात, लोकांची मर्जी संपादन करणे अथवा त्यांची प्रशंसा मिळवणे स्पृहणीय आहे. उपयुक्त आहे. परंतु अत्यावश्यक नाही. आपली लायकी योग्यता लोकांनी केलेल्या प्रशंसेवर अवलंबून ठेऊ नये.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कौतुकाने आनंद मिळतो, प्रोत्साहन मिळतं तसच खोट्या कौतुकाने नुकसानही होऊ शकतं. खोट्या कौतुकाने आपण आपल्या सामान्य किंवा सुमार दर्जाच्या कामाला आणि स्वतःला महान समजतो. आपलं कौतुक कोण करत आहे. का करत आहे हे ही आपण पाहिले पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काही करू पाहतो आहोत, त्यातल्या जाणकारांच मत आपण विचारलं पाहिजे. आपलं फक्त कौतुकच ऐकायची सवय नुकसान करू शकते. आपल्यावर कुणी टीका केली तर ती नीट समजून घ्यावी. त्यात तथ्य आढल्यास आपल्यात सुधारणा करावी. टीका आपला फायदा करू शकते. निंदकाचे घर असावे शेजारी. साहिल, ऋतू यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला हरकत नाही. पण त्यांनी त्याच्या कामात सातत्य ठेवावे. कामात अधिकाधिक सुधारणा करावी. आपण अधिकाधिक चांगला कंटेंट कसा देऊ शकू यावर फोकस ठेवावा. नैनाने आत्मविश्वासाने स्वतःचं ब्युटीपार्लर काढण्याचं धाडस करायला हवं. अर्थात आधी तिला ते मनापासून करावंसं वाटायला हवं. स्वत:चं ब्युटी पार्लर काढण्याच्या कल्पनेने ती झपाटून गेली आणि तिने मेहनत घेतली तर ती नक्कीच यशस्वी होईल.
सुनीती वहिनींच्या जेवणाबद्दल नवरा आणि मुलं काय ‘मस्त टेस्टी झालंय…’ अशी दाद देत नसली तरी बोटं चाटत, मिटक्या मारत खाताना दिसत आहेत ना? ते बोलून कौतुक करत नसले तरी त्यांची कृती तुमचं कौतुक करणारी आहे ना? वहिनींच्या मैत्रिणींनी आणि जवळच्या सार्यांनीच वेळोवेळी त्याचं कौतुक केलं आहे ना? नवरा आणि मुलं यांच्या तोंडी कौतुक करण्याविना काही अडलंय का?
कौतुकात फार अडकायचं नाही, कौतुकातून बाहेर पडून पुढे सटकायचं, पुढच्या कामाला भिडायचं असं ठरवलं तर आपला फार मोठा फायदा होईल. कौतुक ही आपली अत्यावश्यक गरज असता कामा नये. पण आवश्यक तिथे इतरांच कौतुक आपण जरूर केलं पाहिजे. न्यूनगंड असलेल्या, आत्मविश्वासाची कमतरता असलेल्या, बुजणार्या व्यक्तींना प्रोत्साहित करणारं योग्य कौतुक करताना आपण मागे राहता कामा नये. त्यातून त्या व्यक्तीच्या प्रगतीला आपला हातभार लागेल.
एकूण आपण कौतुकाचे भुकेले कौतुकराव, कौतुका मॅडम व्हायचं की कौतुकाच्या फार नादी न लागणारे आणि इतरांचं योग्य ते कौतुक करणारे दिल खुलास कौतुकराव, कौतुका मॅडम व्हायचं हे आपणच ठरवायचं आहे.