संतोष नावाचे गृहस्थ संतोषाने का जगत नाहीत?
– अशोक परब, ठाणे
जसे परब अरब असल्यासारखे वागत नाहीत, तसंच आहे हे अशोकराव!
सचिन पिळगावकरांच्या चिरतारुण्याचे रहस्य ‘तिरुमाला ऑईल’ आहे. मग प्रशांत दामलेंच्या व गेला बाजार संतोष पवारांच्या चिरतारुण्याचं रहस्य नेमकं कोणतं तेल आहे हो?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
वांग्यावर काढायचं तेल… गेला बाजारात मिळतं ते तेल!
सध्या मराठी चित्रपटरसिकांना ‘वाळवी’ने ‘वेड’ लावले आहे… अहाहा, कोटीसम्राट संतोषराव, कशी वाटली आमची ही कोटी?
– राहुल सोळंकी, लोहगाव
खोटी नाहीये… छोटी पण नाहीये… मोठी पण नाहीये… उच्च कोटीची तर नाहीच नाहीये…
माझी बायको मला प्रत्येक गोष्टीत मत विचारते आणि मी सांगेन त्यापेक्षा वेगळंच काहीतरी करते. मग मला ती विचारते तरी का?
– संदीप पांचाळ, घणसोली
आपल्याला कोणी कुत्रंही विचारत नाही अशी नवर्याची भावना होऊ नये म्हणून! माझी बायको असंच करते… तुमच्या बायकोचं मी कसं सांगणार?… ते तुमचं तुम्हीच बघा…
देशाचे पंतप्रधान रोज टीव्हीवर दिसतात, पेपरांमध्ये दिसतात, बातम्यांमध्ये दिसतात, जाहिरातींमध्ये दिसतात, लशीच्या प्रमाणपत्रावरही आपल्याऐवजी त्यांचाच फोटो आहे… तरीही त्यांना ठिकठिकाणी रोड शो करण्याची काय गरज पडत असते?
– आरती कुलकर्णी, डोंबिवली
दिसतं तेच विकतं हे व्यापार्यांना पक्क माहीत असतं… पण, पंतप्रधान तसे का वागतात, हे मला माहित नाही. कारण मी त्यांच्या विरोधी पक्षात नाहीये.
एखाद्या पुरुषाला लोक किती सहजतेने बायकोचा बैल म्हणतात. तुमच्या पाहण्यात एक तरी नवर्याची गाय आहे का हो?
– संतोष पाखरे, वाशीम
माझी बायको बाबा गायच आहे. पण ती मारकुटी आहे का बिन शिंगाची आहे का आखूडशिंगी आहे, ते आता विचारू नका… मला घरी राहायचं आहे…
एखाद्याच्या शारीरिक व्यंगांवर विनोदनिर्मिती करणारे लेखक-नाटककार आणि ती वाचून, पाहून हसणारे वाचक-प्रेक्षक यांची संवेदनशीलता कुठे हरवलेली असते?
– मानसी पिंगळे, सावंतवाडी
मी पण शोधतोय ती संवेदनशीलता. तुम्हाला सापडली तर प्लीज सांगा.
सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांचा मुलगा राहुल इटालियन, पण जहाँगीर बादशहाची आई जोधाबाई राजपूत, तरी तो राजपूत नाही, तो मुघल आणि मुसलमानच, हे काय लॉजिक आहे?
– राघवेंद्र पाटील, चिक्कोडी
ज्यांच्या पूर्वजांचा काहीच इतिहास नाही अशा इल्लॉजिकल इतिहासभक्तांचं लॉजिक असतंय ते पाटील.. वर्तमानात इतिहासामध्ये जगणार्यांना नाही कळणार ते!
अनेक लेखकांची लेखनाची खास जागा असते, त्यांना शांत वातावरण लागतं, विशिष्ट सुगंध, विशिष्ट खानपान लागतं. तुम्ही बहुप्रसवा नाटककार आहात. तुमच्या नाट्यलेखनासाठी असं काय काय खास लागतं?
– बाकर अहमद, सातारा
एकांत आणि खास प्रेरणा, चेतना, प्रतिभा!
व्हॅलेंटाइन डे जवळ आलाय, संतोषराव… तुमचा प्लॅन काय?
– शर्वरी गोडसे, पारगाव
गळ्यात उपरणं घालून फिरायचं आणि स्वतःला कोणी पटत नाही त्याचा राग ज्यांना पटतात त्यांच्यावर काढायचा, असा प्लॅन आहे… होता का आम्हाला जॉइन ताई?
इमारतींचे टेरेस, अंधारे जिने यांच्या काही रोचक, मधुर आठवणी असतात सगळ्यांच्या. तुमच्या आहेत की नाहीत अशा काही आठवणी?
– श्याम कांबळे, घोटी
आहेत ना… टेरेसवर मला बायकांनी पकडला होता त्यांचे वाळत घातलेले पापड चोरून खाताना आणि जिन्यावर गुडघे फुटले होते… अंधारात धडपडलो होतो म्हणून!
या विश्वात देव आहे की नाही?
– शांता कोकणे, बेलापूर
रमेश देव होते.. आता नाहीयेत.. कपिल देव आहेत पण त्यांची आणि माझी ओळख नाहीये.
रावणाची लंका सोन्याची होती, तर हनुमंतरायाने ती जाळली कशी?
– विलास रानगावकर, जातेगाव
ते रावणाला विचारावं लागेल… कारण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!