देशात सत्ता कोणाचीही असो, राष्ट्रपतीपदावर एक रबरस्टँप आणि राज्यपालपदांवर कुरापतखोर पेन्शनर नेमण्याची प्रथाच पडून गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सत्ताकाळात राष्ट्रपती नेमताना त्यांना कसलेही व्यक्तिमत्त्व, ओळख असणार नाही, याची कायम दक्षता घेतली आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती बनण्यापूर्वी काय करत होते, हे सांगता येणे कठीण होते. द्रौपदी मुर्मू या विद्यमान राष्ट्रपतींच्या बाबतीत चारपाच ओळी सांगता येतील, एवढाच काय तो फरक! दलित, आदिवासी वगैरे (आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सोयीच्या) समाजातून एक होयबा उचलून या पदावर बसवले की ते समाज आपल्याला न्याय मिळाला, असे मानेल, ही समजूत या राजकीय गणितामागे आहे. त्यामुळेच तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख या नात्याने सैन्यदलांची मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असताना पंतप्रधान ती मानवंदना स्वीकारायला उभे राहतात आणि त्याविषयी कोणाला काही वाटत नाही.
विद्यमान राष्ट्रपती अलीकडे चर्चेत आल्या त्या राष्ट्रपती भवनातील सुविख्यात मुघल गार्डन्सचे नामकरण अमृत उद्यान असे केल्याचे पत्रक त्यांनी जारी केले तेव्हा. ‘मुघल गार्डन्स’ हे नाव गुलामीचे प्रतीक आहे आणि ते आम्ही नष्ट केले, असे स्वत:च स्वत:च्या पाठीवर शाबासकी देण्याचे उपक्रम सत्ताधारी पक्षातून झाले आणि त्यांच्या समर्थकांनाही जणू बाबराची सत्ताच आपण उलथवून दिली, असा आनंद झाला. इमारत ब्रिटिशांनी बांधलेली, बगीचा मुघल बागकामाच्या शैलीतला, म्हणून त्याचे नाव मुघल गार्डन्स. सदैव ब्रिटिश ‘साहेब मजकुरांच्या सेवेसी सादर’ असलेल्या आणि स्वातंत्र्यलढ्यात कणभराचा सहभाग नसलेल्या विचारधारेचे हे नवदेशभक्त या आयत्या मिळालेल्या बगीच्यावरच्या पाट्या बदलून क्रांतीचा हास्यास्पद आव आणत आहेत. त्यामुळे यापुढे चिकन मुघलाईला चिकन अमृताई म्हणू या, वगैरे विनोदांचे पेवच समाजमाध्यमांत फुटले. नावे बदलण्याचा हा सोस आता मोदी आणि शाह ही आडनावे बदलूनच थांबेल, असे दिसते- कारण ही दोन्ही नावे अरबी-फारसी मूळ असलेली आहेत. तीही गुलामगिरीची प्रतीके नाहीत का? मोगलाईची प्रतीके तर आहेतच.
मुळात बगीच्याचे नाव बदलण्याचा खटाटोप अर्थातच जनतेचे लक्ष महत्त्वाच्या गोष्टींवरून उडवण्यासाठी केला गेला, हे उघड आहे. मोदी जिचे प्रतिनिधी आहेत, त्या विचारधारेला आणि मोदींच्या निकटवर्तीयांना गेल्या काही दिवसांत तीन मोठे दणके आणि हादरे बसलेले आहेत. मोदींच्या राज्यात सगळे काही उत्तम सुरू आहे, हाच देशाचा अमृतकाल आहे, असा सरकारी पैशांनी चाललेला प्रचार पोकळ ठरवणारे हे दणके आहेत.
यातला पहिला दणका होता बीबीसीच्या माहितीपटाचा. २००२च्या गुजरात दंगलीतील मोदींच्या कथित सहभागाबद्दल ब्रिटिश राजनैतिक अधिकार्यांनी दिलेल्या अहवालांवर आधारलेला हा माहितीपट आहे. मोदी यांना या दंगलींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कधीच क्लीन चिट दिलेली आहे. त्यांची देशातली लोकप्रियता निर्विवाद आहे. ज्या दंगलींत त्यांचा सहभागच नाही, असे कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, त्याच दंगलींनी त्यांची आजची प्रतिमा घडवली आहे, त्यांना भक्त मिळवून दिले आहेत, हे एक विरोधाभासी सत्य आहे. त्यामुळे, एखाद्या माहितीपटात काय मांडणी केली आहे, याने त्यांना फरक पडण्याचे काही कारण नव्हते. फार तर भारत सरकारने या सगळ्याचा निषेध करणारा एक खलिता ब्रिटिश सरकार, बीबीसी यांना धाडला असता, तरी काम झाले असते. पण, देश पादाक्रांत केल्यानंतर आता आपण जगाचे नेते बनतो आहोत, अशी समजूत असलेल्या मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमानिर्मितीला तडा देणारा हा माहितीपट असल्याने त्याचे देशातील प्रसारण रोखण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न झाले. आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात असल्या बंदीचे फतवे निरर्थक असल्याने समाजमाध्यमांवरून हा माहितीपट सगळीकडे पोहोचला आणि एरवी ज्यांनी तो पाहिलाच नसता, त्यांनीही पाहिला.
तोच प्रकार ‘पठान’ या सिनेमाच्या बाबतीतही झाला. बॉयकॉट बॉलिवुड असा वाह्यात ट्रेंड ट्विटरवर चालवून सिनेमे पाडता येतात, अशी बावळट समजूत झालेल्या बहिष्कारी कावळ्यांना या सिनेमाने फेफरे आणले. शाहरूख खानचा हा सिनेमा केवळ त्याच्या चाहत्यांनी पाहिला नाही, तर प्रत्येक गोष्टीत धर्म, विद्वेष, बहिष्कार अशी वैतागवाणी किरकिर करणार्या मोदीभक्तांच्या आक्रस्ताळ्या नकारात्मकतेला कंटाळलेल्या लोकांनीही आवर्जून पाहिला. चार दिवसांत चारशे कोटीचा गल्ला कमावणार्या ‘पठान’ने बहिष्कारी गँगचे कंबरडेच मोडून टाकले.
तिसरा हादरा दिला हिंडेनबर्ग अहवालाने. अमेरिकेतल्या या छोट्याशा विश्लेषण कंपनीने जगातल्या श्रीमंतांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर पोहोचलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर थेट ठपका ठेवून त्यांच्या कॉर्पोरेट अनियमिततांबद्दल असे टोकदार प्रश्न उपस्थित केले की अदानींच्या शेअर्सचे भाव धडाधड कोसळले. एखाद्या उद्योगपतीच्या उद्योगांचे शेअर्स हा काही राष्ट्रीय महत्त्वाचा विषय असू शकत नाही. पण, ज्यांची मुळात ओळखच ‘पंतप्रधानांचे मित्र’ अशी आहे (जी पंतप्रधानही कधी लपवत नाहीत), ज्यांचा सगळा आश्चर्यकारक उत्कर्ष या ओळखीतूनच झाला, अशी वदंता आहे, त्या उद्योगपतीच्या साम्राज्याला सुरुंग लागणे हे सत्तेला सुरुंग लागण्यासारखे ठरते. त्याचबरोबर मोदी देशातील जनतेचे नव्हे, उद्योगपती मित्रांचे सेवक आहेत, या राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या टोचर्या टीकेलाही त्यातून बळ मिळते. अदानी यांनी आपल्यावरील हल्ला हा देशावरील हल्ला असल्याचा राग आळवला आहे आणि एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. हिंडेनबर्गवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या त्यांच्या आव्हानाचा फुगा हिंडेनबर्गच्या नॅथन अँडरसन यांनी ‘अमेरिकेच्या कोर्टांत तुमचे स्वागतच आहे’ असे सांगून फोडला आहे. भारताची फार भरभराट होते आहे, मोदींचा करिश्मा जगभरात गाजतो आहे, हे खुपत असल्याने आता आंतरराष्ट्रीय शक्तींनी संगनमत करून भारताविरोधात युद्ध पुकारले आहे, असे केविलवाणे बचाव सरकारसमर्थक करत आहेत.
तशातच एका मतदार सर्वेक्षणात आज मतदान झाले तर मोदी सरकारचे संख्याबळ घटून विरोधकांचे संख्याबळ उत्तम प्रकारे वाढेल, असे निष्कर्ष जाहीर झाले आहेत… महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आली आहे… मग कुठे उद्यानाचे नाव बदल, शहराचे नाव बदल, हिंदूंच्या सर्वशक्तिमान नेत्याची सत्ता असताना हिंदू जनआक्रोश मोर्चा काढ, असे जनमानस भ्रमित करण्याचे उपक्रम सुरू आहेत…
…आगामी निवडणुकांमधून देशाचा खरोखरचा ‘अमृत’काल जवळ येणार आहे, याचीच ही सुचिन्हे असावीत!