हाअंक वाचकांच्या हातात येईल, तो दिवस असेल २६ जानेवारी २०२३… देशाचा प्रजासत्ताक दिन. या दिवशी ‘भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो’ अशा शुभेच्छा लोक एकमेकांना देत असतात. पण, तुम्ही एकीकडे भारतीय जनता पक्षाला मत देत असाल आणि दुसरीकडे या शुभेच्छाही एकमेकांना देत असाल तर तुम्ही भाबडे आहात किंवा पक्के बेरड आहात… कारण, प्रजासत्ताकाचा पाया उभारलेला आहे लोकशाहीवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर संधी मिळेल तेव्हा हुकूमशाहीचा डबल इंजीन बुलडोझर चालवणारा हा पक्ष सत्तेत असेल तोवर प्रजासत्ताक धोक्यात आहे, त्यामुळे ते चिरायू होण्याच्या शुभेच्छा देणे दांभिकपणाचे ठरेल.
मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेल्या, पूर्णत्वाला गेलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. आधीच्या सत्ताधार्यांच्या कामांवर आपला टिळा लावण्याची त्यांची ही सवय आजची नाही, २०१४पासूनची आहे. काँग्रेसच्याच योजना (ज्यांच्यातल्या अनेकांना त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कडाडून विरोध केला होता) नव्या नावाने, साफसूफ करून आणि मुख्य म्हणजे ढोल वाजवून लोकांच्या गळ्यात मारल्या. मुंबईत तेच करून वर त्यांनी मुंबईच्या विकासासाठी मुंबईची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे यायला हवी, असे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे सूतोवाचही केले. स्वत:ला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेताना निलाजरेपणाने गावभर ‘आम्ही मोदींची माणसे आहोत’ असेही छाती फुगवून सांगत फिरणारे मिंधे मागे ‘जी जी रं जी जी’ करायला उभे होते. मुंबईचे अहमदाबाद करण्याची हास्यास्पद चर्चाही इथेच सुरू झाली? अरे, कुठे मुंबई, कुठे अहमदाबाद, काही तुलना आहे का? मुंबईचे अहमदाबाद करायचे म्हणजे मेट्रोच्या रुळांवर बैलगाडी चालवण्याइतके मागासपणाचे आहे. मुंबईची लोकसंख्या किती, आर्थिक उलाढाल किती, गंगाजळी किती? अहमदाबाद त्या तुलनेत ग्रामपंचायतीच्या पातळीवर असेल हो. पण, एकदा गुजराती बोळ्याने दूध प्यायचं ठरलं की दुधाच्या नावाखाली चुन्याची निवळीही मिटक्या मारत पितात मिंधे भक्त.
देशावर भाजपची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात ती कुटील मार्गांनी बळकावलेली आहे. मुख्यमंत्रीपदावर एक बाहुले बसवून त्याच्याकरवी ती राबवली जाते आहे, हे झाले डबल इंजीन सरकार. आता राहिली मुंबई महानगरपालिका! ती ताब्यात आली की ट्रिपल इंजीन सरकार होणार आणि मुंबईच्या विकासाचा रथ प्रचंड गतीने धावणार, असे स्वप्नरंजन पंतप्रधानांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी करून झाले. या स्वप्नरंजनात काही तथ्य आहे का?
डबल इंजीन सरकार म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असले की प्रचंड गतीने राज्याचा विकास होतो, असे गृहीतक. ते तपासून घेण्याची युक्ती सोपी आहे. जिथे तथाकथित डबल इंजीन सरकार आहे, तिथे काय विशेष दिवे लागले आहेत, ते तपासून पाहणे. भारतात काही मोजक्या राज्यांमध्ये भाजपची खरी सत्ता आहे आणि कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये कालाकांडी करून बनवलेली सरकारे आहेत. जिथे भाजपची खरी डबल इंजीन सरकारे आहेत अशी महत्त्वाची राज्ये दोनच, एक गुजरात आणि दुसरे उत्तर प्रदेश. या दोन्ही राज्यांचे देशातील औद्योगिक, सामाजिक, आर्थिक विकासाच्या उतरंडीतले स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे काय? नाही. अनेक निर्देशांकांमध्ये ही राज्ये पहिल्या दहा किंवा पाच राज्यांमध्येही नाहीत.
यातील गुजरातचे अपयश विशेष लक्षणीय आहे. कारण, हे पंतप्रधान मोदी यांचे राज्य. ते देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांचे गुजरातप्रेम कधीही लपून राहिलेले नाही, त्यांनी ते लपवलेलेही नाही. अन्य कोणत्याही पक्षाच्या पंतप्रधानाने आपल्या राज्याच्या संदर्भात इतका पक्षपात केला असता, तर भारतीय जनतेने तो खपवून घेतला नसता आणि याच भाजपने छाती पिटून, गळा काढून, आदळआपट करून अशा पक्षपाती सरकारला दे माय धरणी ठाय करून सोडले असते. पण इथे आपलेच मोदी आणि त्यांचेच दात. त्यामुळे, गुजरातची संस्कृती हीच भारताची संस्कृती, गुजराती पदार्थ हेच भारतीय पदार्थ, आला पाहुणा की ने गुजरातला, फिरव त्याला गुजरात-बडोदा-सुरतेच्या चकचकीत शोकेसमधून, असे उपक्रम करून गुजरातचे महत्त्व वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न मोदींनी केला आहे. त्याचबरोबर, बंदरांपासून सेमी कंडक्टरांपर्यंत कोणताही मोठा उद्योग व्यवसाय इतर कोणत्या राज्यांना मिळूच द्यायचा नाही, इतरांशी केलेले करार धाकदपटशाने मोडून ते उद्योग गुजरातला वळवायचे, मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व खच्ची करण्यासाठी मुंबईतील उद्योग-व्यवसाय पळवून न्यायचे, हेही मोदींनी गुजरातप्रेमापोटी केले आहे. तरीही त्यांचे हे प्रिय मातृराज्य कोणत्याही यादीत शीर्षस्थानावर येत नाही. डबल इंजीन बुलडोझरवाल्या उत्तर प्रदेशाची अवस्था याहून वाईट आहे.
या दोन्ही राज्यांमधून रोजीरोटीसाठी आणि व्यापार-उदीमासाठी तिथले भूमिपुत्र देशभरात विखुरले आहेत, काही परदेशांतही गेले आहेत. भाजपच्या तथाकथित डबल इंजीन सरकारांनी या राज्यांचा खरोखरीच अत्यंत वेगवान विकास केला असता, तर हे भूमिपुत्र आपल्या मातृराज्यांकडे धावत सुटले नसते काय? महाराष्ट्रातून तरी अशा उलट्या भरून जाणार्या रेल्वेगाड्या दिसलेल्या नाहीत.
केंद्रीय सत्ताधीश राज्यातही आमची सत्ता असेल तर विकास वेगाने होईल, असे सांगतात, तेव्हा ते राज्यातील जनतेला धमकी देत असतात. आम्हाला मते दिलीत तरच आम्ही तुमचा विकास करू, तुमच्या निधीच्या चाव्या माझ्या हातात आहेत, अशा शब्दांत भाजपचे आमदार जनतेला धमकावताना दिसले आहेत. तेच गोड भाषेत मोदी करत आहेत, मात्र आतल्या ‘मजकुरा’त काही फरक नाही. हे लोकशाहीच्या गळ्याला नख लावणे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते, तेव्हा सगळ्या बाबतीत अडवणूक होत होती. मलबार हिलच्या वृद्धाश्रमात अहोरात्र जागरणे घडत होती. आता तिथे दिवसाही वामकुक्षी, रात्रीही ताणून झोप, असा कार्यक्रम सुरू आहे, कारण ‘आपले सरकार’ आलेले आहे.
भाजपचे संसदेत अवघे दोन खासदार होते, तेव्हा तत्कालीन सत्ताधीशांनी हाच प्रयोग केला असता तर आज हा पक्ष आणि त्याची विचारधारा औषधालाही कुठे दिसली नसती. लोकशाहीची मूल्ये मानणारे सत्ताधारी होते, म्हणून हा पक्ष मोठा होऊ शकला आणि आता काम साधल्यावर त्याच लोकशाहीच्या जिवावर उठलेला आहे. हे लोकशाहीचे शत्रू सत्तेत आहेत तोवर प्रजासत्ताक चिरायू होणे दूर, ते शिल्लक राहिले तरी पुष्कळ! त्यासाठी शुभेच्छा!