लहान मुलीचा खून आणि सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्यातल्या या नराधमांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वतंत्र करून त्या अमृताचे रूपांतर विषामध्ये करण्याचे काम गुजरातचे सरकार आणि त्यांचे राज्यपाल यांनी केली आणि वर त्यांचे हारतुरे घालून, स्वागत करून ते मोठे वीरच होते, असा आवही आणला गेला. विशिष्ट जातीचे लोक संस्कारी असतात, ते कधीही, कसलंही दुष्कृत्य करत नाहीत, कायदा मोडत नाहीत, भ्रष्ट नसतात असे भारतातल्या मोठ्या समाजवर्गाला कायम वाटत आले आहे, ते किती भ्रममूलक आहेत हे या घटनेतून लक्षात येते.
– – –
अहमदाबादपासून २५० किमी अंतरावर दाहोद जिल्ह्यातील रंधीकपूर या गावी बिल्किस बानोचे पंधरा जणांचे कुटुंब एकत्र रहात होते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्सप्रेसमध्ये ५९ करसेवक आगीत होरपळवून मारले गेले आणि त्या पाशवी घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम दंगल सुरू झाली. दंगलींच्या भीतीने घाबरलेल्या बिल्किस बानोच्या परिवाराने राहते गाव सोडायचे ठरवले. सुरक्षित जागेच्या शोधात तो परिवार गाव सोडून निघाला व ३ मार्च, २००२ रोजी छप्परबाड गावी पोहोचला. त्या ठिकाणी मुक्कामी असताना त्या परिवारावर एका धर्मांध जमावाने लाठी, काठी, सळ्या, तलवारी यांच्यासारख्या हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बिल्किसच्या साडेतीन वर्षाच्या लहान मुलीला तिच्या डोळ्यादेखत जमिनीवर आपटून मारले गेले. ते कृत्य करणार्या क्रूरकर्मा विकृत मारेकर्याचे नाव अजमल कसाब नसून शैलेश भट्ट आहे इतकाच काय तो फरक; कृत्य दोघांचेही अमानवीयच. बिल्किस बानोच्या परिवारातील इतर सातजणांना देखील तिच्यासमोरच ठार मारले गेले. बिल्किस त्यावेळी पाच महिन्यांची गरोदर होती. पोटच्या लहान मुलीला डोळ्यांसमोर ठार मारल्याने जिवाच्या आकांताने आक्रोश करणार्या, पोटात बाळ असलेल्या त्या आईवर दया दाखवण्याऐवजी, पिसाटलेल्या नराधमांनी तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. त्या परिवारातील अन्य स्त्रियांवर देखील बलात्कार झाला. विशिष्ट जातीचे लोक संस्कारी असतात, ते कधीही, कसलंही दुष्कृत्य करत नाहीत, कायदा मोडत नाहीत, भ्रष्ट नसतात असे भारतातल्या मोठ्या समाजवर्गाला कायम वाटत आले आहे, ते किती भ्रममूलक आहेत हे या घटनेतून लक्षात येते. राधेश्याम शाह, विपिन चंद्र जोशी, जसवंत नाई, केशरभाई वोहानिया, शैलेश भट्ट, प्रदीप मोढ़डिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट, बाकाभाई वोहानिया आणि रमेश चांदना ही आरोपींची नावे बघता बलात्कारी आणि खुनी हे कोणत्याही विशिष्ट धर्मातून, जातीतून, समाजातून येत नसतात, तर बाईला भोगवस्तू आणि पुरुषाची मालमत्ता मानणार्या पुरूषसत्ताक मानसिकतेने आणि चुकीच्या शिकवणुकीने निर्माण केलेले विकृत नराधम असतात, हेच यातून अधोरेखित होते.
बिल्किस बानो बलात्कारनंतर कित्येक तास बेशुद्ध निपचित पडली होती. शुद्धीत आल्यावर तिने जवळच्याच एका आदीवासी महिलेकडून अंग झाकण्यासाठी काही कपडे घेतले. नशीब बलवत्तर म्हणून बिल्कीस या जीवघेण्या हल्ल्यातून जिवंत राहिली आणि सर्वस्व गमावलेल्या या माऊलीने दुसर्याच दिवशी ४ मार्च २००२ रोजी पंचमहल येथील लिमखेड़ा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गुजरातला आणि देशालाच नव्हे, तर मानवतेलाच काळिमा फासणारी ही एक क्रूर घटना होती. बिल्किसने धाडस दाखवत तक्रार दाखल केली म्हणून त्या काळातील ही अत्याचाराची एक तरी घटना उघडकीस आली. अशा कित्येक घटना त्या काळात दडपल्या गेल्या असतील. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. पोलीस, प्रशासन, इतकेच नव्हे तर ज्यांना आपण देवदूत, देव मानतो, ते डॉक्टर देखील हे प्रकरण दडपण्यात सहभागी होते. त्या सर्वांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते. प्रशासन त्यावेळी संविधानबरहुकुम चालत होते की कोणा अदृश्य शक्तीच्या इशार्यावर चालत होते? सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड यांनी हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे मांडले. त्यानंतर गुजरात सरकारवर जगभरातून टीकेची झोड उठली. जवळपास १० वर्षांनी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बलात्कार आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारावर आळा घालण्यासाठी कठोर शिफारशी करणारे न्यायमूर्ती वर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेतली. वर्मा आयोगाच्या शिफारसींमुळेच आज महिला सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना अंमलात आल्या आहेत. बिल्किसवरील अत्याचाराची मग सीबीआय चौकशी नेमली गेली. हत्याकांडात मारले गेलेल्या सातजणांच्या दफन केलेल्या मृतदेहाची मुंडकी गायब होती. पोस्टमार्टममध्ये मृतांची मुंडकी गायब केली गेल्याचा संशय व्यक्त झाला. सीबीआयचा तपास सोपा नव्हताच, पण त्यावर मात करत २००८ साली १७ आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या केल्याचे व गुन्ह्यात मदत केल्याचे आरोपपत्र ठेवण्यात आले.
गुजरात राज्यात त्यावेळी मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी होते. त्यांच्या निष्पक्षतेचे दर्शन रोजच घडत असते. चिरकुट सोम्यागोम्यांनी केलेल्या आरोपानंतर लगेच ईडीची कारवाई करणार्या आजच्या खुनशी सरकारचे हे प्रमुख त्या काळात मात्र २००४पर्यंत आरोपींना अटक न करता ढिम्म बसले होते. सध्याच्या मोदी सरकारच्या नजरेत खुपणारे आणि जेलमध्ये टाकले जाणारे सामाजिक कार्यकर्तेच बिल्किस बानो प्रकरणी आवाज उठवण्यात अग्रेसर होते, हा योगायोग नाही. बिल्किस बानोला गुजरातमध्ये निष्पक्ष न्याय मिळणे शक्यच नव्हते, हे त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आणि तिला न्याय देण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर टाकली, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण एखाद्या राज्याच्या नागरिकांना त्याच राज्याची न्यायव्यवस्था न्याय देईल, असे सर्वोच्च न्यायालयाला न वाटणे गुजरातसाठी आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांसाठी किती भयंकर लाजिरवाणे होते! तशी शरम संबंधितांना कधी वाटल्याचे कुठे दिसलेले नाही. महाराष्ट्राच्या न्यायपालिकेने ११ खुनी बलात्कार्यांना जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावली, ती पुढे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली. त्यांच्या नृशंस कृत्याची घृणास्पदता त्यातून अधोरेखित झालेली आहे. ती कोणी माफी दिल्याने आणि पेढे भरवल्याने कमी होत नाही.
गुजरातचे गोधराकांड अत्यंत क्लेशदायी होते. त्यानंतर त्या राज्यात प्रचंड मोठी दंगल उसळली आणि मुख्यमंत्री मोदी व तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कायदा व सुव्यवस्था तात्काळ प्रस्थापित करता आली नाही. कोणत्याही मुख्यमंत्र्याचे ते परमकर्तव्य असते, तो राजधर्म असायला मुख्यमंत्री काही राजा असत नाही. सरकारची इच्छा असल्याशिवाय दंगल होत नाही, असे पोलिस यंत्रणेतले वरिष्ठ सांगत असतात. तेच गुजरातमध्ये पद्धतशीरपणे घडवले गेले, याबद्दल कोणालाही शंका नाही आणि त्याबद्दल एका वर्गाला अभिमान आहे, हे तेव्हाचे कलंकित मोदी आज पंतप्रधानपदावर विराजमान आहेत, त्यातून स्पष्टपणे कळते. मुख्यमंत्री म्हणून मोदींची अकार्यक्षमता ही हिंदुत्वावरच्या संकटाचा केलेला अभूतपूर्व मुकाबला म्हणून रंगवून सादर केली गेली. दंगल आटोक्यात न ठेवणारे, ती पसरू देणारे आणि जनतेला सतत धार्मिक दंगलसदृश भीतीच्या सावटाखाली ठेवून मतांची बेजमी करणारे पक्ष, संघटना अथवा सरकार देशाला किती हानीकारक असतात, ते आता संपूर्ण देशाला समजतेच आहे. लहान मुलीचा खून आणि सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्यातल्या या नराधमांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वतंत्र करून त्या अमृताचे रूपांतर विषामध्ये करण्याचे काम गुजरातचे सरकार आणि त्यांचे राज्यपाल यांनी केली आणि वर त्यांचे हारतुरे घालून, स्वागत करून ते मोठे वीरच होते, असा आवही आणला गेला. हे मानवतेला लाजिरवाणे आहे. (एका ज्येष्ठ महिला वकिलांच्या मते गुजरात सरकारने त्यांचे कार्यक्षेत्र नसताना, महाराष्ट्राच्या न्यायपालिकेच्या निकालात ढवळाढवळ करून केलेल्या) या भयंकर कृतीने घराघरांवर लागलेला तिरंगा खरोखर शरमेने झुकला असेल. हे सगळे या ढोंग्यांचे सम्राट लाल किल्ल्यावरून नारी सन्मानाची जुमलेबाजी करत असताना होत होते, हे अधिक विषण्ण करणारे आहे.
ज्या गुजरातच्या विकासाचे खोटे ढोल वाजवून मोदींनी संपूर्ण देशाला मूर्ख बनवले त्या गुजरातमधील मागची विधानसभा निवडणूकही त्यांना जड गेली होती, काँग्रेसने नाकी नऊ आणले होते. यावेळी आम आदमी पक्षाचाही असाच जोर आहे. तिकडे मोदी विश्वगुरूच बनले आहेत, अशी आवई त्यांचे भक्त उठवत असताना त्यांच्याच राज्यात त्यांचा पक्ष चीतपट झाला, तर ते त्यांच्यासाठी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी मानहानीकारक ठरेल. अशावेळी थंड डोक्याने धार्मिक भावना चेतवण्यासाठी आणि आम्ही कसा मुसलमानांना धडा शिकवला होता, हे प्रतीकरूपाने दाखवण्यासाठी २० वर्षांपूर्वीच्या दंगलीची खपली काढण्याचे गलिच्छ उद्योग भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहेत. २० वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता असून देखील गुजरातमधील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही, मूठभर भांडवलदार मात्र गब्बर होत गेले आहेत. ही गरिबी भिंती बांधून झाकण्याची वेळ मोदींवर आली होती त्यांचे जिवलग मित्र ‘डोलंड’ ट्रम्प यांच्या भेटीच्या वेळी. शिवाय, मोदीशहांमुळे गुजरातचे आणखीही कायमस्वरूपी नुकसान होऊन बसले आहे. जगभर पसरलेला गुजराती समुदाय हा आनंदी, सहज परदेशात, राज्यात, भाषेत मिसळून जाणारा कष्टाळू आणि शांतिप्रिय समाज म्हणून प्रसिद्ध होता. या सगळ्याच समुदायामध्ये आता जगभरातले लोक मोदी आणि शहा यांच्या ऊग्र, एकारलेल्या, हुकूमशाही प्रवृत्तीच्या प्रतिमा पाहू लागले आहेत. महात्मा गांधींचा गुजरात आता मोदींचा गुजरात म्हणून ओळखला जातो आहे, ते त्या समाजासाठी दीर्घकालीन हिताचे नाही. याविरोधात एकवटून गुजराती जनता भाजपा सरकारला नेस्तनाबूत करेल अशी भीती असल्यानेच या आरोपींची सुटका करण्यात आली आहे. समाजमाध्यमावर त्यांचे हार घातलेले फोटो कोण आणि का पसरवत आहे, हे ओळखणे अवघड नाही. भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे आता लपून राहिलेले नाही. पण निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून बलात्कारी आणि खुनी मोकाट सोडले जात असतील, हार घालून त्यांचे सत्कार केले जात असतील, मिठाई वाटली जात असेल तर ते सच्च्या हिंदुत्ववाद्यांवर विश्वास बाळगणारे मतदार तरी हे सहन करतील का? त्यांना धर्माभिमान आणि माणुसकीशून्य बलात्कार-खून यांच्यातला फरक कळत नसेल का? बिल्किस बानो कोणत्या धर्माची आहे, याला या गंभीर गुन्ह्यात स्थानच नाही. ती एक महिला आहे, ती एका लहानग्या मुलीची आई होती आणि ती गर्भवती होती, तिच्यावरचा अत्याचार हे कुणाला धर्मकृत्य वाटत असेल तर त्याचा धर्म आणि धर्माचं आकलन सैतानीच आहे, असं म्हटलं पाहिजे. असा अत्याचार करणारे सुसंस्कृत समाजात आणि खासकरून हिंदू धर्मात राहायला लायक नाहीत.
अशावेळी निर्भयाच्या आईचे खरोखर कौतुक वाटते. तिने धार्मिक दुफळीला बळी न पडता समदुःखी बिल्किस बानोला साथ दिली आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या कैद केलेल्या सुंदर सुनेला स्वतःची आई म्हणून सन्मानाने परत पाठवणार्या छत्रपती शिवरायांचे नाव जो समाज घेतो त्या समाजात बिल्किस बानोवर अत्याचार होतोच कसा? इतके कसे आपण मुर्दाड झालो आहोत? या बलात्कार्यांचे सत्कार करणार्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसाच सांगता कामा नये. सुप्रिम कोर्टाने सामाजिक दायित्व आणि प्रायश्चित म्हणून बिल्किस बानोला पन्नास लाख द्यावेत असा आदेश गुजरात सरकारला दिल्यावरही डोक्यात प्रकाश न पडलेल्या भाजपा सरकारने संपूर्ण समाजाला धोकादायक ठरतील अशा नीच वृत्तीच्या ११जणांची सुटका करून नारी सन्मानाच्या बाबतीत अधोगतीचा नीचांक गाठून दाखवला आहे.
मुळात, खून आणि बलात्कार यासारख्या गुन्ह्यातील आरोपींना कोणत्याही कारणाने शिक्षेत सूट द्यायची नाही अशी या कायद्यात २०१४ सालीच सुधारणा करण्यात आली आहे. त्या तरतुदीनुसार ११ आरोपींना सोडता येणारच नव्हते. गुजरातचे मुख्य सचिव म्हणतात, आम्ही १९९२च्या तरतूदींचा आधार घेत या गुन्हेगारांना सोडले आहे. गुजरातेत जन्माला येऊन यांचे गणित इतके कच्चे कसे? उद्या १८५७चा दाखला देऊन आणखी काहीतरी कराल? लवकरात लवकर भाजपचा आमदार-खासदार बनण्याची घाई झाली आहे का या अधिकार्याला?
या देशात कोर्टाची पायरी चढू नये म्हटले जाते. न्याय मिळवणे इथे सोपे नाही. खासकरून अख्खेच्या अख्खे सरकार, त्याच्या सगळ्या यंत्रणा, सगळे मंत्री तुमच्या विरोधात असतात, तेव्हा ही लढाई अजिबात सोपी नसते. १५ वर्षे कोर्टात लढा देणार्या बिल्किस बानोला जिवाच्या भीतीमुळे दोन वर्षांत तब्बल २० वेळा घर बदलावे लागले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची खरी ताकद काय आहे हे बिल्किस बानोने दाखवून दिले. तिच्या त्या लढाईला कस्पटासमान लेखणारा हा विषारी आणि विखारी निर्णय आहे. मतांसाठी लाचार झालेल्या आणि सगळ्या देशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याच्या लालसेने पछाडलेल्या एका पक्षाचे हे सर्वोच्च अध:पतन आहे.
भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये आतापर्यंत फक्त घोटाळेबाज खोकेवीर धुवून स्वच्छ निघत होते. आता बलात्कारी आणि खुनीही स्वच्छ होऊन बाहेर पडणार असतील, तर ते यांना निवडून देणारा समाज म्हणून आपल्यासाठी लांच्छनास्पद आहे. या देशात बलात्कारी, खुनी कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांची अशी सुटका करणारे आणि त्यांचे सत्कार सोहळे करणारे राजकारणी राजकीय नरकवासात धाडण्याची हिंमत भारतीय मतदारांत आजही आहे, हे आता दाखवून दिले पाहिजे.