कोल्हापुरात प्रबोधनकारांचं स्वागत करवीर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांनी केलं. ते छत्रपती शाहू आणि प्रबोधनकार यांच्यातल्या ऋणानुबंधातले महत्त्वाचा दुवा होते.
– – –
इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी केलेल्या सीकेपी समाजाच्या बदनामीमुळे प्रबोधनकार चिडले. त्यांनी `कोदंडाचा टणत्कार` नावाचं पुस्तक लिहून त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. राजवाडेंचे आरोप खोटे ठरवले. त्याचा प्रचार गावोगाव केला. इतर समाजांचीही अशीच बदनामी होत असल्यामुळे त्यांनाही प्रबोधनकारांच्या पुस्तकाने बळ मिळालं. त्यात दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत, शुक्ल यजुर्वेदी म्हणजे पळशे या ब्राह्मणी पोटजातींबरोबरच मराठा समाजही होता. छत्रपती शाहू महाराजांनी हाती घेतलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे मराठ्यांना शूद्र ठरवण्यासाठी भिक्षुकशाही सरसावली असल्याचं बहुजन समाजाच्या लक्षात आलं होतंच. प्रबोधनकारांसारखा खमका वक्ता आणि लेखक मिळाल्याने ब्राह्मणेतर चळवळीतलं मराठा नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभं राहिलं.
प्रबोधनकारांनी भिक्षुकशाहीच्या पिळवणुकीचा तपास सुरूच ठेवला होता. कोदंडाच्या टणत्कारात इतिहासाचं पुनर्लेखन केलं होतंच. त्यापुढे जाऊन ब्राह्मणी व्यवस्थेने इतर समाजांना हीन लेखण्यासाठी केलेल्या बहिष्कारांचा इतिहास त्यांनी मांडायचं ठरवलं होतं. धर्मशास्त्राच्या नावाने होणार्या ग्रामण्याची समाजशास्त्रीय शहानिशा करण्याचं त्यांनी पक्कं केलं होतं. त्यासाठी त्यांचं संशोधन नेहमीप्रमाणे मुळापासून सुरू होतं. त्यांनी अनेकांना पत्रं लिहिली. गावोगाव स्वतः जाऊन अनेकांना भेटले. बरीच कागदपत्रं मिळवली. प्रबोधनकारांच्या या धडपडीची, पायपीटीची, नव्या संशोधनाची माहिती छत्रपती शाहू महाराजांसारख्या गुणग्राहक नेत्याने घेतली नसती तरच नवल.
तेव्हा तंजावरच्या कोर्टात मराठे क्षत्रिय आहेत की शूद्र, या विषयावर खटला सुरू होता. छत्रपती शाहू महाराजांनी त्यात रस घेतला होता. त्यामुळे त्याच्याशी संबंधित विषयांवरचं नवीन संशोधन समजून घ्यायचं होतंच. तसंच इतिहासाची ब्राह्मणी मांडणी खोडून काढत नवी मांडणी करणारा सडेतोड अभ्यासक हवाच होता. महाराजांकडे भास्करराव जाधव, प्रा. महादेवराव डोंगरे आणि अण्णासाहेब लठ्ठे असे तीन थोर विद्वान अभ्यासक काम करत होतेच. हे तिघेही सत्यशोधक चळवळीशी संबंधित होते. महात्मा फुलेंच्या विचारांची नव्या संदर्भात मांडणी करण्याचं काम या तिघांनी दीर्घकाळ केलं. हे तिघेही उत्तम इतिहास संशोधकही होतेच. पैकी रावबहादूर डोंगरेंनी तर ग्रामण्याच्या इतिहासावरची कागदपत्रं गोळा करण्याचं काम करून ठेवल्याची नोंद प्रबोधनकारांनीच केलेली आहे. इतर दोघांशीही प्रबोधनकारांचा परिचय असणारच. या तिघांपैकी कुणीतरी प्रबोधनकारांना भेटण्याची शिफारस केली असावी, असा प्रबोधनकारांचाच अंदाज आहे.
१९१८ साली बाळासाहेब वैद्य यांचा प्रबोधकारांना ऑफिसात फोन आला. त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना बोलावलं आहे. त्याच दिवशी पूना एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघा, असा तो निरोप होता. मात्र हा निरोप देणारे बाळासाहेब वैद्य कोण, याचा सुगावा मात्र लागत नाही. प्रबोधनकारांनी त्यांच्या नावाचा उल्लेख असा केला आहे की जणू हे नाव त्या काळातल्या वाचकांना परिचितच असावं. या वैद्यांनी दिलेल्या निरोपानुसार प्रबोधनकार दुसर्या दिवशी सकाळी कोल्हापूर स्टेशनवर दाखल झाले. कोल्हापुरात तर आलो, पण आता महाराजांना भेटायला कुठे आणि कसं जायचं, हा प्रश्न प्रबोधनकारांसमोर होताच. पण तो प्रश्न आपोआप मिटला.
स्टेशनवर ५-६ जण प्रवाशांचे चेहरे निरखत नावागावाची विचारपूस करत होते. त्यांना बघून प्रबोधनकारांनी अंदाज लावला की सीआयडीवाले कुणाला तरी शोधत असावेत. पण त्यांचा अंदाज चुकलाच. त्यांच्यातला एकजण प्रबोधनकारांकडे आला आणि नाव विचारलं. नाव सांगताच त्याने शिट्टी फुंकली आणि म्हणाला, `चला, महाराजांकडे जायचं आहे ना तुम्हाला? आम्ही गाडी घेऊन आलो आहोत.` त्यांच्यासाठी घोडागाडी आली होती. त्यात ते बसले. दहा पंधरा मिनिटात गाडी राजवाड्याच्या प्रांगणातल्या दिवाण सर रघुनाथराव सबनीस यांच्या बंगल्यात पोहोचली. स्वतः दिवाणसाहेब स्वागतासाठी पुढे आले.
पुढील काळात सर रघुनाथराव सबनीसांशी प्रबोधनकारांचा उत्तम स्नेह निर्माण झाला. दोघेही सीकेपी असण्याचा संदर्भ त्याला होताच. पण त्यांचा स्नेह त्याच्या पलीकडचा होता. सबनीस हे फक्त कोल्हापूर दरबारचे दिवाणच नव्हते, तर छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू असे कारभारी होते. महाराज लहान असतानापासून सबनीस त्यांचे मार्गदर्शक होते. शाहू महाराजांचे चरित्रकार धनंजय कीर राजर्षी शाहू गौरव ग्रंथातल्या लेखात लिहितात, `राजर्षी शाहू छत्रपती हे केवळ प्रâेजर यांनाच गुरू, मार्गदर्शक वा तत्त्वज्ञ मानीत असे नाही. त्यांचे विद्यार्थीदशेतील आणखी एक गुरू दिवाण सबनीस यांना ते उपरोक्त दोन गुरूंइतकाच मान देत. वर उल्लेखिलेल्या दोन गुरूंची (सर एम. एम. प्रâेजर आणि सर क्लॉड हिल) त्यांनी कृतज्ञतेने कोल्हापुरात स्मारके उभारली. तसेच कर्नल फेरिसचेही त्यांनी स्मारक उभारले. तथापि, त्यांच्या बरोबरीनेच आपले भारतीय गुरू सर रघुनाथराव व्यंकोजी सबनीस ह्यांचाही त्यांनी गुरू म्हणून गौरव केला.`
रघुनाथराव सबनीस हे छत्रपती शाहूंचे गुरू असल्याचा संदर्भ त्यांच्या १३ सप्टेंबर १९१५च्या आज्ञापत्रातही आहे. शाहू महाराज या आदेशात सबनीसांचा अत्यंत आदराने उल्लेख करतात, `मेहरबान रावबहादूर रघुनाथ व्यंकोजी सबनीस, सी.आय.ई. दिवाणसाहेब यांचा संबंध करवीर संस्थानशी पूर्वीचा पुष्कळ दिवसांपासून पिढीजात आहे व विशेषेकरून आम्ही लहान असल्यापासून आमच्याशी व आमच्या घराण्याशी निकट संबंध आला आहे. आम्ही जो काही बरावाईटपणा मिळवला असेल, त्याचे सर्व श्रेय दिवाणसाहेबांकडेच आहे. आम्हास जे अधिकार मिळाले व आमच्या कारकिर्दीत संस्थानचा जो फायदा झाला असेल, त्या सर्वास रावबहाद्दूर सबनीस हेच कारणीभूत आहेत.` शाहू महाराजांनी केलेला हा गौरव सबनीसांची थोरवी कळण्यास पुरेसा ठरावा.
`प्रबोधन`च्या चौथ्या वर्षाच्या आठव्या अंकात प्रबोधनकारांनी `हंटर` या सत्यशोधकी नियतकालिकातील एक उतारा आवर्जून छापला आहे. हा उतारा सर रघुनाथराव सबनीस यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने लिहिण्यात आला होता, त्यात `हंटर`कार लिहितात, `शिवछत्रपतींच्या काळात ब्राम्हणी कारवाईस शेरास सव्वाशेर बाळाजी आवजी भेटले व त्यांनी ब्राम्हणांचा नक्शा जिरविला. याच बाळाजी आवजीचा जन्म अस्पृश्योद्धारक शाहू छत्रपतींच्या मदतीसाठी पुन्हा झाला. हल्लीचे बाळाजी आवजी म्हणजे सर रघुनाथराव सबनीस. हे शाहू राजांची व आजच्या राजाराम प्रभूंची कायावाचामने एकनिष्ठ सेवा करून हक्काने कमावलेल्या विश्रांतीचा उपभोग घेण्यासाठी जात आहेत.`
याच टिपणात रघुनाथरावांनी ३०-३१ वर्षांच्या दिवाणगिरीत शाहू महाराजांशी असलेला ऋणानुबंध मांडला आहे. शाहू महाराज त्यांचा सल्ला घेत आणि त्यांच्याविषयी प्रेमादर व्यक्त करत, असं यात म्हटलंय. ते रोज डायरी लिहित. आहार, व्यायाम यातला त्यांचा वक्तशीरपणा लक्षात ठेवण्यासारखा होता. अशी माहितीही या टिपणात आहे. त्यात पुढे लिहिलंय, `सर रघुनाथराव इतक्या थोर पदावर असतां, घरी कोणीही आला असो, त्याचा योग्य मानमरातब ठेवून त्याचे म्हणणे ऐकून घेत असल्यामुळे हे सर्वांना प्रिय झाले आहेत. असे म्हणतात की आतापर्यंत ते घरच्या नोकरांवर रागावलेले केव्हांच आढळले नाहीत.` यात उल्लेख असलेल्या दिवाणसाहेबांच्या आदरातिथ्याचा अनुभव प्रबोधनकारांनी घेतला.
सकाळची तयारी होऊन चहापान घेऊन होत असतानाच साक्षात शाहू महाराज दिवाणांच्या बंगल्यावर पोचल्याची वर्दी मिळाली. रघुनाथराव आणि प्रबोधनकारांनी त्यांना प्रणाम केला, असं प्रबोधनकारांनी लिहिलं आहे. दरबारी रिवाज म्हणून त्यांनी मुजरा करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी प्रणाम केला. हा प्रणाम हात जोडून केलेला औपचारिक नमस्कार नक्कीच नसेल. प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना पुढे लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी शाहू महाराजांच्या पायांना स्पर्श केल्याचा उल्लेख आहे. तसा प्रणाम प्रबोधनकारांनी केला असल्याची शक्यता आहे.
हा प्रणाम केल्यानंतर महाराज प्रबोधनकारांकडे बारकाईने पाहत राहिले. प्रबोधनकार म्हणतात, ती नजर मोठी सूक्ष्मभेदी होती. हे न्याहाळणं काय होतं, याचा उलगडा प्रबोधनकारांना नंतर झाला. रघुनाथरावांनी त्यांना महाराजांविषयी सांगितलेली गोष्ट महत्त्वाचं होती, `या नजरेच्या परीक्षेला जो उतरला, तो पास झाला. पण मी मात्र त्याच वेळी तुमच्याकडे पहात होतो. या पहिल्याच नजरेने कोण माणूस कसा असावा, काय करू शकेल, वगैरे इत्यंभूत तपशील महाराज हा हा म्हणता आजमावतात. महाराजांचे फिजिऑनमी नि सायकॉलॉजीचे ज्ञान उपजतच असून त्यांनी एका क्षणात काढलेले खटके फारसे चुकत नाहीत. तुमच्याशी ते बोलायला लागल्यावर माझा जीव भांड्यात पडला. नाही तर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे, बराय. ठीक, जावा आता.`
याचाच अर्थ प्रबोधनकार छत्रपती शाहू महाराजांच्या पहिल्याच परीक्षेत पास झाले होते. तरीही शाहू महाराजांनी पुढेही प्रबोधनकारांची परीक्षा बघितली. त्या परीक्षेतही प्रबोधनकार पासच झाले. या दोघांचा ऋणानुबंध शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत घट्ट होता. दिवाण सर रघुनाथराव सबनीस त्याचे साक्षीदार तर होतेच, पण एक महत्त्वाचा दुवाही होते.