देव आणि भक्त यांच्यात विश्वासाचं असं काही घट्ट नातं असतं की सच्च्या भक्तासाठी देव त्राताही असतो आणि ज्याच्याशी बरोबरीने बोलावं असा सखाही असतो. गणेशोत्सवाचे १० दिवस घरोघरी गणरायांचं आगमन होतं, तेव्हा त्यांचं स्वागत एखादा जवळचा पाहुणा आला असावा अशाच पद्धतीने होतो आणि सगळ्या घराला लळा लावणारा पाहुणा परत जाण्यासाठी निघावा तशा जड अंत:करणाने सगळे त्याला निरोपही देतात. त्यामुळेच इथे बाळासाहेबांनी रेखाटलेल्या एका ‘रविवारच्या जत्रे’त भाविक बाप्पांशी छान गप्पा मारताना दिसतात, त्यांना खड्ड्यांपासून सांभाळून चालायला सांगतात, नंतर पकडला गेलेला रामन राघवन मोकाट सुटलेला आहे, मंडपात झोपू नका असं सांगतात, अतिवृष्टीत आगमन झाले असते तर घरच्या घरीच विसर्जन झालं असतं, असंही सहजगत्या सांगून जातात. कर्मकांडी शिस्तीच्या सोवळ्याओवळ्याच्या पलीकडे असणारं देवाबरोबरचं हे अनौपचारिक जिव्हाळ्याचं नातं हाच आपल्या सगळ्या सणांचा प्राण आहे.