□ भाजप नेत्यांना जबाबदार धरत महिलेचा सोलापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
■ यांच्या राज्यात ऑलिंपिक पदकविजेत्या कुस्तीपटू सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य महिलांची काय गत होईल.
□ बुलेट ट्रेन घेणार ६४ हजार २४१ झाडांचा बळी
■ वाळवंटातून धावताना एसी थोडा वाढवावा लागेल, त्यात काय?
□ न्यायाधीशांना नडणे रिजीजू यांना भोवले; कायदामंत्री पदावरून हटवले
■ त्यांना ज्या कामासाठी नेमलं होतं, ते करून झालं की…
□ मिंधे सरकार दोन महिन्यांत जाहिरातींवर ५३ कोटी उधळणार
■ बेकायदा सत्तेत बसलो आहोत, याची लाज वाटते आहे, अशा जाहिराती करणार असतील, तर १०० कोटी खर्च करा जनतेचे, हरकत नाही!
□ हाफ चड्डी घालून दर्शनाला येऊ नका, असे कोणत्या देवाने सांगितले?- अजित पवार यांचा संतप्त सवाल
■ ‘हिंदू गणवेशा’ची सक्ती होणार असेल तर आधी मंदिरातल्या ढेरपोट्या, अर्धनग्न, ओंगळ, घामट पुजार्यांना बाहेर काढायला पाहिजे ना!
□ कर्नाटकचे वारे महाराष्ट्रातही येणार; ते ४० आमदार पडणार- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
■ त्यासाठी कर्नाटकातून वारे येण्याची गरज नाही, शिवसेना नावाचे चक्रीवादळच या चिरकुटांना अंतराळात भिरकवून द्यायला पुरेसं आहे.
□ राज्याची गंगाजळी ९२ हजार कोटींवरून ८६ हजार कोटींवर
■ अजून शिल्लक आहे? मामु, उपमामुंना सांगू नका… तेही कुठेतरी उधळतील.
□ हिमाचलमध्ये सुपडा साफ झालेल्यांचे मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न – काँग्रेसची नड्डांवर टीका
■ बोलावं लागतं तसं, वास्तव माहिती नसेल का त्यांना?
□ कपडे बदलता तसे तुम्ही पक्ष बदलता? – पुण्यात नितेश राणेंना महिला पत्रकाराने सुनावले खडे बोल
■ असे पत्रकार अजून नोकरीत कसे? मालक झोपले आहेत काय?
□ जेलमधील कैद्यांना आता मोबाईल फोनची सुविधा
■ पोलिस कर्मचार्यांच्या कमाईचे एक साधन बंद होणार!
□ भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा महागाईच्या विरोधात आक्रोश
■ नेहरूंचा पुतळा जाळला की नाही मग? तेच जबाबदार असतील ना?
□ कानडी जनतेने गाडले तसे महाराष्ट्रातही भाजपला गाडा- उद्धव ठाकरे यांचा वङ्कानिर्धार
■ निवडणुका लागू द्यात उद्धव साहेब, पळता भुई थोडी होईल यांना!
□ वानखेडेंसह एनसीबी अधिकार्यांचे फोन जप्त
■ भातखळकर गेले नाहीत का सीबीआयच्या दारात आंदोलन करायला?
□ ईडीने भीतीचे वातावरण निर्माण करू नये- सर्वोच्च न्यायालयाने कान उपटले
■ अरेच्चा, हे म्हणजे कोकिळेला तू गाऊ नकोस असं सांगण्यासारखं आहे… तिचं काम काय आहे दुसरं?
□ दोन हजारांची नोट चलनातून बाद
■ आता २० टक्के कमिशनवाल्या दोन नंबरच्या लोकांची चांदी होणार.
□ अदानींना सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट
■ ती क्लीन चिट सेबीला आहे, पण अदानींनाच मिळाल्यासारखा माध्यमांचा नाच सुरू आहे… मालकांचे मालक सुटले ना! म्हणून संयुक्त संसदीय समितीच स्थापन होणं आवश्यक आहे.
□ रामदेवबाबांच्या दंतमंजनात म्हावरा
■ शुद्ध शाकाहारी बाबाभक्त बेशुद्ध झाले असतील!
□ मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यास कंत्राटदारांचा नकार
■ प्रशासनाचे जावई आहेत ते, मुजोरी तर येणारच ना!
□ नगरमध्ये भाजपात गृहकलह; विखेंवर राम शिंदेंची आगपाखड
■ आयारामांच्या बळावर बेटकुळ्या काढणार्या महाशक्तीत दुसरं काय होणार?
□ राज्यातून दररोज ७० मुली बेपत्ता
■ बनवा महाराष्ट्र स्टोरी!
□ निवडणुकांच्या तोंडावरच धर्मांतरावर चित्रपट का? – शत्रुघ्न सिन्हा यांचा सवाल
■ धर्मांधता डोक्यात भिनलेल्यांची मतं मिळवायला!
□ त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी चौकशीचा फार्स
■ धर्माधर्मांत आगी लावण्याचे धंदे, दुसरं काय!
□ बळीराजाला अवकाळी नुकसानीचा छदामही दिला नाही
■ फोटो काढले, पुष्पवृष्टी झाली ना, मग आता मरा!
□ ठाण्यात मिंधे गटाच्या आमदार-नगरसेवकांत ‘कॉन्ट्रॅक्ट वॉर’
■ ते मिंधे झालेत कशासाठी, त्यासाठीच ना!