प्रिय तातूस,
हे जग इतके पुढे गेलेय की काय काय शोध लागतील काही सांगता येत नाही. अरे तातू, बॅटरीवर चालणारा एक छोटा पंखा निघालाय आणि तो क्लिपने अडकवला की डोक्यापासून खालपर्यंत शरीराला वारा मिळतो. घरात आणि ऑफिसात पंखा असतो, मात्र चालताना काहीच सुविधा नसते. आता दिवस बदलले. नाहीतर पूर्वी गावाकडे रस्त्यावर ते वाळ्याचा ओलसर पंखा घेऊन वारा घालणारे लोक चौकात बसलेले असायचे. चार आण्यात थोडा वेळ वारा अंगावर घेतला की किती ताजेतवाने वाटायचे. वाळ्याचा गंध घेत घेत आपण चालत रहायचो. दर उन्हाळ्यात मला या लोकांची आठवण येते. पण काळाबरोबर सारेच बदलले. आणि हे खरे तर पर्यावरणाला किती पूरकदेखील होते. आता तर वाळ्याच्या विणलेल्या छान छान टोप्या पण आल्यात. त्याच्यावर जरासा पाण्याचा स्प्रे फवारा मारायचा की उन्हाचा बिलकुल ताप होत नाही. अर्थात आता या दिवसांत कावळ्यांचा घरटी बांधण्याचा काळ नेमका आलेला असतो. त्यामुळे आपले लक्ष नसेल तेव्हा कावळे चोच मारुन अलगद वाळ्याच्या मुळ्या तंतू घेऊन जातात, असेही काही प्रकार कानावर आलेत. शोध काय फक्त आपल्यालाच लागतात असे नाही. पशुपक्ष्यांना पण शोध लागतात. सगळ्या महापुरुषांनी गरीबांना अन्न द्या, वस्त्र द्या, निवारा द्या असे सांगितलेय, पण कोणीही भर उन्हाळ्यात गरिबांना वारा घाला असे सांगितलेले नाही, याचे मला आश्चर्य वाटते? खरे तर आपण लोकलमध्ये बसलेलो आहोत आणि वाळ्याच्या पंख्याचे सगळे एकमेकांना वारा घालताहेत, हे दृष्य कधी बघायला मिळेल असे आपले वाटत रहाते.
सगळीकडे इतके एसी आणि विजेवर चालणार्या गाड्या आल्या की हळूहळू विजेची फारच टंचाई जाणवणार आहे, असे नाना म्हणत होता. त्याचा परिणाम म्हणजे काही दिवसांनी रस्त्यात चार्जिंगसाठी खोळंबलेली वाहने लांबचलांब रांगेत उभी असलेली दिसतील आणि एकमेक `जरा मागून ढकला’ अशा नजरेने पहात असतील असे वाटते. आता यात अतिशयोक्तीही वाटेल म्हणा. असो. अरे तातू, काही लोकांची अतिशयोक्तीदेखील अतिशय संकुचित असते. त्यातसुद्धा कंजूषगिरी करतात.
या नवनवीन शोधांचा विषय निघाला त्यावरून आठवले, अरे, डार्विनचा धडा आता अभ्यासक्रमातून वगळणार आहेत असे कानावर आलेय! उत्क्रांतीवादाचा त्याने येवढा मोठा शोध लावला. पण बघता बघता दीडदोनशे वर्षात त्याचे नाव पण शाळेत कुणाच्या कानावर पडणार नाही, याचे फारच वाईट वाटले. अरे तातू, आपल्या पुराणात मत्स्य, कूर्म, वराह असे एकेक अवतार सांगत पुढे पूर्ण पुरुषाचे अवतार सांगितलेत, तो सुद्धा उत्क्रांतीवादाचाच प्रकार असे तात्या सांगतात. ते विलक्षण सनातनी आणि अभिमानी आहेत. त्यामुळे सर्व काही आपल्याकडे आधीच होऊन गेलेय, असे त्यांना वाटते.
आता डार्विन बोटीवरून जग फिरून आला आणि सगळी जीवसृष्टी अभ्यासून त्याने माणसाचा आणि माकडाचा सबंध लावला. यात त्याचे कष्टही आहेत. त्याबद्दल त्याचे मोठेपण कुणीही मान्यच करेल. पण मला सांग, आपण पूर्वी माकड होतो आणि या सोसायटीवरून त्या सोसायटीच्या टाकीवर उड्या मारतो आहोत आणि गच्चीत वाळत घातलेल्या वाळवणावर ताव मारत फांदीवर बसलोय आणि आपल्या शेपट्या खाली लोंबतायत हे चित्र तुला कसे वाटेल? म्हणजे रेडिमेड गार्मेंट फॅशन डिझायनर या सगळ्यांची छुट्टीच झाली असती. हल्ली वेषभूषाशास्त्रात पदवी पण घेता येते. त्यामध्ये म्हणे ‘ज्या कपड्यात व्यक्ती कमीतकमी बावळट दिसेल तो वेष परिधान करावा’ इथून सुरूवात होते.
खरे तर उत्क्रांतीवादाची सुरुवात सर्वच क्षेत्रात आढळते. अरे ऑफिसमध्ये प्यून म्हणून लागलेला माणूस रात्रशाळेत जाऊन एसएससी होत होत पुढे कॉलेज करून क्लार्कची परीक्षा देतो आणि आठदहा वर्षांनी ऑफीसर होतो. हे तर आपल्या डोळ्यासमोर घडलेय.
अरे राजकीय पक्षात सतरंज्या उचलणारा बघता बघता नगरसेवकाचे तिकिट घेत कधी आमदार होतो हे कळत पण नाही, हा सुद्धा उत्क्रांतीवादच आहे असं नानाचा मुलगा म्हणतो. त्याच्या डोक्यात सारखं विज्ञान असतं. लंडनला `नॅचरल हिस्टरी’ नावाचे भव्य म्युझियम आहे. तिथे मध्यभागी डार्विनचा बैठा असा भव्य पुतळा आहे. त्याच्या बाजूला उभं राहून काढलेला फोटो त्याने घरात लावलाय. आपण देवादिकांचे फोटो लावतो तसा मोठा फोटो आहे. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्याला काय आनंद… बातमी कळली तेव्हा त्याने लगेच देवासमोर खडीसाखर ठेवली (आमच्या हिने पण परवा माझा डायबेटिसचा रिपोर्ट नॉर्मल आला तर देवासमोर साखर ठेवली).
तात्यांच्या मते तेव्हा नाशिकसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी जयंतराव अध्यक्ष झाले, हा विज्ञान आणि धर्म यांचा समन्वय झाला. तिथल्या एका प्रसिद्ध ज्योतिषांनी तर नारळीकर अध्यक्ष झाल्याने विज्ञानाचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले.
अरे मला स्वत:ला मात्र डार्विनला असे बाजूला सारलेले बघून फार यातना झाल्या. हे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत. अरे तातू, उद्या बे चा पाढा अभ्यासक्रमातून वगळतील. आता काही लोकांचे म्हणणे सगळे वारे उलट्या दिशेने वहातायत. त्यामुळे असाही सिद्धांत मांडला जाईल कदाचित की माणसापासून माकडाची निर्मिती झाली, आता अवतीभवती चाललेल्या माकडचेष्टा बघितल्या की त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल? इकडून तिकडे उड्या मारण्याचा प्रकार बघितला आणि दिसेल त्या गोष्टीवर भरदिवसा डोळ्यांदेखत ताव मारायचा, हे सर्व बघितले की माणसापासूनच माकड उत्क्रांत होत गेले की काय यात शंका नाही असे वाटते.
शोध लावायचा तर काही मोठी प्रयोगशाळा हवीय असे नाही. अरे तातू, साधं आपला घरातला नळ दुरुस्त करायचा झाला तर आपण जंगजंग पछाडून प्लंबर शोधतो. खरे तर हादेखील शोधच असतो. शोध म्हणजे काही कोलंबसाने लावला तसा अमेरिकेचा शोध लावायला पाहिजे असे अजिबात नाही. उलट नाना म्हणतो, अमेरिकेचा शोध लागला नसता तर आज जग खूप शांततेने चालले असते. कोलंबस नसता तर हिरोशिमा नागासाकी तरी कशाला घडले असते, असे नाना म्हणतो. नानाचे विचार एकदम टोकाचे असतात. आता अमेरिकेचा शोध कोलंबसाने नाही तर आणखी कुणी तरी लावलाच असता ना? पण मी हल्ली कुणाशी वाद घालत बसत नाही.
मला एक माहित आहे, माझ्या दृष्टीने बाळासाहेबांनी जो शोध लावला तो सर्वात महत्त्वाचा. `मुंबईतल्या माणसाला आपण मराठी आहोत हे कित्येक वर्षे माहितच नव्हते वा लक्षातच आले नव्हते? या राज्यात आपण `मराठी’ आहोत हा शोध बाळासाहेबांनी लावला! असे आपले मला वाटते. बाकी डार्विनचा शोध कालपर्यंत अभ्यासक्रमात होता आणि आज नाही, पण आपण मराठी आहोत हा शोध मात्र लक्षात रहाणार! असो.
तुझाच
अनंत अपराधी