`प्रबोधन`च्या पाचव्या ते दहाव्या अंकापर्यंत प्रबोधनकारांनी `मानसिक दास्याविरुद्ध बण्ड` या अग्रलेखाचे पाच भाग लिहिले. हे लेख प्रबोधनकारांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे ठरले.
– – –
आज शंभर वर्षांनी मागे वळून वाचताना आढळतं की प्रबोधनकारांनी `प्रबोधन` पाक्षिकात लिहिलेले बहुतांश लेख आजही महत्त्वाचे आहेत. त्यातला विचार आजही ताजा आहे. जगणं आणि लिहिणं हे एकरूप असलं तरच अशी चिरंतन टिकणारी मांडणी उभी राहू शकते. `प्रबोधन`च्या अनेक अग्रलेखांतून हे पुन्हा पुन्हा जाणवतं. त्यांच्या अग्रलेखांमधली `मानसिक दास्याविरुद्ध बण्ड` ही पाच अग्रलेखांची मालिका यात लक्षवेधी ठरते. विचारांच्या आणि लेखनशैलीच्या दृष्टीने तर ती महत्त्वाची आहेच, पण प्रबोधनकारांच्या आयुष्यात या लेखमालेने टर्निंग पॉइंट आणला. लेखकाला आपल्या लेखनाविषयीची बांधिलकी आपल्या कृतीनेच सिद्ध करावी लागते. प्रबोधनकार या परीक्षेत पास झालेले दिसतात. म्हणून या लेखमालेत प्रबोधनकारांनी नेमके कोणते विचार मांडले आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. १६ डिसेंबर १९२१, १ जानेवारी, १६ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि १ मार्च १९२२च्या `प्रबोधन`चे अग्रलेख म्हणून त्यांनी लिहिलेल्या पाच लेखांचं सार पुढे त्यांच्याच शब्दात मांडलं आहे–
मनुष्य प्राणी हा जात्याच मोठा बण्डखोर आहे. किंबहुना परमेश्वराचे प्रतिनिधित्व मिरवणारी आम्हा मानवाची आत्मज्योत हीच वास्तविक बण्डखोर प्रवृत्तीची आदिमाया असल्यामुळे, मनुष्याच्या बण्डखोरपणाची जबाबदारी थेट परमेश्वराकडेच जाते. वेदान्ताच्या भाषेत बोलायचे तर प्राणी गर्भाशयाच्या कोठडीत मुकाट्याने सोहम सोहम असे म्हणत असतो. सतत नऊ महिने सोहमची (तोच मी आहे) अखंड प्रतिज्ञा केल्यामुळे परमेश्वर जेलर त्यावर खूष होऊन त्याची तुरुंगातून मुक्तता करतो. तुरुंगाच्या बाहेर एकच पाऊल पडते न पडते तोच बेटा कोहम कोहम (कोण मी आणि कोण तू?) असा एकच कोलाहल करून गुरूच्या तंगड्या गुरूच्या गळ्यात घालतो आणि परमेश्वराच्या हातावर हात मारून सांगतो की तू जर एकपट बण्डखोर असशील तर तुझा हा पट्टशिष्य दसपट बण्डखोर आहे, हे खूप ध्यानांत ठेव. मनुष्याची ही प्रवृत्ती सृष्टीचे स्पृहणीय लेणे आहे.
आत्मबंधन किंवा आत्ममोक्ष ही स्थिती आपल्या मनाच्या आधीन आहे. मनोवृत्ती जशी उंच अंतराळात उड्डाण करू शकते, तशी ती नीचतम गर्तेत अवनतही होऊ शकते. अविच्छिन्न स्वातंत्र्य किंवा गाळीव गुलामगिरी या दोनही स्थिती मनाच्या वरचढ अथवा निर्बळ कार्यक्षमतेवर अवलंबून असतात. निष्क्रियता हे मेल्या मनाचे चिन्ह असते. मनच मेले की मानव तरी कोठे उरतो? म्हणून मनाची चिच्छक्ति, मनाची विचारणा शक्ती, मानवाची विवेकबुद्धी क्षत्रियाच्या समशेरीप्रमाणे सदैव पाजळत ठेवली पाहिजे. मनुष्याची चिकित्सक बुद्धी जावत्काळ कार्यक्षम आहे, तात्काळ त्याला कोणच्याही प्रकारच्या गुलामगिरीच्या साथीचा ताप बाधा करणार नाही.
शारीरिक गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी फारच भयंकर, मानसिक गुलामगिरी म्हणजे मनाचे मरण आणि मनाचा मृत्यू म्हणजे माणुसकीचा संपूर्ण अध:पात होय. मानसिक गुलामगिरीची प्राणघातक बीजे धर्माच्या क्षेत्रांत फार लवकर रुजतात आणि या कामी राजकारणी चाणक्यांना भिक्षुकशाहीच्या मदतीची अपेक्षा फार असते. याचे कारण भिक्षुकशाहीचे पंचप्राण जनतेच्या मानसिक दास्यावरच जिवंत रहात असते. हिंदुस्थानावर आजपर्यंत अनेक परचक्रे आली, राज्यक्रांत्या झाल्या व राष्ट्रीय जीवनाच्या मूलभूत तत्त्वांवर प्राणघातक आघातही झाले. परंतु भिक्षुकशाहीच्या सोवळ्या धार्मिक गुंडगिरीने हिंदू राष्ट्राचा जेवढा अधःपात झाला आहे, तेवढा इतर कशानेही झालेला नाही. याचे कारण परचक्रांनी बाह्य स्थितीचे कितीही ढलपे सोलवटून काढले असले, तही राष्ट्राच्या मनोवृत्तीची मुंडी पिरगळायचे राष्ट्रद्रोही कर्म भिक्षुकशाहीनेच केलेले आहे. राष्ट्राची विचारणा शक्ती भिक्षुकशाहीच्या स्वार्थी चक्रांत पिळवटून आता तिचे प्राणोत्क्रमण होणार, असे दिसतांच वेळोवेळी नवमतवादानेच पुढे सरसावून तिचे संरक्षण केले आहे.
हिंदू धर्माच्या इतिहासात राष्ट्रीय विवेकाच्या प्राणरक्षणासाठी खर्या अर्थाने लोकशाहीचा प्रभाव जर कोणी दाखविला असेल आणि धार्मिक क्षेत्रातल्या उदारतम भावनेने सामाजिक व राजकीय जीवनात पूर्ण स्वातंत्र्य, योग्य तो लवचिकपणा आणि वैयक्तिक बुद्धिविकासाला वाव दिला असेल, तर तो फक्त गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्मानेच होय. बौद्ध धर्माने भिक्षुकी धर्माची कणखर हाडकी चेचून काढून हिंदू धर्माला काही शतके खर्या लोकशाहीचे वैभव दाखविले. धार्मिक प्रदेशात सर्व मानव बंधू एकाच दर्जाचे ठरविल्यामुळे, भिक्षुकशाहीने आपल्या आत्मवर्चस्वाच्या स्तोमासाठी सामाजिक प्रदेशांत उभारलेले जातिभेदाचे टोलेजंग तट आपोआप जमीनदोस्त झाले आणि त्या तटांच्या दगडमातीच्या ढिगार्याखाली ब्राह्मणांची भिक्षुकी इभ्रत जिवंत गाडली गेली.
बहुजन समाज व विशेषतः क्षत्रिय वर्ग जेव्हा कां? म्हणून पृच्छा करण्यास उद्युक्त झाला, तेव्हाच हिंदू धर्माच्या पूर्व दिग्भागी नवविचाराचा संदेश देणारी नवयुगाची रम्य उषा हंसत हंसत आली व थोड्याच अवधींत तिच्या पाठोपाठ क्षत्रिय शाक्य कुलांतला तेजोराशी आर्यभानू गौतम बुद्ध सार्या जगतितलावर आपल्या डिमॉक्रॅटिक धर्माचा दिव्य प्रकाश पाहू लागला. हा सर्व ‘का?’ मंत्राचा प्रताप. का? हा मानसिक दास्याच्या चिंधड्या चिंधड्या उडविणारा दिव्य ईश्वरी मंत्र आहे. मनुष्यांत जर ‘का’ नसेल तर त्याला मनुष्य म्हणताच येणार नाही. एरवी बुहुतेक सर्व माणसे वा वा (वाहवा) करण्यात गुंगणारी अंधश्रद्धाळू माणसे असतात, म्हणजे त्यांना ‘का’चा चिकित्सकपणा परिचित झालेला नसतो, ती वानरे असतात. मनुष्य जेव्हा वा-नराचा का-नर होतोस तेव्हाच त्याला स्वातंत्र्याची खरी जाणीव होऊन मानसिक गुलामगिरीच्या ओंगळपणाचा त्याला तिटकारा येऊ लागतो. वा वा! ही गुलामगिरीची मेंढरी निशाणी व ‘का?’ हा खर्या माणुसकीचा ट्रेडमार्क आहे.
क्रिस्ती, इस्लाम व हिंदू हे तीन प्रचलित प्रमुख धर्मच जरी विचारार्थ घेतले तरी एक विशेष गोष्ट त्या सर्वांत ठळक दिसून येते, ती हीच की त्यांच्या क्षेत्रांत मानसिक दास्याची निरनिराळी जाळी पसरविण्याचे निंद्य कार्य भिक्षुकशाहीच करीत असते. पापपुण्याच्या काल्पनिक व मनुष्यकृत निर्बंधाची जरब दाखवून मनुष्यमात्राच्या ईश्वरदस्त स्वतंत्र बुद्धिमत्तेची मुस्कटदाबी करण्याचे घाणेरडे कर्म धर्माच्या क्षेत्रात भिक्षुकशाहीने आजवर जेवढे केले आहे, तेवढा रक्तपात व अत्याचार शेकडो नादिरशहांच्या हातून प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात सुद्धा घडलेला नाही. आम्ही तुम्हाला स्पष्टपणे विचारतो की ज्या वेळी इस्लामी गिधाडे हिंदुस्थानाच्या छाताडावर बसून हिंदूधर्माची आतडी काचकच तोडीत होती, त्यावेळी तुमच्या गादीवरचे परात्पर गुरू कोणत्या दिग्विजयांत गुंतले होते. भिक्षुकी आत्मप्रौढीच्या लंब्याचौड्या वल्गना करणार्या व्यंकटप्पा शंकाराचार्याचा कान धरून विचारले पाहिजे, की लेका तुझे परात्पर खापरपणजे, गुजराथेतील सिद्धपूरच्या एक लाख हिंदूंची जानवी तघलखाने अवघ्या सहा तासांत जाळून त्यांना मुसलमान केले, त्यावेळी कोठे जाऊन दडले होते. या मागील गोष्टी सोडून दिल्या, तरी गेल्या ५०-७५ वर्षांत सर्व हिंदुस्थानभर बोकाळलेल्या क्रिस्ती टोपल्यांच्या साळसूद बण्डाविरुद्ध या जगद्गुरू म्हणविण्यास न शरमणार्या प्राण्यांनी कधी एक ब्र तरी काढला आहे काय?
प्रामाण्य मग ते कसलेही व कोणतेही असो, तेच दास्य. व्यक्तिप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, लोकाचारप्रामाण्य, कल्पनाप्रामाण्य, पदवीप्रामाण्य, इत्यादि प्रामाण्यांच्या सेना मानसिक दास्यप्रवर्तकच होत. इतकेच नव्हे तर प्रामाण्य हा शब्दच मुळी दास्य गुलामगिरी या अर्थानेच अस्तित्वांत आणलेला आहे. आद्य शंकराचार्य ही लोकोत्तर विभूती होऊन गेली. म्हणून त्यांच्या गादीवर बसलेला व बसणारा प्रत्येक सांप्रदायिक गुलालपेटाही लोकोत्तर मानण्याची जबरी म्हणजे व्यक्तिप्रामाण्य किंवा पुरुषप्रामाण्य. या प्रामाण्याइतकी घाणेरडी गुलामगिरी हीच. व्यक्तिप्रामाण्याच्या खालोखाल किंबहुना बरोबरीने ग्रंथप्रामाण्य हे माणसांना जिवंतपणी मृतावस्थेचा प्रत्यक्ष अनुभव दाखविणारे दुसरे दास्यप्रचारक जरूर आहे. आणि या जहराची तिडीक हिंदूजनांच्या अगदी जिवाग्री जाऊन भिनलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे कलियुगांत क्षत्रिय वैश्यांचे उडालेले तळपट हे घ्या. कलियुगात क्षत्रिय वैश्य उरले नाहीत, असा भिक्षुकशाही लेखणीचा एकच फटकारा धर्मग्रंथांत उमटतांच अस्सल क्षत्रियांच्या पाणीदार तलवारी बोथट पडून वैश्य जनांच्या तागड्यांच्या तंगड्या आपोआप त्यांच्या गळ्यात पडाव्या, हा भिक्षुकशाही दास्यप्रवर्तकांचा केवढा बिनतोड विजय झाला बरे!
सांप्रत हिंदू जनता नानाविध प्रामाण्यांच्या गुलामगिरीत गिरफ्तार झालेली आहे. ही गुलामगिरी दृश्य नसल्यामुळे तिच्या समाजविध्वंसक परिणामाकडे जनतेचे लक्ष वेधणे प्रत्येक समाजहितवाद्याचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य कटुतम आहे, कठोरहृदयी आहे, कर्त्याला लोकमान्यतेच्या चढत्या उतरत्या घसरंडीत लोळविणारे आहे. पण ते अत्यावश्यक असल्यामुळे कोणीतरी केलेच पाहिजे. मानसिक दास्याविरुद्ध बण्ड आता केलेच पाहिजे. नानाविध प्रामाण्यांच्या पावित्र्याचे ढोंगी मुखवटे फाडले पाहिजेत आणि शुद्ध विवेकशक्तीच्या जोरावर जनैक्य व जनहितवर्धक समाजधर्माची पुनर्घटना केली पाहिजे.
पुनर्घटनेची भूक सपाटून लागली आहे, परंतु संघटनेकडे व शिस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे दुष्काळांतल्या माणसाला एकदम पंचपक्वान्नांचे ताट हाती लागताच अधाशीपणाने खा खा करून जसा प्राणासच मुकण्याचा प्रसंग येतो, तोच प्रकार येथेही होण्याचा बराच संभव आहे. याचा दाखला म्हणून मराठे बांधवांनी निर्माण केलेली क्षात्र जगद्गुरूची गादी हा होय. ब्राह्मण जगद्गुरूचे दास्य नको म्हणून क्षात्रजगद्गुरूचे पीठ निर्माण करणे, म्हणजे जुन्या गुलामगिरीच्या त्रासांतून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखेच आहे. समाजोन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांच्या एक मठच पाहिजे, त्यावर कोणीतरी एक मठपतीच पाहिजे, ही कल्पनाच मुळी मानसिक दास्याची स्पष्टस्पष्ट निशाणी आहे. गुलामगिरीचा नायनाट गुलामगिरीने होत नसतो. पंजाब मेलला एकच राक्षसी इंजिन लावा किंवा दहा लावा. त्यांचा वेग ताशीं ६० मैलांचा असो नाही तर ६००० मैलांचा असो, त्यांच्या नशिबाचे रूळांचे दास्य काही टळत नाही आणि अखेर ती जशी ठराविक रस्त्यांनी ठराविक वळसे घेत ठराविक मुक्कामालाच जाऊन आदळते, तोच प्रकार मठाच्या व सांप्रदायिक उठाठेवींत असतो.
सारांश, मानवी मनाच्या स्वतंत्र विचारसरणीला जे स्वतंत्र वातावरण लागत असते, ते मठाची व मठाधिपतींची स्थापना होऊन त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सांप्रदायांच्या कडेकोट निर्बंधांच्या कुंपणांत लाभणे केव्हाहि शक्य नसते. व्यक्तिप्रामाण्याचे स्तोम माजवून लिलावांच्या दराने आपली मनें विकणार्या स्वयंमन्य गुलामांना स्वातंत्र्यदेवीने वरल्याचे स्वयंवर जगाच्या इतिहासात घडल्याचा दाखला नाही.
(मूळ लेख `प्रबोधनमधील प्रबोधनकार` या तीन खंडांमधील प्रबोधनकारांच्या लेखसंग्रहात वाचता येतील.)