बांधकाम व्यावसायिक किंवा सिविल इंजिनियर हा शब्द १९७० सालानंतर हळूहळू गायब व्हायला लागला. १९८० नंतर हे दोन्ही शब्द कानावर पडेनासे झाले. एक नवीनच शब्द ज्याच्या त्याच्या जिभेवर रुळायला लागलेला होता… ‘बिल्डर’. हा शब्द आणि त्या मागोमाग येणार्या असंख्य छटा या गेल्या पन्नास वर्षांत धुमाकूळ घालत आहे. बिल्डर काय करतो म्हणण्यापेक्षा बिल्डर काय करत नाही याचीच चर्चा जास्त असते. एखादा सिनेमा गाजवायचा असला तर त्यात बिल्डरचे कॅरेक्टर असलेच पाहिजे. सत्तरच्या दशकातले अमिताभ बच्चनचे कोणतेही कॅरेक्टर बघा, बिल्डरविरुद्ध लढा देणारा अँग्री यंग मॅन ही प्रतिमा बिल्डरच नसता तर अमिताभला किंवा हे सिनेमे दिग्दर्शन करणार्यांना शक्य झाली असती काय? दशकागणिक बिल्डर या शब्दाचे स्वरूप बदलत गेले. सुरुवातीला बिल्डर म्हणजे ज्याला बांधकामातले कळते तो माणूस अशी सोपी साधी व्याख्या होती. ती हळूहळू बदलत सध्याच्या काळात ‘सर्वव्यापी परमेश्वरासारखा बिल्डर सर्व शहरांवर ताबा मिळवून असतो’, इथपर्यंत पोहोचली आहे. मोठी चाळ असो, जुन्या सोसायटीचा पुनर्विकास असो, किंवा धारावीसारख्या वस्तीचा विकास करायचा असो- पहिले नाव पेपरात झळकते ते बिल्डरचे. यामागचे न छापले गेलेले नाव अनेकांना पाठ असते ते राजकारण्यांचे व मंत्र्यांचे. बिल्डर नसता तर खंडणीबहाद्दर, एन्काऊंटर स्पेशालिस्ट, सुपारीबहाद्दर या सार्यांचा जन्म तरी झाला असता का? सहज आठवा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ सिनेमा.
करियर कथा सांगताना हे बिल्डर पुराण काय लावले आहे, असे अनेक वाचकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण आज चांगले नाव मिळवलेल्या तीन बिल्डरांची एकत्रित करिअर कथा वाचणार आहात. खरे तर त्या तिघांनाही बिल्डर शब्द आवडत नाही पण त्यांना तो चिकटलेला आहे. तिघांचाही प्रवास मी खूप जवळून पाहिलाय. मुख्य म्हणजे गेल्या पन्नास वर्षातील संपूर्ण प्रवास पाहिलेला पहिला बिल्डर आज वयाची ७५ वर्षे पार केलेला आहे. दुसर्याने साठीत पदार्पण केलेले आहे, तर तिसरा जेमतेम पंचेचाळीशीत शिरला आहे. तिघांच्याही कथा आपण वेगवेगळ्या वाचणार आहोत. शिकणार्या, याच कामात पडू इच्छिणार्या किंवा मध्यमवर्गीय प्रत्येकाला यातून काहीना काहीतरी मिळणार आहे हे मात्र नक्की. वृत्तपत्रातील एखाद्या बातमीत जसे छापतात की मूळ नावे बदलली आहेत, तसेच इथेही समजावे. म्हणून नावेच नाहीयेत. पहिला, दुसरा, तिसरा हीच नावे.
गोष्ट पहिल्या बिल्डरची
एकोणिसाव्या शतकात शहरातील अनेक संस्थांची खूप मोठ्या स्वरूपाची बांधकामे व पुलांची बांधकामे यांच्या आजोबांनी केली होती. मुलगा या व्यवसायात न आल्यामुळे त्यांनी व्यवसाय गुंडाळला. पण नातवाच्या मनामध्ये पक्के बसले होते की आपण आजोबांचा व्यवसाय पुढे करणार. विविध संस्थांच्या संदर्भात आजोबांचे कौतुकाने घेतले जाणारे नाव, इतिहासकालीन पुस्तके, नोंदी वाचताना त्याच्या मनावर ठळकपणे ठसत होते. मुख्य म्हणजे व्यवसाय करायचा आहे, धंदा करायचा नाही हे मनावर कोरले जात होते. लवकरात लवकर या उद्योगात कसे पडता येईल याचाही विचार सतत मनात घोळत होता. सगळी माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की लौकर याची सुरुवात करण्याचा रस्ता डिप्लोमातून जातो. कारण अनेकांच्याकडे पदव्या असतात, पण अनुभव शून्य असतो. प्रथम आपण डिप्लोमा पूर्ण करू. सिविल इंजिनिअरिंगचा करू. उत्तम संस्थेतून करू हे त्यांनी पक्के ठरवले, तेही शाळेत असतानाच. त्या काळातील अकरावी पूर्ण झाल्या झाल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेऊन सिविल डिप्लोमा उत्तम मार्काने त्यांनी पूर्ण केला.तेव्हा खूप मोठे बांधकाम व्यावसायिक असलेल्या एका गृहस्थांनी जवळपास ५०० फ्लॅट्स बांधण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली होती. फ्लॅटमध्ये राहायचे हे त्यावेळेला फारसे कोणाला मंजूर नव्हते. छोटे छोटे बंगले, खाली मालक वर भाडेकरू, नाहीतर चाळवजा मोठ्या इमारती असा मुंबई सोडता सार्या महाराष्ट्राचा माहोल होता. डिप्लोमा हाती आल्यानंतर थेट या बांधकाम व्यवसायिकाकडे जाऊन मला तुमच्याकडे काम द्या, मला शिकायची इच्छा आहे असे सांगण्याचे धाडस त्यांनी केले. गंमतीची गोष्ट म्हणजे, त्यांच्या आजोबांनी केलेली कामे व आजोबांचे नाव त्या बांधकाम व्यावसायिकांना माहिती होत्या. त्यांनी एकच अट घातली हा संपूर्ण प्रकल्प संपेपर्यंत तू इथेच नक्की राहशील ना? दिलेले उत्तर ऐकून बांधकाम व्यवसायिकांना सुद्धा पटकन हसू आले. शंभर टक्के राहीन, पण मला तुमच्याकडे कायमची नोकरी करायची इच्छा नाही. मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. त्यासाठीचा अनुभव तुमच्याकडे घेण्याची इच्छा आहे. जेमतेम विशीतल्या त्या तरुणाचे हे उत्तर ऐकून त्यांना स्वाभाविकपणे हसू आले होते. तो प्रकल्प यशस्वी झाला. आजही तो एक लँडमार्क म्हणून शहरात उभा आहे.
प्रकल्पातील ५० टक्के फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर एके दिवशी हा तरुण हातात राजीनामा घेऊन त्या बांधकाम व्यवसायिकाकडे गेला. आता चकित होण्याची वेळ त्यांची होती. पण त्यांनी तो आनंदाने स्वीकारला. आश्वासन सुद्धा दिले. कधी काही लागले तर जरूर माझ्याकडे ये. पुन्हा माझ्याकडे रुजू व्हायचे असेल तरी तुला दारे उघडी आहेत. दोन्हीची वेळ कधी आलीच नाही आजपर्यंत.
शहरात त्या काळात जुने बंगले पाडून नवीन इमारती उभ्या करण्याची सुरुवात झालेली होती. स्वाभाविकपणे प्लॉट विकत न घेता बांधकामाच्या संदर्भात नोंदणी करत पैसे जमा केले जात. तयार केलेले फ्लॅट्स जसजसे विकले जातील तसे येणार्या भांडवलातून नवीन इमारती उभारण्याची पद्धत सुरू होत होती. त्याचा खूप मोठा फायदा या पहिल्या बिल्डरला झाला. यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे आजही सत्तरच्या दशकात बांधलेल्या इमारतीतील फ्लॅटचे मालक यांना कौतुकाने घरी चहाला बोलवतात. मैत्रीपूर्ण संबंध ठेवत एकेक इमारती दोन तीन वर्षांत पूर्ण करत व्यवसायात त्यांनी उत्तम बस्तान बसवले. एखादा बँकर जसे कर्ज देताना जोखीम किती हे पाहतो त्याच पद्धतीत फ्लॅट विकत घ्यायला येणार्या प्रत्येकाला फ्लॅट कशा पद्धतीत परवडेल याचाही सल्ला देण्याची पद्धत त्यांनी पहिल्यापासून ठेवली. त्यातून यांच्यामुळे माझे स्वतःचे घर झाले ही भावना कायम रुजत गेली. काही ग्राहकांशी यांचे जुळले नाही तरीही ते ग्राहक आजही यांना दिलेल्या योग्य सल्ल्याबद्दल दुवा देतात. हे विशेष नाही काय? मूल्य विचार, नैतिकता व सचोटी यांचा त्रिवेणी संगम प्रत्येक व्यवहारात कसा राहील हे पाहणारा हा बिल्डर. आजही शहरांतील बाकीच्या अनेक बिल्डरांचा तो आदर्श ठरतोय हे विशेषच.
दुसर्या बिल्डरची गोष्ट
एका खोलीत सातजण राहणारे बालपण… सामान्य व्यवसायातील वडील… यातून सातत्याने साठ टक्के मार्क टिकवण्यात यश मिळवून त्यांनी कॉमर्सची पदवी मिळवली. नात्यागोत्यात, आसपासच्या सर्व लोकांत व्यवसायाचे गणित रुजलेले. राजस्थानातून आलेली ही माणसे. मराठी शाळेत शिक्षण, शुद्ध मराठीमध्ये संतवचनांपासून आधुनिक मराठी ललित वाचनापर्यंतचे वेड पक्के मनात रुजलेले होते. मग एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला सुरुवात केली. पदवीनंतर लगेच त्या कंपनीत जेवढ्या स्वरूपाची कामे होती त्यातील एकेकाचा शिकून फडशा पाडण्याची सुरुवात केली. दोन-तीन वर्षांत तिथे शिकण्याजोगे काही राहिले नाही. पगारवाढीवरही मर्यादा होती. पण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगला समजलेला होता.
जवळच्याच नात्यांमध्ये काहीजण बांधकाम व्यवसायात स्थिरावून त्यांचे बिल्डर म्हणून नावही झालेले होते. बिल्डरने मोठमोठे फ्लॅट बांधून देण्याचे व मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेण्याची सुरूवात होऊन एक दशक लोटले होते. या समाजात एकमेकांचे बोट धरून सगळ्यांनी प्रगती करण्याची पद्धत फार जुनी, शतकानुशतके चालत आलेली. स्वाभाविकपणे त्यातील दोघांनी यांना आमच्याबरोबर काम करायला ये असे बोलावणेच पाठवले. पण त्याचबरोबर एक गंमतीची अट घातली, पगार देणार नाही, काम कर आणि कमव. वर्षभराने आमच्यात भागीदार म्हणून सामील हो.
दरमहा घरी येणारे पैसे बंद होणार हे घरच्यांना कसे सांगायचे एवढाच प्रश्न होता. पण नातेसंबंध असल्यामुळे तेही घरच्यांनी मान्य केले व काहीही संबंध नसलेल्या या क्षेत्रात पुन्हा उमेदवारी सुरू झाली. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात दोन वर्षे काढलेली असल्यामुळे गावोगावचे व्यवहार, अनोळखी माणसे, त्यांच्याबरोबरचे व्यवहाराचे बोलणे कसे करायचे याची छान जाण झाली होती. त्यामुळे कोणत्याही नवीन व्यवहारातील चर्चेत यांना सहभागी करून घ्यायला या बिल्डरांनी सुरुवात केली. पाहता पाहता याही धंद्यातील सार्या खाचाखोचा दोन वर्षांत यांनी ओळखल्या, आत्मसात केल्या. विविध राजकारणी, नगरपालिकेतील अडसर व मंत्रालयातील बाबू यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यात यांचा मोठाच वाटा होता. बांधकामाचा तांत्रिक भाग सोडून जमिनीचा ताबा मिळेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये हे दुसरे बिल्डर इतके तरबेज झाले की नवीन कोणतेही प्रोजेक्ट सुरू करायची जबाबदारी आता त्यांच्यावर सोपवली जाऊ लागली. अशा पद्धतीत पंचवीस वर्षे काम केल्यावर एके दिवशी त्यांनी सर्व भागीदारांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर पूर्णवेळ कामात न राहता थोडेसे काम करत समाजकारणात जाण्याची इच्छा आहे, त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेत आहे. मला मोकळे करावे.
शहरातील एका नामवंत बिल्डर फर्ममधील एक भागीदार बाहेर पडत आहे ही तशी त्या काळातील मोठीच बातमी होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षे त्यांनी बांधकाम व्यवसायाशी संबंधित काहीच केले नाही. एका नामवंत शिक्षण संस्थेच्या कामाकरता त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्याचवेळी मूळ साहित्याकडे असलेला ओढा लक्षात घेऊन त्याच्याशी संबंधित कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी सहभाग सुरू केला. काही खेळांना प्रायोजित केले. संयोजक व पदाधिकारी या नात्याने त्यातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला.
शहरातील समाजकारणामध्ये पुरेसा ठसा उमटवल्यानंतर त्यांनी एक मोठी खेळी खेळायचे ठरवले. मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या साहित्य संमेलनाचे प्रयोजकत्व त्यांनी घेतले व महाराष्ट्रापासून दूरवरच्या गावी ते अत्यंत यशस्वी करून दाखवले. एखादा बिल्डर मनात आले तर समाजकारणावर स्वतःचा ठसा कसा उमटवू शकतो याचेही आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले. आता वयाच्या साठीमध्ये वर्षाकाठी शंभर दीडशे फ्लॅट्स बांधून ग्राहकांच्या हाती सोपवण्याचा जुना उद्योग करण्यात ते रमले आहेत.
तिसर्याची अनोखी गोष्ट
आधी सांगितल्याप्रमाणे हा तिसरा बिल्डर जेमतेम पंचेचाळीशीत आहे. सध्या बिल्डर बनण्यासाठीचे भांडवल लागते शंभरएक कोटीचे. तो काॅमर्स ग्रॅज्युएट झाला तेव्हापासून त्याला पक्के माहिती होते की दोन-चार कोटीमध्ये आता काहीच होत नाही व आपल्या घराची उडी एक कोटीच्या पलीकडे कधीच जाणार नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा तिसरा बिल्डर त्यामुळेच एका छोट्या बांधकाम कंत्राटदाराकडे नोकरीला लागला. पडेल ते काम, मिळेल तो पगार असे पहिले वर्ष गेल्यानंतर एक साईट स्वतंत्रपणे संभाळण्यासाठी त्याची नेमणूक झाली. सध्याच्या भाषेत वन प्लस थ्री अशी २५ फ्लॅटची ती बिल्डिंग त्याने नीट पूर्ण केली. नाममात्र साईट इंजिनियर तिथे उभा असायचा. गरजेनुसार आर्किटेक्ट येऊन जायचा. पण सारे व्यवहार व त्याच्या नाड्या याच्या हातात होत्या. लागणारा माल, त्याच्या किमतीसाठीची घासाघीस, एकाच वेळी दोन किंवा तीन सप्लायरकरवी माल घेण्याची पद्धत अशा पद्धती त्याच्या अंगवळणी पडल्या होत्या. पगार कितीही वाढला असला तरीसुद्धा तो धंदा करण्यासाठी कधीच पूर्ण उपयोगी पडणारा नव्हता. घरातून भांडवलाची शक्यताही नव्हती. पण या इमारतीचे काम पूर्ण होत असताना शेजारच्याच बंगल्यातील मालक याची हालचाल दिवसभर दोन वर्षे पाहत होते. अधूनमधून गप्पासुद्धा होत असत. मुलाचे चार हात करायचे असल्यामुळे चार खोल्यांचे एकमजली घर त्यांना आता आठ खोल्यांचे करायचे होते. दुसरा मजला बांधून घेण्याची इच्छा होती, पण ते काम करणारा खात्रीलायक माणूस सापडत नव्हता. त्यांनी याला घरी जेवायला बोलावले. हे काम तू घेशील का म्हणून विचारले. चार दिवसांचा अवधी द्या, मला मालकांशी बोलावे लागेल, असे सांगून त्यांनी ती वेळ मारून नेली. नोकरी सोडणे तर परवडणारे नव्हते, पण आलेली संधी त्याला सोडायची नव्हती. कागदावर पुन्हा पुन्हा हिशोब मांडून त्याने काही अडाखे मनाशी ठरवले. मिळणार्या कामातून सुटणारे पैसे व त्यादरम्यान हाती येणार्या पगार याचा ताळेबंद मनात पक्का झाल्यावर तो मालकाकडे गेला. आपले सध्याचे काम चालू राहील, पण मी यानंतर नोकरीस्वरूपात ते न करता जबाबदारी घेऊन नेहमीच्या वेळात पूर्ण करून देईन, असे मालकाशी बोलणे झाले. विश्वास असल्यामुळे मालकांनीही ते मान्य केले.
या तिसर्या ‘भावी’ बिल्डरची ही कामाची पहिली सुरुवात होती. ७५ छोट्या बंगल्यांची ती सोसायटी होती. हे काम कोण करतंय, कसं करतंय त्यावर जाणार्या येणार्या सगळ्यांची नजर होती. या बंगल्याची दुसर्या मजल्याची स्लॅब पडण्याच्या आतच नवीन काम त्याच्या हाती आले होते. त्या सोसायटीतील एक जुना बंगला पाडून तेथे तीन मजली नवीन इमारत उभारण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ती इमारत पाडण्याच्या आधीच त्या प्लॉटवर या तिसर्या बिल्डरने आईच्या नावाने कंपनी काढून व्यवसायाचा शुभारंभ केला. आजवर फार मोठे काम हाती घ्यायचे नाही, पण हाती आलेले काम सोडायचे नाही, या पद्धतीत छान नाव कमावून पाच ते आठ हजार स्क्वेअर फुटाची अनेक बांधकामे त्याच्या खाती जमा झाली आहेत.
तात्पर्य : काळ बदलत गेला, कामे बदलत गेली तरी बिल्डर सचोटीने व्यवहार करत असेल, ग्राहकांचा विश्वास निर्माण करत असेल, तर या व्यवसायाला कायम मागणी राहणार आहे. केवळ तांत्रिक हुशारीपेक्षा व्यवहाराची ज्यांची जाण सखोल असते, ग्राहकांबरोबर संवाद साधण्याचे कौशल्य ज्यांना जमते, त्यांना यात करिअर शक्य आहे. हे तिघेही भांडवलासाठी थांबले नाहीत. काम शिकण्याला त्यांनी महत्व दिले. यश चालत आले.