उन्हाळा सुरू होतो आणि लोक आपल्या आत्म्याला, शरीराला थंडावा देणारे आणि उकाड्याच्या छळापासून मुक्त करणारे काहीतरी खाण्यापिण्याची सोय होते का याचा विचार करायला सुरुवात करतात. अशा वेळी आईस्क्रीमचा कोन हातात आला तर क्या बात है..! आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं. आय बेट, उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला आवडत नाही असा कोणीही जगात असू शकत नाही.
व्हॅनिला, चॉकलेट, आंबा, बटरस्कॉच, फ्रुट अँड नट्स, रबडी, पिस्ता आणि अगणित फ्लेवर्स. चॉकलेट आणि आंबा हे माझे आवडते फ्लेवर्स आहेत. मी दिवसातून किमान २ आईस्क्रीम खायचो. आणि मग मला हमखास सर्दी व्हायची. त्यामुळे आईने घरीच आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली.
तुम्हाला धक्का बसला का?…
आजकाल आपण घरीच आईस्क्रीम बनवू शकतो, हे तुम्हाला माहीत नाही का? हे २०२३ आहे मित्रांनो! त्यात सर्व काही शक्य आहे.
कसं बनवायचं आइस्क्रीम, ते मी शिकवतो. सिंपल आहे. बाजारात आइस्क्रीमचे तयार पावडर मिक्स मिळतात. तुमच्या आवडत्या फ्लेवरचे एक पॅकेट घरी आणा. ते अर्धा लिटर दुधात रिकामे करा आणि ढवळत-ढवळत दूध उकळा. दूध थंड होऊ द्या. नंतर ते एका ट्रेमध्ये ओता, झाकण लावा आणि रेप्रिâजरेटरमध्ये २-३ तास गोठवू द्या. हे सगळं करताना संयम ठेवायला हवा बरं का… आइस्क्रीम झालंय का हे पाहण्यासाठी सारखा-सारखा फ्रीज उघडून बघत बसलात, तर ते लवकर गोठणार नाही. मिश्रण गोठले की नंतर मिक्सरमधून काढून फेटून घ्या. आणि मग टाडाडा.. टाडाडा!! तुमचे आईस्क्रीम तयार आहे! तुम्ही ते तसेच खाऊ शकता किंवा त्यात ड्रायफ्रुट्स, चॉकलेट सिरप, रुह-अफजा टाकू शकता. त्यातून तुम्ही आईस्क्रीम मिल्कशेकही बनवू शकता! मस्त आहे ना.
आता वळू केककडे.
केक देखील अनेकांना आवडतो. सुट्टीत काहीतरी गोड हवे असते, तेव्हा आपल्याला केकची आठवण येते. मऊ, मऊ, मस्त केक खाताना कित्ती मज्जा येते. माझ्या केकच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. माझे वडील आणि काका यांचे वाढदिवस सुट्टीतच येतात. आणि बेस्ट म्हणजे माझ्या काकांचा वाढदिवस ज्या दिवशी त्याच्या दुसर्याच दिवशी बाबांचा वाढदिवस आहे. म्हणजे लागोपाठ दोन दिवस दोन केक. छान आहे ना!
माझ्या घरी बाहेरून केक आणण्याऐवजी तोही घरीच केला जातो. आता तुम्ही म्हणाल, याचं घर आहे की बेकरी? अरे, विसरलात का? हे आहे २०२३, यहाँ सब कुछ मुमकिन है… तुम्हालाही घरी बनवलेला केक खायचाय ना! मी तो कसा बनवायचा ते शिकवतो. आईवडिलांची पण मदत घ्यायला लागेल बरं का?
साहित्य : १ वाटी लोणी, १ वाटी साखर, १ अंडे घ्या आणि बीटरने एकत्र मिसळा. नंतर हे मिश्रण चांगले बटरी होईपर्यंत त्यात मैदा घाला. नंतर चवीनुसार त्यात व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट पावडर घाला. तुम्ही सुका मेवासुद्धा थोडा दुखवून देखील घालू शकता. दुखवून म्हणजे जाडसर कुटून… नंतर एका अॅल्युमिनियमच्या कंटेनरमध्ये पीठ घाला आणि ३०-३५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. ओव्हन नसेल तर तुम्ही कुकर देखील वापरू शकता. गरम केल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि डब्यातून केक काढा. केक फ्लफी झाला आहे का ते तपासा. झाला असेल तर तुम्ही चांगले केकमेकर आहात. आता तुम्ही केक खाण्यासाठी तयार आहात.
व्वा मित्रांनो! अभिनंदन! तुम्ही दोन पदार्थ बनवायला शिकलात चक्क. आता साहित्य मिळवा आणि बनवा आइस्क्रीम आणि केक. पण, घरातील वडिलधार्यांची मदत घ्यायला विसरू नका. प्रयोग करा.
मी निघतो आता…
…का म्हणजे काय, आईस्क्रीम वितळतंय माझं!