प्रसिद्ध छायाचित्र पत्रकार (फोटोजर्नलिस्ट) आणि खुसखुशीत शैली लाभलेले लेखक घनश्याम भडेकर यांनी साप्ताहिक मार्मिकमध्ये लिहिलेल्या लोकप्रिय लेखमालेतील लेखांचे संकलन असलेल्या ‘शूटआऊट’ या पुस्तकाचे प्रकाशन २९ एप्रिल २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश…
– – –
वृत्तपत्रांमध्ये आणि एकूणच प्रसारमाध्यमांमध्ये दृश्यात्मकतेचं प्रमाण आणि महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आलं आहे. आशयानुरूप आणि सौंदर्यपूर्ण मांडणीचा तो एक अविभाज्य भाग झाला आहे. दृश्य माध्यमांचा गाभाच दृश्यात्मकतेचा असणं स्वाभाविकच आहे. पण लिखित अथवा वाच्य माध्यमांमध्येही दृश्यात्मकतेनं महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे. त्यात छायाचित्रणाचा वाटा मोठा आहे.
सर्वसाधारणत: ‘वृत्त’पत्रात वृत्ताला प्राधान्य आणि त्याला पूरक म्हणून छायाचित्र अशी स्थिती पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत होती. त्यामुळे छायाचित्रण/ छायाचित्रकार यांचं स्थानही महत्त्वाच्या उतरंडीत तुलनेनं खालचं होतं. पण हळूहळू वाढत गेलेला दृश्यात्मकतेचा प्रभाव आणि अनेक छायाचित्रकारांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी यामुळे हे स्थान उंचावत गेलं, वाचकाची नजरही विस्तारली. या सार्याच्या परिणामातून ‘वृत्तछायाचित्र’ असा विशेष विभाग विकसित होत गेला आणि छायाचित्रपत्रकारिता (फोटो जर्नालिझम) अशी नवी शाखा पत्रकारितेत प्रस्थापित होत गेली.
छायाचित्रकार कोणता विषय निवडतो, तो कसा टिपतो, त्यातही प्राधान्य कशाला देतो, त्याची कल्पकता त्यात कशी व्यक्त होते आणि या सर्वांसह तो कोणता आणि कसा एकत्रित परिणाम साधतो, हे फार महत्त्वाचं असतं. चित्रणामागची त्याची दृष्टी त्यात प्रतिबिंबित होते. म्हणजेच वृत्तासाठी छायाचित्रण करताना छायाचित्रणावरील प्रभुत्वाबरोबरच वाचकांच्या-पर्यायानं समाजाच्या- मानसिकतेचीही जाण असणं गरजेचं ठरतं. (अर्थात; गांभीर्यानं केली जाणारी निर्मिती आणि सादरीकरण हे यात गृहीत धरलेलं आहे.)
घन:श्याम भडेकर हे गेल्या ४२-४३ वर्षांपासून अशी गांभीर्यानं, अभ्यासपूर्वक, वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रकारिता करण्यासाठी झटत आलेले वृत्तछायाचित्रकार आहेत. ते केवळ छायाचित्रकार नाहीत, तर पत्रकार म्हणून वृत्तांत आणि इतर लेखनही प्रारंभापासून; १९८०-८१पासून करीत आले आहेत. एकदा या क्षेत्रात आल्यावर अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत, माणसांची आणि त्यांच्या जगण्याची नाना रूपं बघत; अनुभवत आणि त्यांच्या व्यथा-वेदना मांडण्यात, प्रश्न सोडविण्यात प्रभावी ठरण्याच्या माध्यमाच्या सामर्थ्याचा प्रत्यय घेत, त्यात आनंद मिळवत ते याच क्षेत्रात रमले. या प्रदीर्घ अनुभवातील काही प्रसंगांच्या आणि छायाचित्रणांच्या अनुभवकथा त्यांनी ‘शूट आऊट’मध्ये चितारल्या आहेत.
वृत्तछायाचित्रणासंदर्भात पडद्यामागे काय काय घडत असतं, छायाचित्रकार कोणत्या परिस्थितीतून जात असतो, एखाद्या प्रसंगात वेगळा क्षण टिपण्यासाठी तो कशी धडपड करत असतो आणि छायाचित्रं प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे परिणाम आणि प्रतिक्रिया कोणते अनुभव देतात, हे भडेकर यांनी स्वत:च्या काही छायाचित्रांच्या प्रसंगांमधून सांगितलं आहे. करीम लाला, छोटा राजन, अमर नाईक अशा गुन्हेगारी जगतातल्या मोठ्या गुंडांचा शोध घेऊन काढलेली त्यांची छायाचित्रं, प्रमोद नवलकर यांच्याबरोबर रात्री केलेली थरारक भ्रमंती, ख्यातनाम संगीतकार सी. रामचंद्र यांचा अंत्यविधी, ग्रँट रोड येथे झालेलं दुहेरी हत्याकांड, मानखुर्दच्या बालकल्याण नगरीतून गायब झालेल्या आठ वर्षाच्या दीपकचा शोध, कुर्ला बस डेपोच्या जवळच्या भागात लागलेल्या आगीचं घाणीत नखशिखांत बरबटलेल्या अवस्थेत केलेले चित्रण, जीव धोक्यात घालून केलेलं दंगलींचं; वडाळ्यातल्या (मूळातच बेकायदेशीर असलेल्या) कंपनीला लागलेल्या आगीचं ‘मुजर्या’चं छायाचित्रण किंवा गणपती विसर्जनानंतर समुद्रात दिसणार्या छिन्न विच्छिन्न अवस्थेतील भव्य गणेश मूर्ती आणि त्यांचे काही भाग घेण्यासाठी चाललेली विटंबना, गोव्यात समुद्रकिनार्यावर विवस्त्र अवस्थेतील एका परदेशी तरुणीचं छायाचित्र घेण्यावरून जीवावर बेतलेला आणि कायम लक्षात राहिलेला बाका प्रसंग, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील गणपती विसर्जनाचा आगळा अनुभव, ठाण्याच्या मनोरुग्णालयातील एका दुर्दैवी जिवाची विदारक कहाणी सांगणारी भेट, ‘मसाज केंद्रे की कुंटणखाने?’ या लेखासाठी एका मित्राला मॉडेलिंग करायला सांगून घेतलेल्या छायाचित्रानं त्या मित्राच्या आयुष्यात उठवलेलं मोठं वादळ अशा अनेक घटना-प्रसंगांमधून आपलं अनुभवविश्व त्यांनी उलगडलं आहे.
चांगली वृत्तछायाचित्रं घटना-प्रसंगांमधले विशिष्ट क्षण टिपत असतातच, पण त्याचबरोबर कधी कधी जाणीवपूर्वक, तर कधी कळत-नकळत तो तो काळही चित्रबद्ध करतात. मग ते दृश्य किल्ल्यावरच्या एखाद्या कार्यक्रमाचं असो, गणेशोत्सवासारख्या सणाचं- उत्सवाचं असो, एखाद्या मानवी किंवा निसर्गनिर्मित आपत्तीचं असो, की क्रिकेटसारख्या खेळामधलं असो. माणसांचे पोशाख, आभूषणं, निसर्गाची स्थिती, उत्सवातली सजावट अशा अनेक गोष्टींच्या तपशीलांमधून काळ अप्रत्यक्षपणे दिसत असतो. पाशवी जालियनवाला बाग हत्याकांडाचं भीषण चित्र दाखवणारं अमृतसरमधलं संग्रहालय किंवा लंडनमधल्या लॉर्डस् क्रीडांगणाच्या प्रांगणातलं क्रिकेटच्या इतिहासातले अविस्मरणीय क्षण, घटना आणि खेळाडू आणि अन्य संबंधित नामवंत यांचं दर्शन घडवणारं संग्रहालय ही याची मोठी उदाहरणं वानगीदाखल सांगता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या नेत्यांची छायाचित्रं आणि आजच्या नेत्यांची छायाचित्रं पाहिली तरी वेशभूषा, शैली, राहणीमान याच्या तपशीलातून काळाची पावलं उमटलेली दिसतात. राजकारण, समाजकारण, धर्म, संस्कृती, जीवनशैली, शेती, निसर्ग आदीमध्ये काळानुसार झालेल्या बदलाचा आलेख त्यातून काढता येतो. (हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये छायांकित झालेली तत्कालीन मुंबई आज पाहताना येणारा अनुभव विलक्षण असतो.)
भडेकर यांनी टिपलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये असे छोटे-मोठे संदर्भ सामावलेले आहेत. मुंबईचे तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी वेशांतर करून केलेल्या पाहणीत दिसलेली जुहू चौपाटी, बोरिवली रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाणं, २६/११/२००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वेळचा मुंबईचा सीएसटी परिसर, दुधाच्या निमित्तानं झालेल्या दंगलीतला कामाठीपुरा, तृतीयपंथीयांची गोलपिठ्यातली वस्ती अशी ठिकाणं आणि सामान्य माणसं इथपासून अल्पोपहार करणार्या श्रीमती इंदिरा गांधी अशासारख्या नामवंतांच्या संदर्भातील क्षणचित्रांपर्यंत भडेकर यांची विविध छायाचित्रं याची साक्ष देणारी आहेत. अशी छायाचित्रं आणि त्याची कथा सांगणारं लेखन यात त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं त्यांची सजगता आणि बारकावे टिपण्याची सहजता दिसून येते.
प्रतिभावंत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या निधनाच्या प्रसंगी अभिनेत्री पूनम धिल्लन कशी दिसली, तर ‘पूनम सिनेमात किती देखणी दिसते, पण प्रत्यक्षात जाड काचेचा चष्मा वापरते, हे त्यावेळी दिसले.’ असंच आणखी एक निरीक्षण पहा, ‘प्रसंगानुरूप कॅमेर्याला तोंड देणे फार कठीण असते. मी मी म्हणणारे कॅमेर्यासमोर तग धरू शकत नाहीत. आपले तरुण मुख्यमंत्री शरद पवार पहा, बेधडक भाषण ठोकतात. विरोधकांना खुलेआम आव्हान देतात. पण कॅमेर्यासमोर ते नवर्या मुलासारखे लाजतात. पवार साहेब चेहर्यावर अजिबात ‘एक्स्प्रेशन’ देत नाहीत, अशी अनेक छायाचित्रकारांची तक्रार आहे.’ (अर्थात शरद पवार तरुण असतानाच्या काळातलं.. अनेक वर्षांपूर्वीचं हे निरीक्षण आहे, हे सांगायलाच नको.)’
शंकरराव चव्हाण तोंडात सुपारी ठेवून दिलखुलास खूप खो खो हसतील. पण कॅमेर्यासमोर आले की, मोठेमोठे डोळे करतील. त्यामुळे फोटोत ते हेडमास्तरांसारखे दिसतात. वसंतदादा पाटील केव्हाही सौम्य निर्मळ चेहरा करून बसतील. छगन भुजबळ प्रसंग पाहून अॅक्शन देतात.’ कोर्टात उभे राहण्याची माझी पहिलीच वेळ. लहान कोर्ट, अपुरी जागा. पान तंबाखू खाऊन जज्जसाहेबांचे तोंड लाल चुटूक झाले होते.’ जे जे स्कूलमध्ये शिकणार्या, सोळा वर्षं वयाच्या (तेव्हाच्या) उद्धव ठाकरे यांचं स्वभाव वर्णन, करीम लाला, छोटा राजन, अमर नाईक अशा बड्या गुन्हेगारांचं वागणं, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातील गणपती आणि घरगुतीपणा असं बरंच काही त्यांनी बारकाईनं टिपलं आहे.
छायाचित्रांबरोबरच भडेकर यांनी सांगितलेल्या त्यामागच्या कहाण्याही रंजक आहेत. भडेकर यांचा पत्रकारितेत अपघातानं प्रवेश झाला तोच मुळी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या वेगळ्या मुद्रा टिपल्यामुळे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंतीचा महोत्सव तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत झाला तेव्हा उघड्या जीपवर उभ्या राहून त्या समाधीस्थळाकडे जात असताना ‘इंदिराजी.. इंदिराजी, यहां देखिये’, असं (पत्रकारितेचा, वृत्तछायाचित्र टिपण्याचा अनुभव नसल्यामुळे) ओरडून त्यांना आपल्याकडे कसं बघायला लावलं आणि त्या पहिल्या छायाचित्रांनीच आपल्याला पत्रकारितेत प्रवेश कसा मिळवून दिला, याची हकिकत भडेकर यांनी रंगवून खुमासदारपणे सांगितली आहे.
भडेकर यांच्या स्वभावात मिश्किलपणा आहे. या लेखनात अनेक ठिकाणी तो दिसून येतो. सरहद्द गांधी अब्दुल गफार खान गंभीर आजारी पडले, ते जातील की राहतील अशी अवस्था होती. मोठ्या माणसांच्या बाबतीत अशा वेळी ते गेल्यानंतरची तयारी वृत्तपत्रांमध्ये/ प्रसारमाध्यमांमध्ये आधीच करून ठेवली जाते. तो व्यावसायिक अपरिहार्यतेचा भाग आहे. भडेकरांनी तशी तयारी करून ठेवली होती. पण बादशहा खान बरे झाले. आणि पुढे काही दिवसांनी अचानक ते गेले. त्यावेळी छायाचित्रं वगैरे शोधण्यासाठी झालेली धावपळ सांगताना भडेकर म्हणतात, ‘मोठ्या माणसांना वेळी अवेळी ध्यानीमनी नसताना अकस्मात जाण्याची सवयच असावी.’ इगतपुरी येथील शवचिकित्सागृहाची दुरवस्था प्रकाशित केल्याबद्दल ‘छान केले तुम्ही पेपरात छापले ते. असे विषय तुम्ही पेपरवाल्यांनी उचलून धरले पाहिजेत. त्याशिवाय आमचे प्रश्न सुटायचे नाहीत’ असं नगरसेवक म्हणाल्याचं सांगून भडेकर विचारतात, ‘म्हणजे यांनी काय करायचं? फक्त निवडणुकीला उभं राहायचं?’
वांद्य्राला भररस्त्यात बकरे सपासप कापून दिले जातात याची छायाचित्रं भडेकर यांनी घेतली. ती प्रकाशित झाल्यावर कारवाई झाली. पण अशा विषयांच्या बाबतीत पुढे काय होतं ते त्यांनी नोंदवलं आहे, ‘मटणवाल्यांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. भिंतीच्या आड किंवा गोणपाटाचा आडोसा करून पुन्हा बकरे कापण्यास सुरुवात झाली आहे. आता फोटो घेण्यासाठी मी गोणपाटाच्या आत गेलो तर माझाच बकरा होण्याची शक्यता आहे.’
छायाचित्रांसाठी ग्राहक म्हणून मसाज केंद्रात गेल्यावर तिथल्या तरुणीनं एक पंचा गुंडाळायला दिला आणि कपडे काढून झोपायला सांगितलं. त्यावर भडेकरांचं भाष्य, ‘पत्रकार लोकांचे कपडे उतरवतात असं ऐकून होतो. या बाईनं पत्रकाराचेच कपडे उतरवले, याची खंत वाटली.’
ऋषितुल्य समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचं छायाचित्र मिळवण्याच्या धडपडीत काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे यांना खायची पानं देऊन खूश करण्याचा प्रयत्न कसा केला हे सांगताना भडेकर लिहितात, ‘बनारसी मसाला, कतरी सुपारी, चार पानं आणून दिली. चुना वेगळा लावला. ठसका लागला, तेव्हा पाणीही आणून दिलं. एका फोटोसाठी मी काय काय करावं? पान चघळून कुंटेंचं तोंडही रंगलं, पण माझ्यासाठी (शब्द टाकण्याकरिता) ते तोंड उघडेना.’
वृत्तछायाचित्रात कलात्मकतेपेक्षा कांकणभर अधिक महत्त्व असतं ते छायाचित्रकाराच्या राजकीय, सामाजिक, सामान्य माणसाविषयीच्या दृष्टीला. एका अर्थी त्या त्या घटनेवरचं; व्यक्तींच्या संदर्भातलं भाष्य, मर्म, अन्वयार्थ याचा तो आविष्कार असतो. पत्रकार छायाचित्रकार म्हणून भडेकर वेगळ्या विषयांच्या शोधात असणारे आहेतच, पण सर्वसामान्य, गरीब, दबलेल्या, उपेक्षित माणसाच्या भल्याची आस आणि आच असणारे आहेत. त्यांचे छायाचित्रांचे आणि बातम्यांचे किंवा वृत्तलेखांचे विषय पाहिले तरी याची कल्पना येते. दरिद्री, उपेक्षित वर्गाबद्दल वरकरणी कणव दाखवणारे तथाकथित ‘पुरोगामी’ अनेक असतात, पण भडेकरांची भूमिका दिखाऊ; बेगडी नाही. त्यांची दृष्टी आणि तळमळ आंतरिक आहे.’
मी माझ्या हातात कॅमेरा आणि लेखणी घेतल्यापासून समाजहित सतत डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यात आजही मी कुठे कसर पडू देत नाही’, असं ते नेहमी सांगतात. ‘माझ्या फोटोमुळे लोकांचे कल्याण व्हावे, समाजात सुधारणा व्हावी, असा माझा नेहमी प्रयत्न असतो,’ ही त्यांची दृष्टी आणि वृत्ती अनेक प्रसंगांमध्ये व्यक्त झाली आहे.
वडाळ्याच्या अल्लारखां कंपनीला आग लागल्याच्या बातमीबद्दल विचार करताना ‘आग लागली की लावली?’ असा प्रश्न त्यांना पडतो.’ मी जेथे जेथे आगीचे फोटो काढायला गेलो होतो, त्यापैकी अनेक ठिकाणी काही वर्षांतच टोलेजंग लक्झुरिअस टॉवर झालेले पाहिले. ते पाहून असे वाटते की, आग लागल्यावर मालकाचे नुकसान होते की फायदा होतो; यावर संशोधन करायला हवे,’ या शब्दांत ते एक विदारक सत्य अधोरेखित करतात…’
डोंगरदर्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला इगतपुरीचा परिसर पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात. पण स्थानिक आदिवासींचे हाल पाहायला कुणाला वेळ नसतो. ‘एखाद्या झोपडपट्टीला आग लागली की, आगीच्या ज्वालांचे व धुराच्या प्रचंड लोटाचे फोटो घेण्याला आताचे फोटोग्राफर कौशल्य समजतात. मी मात्र त्या मरण-ज्वालातून स्वत:ला वाचविण्यासाठी स्टोव्ह घेऊन धडपडणार्या मुलीचा फोटो टिपतो. शबाना आझमी नावाची एक गोरीगोमटी नटी झोपडपट्टीवासियांसाठी मोर्चा काढते या कौतुकापेक्षा त्या समाजाचं दारुण जीवनचित्र मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.’.
अशा विविध प्रकारे आणि विविध निमित्तांनी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपल्या कामातून काही प्रश्न सुटले, बालगृहातून अचानक बेपत्ता झालेला एखादा गरीब मुलगा आईला पुन्हा मिळाला, बड्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एखाद्या गरीब स्त्रीला न्याय मिळाला, पोलीस चौकीची दुरवस्था दूर झाली अशासारख्या फलिताचा आनंद त्यांना अधिक मोलाचा वाटतो, हे महत्त्वाचं आहे.
एकाच ध्यासानं… सामान्य; गरीब माणसाचं हित उराशी बाळगून चाळीस-बेचाळीस वर्षं रोज नव्याचा शोध घेत त्याच उत्साहानं आणि उमेदीनं काम करत राहणं आणि तेही अनेक लाभांच्या चमचमत्या विश्वात राहून झगमगटाच्या मागे न लागता करत राहणं ही सोपी गोष्ट नाही. पण त्यात मिळणार्या आनंदालाही तोड नसते. भडेकरांच्या उमेदीचं, जिद्दीचं आणि यशस्वितेचं तेच गमक असावं. हा त्यांचा सुफळ आणि सफल प्रवास असाच चालत राहो आणि असाच आनंद यापुढेही त्यांना मिळत राहो, ही शुभेच्छा.