खेळावर आधारित पहिला सिनेमा या वर्षी रिलीज झाला तो अजय देवगणचा ‘मैदान’. गेल्या महिन्यात ‘शैतान’ला यश मिळाल्यावर या सिनेमाकडून अजय आणि त्याच्या चाहत्यांच्या बर्याच अपेक्षा होत्या. ‘शैतान’पेक्षा ‘मैदान’चं प्रमोशनही दणक्यात झालं होतं. पण तरीही ‘मैदान’ला मैदान मारता आलं नाही. वर्षाकाठी फार तर एखाद दुसरा खेळावर आधारित सिनेमा प्रदर्शित होतो, जो बहुतांशी वेळा बॉक्स ऑफिसवर तितकासा चालत नाही. लवस्टोरी, थ्रिलर, कॉमेडी यांची जी कळ सिनेसृष्टीला गवसली आहे, ती क्रीडापटांबाबत बहुतांशी वेळा फसलेली आहे. खरं तर क्रिकेट आणि सिनेमा हे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रमुख घटक आहेत. आयपीएल टीमचे फॅन्स असोत वा ‘खाना’वळीचे, कोण सरस या मुद्द्यावर एकमेकांशी पंगे घ्यायला लोक कमी करत नाहीत. ज्या देशात खेळातील ड्रामा आणि सिनेमातील खेळखंडोबा सर्वपरिचित आहे, त्या देशात खेळविषयक सिनेमाविषयी आस्था का बरं उणावत असेल, याचा स्कोअर पाहण्यासाठी मांडलेला हा मोठ्या पडद्यावरील खेळांचा सामना…
क्रीडापट बनवताना खेळ किंवा खेळाडू दोघांपैकी एक लोकप्रिय असायला हवा हे पाहिलं जातं. कधी दुखापतीमुळे तर कधी फॉर्म हरवल्यामुळे खेळाडूंच्या आयुष्यात नाट्यमय चढउतार येतच असतात. एखाद्या खेळाडूच्या कारकीर्दीत वादग्रस्त घटना झाली असेल, तर पटकथेच्या दृष्टीने सोने पे सुहागा. वादग्रस्त घटना नसतील तर सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तशा जागा सिनेमात तयार केल्या जातात.
देशातील क्रिकेटची लोकप्रियता आणि वेड पाहता हा खेळ आणि देशासाठी क्रिकेट खेळलेले खेळाडू ही चित्रपट निर्मात्यांची पहिली चॉईस ठरली. १९५९च्या ‘लव मॅरेज’ या देव आनंद आणि माला सिन्हा यांच्या चित्रपटात देव यांनी क्रिकेटरची भूमिका साकारली होती. सिनेमाची गोष्ट नायक-नायिकेच्या लग्नाभोवती फिरत असली तरी, नायकाचा स्ट्रगल, त्याची मॅच बघून नायिकेचे प्रेमात पडणे, एवढ्यापुरतं क्रिकेट या सिनेमात दाखवलं होतं. त्यानंतर बॅडमिंटन रॅकेट घेऊन डॅडींच्या स्टडीरूममध्ये येणारे, ज्यूस पिणारे नायक-नायिका सिनेमात अनेक वेळा दिसलेत. नायक-नायिकेच्या रूममध्ये फ्रेममध्ये दिसेल अशी रॅकेट तर कितीतरी सिनेमांत बघायला मिळते, तेवढाच सिनेमा आणि खेळांचा संबंध. पुढे १९७०मध्ये ‘हमजोली’ सिनेमात जितेंद्र आणि लीना चंदावरकर बॅडमिंटन खेळत ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ गातात, ते गाणं त्यातल्या टॉक टॉकच्या जागांसकट आपल्या परिचयाचं आहे.
त्यानंतर उल्लेखनीय क्रीडापट केला कुमार गौरवने. लव स्टोरी (१९८१) सिनेमाच्या यशानंतर त्याने अनेक चित्रपट साईन केले. ‘ऑल राऊंडर’ (१९८४) हा याच रांगेतील सिनेमा क्रिकेटवर आधारित होता. पण, पहिल्या सिनेमानंतर फॉर्म हरवल्यामुळे हा ‘ऑल राऊंडर’ शून्यावर बाद झाला. देव आनंदने आमीर खानसोबत ‘अव्वल नंबर’ (१९९०) हा क्रिकेटपट बनवला होता. देव आनंदच्या उत्तरकाळातील प्रत्येक चित्रपटात फक्त देव आनंद दिसतात, बाकी सगळा आनंदी आनंद असतो. यामुळे आमीर असूनही हा ‘अव्वल नंबर’ शेवटून पहिला आला.
२००१ साली ‘लगान’ने जगभरात ५८ कोटी रुपयांची कमाई करून क्रीडापटांचं अपयश धुवून काढलं होतं. त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या गदरने बॉक्स ऑफिसवर १३२ कोटींची ‘हँडपंप’तोड कमाई केली होती. पण ‘लगान’ सिनेमाचे यश फक्त पैशाच्या तागडीत तोलून चालणार नाही. ब्रिटिश कालखंडातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील शेतसारा आणि त्या काळातील क्रिकेट सामना यांची सांगड घालून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी क्लासेस आणि मासेसना अपील होईल असा उत्तम सिनेमा बनवला होता. याच सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. आमीर खान हा रिस्क घेणारा सुपरस्टार आहे. ‘लगान’ची पटकथा चांगली असूनही सिनेमाचा ग्रामीण बाज, धोतर घालणारा हिरो, लोकसंगीतावर आधारित संगीत आणि क्रिकेटचा खेळ या गोष्टींमुळे कोणताही निर्माता या सिनेमावर पैसे लावायला तयार नव्हता. शेवटी आमीर स्वत: निर्माता बनला.
९०च्याच दशकात आलेल्या शाहरुख खान आणि ऊर्मिला मातोंडकर यांचा ‘चमत्कार’ या चित्रपटाला क्रिकेटची पार्श्वभूमी होती. भूत बनलेला नसिरुद्दीन शाह सामना जिंकून देण्यासाठी मैदानावर भरपूर उचापत्या करतो. या सिनेमातील लाजराबुजरा शाहरुख प्रेक्षकांना तितकासा भावला नाही. यामुळे या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कोणताही चमत्कार करता आला नाही.
भारतीय क्रिकेट संघातील पहिला मूकबधीर खेळाडू यशवंत सिधये उर्फ बाबा पँथर (१९३२-२००२) यांच्या जीवनावर आधारित ‘इक्बाल’ हा सिनेमा नागेश कुकनुर यांनी दिग्दर्शित केला होता. बजेट कमी असूनही चांगली पटकथा, उत्तम कलाकारांची निवड या जोरावर श्रेयस तळपदेच्या इक्बालने बॉक्स ऑफिसचा फलक हलता ठेवला. २०२२मध्ये श्रेयस क्रिकेटपटू प्रवीण तांबेच्या रूपात पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. शेकडो खेळाडू रणजी टीममध्ये एक ना एक दिवस प्रवेश मिळेल या आशेने वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात, पण संधी मिळत नाही आणि वय उलटून जात असतं… याच रिअल लाईफ स्टोरीवर ‘कौन प्रवीण तांबे’ हा सिनेमा आधारित होता, पण सिनेमा डायरेक्ट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रवीण तांबे नक्की कोण होता हे फारशा सिनेरसिकांपर्यंत पोहचलं नाही.
मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘घुमर’ही क्रिकेटवर आधारित होता. एका अपघातात एक हात गमावलेल्या महिला क्रिकेटपटूचा पुन्हा जिद्दीने उभं राहून भारतीय संघात स्थान मिळविण्याचा खडतर प्रवास आणि क्रिकेटमध्ये अपयशी खेळाडूने, कोच बनून स्वत:वरचा कलंक मिटवण्याचा प्रयत्न या सिनेमात दाखवला गेला होता. सय्यामी खेरची उत्तम कामगिरी, अभिषेक बच्चनचा खडूस प्रशिक्षक यांनी चित्रपटात रंगत आणली होती पण हा घुमर गल्लापेटीवर फार काळ घुमला नाही. मिताली राज या महिला क्रिकेटरवर आलेला ‘शाबास मिथू’ सिनेमा २०२२मध्ये प्रदर्शित झाला, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर हिट विकेट ठरला. त्या आधी २००६मध्ये क्रिकेट संघात प्रवेश मिळवण्यासाठी मुलाच्या वेशात खेळणारी मुलगी राणी मुखर्जीने दिलेला, ‘दिल बोले हडिप्पा’देखील बॉक्स ऑफिसवर अबोल ठरला. २००६नंतर जवळजवळ एक दशक क्रिकेटवर यशस्वी सिनेमे आले नाहीत. क्रीडापटांत एक साचा दिसून येतो. आधी डावललं जाणं, मग प्रचंड मेहनत, मार्गातील अडथळे, सुरुवातीचे अपयश, आणि मग गगनभेदी यश असे बेतलेले सिनेमे आपला चाणाक्ष प्रेक्षक सिनेमाचा ट्रेलर पाहून ओळखतो आणि पडद्यावरची लुटूपुटूची लढाई पाहायला जायचं टाळतो.
२०१६ हे वर्ष भारतातील स्पोर्ट्स मूव्ही इयर घोषित करायला हरकत नाही, कारण २०१६ या वर्षात खेळावर आधारित पाच मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. याची सुरुवात मे महिन्यातील मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावरील ‘अझर’पासून झाली. पण हा सिनेमा फसला, कारण कोणताही चरित्रपट काढताना तो चारित्र्यपट असावा अशी किमान अपेक्षा असते. ९०च्या दशकात अझरुद्दीनवर झालेले मॅचफिक्सिंगचे आरोप, त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी, ही पार्श्वभूमी या चरित्रपटाला पोषक नव्हती. हा चित्रपट अझरची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न वाटला, यामुळे सिनेमात दिसली तशी क्लीन चिट प्रेक्षकांच्या न्यायालयात अझरला मिळाली नाही.
लाल मातीच्या आखाड्यातील मल्ल पुढे जाऊन जीवाची बाजी लावणारी फ्री-स्टाईल कुस्ती खेळतो हा रोमांचकारी प्रवास दाखवणार्या ‘सुलतान’ने जुलै महिन्यात तिकीट बारीवर रमझान ईद साजरी केली होती.
नवाजुद्दीन सिद्दिकीला घेऊन गोल्फ खेळावर आधारित ‘फ्रीकी अली’ हा विनोदी चित्रपट सोहेल खानने सप्टेंबर महिन्यात आणला होता. गोल्फ हा महागड्या आणि संथ खेळाबाबत आपल्याकडील मध्यमवर्ग सोडा, उच्च मध्यमवर्गदेखील उत्सुक नाही. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कुठल्यातरी खळग्यात जाऊन अंतर्धान पावला. याच महिन्यात ‘एम. एस. धोनी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना, एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि कसोटी विश्वचषक मिळवून देणार्या धोनीच्या जीवनावरील सिनेमाला सलमान, शाहरुख असे कुणी मोठे स्टार नसतानाही प्रेक्षकांचा (२१५ कोटी) अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. रोज टीव्हीवर दिसणारा, खेळणारा आणि त्यावेळी देशातील सर्वात लोकप्रिय अशा धोनीची नक्कल न करता सुशांत सिंग राजपूत या गुणी अभिनेत्याने अस्सल धोनी पडद्यावर साकारत मिळालेल्या संधीचे सोने केलं. धोनीच्या तुलनेत ‘८३’ या सिनेमाने मात्र निराश केलं. प्रेक्षकांना अडतीस वर्षांपूर्वी घडलेला एक दिवसीय क्रिकेटचा सुवर्ण इतिहास तितकासा अपील झाला नाही. पटकथेतील त्रुटी, हाताबाहेर गेलेलं बजेट, अव्वाच्या सव्वा तिकीट दर अशा अनेक कारणांमुळे प्रेक्षक थिएटरकडे वळले नाहीत.
याच वर्षी आलेल्या आमीर खानच्या ‘दंगल’ने दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसला धोबीपछाड दिला. भारतीय कुस्तीगीर महावीर सिंह फोगाट यांच्या जीवनावरील चित्रपटात आमीरने पोट सुटलेला, मध्यमवयीन खमका ग्रामीण पुरुष उभा केला. ग्रामीण भागात मुलींवर खूप सामाजिक बंधने असतात. मुलींनी कुस्तीसारखा मैदानी खेळ खेळायला संकुचित वृत्तीची पुरुषप्रधान संस्कृती किती आड आली असेल? सर्व अडचणींवर मात करून जेव्हा गीता, बबिता या मुली जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करतात, तेव्हा प्रेक्षक सिनेमाशी अधिक जोडला जातो. म्हणूनच जगभरातील प्रेक्षकांनी ‘दंगल’ला डोक्यावर घेतलं.
क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असला तरी भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. एकेकाळी सुवर्णयुग पाहिलेल्या या खेळाकडे आज देशातील मोठ्या घटकाने पाठ फिरवली आहे. अशा खेळाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा बनवणे ही व्यावसायिक रिस्क ठरू शकते. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुरमा’ चित्रपटाने ती रिस्क घेतली. एका दुर्दैवी अपघातात अंथरुणावर खिळलेला हॉकीपटू संदीप सिंग पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देशाला पदक प्राप्त करून देतो, याची प्रेरणादायी कहाणी सांगणार्या सिनेमात दिलजीत दोसांझ या गुणी अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली होती. समीक्षकांनी या सिनेमाचे कौतुक केलं, पण प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद या सिनेमाला मिळाला होता. हॉकीच्या मैदानात बाजी मारणारा आणखी एक सिनेमा म्हणजे २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘गोल्ड’. १९४८ साली भारतीय हॉकी संघाला ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी जिवाचं रान करणार्या तपन दास या मॅनेजरची ही गोष्ट सत्य आणि काल्पनिक प्रसंग यांची सरमिसळ करून सांगितली गेली होती. अक्षयकुमार अभिनीत हॉकी खेळावरील या सिनेमाने जगभरात १५८ कोटी रुपयांची कमाई केली.
जागतिक स्तरावर पुरुषांचे खेळ आणि खेळाडू महिलांच्या खेळांपेक्षा अधिक लोकप्रिय असतात. अशावेळी जिथे क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातील महिला खेळाडूंकडे माध्यमे आणि प्रेक्षक दुर्लक्ष करतात, तिथं महिला हॉकी संघावर चित्रपटनिर्मिती करणं हे धाडसाचं काम होतं. यशराज बॅनरने शाहरुख खानच्या सोबतीने हे कठीण आव्हान उचललं आणि २००७ साली ‘चक दे इंडिया’ या सिनेमाने इतिहास घडवला. महिला हॉकी खेळाच्या अधिकार्यांची खेळाबद्दल अनास्था, वेगवेगळ्या राज्यातील खेळाडूंमधील वैविध्य, आपापसातील ठसन, खेळाडूंमधील आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्यवाद यावर मात करून कबीर खान नावाचा चांगला प्रशिक्षक इच्छा, सांघिक कामगिरी यांच्या जोरावर एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकतो, हे या चित्रपटात सुरेखपणे मांडले आहे. वो सत्तर मिनिट… असे प्रेरणादायी संवाद, उत्तम संगीत आणि शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे यांच्यासह सर्व कलाकारांची उत्तम कामगिरी या बळावर हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गोल केलाच, पण त्यासोबतच क्रिकेटतर खेळांकडे भारतीय जनमानसांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियंका चोप्राने २०१४ साली ‘मेरी कोम’ नावाचा चित्रपटात प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारली होती. तिचं वैयक्तिक आयुष्य, त्यामधला एक संघर्ष, प्रवाहाविरुद्ध पोहण्यामध्ये असलेली तिची जिगरबाज वृत्ती, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मोजावी लागणारी किंमत या सार्यावर प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा केवळ बॉक्सिंग करिअरपुरता न राहता मणिपूर अन तिथल्या नागरिकांच्या जगण्यावर भाष्य करत होता. किक बॉक्सर आणि मार्शल आर्ट खेळाडू रितिका सिंग या खेळाडूच्या जीवनावर ‘साला खडूस’ हा चित्रपट प्रकाश टाकतो. मुष्टियुद्धासारख्या खेळामध्ये महिलांचे स्थान, खेळाडू व प्रशिक्षकातील नातेसंबंध व या क्षेत्रातील राजकारण यांवर आर. माधवनची धडाकेबाज भूमिका आणि त्याला नवोदित नायिका (व खरीखुरी बॉक्सर) रितिका सिंगनं दिलेली साथ यामुळे हा सिनेमा उत्कंठावर्धक झाला आहे.
बॉक्सिंगवरील चित्रपटांत प्रामुख्याने अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’चा उल्लेख करावा लागेल. नेहमी यशस्वी खेळाडूंवर चित्रपट बनतात, पण संघर्ष करूनही यश लाभत नाही अशा हजारो सामान्य खेळाडूंच्या आयुष्याचे चित्रण हा सिनेमा दाखवतो. उच्चशिक्षण घेण्याची ज्यांची ऐपत नाही असे अनेक बेरोजगार तरुण खेळाचा वापर करून नोकरी मिळवण्यासाठी झगडत असतात, त्याचं प्रतिनिधित्व यातील मुक्काबाज श्रवण सिंह करतो. अभिनेता विनित सिंह याने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसते. याच मुक्काबाजीच्या परंपरेत अमीर खानचा ‘गुलाम’ चित्रपट देखील उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतो. या सिनेमात पोरसवदा आमीर खान (सिद्धू) महाकाय गुंड शरत सक्सेना (रॉनी) याच्यासमोर कसा जिंकणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो, पण मुष्टियोद्धा प्रतिकार करताना चपळता, दमसास आणि योग्य तंत्र या जोरावर आपल्यापेक्षा अधिक ताकदवान व्यक्तीवर विजय मिळवू शकतो हे इथे दिसलं.
आपलं जीवन हीच एक धावण्याची शर्यत आहे, त्यामुळे धावण्याच्या स्पर्धेला आपल्याकडे ग्लॅमर नाही. या खेळाला फार पैसे लागत नाहीत, तुमचे पाय भक्कम असले की झालं. यामुळेच पायातील बूट घेण्याची परिस्थिती नसलेले अनेक खेळाडू इतर खेळांच्या तुलनेत धावण्याच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर दिसतात. धावपटू मिल्खा सिंह यांच्या जिवनावर आधारीत ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट बनवण्यात आला. फ्लाईंग सिख या नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंह यांनी लहानपणी सोडलेली फाळणीची धग, असंख्य अडचणींवर मात करून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनणं हा प्रवास फरहान अख्तर या अभिनेत्याने आपल्या देहबोलीतून उत्तम दाखवला आहे. सैन्यातील फौजी आणि भारतीय धावपटू चंबळ खोर्यातील डाकू कसा बनतो याची कथा तिग्मांशु धूलिया यांनी दिग्दर्शित केलेला ‘पानसिंह तोमर’ चित्रपट सांगतो. पानसिंह स्टीपलचेस या स्पर्धेत सात वेळा राष्ट्रीय चॅम्पियन होता. खेळाडू, पती, डाकू असे अनेक पदर असलेली ही भूमिका इरफान खानने अप्रतिम निभावली आहे.
काही दशकांपूर्वी भारतातील दळणवळणाचा सायकल हा कणा होता. आज स्कूटर, बाईकच्या धुरात सायकल धूसर झाली असली तरी देशातील दुर्गम भागात आजही सायकलला तोड नाही. आंतरमहाविद्यालयीन सायकलस्पर्धेवर आधारित असलेला आमीर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ गाजला. खेळात गरीब, वंचित व्यक्ती कर्तृत्वावर यश संपादन करू शकते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे मॉडेल कॉलेज आणि श्रीमंत मुलांचे राजपूत कॉलेज यांच्यातील स्पर्धा हा सिनेमा दाखवतो. कसलीही जबाबदारी न घेणारा उनाड, आगाऊ संजू मोठ्या भावाच्या अपघातानंतर बदलतो. घराची जबाबदारी उचलतो, वडिलांचे आणि भावाचे सायकल रेस जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो हा प्रवास रोमांचकारी आहे. आज या सिनेमाचे कौतुक होत असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हरला होता हे खेदाने म्हणावे लागेल.
फुटबॉल हा खेळ जगभरात सर्वात लोकप्रिय आहे. भारतात फुटबॉलला पश्चिम बंगाल आणि गोवा या राज्यांत लोकाश्रय मिळाला. १९८४ साली दिग्दर्शक प्रकाश झा यांनी फुटबॉलवर ‘हिप हिप हुर्रे’ नावाचा चित्रपट आणला होता. राज किरण यांनी एकसंघ नसलेल्या संघाला एकत्र आणून विजयी करणार्या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका केली होती. फुटबॉलवर ‘दन दनादन गोल’ या चित्रपटात जॉन अब्राहम, अरशद वारसी आणि बिपाशा बसू यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात इंग्लडमधील फुटबॉल क्लब कल्चरवर प्रकाश टाकण्यात आला होता.
कॅरमच्या खेळावर आधारित ‘स्ट्राइकर’ या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा यांचा सुंदर मिलाफ दर्शवला होता. पण ही कथा नंतर कॅरमच्या सोंगट्यांसारखी विखुरली. दक्षिणेतील सिद्धार्थ, विद्या मालवदे, अनुपम खेर आणि आदित्य पांचोली यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात होत्या. अनेक आंतरराष्ट्रीय पदके पटकावलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आलेला, परिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’ (२०२१) हा सिनेमा तितकासा रंगला नाही.
बॅडमिंटनच्या भाषेत सांगायचं तर ‘लव ऑल’वर (म्हणजे झीरो स्कोअर) वर सुरू झालेला सिनेमा तसाच संपला.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणार्या ‘बैलगाडा’ शर्यतीचे चित्रण अनेक जुन्या मराठी चित्रपटात आलेलं आहे. अन्यथा खेळांना मराठी चित्रपटात फार स्थान मिळालेलं दिसत नाही. उपेंद्र लिमये यांचा ‘येलो’ (२०१४) हा डाऊन सिंड्रोम असलेल्या गार्गी गाडगीळ या मुलीचा, स्विमिंगमधील उल्लेखनीय कारकीर्दीचा प्रवास. यातील प्रमुख भूमिका स्वत: गार्गीने साकारली होती. या सिनेमाला स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. भारताला ऑलिंपिकमध्ये पदके मिळत नव्हती तेव्हा गोट्या, आट्यापाट्या, लगोरी या खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश करा असा विनोद केला जायचा. याच गोट्यांच्या खेळावर ‘गोट्या’ नावाचा एक मराठी चित्रपट दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी आणला होता. कुस्ती खेळावरील ‘केसरी’, सचिन तेंडुलकरला समर्पित ‘तेंडल्या’, कबड्डी खेळावरील ‘सुर सपाटा’, खेळाडूंचे मनोधैर्य वाढविणार्या क्रीडा मानसोपचार विषयावर आधारित ‘विजेता’, बॉक्सिंग खेळावरील ‘बेधडक’… असे काही मराठी चित्रपट येऊन गेले पण बॉक्स ऑफिसवरील धावफलक अजूनही कोरा आहे.
‘झुंड’ ही एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कथा आहे, ज्यांची भूमिका बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. हा शिक्षक झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध सॉकर खेळाडू बनवतो. ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला होता. अमिताभ यांचा अभिनय, नागराज अण्णाच दिग्दर्शन या जोडगळीकडून खूप अपेक्षा होत्या. त्यातला मेसेज उत्तम होता, पण संकलन, वेग, आणि पटकथेतील उणिवा यामुळे ‘झुंड’ सिनेमा पकड घेऊ शकला नाही.
हिंदी असो मराठी अथवा इतर भारतीय भाषा, हॉलिवुडसोबत तुलना केली तर त्यांच्या निम्मेही खेळपट आपल्याकडे नाहीत. संपूर्ण जगात इंग्रजी सिनेमे बघितले जात असल्याने, बिझनेस मिळण्याची हमी असते, शिवाय त्यांच्याकडे जिवंत क्रीडा संस्कृती आहे. याउलट आपल्याकडे ‘पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब’ ही मानसिकता दृढ आहे. तरी आता परिस्थिती बदलते आहे. गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमांनी अनेक खेळांना ग्लॅमर मिळवून दिलं. खेळातून उत्तम करियर करता येतं, पैसे मिळवता येतात यावर तरुण पिढीचा विश्वास बसू लागला आहे. आवडीसाठी खेळ आणि त्यातून आपसूक झालेलं करियर जेव्हा आपलं कल्चर होईल, तेव्हा खाशबा जाधव, मेजर ध्यानचंद, पी. टी. उषा, बायचुंग भुतिया, अभिनव बिंद्रा या नामावलीत अखंड भर पडत राहील आणि हॉलिवुडसारखी खेळांवर आधारित उत्तमोत्तम सिनेमांची लाट आपल्याकडेही येईल.
चक दे इंडिया!