रमेश रावळकर यांच्या ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीतील एक अंश… ‘कस्टमर’च्या मनात प्रेमाची आणि वासनेची कारंजी फुलवणार्या, देखण्या दिसणार्या बारबालांच्या व्यक्तिगत आयुष्यात केवढा कभिन्न काळोख भरलेला असतो, त्यावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारा!
—-
हसिना सांगू लागली, ‘‘शांती कोण आहे? काय झालं तिचं?’’ अर्जुन मधीच बोलला.
शांती अत्यंत रूपवान होती. ती मुंबईला बारमधी नोकरी करायची. कस्टमर तिला धडकन म्हणून हाक मारायचे. शांती बारमधी आल्यावर सगळीकडं उत्साहाची लहर उमटायची. तिनं गाण्यावर ठेका धरताच पैशांची बरसात व्हायची. यामुळे शांतीला खूप पैसा मिळाला. देखण्या शांतीचा पार्लर, शॉपिंग, पार्ट्या यातच सगळा पैसा खर्च व्हायचा. टिपच्या पैशातून तिनं एक घर विकत घेतलं. रोजच्या रोज हातात खेळणारा पैसा आणि ऊर्मीत जगणारी शांती पैसा काही मानत नव्हती. कित्येक कस्टमरनं शांतीला लग्नाची मागणी घातली. मात्र मागणीला भीक घालेल, ती शांती कसली? तिला स्वत:वर गर्व चढला होता. पण वय उतरू लागल्यावर कस्टमर तिला टाळू लागले. हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. हवेवर स्वार असणारी शांती हळूहळू खाली उतरली. या वयात सोबत हवी म्हणून. ती एका थिएटर मालकासोबत राहू लागली. तो शांतीला हॉटेलमधी जाऊ द्यायचा नाही. ती हॉटेलमधी जाण्यासाठी तळमळायची. एक दिवस दोघात कडाक्याचं भांडण झालं. त्यानं शांतीच्या कानाखाली ठेवून दिली. त्यामुळं शांती भयंकर चिडली. रागाच्या भरात तिनं त्याला लाथाबुक्क्यानं तुडवलं. त्याला हा अपमान सहन झाला नाही. नशेत तो घराबाहेर पडला. कार नीट चालवता न आल्यानं त्याचा मोठा अपघात झाला. दवाखान्यात त्याला वाचविण्याचे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, अखेर तो मेला. आता शांती एकटी पडली होती. ती घरीच विचार करत बसायची. बरेच दिवस कामावर न गेल्यानं.
हॉटेल मालकानं तिला काढून टाकलं.
शांतीनं मुंबईतल्या अनेक हॉटेलच्या पायर्या झिंजवल्या. पण वाढत्या वयानं तिला कोणताच लेडीज बारवाला काम देत नव्हता. मुंबईत अनेक डान्स बार होते. त्या गु्रपला जॉईन व्हावं तर शांतीला गाता येत नव्हतं. टेबल सर्व्हिसला ती चालत नव्हती. शांतीजवळचा पैसा संपला. तिची खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. पोटाची आग बुझवण्यासाठी शांती वेश्या झाली. पन्नाशी सरल्यावर ती पुन्हा एकटी पडली. कस्टमरसुद्धा तिच्याकडं येत नव्हतं. एक दिवस शांतीनं जहेर खाल्लं. लग्न न करता मेलेल्या शांतीच्या शवाला मुंग्या लागल्या होत्या.
मीनानं डोळे पुसले. ते तिघंही हॉटेलमधून बाहेर आले. हॉटेल मॅनेजर या तिघांकडं पाहत होता. हसिना आणि अर्जुनला रिक्षात बसवायला मीना बाहेर आली. अर्जुन कोणाशीच बोलत नव्हता. रिक्षातदेखील तो हसिनाकडं बघत नव्हता. शांतीच्या कहाणीचं प्रचंड ओझं त्याच्या डोक्यावर बसलं होतं. हसिनासुद्धा खामोश होती. चालत्या रिक्षातून माणसांच्या गर्दीत तिचं एकटेपण तिला खात होतं. डोक्यावरच्या ओझ्यानं अर्जुनचं अंग आणखीनच जड होऊ लागलं.
दुपारी हसिना हॉटेलवर गेली नाही. तिला फ्लॅटवर एकटं सोडून अर्जुनचा पाय निघत नव्हता. पन्नास हजार रुपयाचं जुगाड जमविण्यासाठी तो हसिनाला रेश्माचा पत्ता मागत होता; पण रेश्माचा थांगपत्ता तर लागला नाही. उलट हसिनाच्या भेटीनं बारबालांच्या दु:खी जीवनाचा आरसा पाहायला मिळाला. तो पाहून अर्जुनला स्वत:च्या नोकरीचा विसर पडला.
‘‘समझा, दुख किसे कहते हैं? कैसे जिते हैं हम लोग? आज तुझे दिखा दिया और तुझे एहसास भी हुआ।’’- हसिना
अर्जुन सुन्न डोक्यानं खाली बसला.
हसिना आता शांत झाली होती. ती खिडकीतून बाहेर पाहत उभी होती. दुपारच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. एक भंगारवाला माणूस भंगारची गाडी लोटत पुढं चालला होता. अर्जुन उठला, तो पाठमोर्या हसिनाच्या मागं उभा राहिला. तिनं वळून पाह्यलं नाही. त्यानं तिच्या खांद्यावर मोठ्या विश्वासानं थोपटलं. ती हात बाजूला करेल; पण तिनं केला नाही. हसिना अजूनही खिडकीतून बाहेर पाहत होती. खरं तर तिला आता आधाराची नितांत गरज होती. खांद्यावरून हात काढल्यावर तिनं मागं वळून बघितलं. अर्जुन तिथंच उभा होता. एकही शब्द न बोलता हसिना आतल्या खोलीत गेली, आणि तिनं स्वत:ला अंथरुणावर झोकून दिलं. बराच वेळ झाला, ते दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. ऐश्वर्यातून आल्यापासून हसिनानं खामोशीची चादर पांघरली होती. क्षणभर वाटलं तिला झोपू द्यावं आणि गुपचूप तिथून निघून जावं. पण न सांगता बाहेर पडणं अर्जुनला बरं दिसत नव्हतं. त्यानं `हसिना हसिना’ म्हणून दोनदा हाका मारल्या. तिनं उत्तर दिलं नाही. अर्जुन विचार करू लागला. केवढा मोठा दु:खाचा समुद्र मनात साठवून ह्या बारबाला जगतात. एखाद्या कस्टमरनं जीव लावला तर त्याला आयुष्य वाहून टाकतात. मात्र कस्टमरची जातही पुरुषच! ती नेहमी पायाजवळ बघणारी. हवं तेवढं ओरबडणारी. कुचकरणारी हवं ते मिळालं, की ते कधीच तिच्या घराची पायरी चढत नाहीत. विचारांची कुरघोडी अर्जुनला खाली दाबू लागली होती. शेवटी तो मोठ्या हिंमतीनं उठला. हसिनाच्या जवळ गेला. क्षणभर त्याला काही सुचलं नाही. पण त्यानंतर त्यानं तिचं डोकं मांडीवर घेतलं. ती शांत पडून होती. अर्जुनला वाटलं जवळ गेल्यावर हसिना रागानं दूर लोटून देईन. अथवा झिडकारून टावâेल. रागावेल. मारेल पण तिनं तसं काही केलं नाही. उलट कपाळावर हळूवार थोपटल्यानं तिला दाटून आलं. मग अर्जुनलाही कळलं नाही, की त्याच्या डोळ्यातून नितळ थेंब केव्हा तिच्या दोन्ही पापण्यांवर पडले ते?
दिवस कलला होता. अर्जुनला निघायचं होतं. पैशाची सोय लावावी म्हणून इथपर्यंत आलेल्या, अर्जुनला बारबालाच्या दु:खानं सोलून काढलं होतं. जगण्याला कोणाचाही आधार नसलेल्या बारबाला महाकाय दु:खाला ठोकर मारत. रोजचं जगणं कस्टमरची सर्व्हिस करत आनंदी करायच्या. फरशी, टेबल पुसून ध्येयापर्यंत पोहचलेला अर्जुन केवळ डोनेशनमुळं अंधाराच्या खाईत पडला होता. हे जगणं त्यानं उराशी एवढं कवटाळून घेतलं होतं की, स्वत:च्या दु:खापुढं दुसर्याचं दु:ख त्याला हलकं वाटायचं. मात्र शांतीच्या आणि वैशालीच्या वैâफियतनाम्यानं अर्जुनला भुईवर आणलं. बारबालाचा अखेरचा काळ अतिशय क्लेशदायक होता. मोजक्याच बारबाला पैशाचा योग्य वापर करायच्या. कुटुंब नसल्यानं भविष्याकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन उदासीन असायचा. रेश्मासोबत काम करताना अर्जुन नेहमी तिला बोलायचा; पण ती ‘‘मेरा कौन है? जिसके लिये कुछ बचाके रखु?’’ असं बोलून ती नेहमी त्याला टाळायची. हसिनाचंही मागं पुढं कोणी नव्हतं?
अर्जुननं बेसिनच्या नळावर तोंडावर पाण्याचे शिपकारे मारले. आरशात बघून त्यानं कंगवा फिरवला. तोच दरवाज्यावर बेल वाजली.
‘‘आपको मॅनेजर ने बुलाया है।’’
हॉटेलमधून आलेला हेल्पर हसिनाला म्हणाला.
हेल्पर अर्जुनकडं संशयानं पाहू लागला. तो हसिनाजवळ गेला आणि हळूच तिच्या कानाजवळ बोलला –
‘‘आप लोग हॉटेल ऐश्वर्या गये थे?’’
‘‘तुझे कैसे पता चला?’’ हसिनानं हेल्परला विचारलं.
‘‘ऐश्वर्या के मॅनेजर का फोन आया था। इसलिये तो भेजा मेरे को, तुम दोनो को बुलाया हॉटेल पर।’’
हेल्परनं दोघांचे नाव घेतल्यावर अर्जुन हसिना एकमेकांकडं बघू लागली. कशासाठी आलोय अन् हे काय होऊन बसलंय इथं दुसरंच झंजट मागं लागलंय. अर्जुननं कोणता गुन्हा केला नव्हता मग त्याला हॉटेलवर बोलवण्याचं कारण समजत नव्हतं. खरं तर अर्जुननं हसिनासोबत ऐश्वर्या हॉटेलमधी जाणं, मॅनेजरला खपलं नव्हतं. ऐश्वर्याच्या मॅनेजरनं कोणी मुलगा हसिनासोबत गुलछरे उडवत फिरतोय. असं सांगितलं. हेल्पर दोघांना
हॉटेलवर घेऊन गेला. हॉटेलमधी कोणी कस्टमर नव्हतं. हे पाहून अर्जुननं सुटकेचा श्वास सोडला. कारण मॅनेजरनं त्याला कस्टमरसमोर बोलायला कमी केलं नसतं.
‘‘तू आमच्या पोरीसोबत कसा काय फिरतो?’’ मॅनेजरनं अर्जुनला दरडावून विचारलं.
अर्जुनला काहीच उत्तर देता आलं नाही. तो शांत बसला. अर्जुन बोलत नाही म्हटल्यावर मॅनेजर मोठ्यानं बोलू लागला. आवाजानं वेटर, हेल्पर बारबाला सगळे गोळा झाले.
‘‘ड्युटीवर नसल्यावर हसिनानं काय करावं? काय करू नये, हा तिचा प्रश्न आहे.’’ अर्जुननं तोंड उघडलं.
‘‘वकील साहब, हमे ज्ञान मत सिखाओ, हमारे कान में बिडी नही है। ये सब बारबाला की जिम्मेदारी हमारे उपर है।’’
मॅनेजर आता ऐकणार नाही. हे पाहून गप्प असलेल्या हसिनानं बोलायला सुरुवात केली.
‘‘ए मॅनेजर, खोपडी गरम मत कर। क्यूं उसे डाट रहा है तू? उसे, मै साथ लेकर गई थी। तुझे क्यूं इतनी तकलीफ हो रही है? पता है मुझे । तुझे भाव नही देती, इसलिये तेरी जल रही होगी।’’
अर्जुन हसिनाला शांत करू लागला. ती ऐकण्याच्या पावित्र्यात नव्हती. तिच्या तोंडाचा पट्टा सुटला होता. मॅनेजरसुद्धा तिला बोलू लागला. तेव्हा हसिनानं मला इथं काम करायचं नाही. ‘‘चली मैं मुंबई।’’ असं म्हणताच मॅनेजर शांत बसला. ती
हॉटेल सोडून गेल्यावर हॉटेलचं कस्टमर तुटलं असतं हे तो जाणून होता. आणि तसं झालं तर मॅनेजरला शेठचा ओरडा खावा लागणार होता. शेवटी संतापलेल्या हसिनाची मॅनेजरनं माफी मागितली. तो शांत झाल्यावर बारबाला हसिनाला स्टाफ रूममधी घेऊन गेल्या. वेटर, हेल्पर निघून गेले. अर्जुन अजून तिथंच उभा होता.
मॅनेजरनं त्याच्याकडं पाह्यलं तो पुन्हा संतापला – ‘‘तू अब खाना खाकर जायेगा? क्या तुझे भी कुछ बोलना है?’’
अर्जुन सॉरी म्हणत हॉटेलचा जिना उतरू लागला.