• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अन कॉमन मॅन!

- मुकेश माचकर (दिवाळी अंकांतील वेचक-वेधक)

मुकेश माचकर by मुकेश माचकर
December 1, 2021
in दिवाळी 21 धमाका
0
अन कॉमन मॅन!

मधुवंती सप्रे यांनी संपादित केलेल्या ‘अक्षरगंध’ दिवाळी अंकात बहुआयामी कलावंत, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या कलाकारकीर्दीचा आढावा घेणारा विशेष विभाग हे एक मोठे आकर्षण आहे. कमलाकर नाडकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे, प्रभाकर कोलते, संध्या गोखले आदींनी पालेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. त्यातील पालेकरांच्या चित्रपट अभिनय कारकीर्दीचा वेध घेणारा हा एक लेख.
—-

‘जिथे पंजाबी लॉबी भक्कम होती, इतर कोणत्याही प्रांताचा अभिनेता टिकूच दिला जात नव्हता, त्या हिंदी चित्रपटसृष्टीत मी घुसू शकलो, टिकलो, याचं मुख्य कारण म्हणजे मला तिथे जायचंच नव्हतं… कोणत्याही अपेक्षांचं बॅगेज न घेता मी वाट चालत राहिलो, ती आपोआप उलगडत गेली… मात्र, माझ्या यशामागे विचारही होता आणि मेथडही… अर्थात, आज असं वेडं साहस करण्याचा सल्ला मी कोणालाही देणार नाही.’
– अमोल पालेकर
—-
अमोल पालेकर हे नाव घेतल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आठवतात…
एम. एफ. हुसेनसारख्या जागतिक ख्यातीच्या भारतीय चित्रकाराला पालेकरांच्या रूपाने भारताने गमावलेला एक प्रॉमिसिंग चित्रकार आठवायचा… ते भेटल्यावर त्यांना तसं सांगायचेच नेहमी.
मराठी प्रायोगिक नाट्यधर्मींना एखाद्या व्रताच्या निष्ठेने सतत प्रायोगिक रंगभूमीवरच काम केलेला, हयवदन, आधे अधुरे, शांतता कोर्ट चालू आहे अशा सरस कलाकृती देणारा, हिंदी सिनेमात व्यावसायिक यशाच्या शिखरावर असतानाही संध्याकाळी प्रायोगिक नाटकासाठी हजर होणारा प्रखर नाट्यजाणीवांचा रंगधर्मी आठवेल.
जागतिक पातळीवरच्या सकस, अभिजात कलाकृतींवर पोसलेल्या प्रेक्षकांना दिग्दर्शक अमोल पालेकरांच्या आशयघन चित्रपटांची आठवण होईल.
सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना ठोस समाजभान असलेला आणि न पटणार्‍या गोष्टींवर बोलायला न कचरणारा एक दुर्मीळ कलावंत आठवेल…
…पण, अमोल पालेकर हे नाव घेतल्यावर देशभरातल्या सर्वसाधारण चित्रपट रसिकांना आठवणार तो त्यांनी साकारलेला निरागस, भाबडा, मध्यमवर्गीय नायक, त्याचे हलकेफुलके, रोमँटिक, माफक स्वप्नरंजक सिनेमे आणि त्यातला त्यांचा अतिशय सहज, तरल वावर… साक्षात अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनच्या युगात, त्याच्या झंझावाताने जिथे सुपरस्टार राजेश खन्नाचा पालापाचोळा करून टाकला होता, तिथे त्याच्या सिनेमांसमोर घवघवीत यश कमावणारे मध्यममार्गी सिनेमे देणारा त्यांचा नायक म्हणजे एक चमत्कार होता…
हा चमत्कार कसा झाला? अमिताभच्या पडदा व्यापून शतांगुळे वर उरणार्‍या अँग्री यंग मॅनसमोर पालेकर यशस्वी कसे झाले?
अमिताभ आणि अमोल पालेकर हे एका काळाचे दोन उद्गार होते.
एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.
—-
पालेकर एका मुलाखतीत म्हणाले की कोणीतरी एक समकालीन अभिनेता म्हणाला होता, इसको आप लोग अ‍ॅक्टर कैसे कहते हो? ये अ‍ॅक्टिंग कहाँ करता है?
ती सगळ्यात मोठी कॉम्पिमेंट होती त्यांना!
ते अभिनेते आहेत, अभिनय करतायत, असं सर्वसामान्य प्रेक्षकांना वाटणंच शक्य नव्हतं… तो काळ नाट्यमय, मेलोड्रॅमॅटिक अभिनयाचा होता. पालेकरांचा अभिनय अंडरप्लेच्या धाटणीचा. तसा अंडरप्ले करणारे मोतीलाल, बलराज साहनी यांच्यासारखे थोर अभिनेते हिंदी सिनेमाने पाहिले होतेच, पण ते मुख्य नायक क्वचितच होते- कायम सहाय्यक भूमिकांमध्ये सहजाभिनय करत राहिले… हा अभिनयच नाही असं वाटायला लावण्याइतका सहज अभिनय पालेकरांच्या माध्यमातून मध्यवर्ती भूमिकेत आला, त्याला पालेकरांइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदार होते बासू चटर्जी आणि नंतर हृषिकेश मुखर्जी… आणि त्या दोघांबरोबर तेवढीच निर्णायक भूमिका होती त्या काळाची…
…अमिताभ बच्चन हे त्या काळाचं एक अपत्य होतं आणि अमोल पालेकर हे दुसरं… एका अर्थी यिन आणि यँग होते ते त्या काळाचे आणि हिंदी सिनेमाचे (चिनी तत्त्वज्ञानात यिन आणि यँग ही दोन परस्परविरोधी पण परस्परपूरक तत्त्वं विश्वाचा समतोल राखण्याचं काम करत असतात).
म्हणजे काय, हे कळण्यासाठी तेव्हाचा सिनेमाही समजून घ्यायला हवा आणि समाजही.
१९७०च्या दशकाच्या पाचेक वर्षं आधीपासून हिंदी सिनेमात बदलाचे वारे वाहायला लागले होते. दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर ही त्रयी आता म्हातारी व्हायला लागली होती. तिचे सिनेमे पाहणार्‍या प्रेक्षकांचा भारतीय स्वातंत्र्याकडून असलेला स्वप्नाळू आशावाद ध्वस्त होण्याच्या वाटेवर होता. तरुणाईच्या कल्पना आदर्शवादाकडून व्यवहारवादाकडे झुकत चालल्या होत्या. शम्मी कपूर हा त्या पिढीचा प्रतिनिधी होता. त्याने प्रेम जमिनीवर आणलं, त्याला ठोस शारीर अर्थ दिला. प्रेमात ‘वासना’ निसर्गत: असते, तीही सुंदर असते, याचं भान दिलं आणि सद्गुणांचा पुतळा नसलेला रांगडा, प्रसंगी रासवट, स्खलनशील नायक (जो देव आनंदने अधून मधून साकारला होता, पण अति‘गोड’ शैलीत) प्रेक्षकांपुढे आणला. त्याच्यात तरुणाईला त्यांचा नवा नायक गवसत होता, पण दुर्दैवाने तो चाळिशीकडे झुकला होता आणि वजनाने आधीच पन्नाशीत पोहोचला होता. अशात राजेश खन्ना नावाची झुळुक आली आणि तिने शम्मी कपूरचं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकलं. पलायनवादी रोमँटिक सिनेमांची एक संगीतमय दुनिया राजेश खन्नाने काही काळासाठी जोरदार उभी केली. पण तो दिलीप-देव-राज त्रयीच्या वळणाच्या प्रेममय, शोकात्म सिनेमांचा शेवटचा आचका होता… प्रेक्षक सिनेमे फक्त स्वप्नरंजनासाठी पाहतात, त्यांना काही घटका त्यांचं नेहमीचं आयुष्य विसरायचं असतं, मनोरथांच्या नगरीत रमायचं असतं, हा सिद्धांत गदगदा हलवला तो सलीम जावेद या लेखकद्वयीने आणि त्यांना साथ होती प्रकाश मेहरा, यश चोपडा यांच्यासारख्या नव्या पद्धतीने विचार करू पाहणार्‍या दिग्दर्शकांची. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाचा प्रेक्षक स्वप्नरंजनासाठीच सिनेमा पाहतो, पण त्या स्वप्नांचा त्याच्या वास्तवाशी काहीतरी ताळेबंद जुळावाच लागतो. त्या काळातल्या अस्वस्थतेचा, स्फोटक असंतोषाचा सगळा दारूगोळा सलीम-जावेद यांनी त्यांच्या अँग्री यंग मॅनमध्ये भरला आणि तो संपूर्णपणे रिचवून, आत्मसात करून अमिताभ बच्चन या अद्भुत अभिनेत्याने त्यांचा मानसपुत्र ‘विजय’ पडद्यावर जिवंत केला… त्याच्या वावटळीत जिथे साक्षात राजेश खन्नाचाही धुरळा होऊन उडाला, तिथे धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर वगैरे मंडळींची काय गणती… ती फळकुटं धरून जेमतेम तगून राहिली आणि त्यांनाही अँग्री यंग मॅनच्या झेरॉक्स नकला माराव्या लागल्या… सगळ्या प्रस्थापित नायकांनी अमिताभसमोर शस्त्रं टाकून दिली असल्याच्या वातावरणात हिंदी सिनेमाच्या नायकाचा एकही गुण नसलेला अमोल पालेकर हा अभिनेता एवढा लोकप्रिय कसा होऊ शकला?
खुद्द पालेकरांनीही त्याची मिमांसा केली आहे. अमिताभ एकहाती ३० गुंडांना लोळवायचा. लोकांच्या मनात दडलेल्या असंतोषाला त्याच्या त्या घनगंभीर, खर्जदार आवाजात वाचा फोडायचा, ते सगळ्यांना फार आवडायचं. राजेश खन्ना ज्या अदेने प्रेम करायचा ते पाहिल्यावर तरुणींच्या हृदयाचं पाणी पाणी होऊन जायचं. धर्मेंद्रकडे सशक्त शरीर, आरडाओरड्यासाठी सक्षम फुप्फुसं आणि ओरिजिनल ढाई किलो के हाथ होते. जितेंद्रच्या नाचाच्या अदेवर पब्लिक फिदा होतं… पालेकरांकडे यातलं काहीही नव्हतं… पण प्रांजळपणा होता… तो त्यांच्या व्यक्तिरेखांच्या डोळ्यांमध्ये दिसायचा, चेहर्‍यावर दिसायचा. मी उपरोल्लेखित गोष्टींपैकी काहीही करू शकत नाही, मी काही देखणा वगैरेही नाही, अगदी साधा माणूस आहे, तुमच्यातलाच, तुमच्यासारखाच, असं त्यांना संवादातून सांगावं लागायचं नाही, त्यांच्या दिसण्यातून, पडद्यावरच्या वावरातून आपोआप दिसायचंच.
प्रेक्षकांना एकीकडे त्यांना जे अशक्य होतं, पण व्हावंसं वाटत होतं, ते पडद्यावर साकारून दाखवणारा अमिताभ बच्चन मिळालेला होता; मात्र, थिएटरातून बाहेर पडल्यानंतर अर्धापाऊण तासात जोश ओसरल्यावर होश यायचा आणि लक्षात यायचं की आपल्या आसपासचं वास्तव काही इतकं सोपं नाही, अँग्री यंग मॅन फक्त पडद्यावरच सोडवणूक करू शकतो प्रश्नांची. त्यातून मनात तयार होणारी निराशेची पोकळी भरायला अमोल पालेकरांचा नायक हजर झाला… आपल्यासारखाच दिसणारा, बस, ट्रेनने प्रवास करणारा, साधे कपडे घालणारा, चोपून भांग काढणारा, किरकोळ देहयष्टीचा, किरकोळ आवाजाचा- आयुष्यात छोटे छोटे प्रश्न पडणारा आणि त्यांची आपल्या आवाक्यातली उत्तरं शोधणारा… जमिनीवर राहणारा आणि प्रेक्षकाला जमिनीवर ठेवणारा… अमिताभचा थेट व्यत्यास… त्या यिनचा यँग!
—-
‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’, ‘चितचोर’…
तीन छोटे सिनेमे.
तीन सुपरहिट सिनेमे.
पदार्पणातच तीन लागोपाठ रौप्यमहोत्सवी सिनेमे.
अमोल पालेकरांची हिंदी सिनेमातली एन्ट्री ही अशी धमाकेदार होती… हे सिनेमे अशा प्रकारे हिट झाले नसते तर पालेकर सर्वसामान्य हिंदी प्रेक्षकांच्या स्मरणपुस्तिकेत सोनेरी पानावर विराजमान नसते… त्यातही छोट्या सिनेमांचं यश मोठं असतं. ते कुणी अपेक्षिलेलं नसतं. असा सिनेमा रौप्यमहोत्सव करतो तेव्हा व्यावसायिक सिनेमाच्या कितीतरी पटींनी अधिक यशस्वी असतो.
अर्थात, आता ही यादी मांडून केवढं जबरदस्त पदार्पण असं म्हणता येतं, तेव्हा ते इतकं सोपं नव्हतं… ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले, असं काही पालेकरांच्या बाबतीत झालं नव्हतं… बासू चटर्जींचा सिनेमाच नसलेला सिनेमा आणि त्यातला नायकच नसलेला नायक मिळून गल्लापेटीला आग लावणार आहेत, अशी काही कोणाला कल्पना नव्हती… किंबहुना रजनीगंधा विकण्यासाठी बासुदा आणि सिनेमाचे निर्माते सुरेश जिंदाल यांना डोक्यावर रिळं घेऊन फिरायला लागलं होतं वितरकांच्या दारोदार… थोडी थोडकी नाही, दीड वर्षं.
…तरीही मुळात बासू चटर्जी असा, व्यावसायिक सिनेमाचा एकही मसालेदार घटक नसलेला सिनेमा बनवू शकले होते, हे महत्त्वाचं. हाही त्या काळाचा गुण. त्या काळात जो टिपिकल हिंदी सिनेमा होता, त्याचे कर्तेही सामाजिक भान असलेले लोक होते. नंतर रोमान्सचे बादशहा वगैरे बनलेले यश चोपडा काय किंवा त्यांचे मोठे भाऊ बी. आर. चोपडा काय, हे सामाजिक विषयांवर आधारलेले, सुधारकी विचारांचे सिनेमे बनवत होते सुरुवातीच्या टप्प्यात. सगळ्याच मसालापटांमध्ये तोंडी लावायला का होईना, आदर्शवाद होता, शांती, समता, बंधुतेचा समाजवादी विचार असायचा. व्यावसायिक हिंदी सिनेमांचे बहुतेक लेखक हे कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित होते, प्रोग्रेसिव्ह रायटर्सच्या चळवळीचा भाग होते, इप्टाच्या नाट्यचळवळीत त्यांचं भरणपोषण झालेलं होत्ां. पडद्यावर दोन मिनिटांपूर्वी काश्मीर की हसीन वादियों में नवनवीन स्वेटर घालून देखण्या नायिकेचं सुरेल गाण्यातून प्रणयाराधन करणारा गोराचिट्टा नायकही संवादात अचानक गरीब की भूख, मजदूर का हक वगैरे बोलायला लागायचा, तेव्हा ते विसंगत वाटायचं नाही. अशा सजग मंडळींचा नाट्यचळवळीशी निकटचा संबंध होता. दिलीप कुमारपासून अनेक मंडळी हिंदी-मराठी नाटकांना आवर्जून हजेरी लावायची. बासू चटर्जी, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी हे प्रायोगिक नाटकांना हजर असायचे. बासू चटर्जी हे फिल्म फोरम या सकस सिनेमाचळवळीचे अध्वर्यू. पालेकर प्रायोगिक नाटकवाले (ते नाटकवाले कसे झाले, हा अभूतपूर्व किस्सा पुढे येईलच). त्यांच्या नियमित भेटीगाठी होत असत. चर्चा होत असत. ही मंडळी सिनेमा करताहेत, आपण नाटक करतोय, तर भविष्यात यांच्यातला कोणी आपल्याला चमकवेल, असा विचारही त्यात नसल्याने त्या निकोप, मोकळ्याढाकळ्या चर्चा होत.
मूळ मुद्दा असा की हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहाच्या पोटातच या अशा, वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या वाटेच्या, साध्या माणसांच्या सिनेमांना जागा होती. हृषिकेश मुखर्जी, गुलजार, के. ए. अब्बास, एम. एस. सत्यू यांच्यासारखे लोक त्या वाटेवर निघालेले होतेच… बासू चटर्जीही या वाटेवर आले… त्यांना पालेकरांमध्ये त्यांचा नायक दिसला… पण तो त्यांना पहिल्याच सिनेमात मिळाला मात्र नाही…
…पालेकरांची सिनेमातली अभिनय कारकीर्द सुरू होते राजा ठाकूर दिग्दर्शित बाजीरावाचा बेटा या सिनेमापासून. ‘नाचत नाचत गावे’, ‘टिपूर टिपूर’, ‘एकतारीसंगे,’ ‘हे असेच स्वप्न राहू दे’ या गदिमांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपुरतीच ओळख शिल्लक राहिलेल्या या सिनेमाबद्दल इतर माहिती फारशी मिळत नाही. त्यानंतर शांतता कोर्ट चालू आहे या विजय तेंडुलकरांच्या नाटकावर सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमातही पालेकर होते. रजनीगंधा त्यानंतर तीन वर्षांनी आला. पालेकरांचा स्वाभिमान आडवा आला नसता तर ते ‘पिया का घर’मधून, जया भादुरीचा नायक बनून हिंदीच्या प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा आले असते आणि अमिताभबरोबरच्या व्यत्यासी समीकरणात आणखी एक भर पडली असती. हा सिनेमा राजा ठाकूरांच्या ‘मुंबईचा जावई’ या हिट सिनेमावर बेतलेला. राजाभाऊ पालेकरांना गुरूस्थानी. बासू चटर्जींनी त्यांना विचारलं तेव्हा नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पण बासुदा म्हणाले, ताराचंद बडजात्यांना ‘जाऊन भेट.’ बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्शन्सचीच ती निर्मिती होती. पालेकर म्हणाले, तुम्ही दिग्दर्शक आहात. तुम्ही मला नायक म्हणून निवडलं आहे. माझी निर्मात्याशी ओळख करून देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही मला सन्मानाने त्यांच्याकडे न्या आणि हा आपला नायक, अशी ओळख करून द्या. मी काही त्यांच्याकडे काम मागायला चाललेलो नाही, इतर नवोदितांच्या रांगेत बसून मी त्यांना भेटणार नाही.
झालं. गाडं तिथे फिस्कटलं.
पण बासुदांचा मोठेपणा असा की त्यांनी पालेकरांचा राग धरला नाही, त्यांना पुढे रजनीगंधा ऑफर करताना ते अडखळले नाहीत. पालेकरांनीही रजनीगंधा स्वीकारताना आधीच्या अनुभवाची कटुता बाजूला ठेवून पाटी कोरी केली.
यही सच है ही मन्नू भंडारी यांची कथा आज वाचतानाही तिच्यात कोणाला हिंदी सिनेमाची शक्यता दिसू शकते, याचं आश्चर्य वाटतं… तेव्हा तर अशी कल्पना सुचणंच अशक्यप्राय होतं… बासुदांनी ही कथा पालेकरांना दिली आणि सांगितलं की यावर मी सिनेमा करतोय, तुझा नायकाच्या भूमिकेसाठी विचार करतोय. वाच आणि कळव.
पालेकरांनी कथा वाचली. त्यांना ती आवडली. त्यांनी होकार दिला. नवी नायिका विद्या सिन्हा, पालेकर आणि दिनेश ठाकूर यांना घेऊन बासुदांनी त्यांच्या पद्धतीने सिनेमा बनवला. पण तो विकणार कसा?
बासुदा आणि जिंदाल वितरकांकडे जायचे, तेव्हा टिपिकल संवाद व्हायचे.
नायक कोण आहे? अमोल पालेकर.
अमोल पालेकर, हे नाव आहे नायकाचं? (तेव्हा अमुक कुमार, ढमकेंद्र, तमुक खन्ना, अमुक चोपडा अशा नावांची चलती होती. त्यात मराठी नावाचा नायक. तोही नाव-आडनाव दोन्ही घेऊन वावरणारा? पालेकरांनाही नाव बदलण्याचा आग्रह झालाच होता. त्याला ते बधले नाहीत. सिनेमा कामावर चालणार, नावामुळे चालणार नाही, नावामुळे पडणार नाही, सबब नाव बदलणार नाही, हा त्यांचा खाक्या.)
बरं, नायिका कोण आहे?
विद्या सिन्हा. तीही नवी मुलगी आहे.
हरे राम, तीही नवीनच. बरं मग व्हिलन तरी नावाजलेला आहे का एखादा तगडा.
नाही. सिनेमात व्हिलनच नाही.
अरे, मग असा सिनेमा मुळात बनवलातच कशाला? कोण पाहायला येणार तुमचा सिनेमा?
दार बंद.
हा प्रकार होत होत अखेर १९७४ साली सिनेमा रिलीझ झाला आणि तो आधी हिट, मग सुपरहिट झाला. पाठोपाठ १९७६ला बासुदांचाच छोटी सी बात आला आणि त्याच वर्षात चितचोर आला. हे तिन्ही सिनेमे लागोपाठ आले, हिट, सुपरहिट झाले तेव्हा हिंदी सिनेमावाल्यांच्या लक्षात आलं की अमोल पालेकर नावाचा कोणी अवतार सांप्रति अवतरला आहे पडद्यावर.
कारण, रजनीगंधाचं यश फ्लूक मानलं गेलं होतं. ते स्वाभाविकही होतं. एक नायिका, दोन नायक. सगळेच मध्यमवर्गीय. तिचं मन दोघांकडेही ओढ घेतंय आणि काय करावं, कुणाला निवडावं असा तिला प्रश्न पडलाय, अशी कथा. तिच्या त्या दुविधेतून फिल्मी नाट्य किती निर्माण होणार? त्यात शैली वास्तवदर्शी. रस्त्यांमध्ये, बसमध्ये, गर्दीत, साध्या घरांमध्ये चित्रित झालेला सिनेमा. शून्य ग्लॅमर. नायक ‘सामान्य’ चेहर्‍याचा, साध्या आवाजाचा. संवाद पल्लेदार नाहीत, नाटकी नाहीत. सगळे घरगुती भाषेत बोलणारे लोक. हे असलं काहीतरी क्वचित लोकांना रुचिपालट म्हणून चालून जातं. ‘खरा व्यावसायिक सिनेमा’ म्हणजे लार्जर दॅन लाइफ, अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन. लोकांना दुष्टांची धुलाई करणारा दैवी शक्तीवाला हिरो पाहिजे. तो तर्रीदार तेजतर्रार तांबडा रस्सा, इथला हिरो म्हणजे फिकं वरण. कधीतरी आजारल्यासारखं वाटल्यावर लिंबू पिळून तुपाची धार सोडून खायला बरं वाटतं इतकंच.
पण हाच हिरो ‘छोटीसी बात’मध्ये पुन्हा आला, पुन्हा कुणाला अपेक्षा नसताना हिट झाला, सुपरहिट झाला. अरे यार, कुछ बात दिखती है इसमें, असं म्हणेम्हणेपर्यंत ‘चितचोर’ आला आणि हिंदी सिनेमाच्या भाषेत लागोपाठ तीन सिल्व्हर ज्युबिली हिट्स म्हणजे बोलाईच्या मटणाच्या तुडुंब गर्दीच्या खानावळीसमोर शुद्ध शाकाहारी, सात्त्विक थाळी देणारं हॉटेलही तेवढ्याच गर्दीत चालू लागलं…
हिंदी सिनेमावाल्यांची एक खासियत आहे… त्यांना यशाचा फॉर्म्युला हवा असतो… प्रत्येक यशस्वी होणारा सिनेमा वेगळं काहीतरी देणारा असतो म्हणून यशस्वी होतो, तरी त्यांना वाटतं की अरे वा, आता हा नवा यशाचा फॉर्म्युला; मग ते त्या यशस्वी सिनेमाच्या झेरॉक्स कॉप्या काढू पाहतात, ते यश कॅश करू पाहतात… इथे अमोल पालेकरांनी तीन लागोपाठ सुपरहिट सिनेमे दिले होते, एक वेगळ्याच शैलीचा सिनेमा आणि नायक रूढ करायला घेतला होता, आता आयत्या पिठावर हव्या तेवढ्या यशस्वी रेघोट्या मारणं शक्य होतं…
…पण, या मंडळींच्या लक्षात आलं नाही की अमोल पालेकर हे प्रकरण वेगळं आहे… या नायकाने पहिल्याच सिनेमात नाव बदललं नाही. तो विवाहित होता, त्याला एक मुलगी होती, हे मुलाखतींमधून लपवलं नाही. पहिल्या सिनेमाच्या यशाने हवेत जाऊन भाराभर सिनेमे साइन केले नाहीत. तो संध्याकाळी पार्ट्यांना जात नव्हता. तो दिवसभराचं शूटिंग संपलं की नाटकांकडे वळत होता. त्यातही गंमत अशी की तो मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ‘आणि अमोल पालेकर’ अशी पाटी रंगवून मध्यमवर्गीय नायक साकारून तिथेही गल्ला गोळा करत नव्हता. या नायकाने ठरवलं असतं तर कानेटकर, कालेलकर, दारव्हेकर, पणशीकर आदी मान्यवरांनी त्याच्यासाठी खास संहिता घडवून व्यावसायिक नाटकात त्याचं यश एन्कॅश केलं असतंच. पण, तो त्याच्या आवडत्या प्रायोगिक रंगभूमीवरच रमला होता… छापाचे गणपती विकण्याचा धंदा हा अभिनेता करणार नाही, हे सगळ्यांना कळलं त्याच्या चौथ्या सिनेमात.
तो होता ‘भूमिका’.
हंसा वाडकरांच्या ‘सांगत्ये ऐका’ या खुल्लमखुल्ला आत्मचरित्रावर आधारलेल्या या सिनेमात एक नायकाच्या वळणाने जाणारी भूमिका होती आणि दुसरी केशव दळवी ही व्यक्तिरेखा खलनायकी अंगाने जाणारी होती… हंसाबाईंच्या नवर्‍याची. सिनेमाची आखणी सुरू झाली तेव्हा श्याम बेनेगलांना वाटत होतं की केशवच्या भूमिकेत अमोल पालेकरांना घेतलं पाहिजे. पण त्यांचं नायक म्हणून घवघवीत यश पाहता ते ती भूमिका स्वीकारतील असं वाटलं नाही. त्यांना दुसरी भूमिका ऑफर झाली. संहिता वाचल्यावर पालेकर म्हणाले, मला केशव दळवी साकारायला आवडेल. श्यामबाबूंच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. सकारात्मक भूमिका अनंत नागकडे गेली.
व्यावसायिकदृष्ट्या ही डबल हाराकिरी होती. बासू चटर्जींचा सिनेमा नाही म्हटलं तरी व्यावसायिक सिनेमाच्या प्रेक्षकांना अपील होणारा होता. घरगुती वळण असलं तरी हलकाफुलका होता, नर्मविनोदी होता. छान संवाद, गोड प्रेम, गोड संगीत यांच्या साथीने साध्या माणसांच्या साध्या उलघाली सांगणारा होता- बेनेगलांचा सिनेमा बुद्धिगामी आणि तुलनेने किचकट, प्रेक्षकानुनय न करणारा- त्यातल्या व्यक्तिरेखा अनवट- रूढ व्यक्तिरेखांसारख्या न दिसणार्‍या- मुळात या सिनेमात काम करायची गरजच काय होती पालेकरांना? त्यातही निगेटिव्ह भूमिका? म्हणजे आतापर्यंतच्या यशावर स्वहस्ते माती लोटण्यासारखंच होतं… हा अविचार करू नकोस, मध्यमवर्गीय नायक बनून राहा, भरपूर सिनेमे कर, भरपूर पैसे कमाव, आम्हालाही कमावून दे, असं इथले शहाणेसुर्ते लोक पालेकरांना परोपरीने विनवत राहिले… पण पालेकरांनी ‘भूमिका’ केलाच… त्याने नायकपदाला तडा जाईल, असा विचारही त्यांनी केला नाही, कारण त्याची त्यांना फिकीर कुठे होती?
त्यानंतर अगर, टॅक्सी टॅक्सी, दामाद, सफेद झूठ या सिनेमांमध्ये त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे नायक साकारले… ‘टॅक्सी टॅक्सी’मध्ये ते चक्क मुंबईचा टॅकसी ड्रायव्हर बनले होते, अगरमध्ये मध्यमवर्गीय चौकटीपलीकडची व्यक्तिरेखा होती. या सिनेमांना आधीच्या सिनेमांइतकं झळझळीत यश मिळालं नाही. अमोल पालेकरांचं प्रारंभीचं यशच फ्लूक होतं का, त्यांच्या ‘मर्यादा’ त्यांनी ओळखल्या नाहीत का, त्यांच्या ‘चुकीच्या निवडीं’चा फटका बसला का, अशी चर्चा तेव्हा चालू झाली असणार… मात्र, १९७९ साली बासू चटर्जींचा ‘बातों बातों में’ आला आणि पाठोपाठ हृषिकेश मुखर्जींचा एव्हरग्रीन ‘गोलमाल’. या दोन सिनेमांनी पुन्हा एकदा अमोल पालेकरांची लाट उसळवून दिली… सगळ्या शंकाकुशंका झळझळीत यशाने धुवून काढल्या… गोलमालने तर पालेकरांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळवून दिला… आज देशातल्या आजवरच्या अव्वल हलक्याफुलक्या सिनेमांमध्ये ‘गोलमाल’चं स्थान फारच वरचं आहे…
…त्यानंतर पालेकर हिंदी सिनेमात १९८६पर्यंत सलग अभिनय करत राहिले… पण त्यांच्या पदार्पणाची चित्रत्रयी आणि हे दोन सिनेमे यांच्याइतकं मोठं यश गल्लापेटीवर मिळालं नाही. घरोंदा हा एक वेगळा अपवाद असावा. ‘अपने पराये’, ‘रंगबिरंगी’, ‘नरम गरम’, ‘जीवनधारा’, ‘श्रीमान श्रीमती’ असे काही सिनेमे व्यवस्थित चालले, पण त्यातले काही ऑन्साम्ब्ल कास्ट म्हणतात तसे अनेक लोकप्रिय कलावंत एकत्र असलेले होते. त्यात पालेकरही होते, पण ते संपूर्णपणे पालेकरांचे सिनेमे नव्हते. जीवनधारासारख्या तद्दन ‘मद्रासी’ सिनेमात ते रेखाचे नायक होते. ‘गंगाराम कँवारा रह गया’ या किशोर कुमारने अद्भुत गायलेल्या गाण्यात पालेकरांनी ‘पिटातल्या पब्लिक’साठी जी काही अफलातून अदाकारी केली आहे, अगदी मस्त रमून नाचही केलेला आहे, तो पाहिला की आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र त्याचवेळी त्यांनी कुमार शाहनींसारख्या वेगळ्या वाटेच्या दिग्दर्शकासाठी ‘तरंग’ केला. या सिनेमाच्या मागे कोणीही उभं राहणार नाही हे ओळखून त्यांनी फक्त सव्वा रुपया मानधन घेतलं. मेकअपमन आणि इतर सहाय्यकांना पैसे द्या आणि माझी फी सिनेमा उत्तम करण्यासाठी आवश्यक तिथे सत्कारणी लावा, असं सांगितलं होतं त्यांनी. ‘सोलवा साल’मध्ये त्यांनी श्रीदेवीचा हिंदीतला पहिला नायक साकारला. मूळ ‘१६ वयथिनिले’ या जबरदस्त सिनेमात श्रीदेवी, कमलहासन आणि रजनीकांत अशी ड्रीम टीम होती. या तिघांनी त्यात धमाका उडवून दिला होता. कमल हासनने साकारलेल्या गतिमंद नायकाच्या भूमिकेत हिंदीत अमोल पालेकर होते, पण समोर होते कुलभूषण खरबंदा. त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल वाद नाही- पण रजनीकांतच्या भूमिकेत त्या व्यावसायिक तोलामोलाचा कुणी कलावंत हवा होता. या सिनेमात पालेकरांनी किती वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आहे, याची काही मिनिटंच आता यूट्यूबवर पाहायला मिळतात. एरवीच्या सिनेमांमध्ये पालेकरांची संवादशैली एका ठरीव बाजाची होती (ते बोलतात कमी आणि पॉझ जास्त घेतात, असा त्यांचा लौकिक होताच), उच्चारण शुद्ध हिंदी वळणाचं (त्याला मराठी प्रेक्षक मराठी वळणाचं हिंदी म्हणतात, ही पालेकरांची खंत)… आज पालेकरांचा वारसा पडद्यावर चालवणारे आयुष्मान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव यांच्यासारखे अभिनेते सिनेमाच्या वातावरणानुसार हिंदीच्या वेगवेगळ्या बोलींचा लहेजा आत्मसात करतात, रणवीर सिंगसारखा मेनस्ट्रीम नायकही बाजीराव पेशवे साकारताना मराठी टोन पकडतो आणि गल्ली बॉय साकारताना बंबईया टोन. पालेकरांच्या काळात मुळात ही पद्धतच नव्हती आणि व्यक्तिरेखेसाठी शारीरिक स्थित्यंतर तर कमल हासनने आणलं भारतीय सिनेमात. त्यामुळे पालेकरांच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये त्यांची एकसाची प्रतिमा तयार झालेली दिसते. त्यातले छोटेछोटे बदल आणि पदर दुर्लक्षिले गेले. या प्रतिमेला सर्वस्वी छेद देणार्‍या ज्या भूमिका त्यांनी केल्या, त्या दुर्दैवाने प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळवू शकलेल्या दिसत नाहीत.
पालेकरांनी या काळात जेवढे सिनेमे केले, त्याहून अधिक नाकारले. तर्कशास्त्र खुंटीला टांगणार्‍या शुद्ध पठडीबाज व्यावसायिक सिनेमाची त्यांना अ‍ॅलर्जी नव्हती. पण, ते म्हणतात, तर्कशून्य म्हणजे पूर्ण तर्कशून्यच हवा सिनेमा… कारण, तर्कशून्यता हेच त्या सिनेमाच्या कथेचं लॉजिक असतं. ‘अमर अकबर अँथनी’ तसा होता. पण, तसा सिनेमा मला कुणी ऑफर केला नाही. एका सीनमध्ये कॉमेडी, दुसर्‍या सीनमध्ये मेलोड्रामा, तिसर्‍या सीनमध्ये वास्तववादी अभिनय, अशी खिचडी असलेला सिनेमा म्हणजे त्याला स्वत:चं काही लॉजिकच नाही. तो मी का करू? जिथे त्यांना त्यांच्या पद्धतीचं लॉजिक सापडलं तो सिनेमा करायला त्यांनी भाषेचंही बंधन मानलं नाही, कन्नड, बंगाली, मल्याळी सिनेमेही केले. ‘खामोश’सारख्या सिनेमात विधू विनोद चोपडाने पालेकरांची इमेज इतक्या चतुराईने वापरून घेतली की त्या रहस्यमय सिनेमाचा सगळा धक्काच पालेकरांवर बेतलेला होता… ही पालेकरांच्या त्या लोकप्रिय प्रतिमेची सगळ्यात उत्तुंग कमाई होती… तिथे पालेकर नसते, तर ‘खामोश’ घडूच शकला नसता!
हळुहळू पालेकरांमधला दिग्दर्शक उचल खायला लागला. त्यांनी १९८१मध्ये संपूर्णपणे वेगळ्या वळणाच्या ‘आक्रित’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. त्यात मुकुटराव थेट खलनायकी छटेची प्रमुख व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. त्या व्यक्तिरेखेसाठी त्यांनी लावलेला करकरीत आवाज आणि पकडलेला ग्रामीण बोलीचा लहेजा त्यांच्या ‘नेहमीच्या’ भूमिका पाहणार्‍यांना चमकवून टाकणारा ठरू शकतो… चेहर्‍यावरचा थंडगार भावही. दिग्दर्शनाची वाट सापडल्यावर पालेकर तिकडेच अधिक रमले आणि अभिनयाच्या बाबतीत फार चोखंदळ होत गेले की काय नकळे! शिवाय दूरदर्शनच्या आगमनानंतर आणि टीव्ही मालिका सुरू झाल्यावर पालेकरांना प्रिय अशा समांतर सिनेमाची काही काळापुरती मोठ्या पडद्यावरून सुट्टीच झाली. तो सगळा आशय सुरुवातीच्या काळातल्या टीव्ही माल्िाकांकडे वळला. मध्यमवर्गाचं स्वरूप बदललं, १९९०च्या दशकात देशाचं राजकारण, समाजकारण बदललं आणि मध्यमवर्गाची सगळी दिशा बदलून गेली… या नव्या दिशेच्या मध्यमवर्गाचं आणि पालेकरांचं कधी जमलं असतं असं वाटत नाही… ते या मध्यमवर्गाचे नायक नव्हते… असू शकले नसते.
पालेकरांनी एवढ्या प्रदीर्घ कारकीर्दीत अभिनेता म्हणून जेमतेम ५०च्या आसपास सिनेमे केले आणि १६ सिनेमे दिग्दर्शित केले. ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘मृगनयनी’ अशा मालिका दिग्दर्शित केल्या. त्या हिशोबात त्यांना लाभलेलं रसिकांचं प्रेम कितीतरी पटींनी अधिक आहे… बासू चटर्जी यांचे चार आणि हृषिकेश मुखर्जी यांचा एक असे एकूण पाच चित्रपट त्याला बर्‍यापैकी कारणीभूत ठरले… या सिनेमांनी पालेकरांपुढे तीन विशेषणं जोडली… बॉय नेक्स्ट डोअर, मिडलक्लास हिरो आणि कॉमन मॅन…
यातली दोन बरोबर आहेत, पण तिसरं… कॉमन मॅन, हे फसवं आहे… पालेकर खरंतर अनकॉमन मॅन होते, पडद्यावरही आणि प्रत्यक्षातही…
—-
गोड, गोंडस, निरागस, भाबडा, पाहताक्षणी आपुलकी निर्माण करणारा, अगदी आपल्यातलाच वाटणारा नायक…
हे वर्णन करताच समोर येतो तो अमोल पालेकरांचा चेहरा.
पण, त्यांच्या ज्या सिनेमांनी त्यांची ही प्रतिमा निर्माण केली, त्यात तरी ते डिट्टो असे आहेत का?
त्यांनी साकारलेला नायक मध्यमवर्गीय आहे, ट्रेन-बसने प्रवास करणारा, साधे कपडे घालणारा, काही मूल्यं मानणारा, कुणाच्या अध्यात ना मध्यात असा- पण तेवढंच आहे का? माणूस मध्यमवर्गीय असला की आपोआप निरागस, भाबडा वगैरे होतो का, तो माणूस असतोच ना? निरागस, भाबडा या वर्णनाला साजेसा नायक फक्त छोटी सी बातमध्ये आहे, सुरुवातीच्या भागात. पण त्याचं हे साधं असणं त्याच्यासाठी अडथळा बनतं तेव्हा तो रीतसर शिकवणी लावून स्मार्ट आणि चालू टाइप बनतो, नायिकेला गटवतो… रजनीगंधामधला नायक बडबड्या आहे, पण तो नायिकेला वाट पाहायला लावतो, त्याबद्दल त्याला काही खंत नाही. तिला भेटल्यावर तो त्याच्याच ऑफिसबद्दल बोलत राहतो, त्यात त्याला काही गैर वाटत नाही… हे काही भाबडेपणाचं लक्षण नाही. चितचोरमध्ये तर तो चक्क नायिकेला पळवतो, फूसच लावतो. आपण इथे कशासाठी आलो होतो, ते विसरतो. ‘गोलमाल’ची वेगळीच गंमत आहे. अजूनही लोक त्यातल्या दुहेरी भूमिकेबद्दल पालेकरांना काँम्प्लिमेंट देतात, ती भूमिका दुहेरी नाही, एकाच माणसाने घेतलेली ती दोन सोंगं आहेत हे लोकांच्या लक्षातच येत नाही. हे अभिनेत्याचं यश. पण पुन्हा इथे काही भाबडा, निरागस वगैरे नायक नाही. तो नोकरी मिळवण्यासाठी बनाव रचणारा खोटारडा नायक आहे. घरोंदामध्ये हा नायक सर्वोच्च ग्रे शेडमध्ये जातो. मुंबईसारख्या महानगरात सामान्य माणसाला साधं घरही घेता येत नाही, या दु:खातून सुरू होणारा त्याचा प्रवास प्रेयसीला तिच्या साहेबाच्या गळ्यात मारून तिच्याबरोबर अफेयर चालू ठेवू या आणि दुर्धर आजाराने ग्रासलेला साहेब मेला की तिच्याशी लग्न करून त्याची संपत्ती लाटू या, अशी योजना आखण्यापर्यंत जातो. हे तर सरळ खलनायकी वळण आहे. तसाच अनकहीचा नायक. प्रेयसीबरोबर लग्न केल्यावर तिचा मृत्यू ओढवेल म्हणून वेगळ्याच बाईशी पाट लावून तिच्या जिवावर उदार होणारा कॅल्क्युलेटेड थंड डोक्याचा माणूस…
…हे सगळं निरागस आणि भाबडं नाही. सर्वसामान्य माणसाच्या या करड्या छटा आहेत. पालेकरांचं यश असं की या छटा त्यांच्यामुळे काळ्याकुट्ट होत नाहीत… हा आपल्यासारखाच माणूस आहे, आपल्यासारखाच घसरतो, सावरतो, मोहात पडतो, मागे फिरतो, मुळातला चांगला आहे, परिस्थितीने त्याच्यावर ही वेळ आणली आहे, असं ते प्रेक्षकाला वाटायला लावतात; त्याची अनुकंपा मिळवत नाहीत, सहानुभाव मिळवतात, हे त्यांच्या संयत अभिनयाचं यश.
अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास अनकॉमन आहे. कारण त्यांना सिनेमाच्याच नव्हे, एकंदर अभिनयात कसलीच महत्त्वाकांक्षा नव्हती… ही वाट त्यांनी निवडलेली नव्हती… त्यांना मुळात अभिनेता बनायचंच नव्हतं…
मध्यमवर्गीय कुटुंबातला तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या पालेकरांना बनायचं होतं चित्रकार… ती त्यांची मुख्य आवड होती. त्या काळात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना ती वाट निवडू दिली, हेच आश्चर्य. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यावर, १९६८मध्येच पहिलं स्वतंत्र प्रदर्शन केल्यानंतर पालेकरांच्या लक्षात आलं की आपण चित्रकार म्हणून उदरनिर्वाह चालवू शकत नाही. त्यासाठी ओलेत्या बायका, अर्धनग्न बायका, पानं, फुलं वगैरेंची चित्रं काढायला लागतील. ती आपण अजिबात काढणार नाही. त्यामुळे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची तर वेगळी नोकरी करायला हवी. ती त्यांनी बँकेत केली. अतिशय स्वच्छ विचार होता त्यांच्या डोक्यात. सकाळी नऊ ते सहा नोकरी करायची, त्यानंतरचा वेळ आपल्या आवडीच्या विषयांना द्यायचा. कुठे काही स्ट्रगल नाही, त्यागबिग नाही.
जेजेमध्ये असताना चिं. त्र्यं. खानोलकरांचं जेव्हा आरसा बोलतो या नाटकात त्यांनी भूमिका साकारली होती. संभाजी कदमांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रा ही त्यांची प्रेयसी. ती नाटकवाली. तिला सत्यदेव दुबेंच्या रिहर्सलच्या ठिकाणी सोडायला, आणायला ते जायचे, तिथल्या वातावरणात रमायचे. दुबेंनी त्यांना विचारलं, माझ्या पुढच्या नाटकात काम करशील का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याच्या आत दुबे म्हणाले, तू फार ग्रेट अ‍ॅक्टर होशील अशी तुझ्यात काही क्षमता, गुणवत्ता मला दिसते आहे, अशातला भाग नाही; तू इथे इतका वेळ टंगळमंगळ करत असतोस की तुझ्याकडे खूप रिकामा वेळ आहे, हे माझ्या लक्षात आलंय. तो वेळ सार्थकी लावावा, म्हणून तुला विचारलं.
आता दुबे बिइंग दुबे, त्यांना खरोखरच पालेकरांमधलं पोटेन्शियल कळलं होतं का आणि त्याची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून त्यांनी टाचणी लावली का, हे दुबेच सांगू शकले असते- पण त्यांच्या त्या टाचणीचा फार मोठा परिणाम पालेकरांच्या एकूण विचारांवर आणि कारकीर्दीवर झालेला दिसतो… आपण काही अभिनेता व्हायचं ठरवलेलंच नाही, तर कशाला उगाच प्रेशर घ्यायचं, मजा येतेय तोवर करू या, इतक्या स्वच्छ पाटीने ते नाटकांच्या जगात उतरले. त्या काळातल्या प्रायोगिक नाट्यचळवळीत त्यांनी दिग्दर्शन केलं, कलादिग्दर्शन, प्रकाशयोजना केली, अभिनयही केला. नाटक भरभरून जगले.
सिनेमात प्रवेश करतानाही अशीच स्वच्छ कोरी पाटी होती त्यांची… हे फार मोठं आश्चर्य. विचार करा. त्या काळातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात नेहमीच देशभराला मुंबईचं चुंबकीय आकर्षण वाटत आलेलं आहे. त्याचं एक कारण आहे चित्रपटसृष्टी. कधीतरी दिलीप कुमारांचे सिनेमे पाहिल्यावर आपण सिनेमात काम करायचं असं ठरवून मुंबईला जवळपास पळून आलेले, स्ट्रगल करणारे धर्मेंद्र, मनोज कुमार यांच्यासारखे कलाकार होते. अमिताभ बच्चनही सिनेमात काम जमलं नाही तर टॅक्सी चालवून गुजराण करीन असा विचार करून इथे पाय रोवायला आला होता. कुणाला सिनेमाच्या ग्लॅमरचं आकर्षण होतं, कुणाला अभिनयाचा किडा चावला होता, कुणाला आणखी कशाने पछाडलं होतं… असं असताना पालेकरांना मुंबईत राहून, नाटकांत कामं करून, पुढे सिनेमात काम करण्याची महत्त्वाकांक्षा तर सोडाच, साधी इच्छाही नव्हती. थेट चालून आलेला सिनेमा मिळवण्यासाठी साधं निर्मात्याला स्वतंत्रपणे भेटायला ते तयार झाले नाहीत.
जेव्हा सिनेमा केला आणि लागोपाठ सिनेमे चालू लागले तेव्हा अमिताभला झोपवू, आपण सुपरस्टार बनू, मोठा नायक बनून प्रचंड पैसे कमावू, हा विचारही त्यांना सुचला नाही. त्यामुळे गल्लापेटीवरच्या यशाच्या, फॉर्म्युल्याच्या ट्रॅपमध्ये ते अजिबात अडकले नाहीत. हे सगळं कॉमन आहे?
अशक्य कोटीतला प्रकार आहे हा!
एका मुलाखतीत ते म्हणाले आहेत की पहिले दोन सिनेमे तसं फार काही बदललं नव्हतं. चितचोरनंतर मात्र ते स्टार झाले. ते जातील तिथे गराडा पडायला लागला. लोक ओळखायला लागले. हे सुरू झालं की सिनेमातली मंडळी कोषात जातात. बाहेर फिरणं बंद करतात. जेव्हा त्यांना आपल्या लोकप्रियतेचं प्रदर्शन मांडायचं असतं, तेव्हाच फोटोग्राफरांना बोलावून ‘अचानक’ लोकांमध्ये येतात… पालेकर हट्टाने सर्वसामान्य आयुष्य जगत राहिले. रस्त्यांवरून चालत राहिले, फुटपाथवर पुस्तकं घेत राहिले, एकदा दिलीप कुलकर्णींच्या ऑफिसात त्यांना भेटायला गेले, मग खाली इराण्याकडे चहा प्यायला बसले. गल्लीत तौबा गर्दी उसळली पालेकर आले आहेत म्हटल्यावर. इराणी वैतागला. पालेकर बाहेर आले, गर्दीला म्हणाले, मी इथे मित्राला भेटायला आलो आहे. गर्दीचा सगळ्यांना त्रास होतो आहे. मला माझा हा वेळ मित्रासोबत व्यतीत करू द्या. गर्दी पांगली.
मी असेन अभिनेता, स्टारही असेन, पण माणूस आहे, तुमच्यातलाच एक आहे, हे लोकांना आणि स्वत:ला सांगत राहण्यासाठी ते कायम असेच राहिले… हे पालेकरांनी का केलं असावं?
त्यांना आणखी यश, उत्तुंग यश वगैरे कमावावंसं वाटलं नाही का?
त्यांचं उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणतात की मी फार भाग्यवान आहे. मला जे जे करायचं होतं, ते ते मी करू शकलो. चित्रकला, नाटक, सिनेमा या तिन्ही क्षेत्रांमध्ये यथेच्छ लुडबुड करू शकलो, जेव्हा जे वाटलं ते करू शकलो. यशस्वी व्हायचं, अमुक करून दाखवायचं, अशा कल्पनांच्या आहारी न जाता ज्यात आनंद मिळाला, जे करावंसं वाटलं ते मनसोक्त केलं. सिनेमातल्या अभिनयाने यश दिलं, पैसा दिला, त्याचा यासाठी फार मोठा उपयोग झाला. मी ही वाट या प्रकारे चाललो म्हणून ती सगळ्यांना चालता येईल असं नाही. माझा विचार आणि माझी मेथड यशस्वी झाली म्हणजे ती सगळ्यांच्या बाबतीत यशस्वी होईल असंही नाही. मी यशस्वी झालो हा काळाचा महिमा आणि माझं भाग्य.
इतक्या स्वच्छ निर्लेपपणे स्वत:कडे पाहणार्‍या, सजगपणे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेणार्‍या, जे सोडलं किंवा सुटलं त्याची अजिबात खंत न बाळगणार्‍या पालेकरांच्या यशाचं मर्म मुळात यशाची रूढ संकल्पनाच झुगारून देण्यात आहे…
हिंदी सिनेमातल्या नायकांचा इतिहास लिहिताना अमोल पालेकरांचा नायक दुर्लक्षून पुढे जाता येणार नाही… त्यासाठी त्यांनी अट्टहासाने काही केलं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं… त्यांना जी चालायचीच नव्हती ती वाट ते चालत राहिले, ती आपोआप उलगडत गेली…

– मुकेश माचकर

Previous Post

कोल्हापूर चित्रनगरीचा नवा साज

Next Post

पहिली चाळपूजा गमतीची!

Related Posts

दिवाळी 21 धमाका

आम्ही V/S प्रेसिडेंट शी जिनपिंग

December 1, 2021
दिवाळी 21 धमाका

मला लागली ईडीची उचकी!

November 24, 2021
दिवाळी 21 धमाका

धाडस?

November 24, 2021
दिवाळी 21 धमाका

पावडर

November 24, 2021
Next Post

पहिली चाळपूजा गमतीची!

२७ नोव्हेंबर भविष्यवाणी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.