चादरीचे चार उपयोग
चर्चगेट स्टेशनजवळ एक चादरीवाला चादरी विकत होता.
“चादरी घ्या चादरी! चार चार उपयोगाच्या चादरी!!” तो ओरडत होता.
“चार उपयोग असलेल्या चादरी? हा काय प्रकार आहे?” जाणारे येणारे विस्मयाने त्याच्याकडे बघत होते.
“चार उपयोग कसे काय?” एकाने विचारले.
“साहेब, विकत तर घ्या. मग सांगतो नेमकं रहस्य!”
एकाने चादर विकत घेतली. मग दुसर्याने, नंतर तिसर्याने.
बर्यापैकी गिर्हाईक गळाशी लागल्यावर त्याने ते रहस्य उलगडायला सुरुवात केली.
“तुम्ही घरी गेल्यावर या चादरीचा अंगावर पांघरण्यासाठी वापर करा. चादर मळली की धुवायची. तिचे लुंगीत रूपांतर होईल. लुंगी वापरून खराब झाली की धुवून घ्या. तिचे
टॉवेलमध्ये रुपांतर होईल. टॉवेल काही दिवसांनी धुतला की त्याचे हातरुमाल तयार होतील. आहेत की नाही, चार चार उपयोग?
एवढं बोलून त्याने उरलेल्या चादरीचे गाठोडे पाठीवर मारले नि दुसरीकडे गेला.
फक्त एकदाचा धुवा!
गिर्हाईक : “शर्ट तसा मला पसंत आहे, पण थोडा सैल वाटतो नि रंग जरा गडद आहे.”
कपडे विक्रेता : “त्यात काय विशेष? एकदा धुतला की तुमच्या मनाजोगा होईल सायेब.”
उंदरांसाठी सूचना!
गिर्हाईक : “काय म्हणता, हा कपडा १०० टक्के वूलनचा आहे.”
दुकानदार : “हो, अगदी १०० टक्के वूलन!”
गिर्हाईक : “पण ह्याच्यावर १०० टक्के कॉटन लिहिलेले दिसते.”
दुकानदार : “अहो, ते तुमच्यासाठी नाही, ते उंदरांना फसविण्यासाठी लिहिलंय.”
माणसाची निर्दयता
कवि सोपानदेव चौधरी ह्यांच्या मातोश्री कवियित्री बहिणाबाई कोणत्या मराठी माणसाला माहीत नाहीत? ह्या अशिक्षित बाईला काव्याचे देणे अंगचे होते. अनुमान, अनुभव हे तिचे अनुभूती झाले होते. त्यामुळे जीवनातला क्षण नि क्षण त्यांनी आपल्या खानदेशी वर्हाडी भाषेत सजवून ठेवलाय. त्यांची एक आठवण अशी आहे. कापूस वेचणीच्या वेळी कवी सोपानदेव आपल्या मातेसोबत शेतात गेले होते. त्यांनी कापसाचे एक बोंड हाती घेतले व त्याचा कापूस (रुई) बाजूला काढून सरकी हातावर घेतली. त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, “पहा, देवाने सरकीला कसा पांढरा स्वच्छ पोशाख नेसवून पाठविले. पण माणसाने तिला नागडी केली आणि तिचे वस्त्र तो आपण स्वत:च नेसू लागला.”
शिंप्याच्या पोराचे वय!
एक मनुष्य काही कपडे घेऊन शिंप्याच्या दुकानात शिरला. शिंप्याने ते कापड मोजले व ते सदरा शिवायला पुरणार नाही म्हणून सांगितले.
चकित झालेला तो गृहस्थ ते कापड घेऊन समोरच्याच दुसर्या शिंप्याकडे गेला. त्यानेही कापड प्रथम मोजले व `सदरा शिवून होईल’ म्हणून सांगितले. तेव्हा तो गृहस्थ पहिल्या शिंप्याकडे येऊन खिजवण्याच्या हेतूने म्हणाला, “ते कापड सदर्यासाठी अपुरे होते! पण तो समोरचा शिंपी कसा काय शिवायला कबूल झाला?”
तेव्हा नम्रपणे तो पहिला शिंपी उत्तरला.
“साहजिकच आहे. माझा मुलगा बारा वर्षाचा आहे नि त्याचा फक्त तीनच वर्षाचा आहे. सदरा शिवून उरलेले कापड त्याच्या मुलाला सहज होईल.”
वाढत जाणारे वस्त्र
“पपा, एक जीवाणू म्हणे रिबिनीसारखा धागा तयार निर्माण करतो!”
“हो का?”
“अन् हा धागा सजीव असतो व हळूहळू वाढत जातो.”
“कमालै!”
“याचा अर्थ, लहान बाळाला या धाग्याचा बाबासूट घेतला की तोही बाळाच्या शरीरासोबत वाढत जाईल, नाही का?”
“मग पुन्हा पुन्हा कपडे घ्यायलाच नको!”
कपड्यामागचे रहस्य
एक छोटी मुलगी आपल्या आजोबांसोबत लग्नाला गेली होती.
“आजोबा, त्या नवरीने आज पांढराशुभ्र पेहराव का घातलाय?” तिने विचारले.
“कारण आज तिच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे.”
आजोबाने स्पष्टीकरण केले.
“मग, त्या नवर्याने काळ्या रंगाचा सूट का घातलाय?”
आजोबा चूप झाले.