गुणवंतवाडी या गावात एक नवा आदर्श निर्माण करणारे ग्रामसुधारक श्रीधरपंत यांनी स्वत:ला वाहून घेतलं होतं. त्या गावाला सरकारी पुरस्कार म्हणून ढाल मिळते नि गांवात तमाशाचा ताफा आल्यामुळे थोडी उलाढाल होते. कारण गावात तमाशाला बंदी असते. म्हणून चंद्रकलेचा तमाशा माळ्यावर मुक्काम ठोकतो. पण श्रीधरपंताच्या हुकमावरून त्याना तेथूनही हुसकावलं जातं. त्याचवेळी चंद्रकला मनाशी ठरवते ‘नाही याला तुनतुन वाजवायला लावीन तर नावाची चंद्रकला नाही!’ आणि तमाशाचा तळ नदीपल्याड ठरतो. श्रीधरपंताचा आदर्श असला तरी मनातल्या कोनाड्यातली शांती शमवायला गांवकरी तमाशाला जातात श्रीधरपंत नदी पोहून येतात. कशासाठी? आपले लोक आपल्याला फसवून आलेत का ते बघायला नि चंद्रकलेच्या प्रेमात पडतात. खुनाच्या संशयावरून पळून जातात नि पकडले जातात. ती मरते, याना फाशी होते. व्ही. शांताराम प्रॉडक्टरच्या रंगीत ‘पिंजरा’ या चित्रात दिसतात.
चित्रपटाची जाहिरात करताना हे तमाशा चित्र नाही असे म्हटले जाते. संबंध चित्रपटभर मग काय नाटक दाखवलंय? गावाला आदर्श बनवणारा हिरो तमाशातल्या बाईच्या तंगड्यावर खूष होऊन अगदी वरपर्यंत जाऊ शकतो. लोकशाहीत त्याला कुठेही कुठपर्यंत जाण्याचा अधिकार आहे. पण ‘व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’, असे सांगणारांनी एक तर आत्महत्या तरी करायला हवी होती किंवा तोंड कायमचं काळं करायला हवं. पण इथं काय घडलं. ज्यांचं तोंड दगडानं ठेचलंय त्याला झब्बा नि सुरवार चढवली जाते. अहो, जिवंत असताना एखाद्याचे कपडे दुसर्याने घालताना तकलीफ होते तर खून झालेल्याला चढवणार कसे? शिवाय पोलिसांनी पकडून आणल्यावर काय गावकर्यांनी त्याच्या घार्या डोळ्याकडे नि नाकावरून न ओळखावं हे दाखवलेलं साफ चूक आहे. त्यापेक्षा त्या तमाशावाल्या बाईला तो गावात घेऊन आला असता नि आत्मविश्वासानं सांगितलं असतं की मी आजपर्यंत गावाला जे नवे आदर्श घालवून दिले त्यातला एक नवा टप्पा! तमाशा वाईट नसतो (कारण त्याला हे पटलेलं असतं) त्याच्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. हे तत्व जर पटवून दिलं असतं तर गावकर्यांनी जरूर मानलं असतं नि चित्राचा शेवट लोकांना आवडला असता.
दुसरा एक ‘शॉट’ आठवला. ज्या बाईला पाटलाचा पोरगा धरतो तिचा नवरा त्याचा खून करतो. तो शेवटपर्यंत गुलदस्ताच रहातो. एकदा श्रीधरपंताच्या पुतळ्यावर डोकं आपटून रक्त सांडतो. हा प्रकार कशासाठी? त्यापेक्षा ज्यावेळेस सुचवलेला शेवट दाखवला असता तर याच व्यक्तीने पुढं येऊन सांगितलं की ‘व्हय पाटलाचा पोर माझ्या बायकोची अब्रू घ्याया आला व्हता म्हूनून म्या त्याचा खून केला!’ म्हणजे स्टोरी कशी अगदी कम्प्लिट झाली असती. शांतारामबापूंनी पहिल्यापासून शेवटपर्यंत चित्र चांगलं घेतलंय. त्यांच्या दिगदर्शनातले एकेक नमुने झकास आहेत. पहिल्या भागात ‘घेतलेला’ एक इसम धडपडून पडतो नि विचारतो ‘काय पडलं?’ श्रीधर नि चंद्रकला यांच्या पहिल्या प्रेमाची पायरी ‘हापूस पायरी’ पेक्षाही सरस वाटली. आक्का छक्क्याला चंद्रकलेविषयी सांगताना निळू फुलेच्या घोरण्याचं बॅकग्राऊंड अफलातून वाटली. आऊटडोअर सीन्स झकास वाटले. मध्यंतरापूर्वी गाण्याचा जो भडीमार होतो त्याने वैताग येतो. फोटोग्राफी समाधानकारक.
सर्व कलाकारांनी आपापली कामं झकास केलीत. डॉ. श्रीराम लागू यांची स्वाभाविक संवाद फेकण्याची हातोटी मनाला समाधान देते. या चित्रातलं त्यांचं काम ही फिल्मिंडस्ट्रीला एक देणगी आहे. संध्याने आपला ठसका हिंदी चित्रापेक्षाही चांगला राखलाय. निळू फुले तब्बेतीने सुधारलाय. कामाबद्दल प्रश्नच नाही.
थोडक्यात लांबीवर कात्री फिरवल्यास हे चित्र आहे त्यापेक्षा पहाणार्याच्या प्रकृतीला मानवेल अशी आशा आहे.