दक्षिण कोरियामधलं सर्वात मोठं बेट म्हणून जेजू या बेटाचं नाव घेतलं जातं. कोरियन समुद्रधुनीत हे वसलेलं आहे. तसं जेजू खूप मोठं आहे. आम्ही वाचलंय की त्याचा पसारा साधारण १८५० चौरस किलोमीटर इतका आहे. आम्ही या बेटाची माहिती मिळवायला जेव्हा इंटरनेटवर शोध घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळी कितीतरी वेगळी माहिती समोर आली. त्या माहितीचा आमच्या प्रवासाशी काहीही संबंध नसला तरी ती माहिती खूपच मनोरंजक वाटली म्हणून इथं देण्याचा मोह आवरत नाही.
कित्येक वर्षेपर्यंत जगाला या ठिकाणाचा थांगपत्ता नव्हता. जगाच्या नकाशावर अगदी ठिपक्यासारख्या असलेल्या बेटाची खबरबात ठेवण्याची गरज जगाला वाटेल तरी कशी! तर हे बेट आज जेजू या नावानं ओळखलं जातं. पण अगदी हल्लीपर्यंत त्याचं नाव हे नव्हतं. गंमत म्हणजे आम्ही शोध घेत होतो तेव्हा एकंदर ११ नावं समोर आली. अर्थात त्यातली बरीचशी प्रचलित नाहीत. हल्लीपर्यंत या बेटाला क्वेलपर्ट (पुन्हा एकदा सांगायला हवं की उच्चाराची खात्री नाही) म्हणायचे. त्याचाही एक इतिहास आहे. सर्वप्रथम हे बेट जग जिंकायला निघालेल्या डच जहाजाच्या नजरेला पडलं. त्या जहाजावरच्या खलाशांनी क्वेलपर्ट हे नाव दिलं. काही काळ इथं जपानी लोकांनी राज्य केलं. जपान्यांनी की आणखी कोणीतरी मग बेटाचं नाव बदललं. आज क्वेलपर्ट मागं पडलंय आणि जेजू हे साधंसं वाटणारं नाव पुढं आलंय (आपण त्या व्यक्तीचे धन्यवाद मानायला हवेत, निदान जिभेचा तितका व्यायाम वाचला).
साधारण वीसेक लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून बाहेर निघालेल्या लाव्हा आणि राखेसारख्या इतर गोष्टींनी इथली जमीन तयार झाली. आजही तो पर्वत बेटाच्या बरोबर मध्यभागी उभा आहे. का कोण जाणे, मला यामुळं मॉरिशियस या देशाची आठवण झाली. तो देशही एक बेटच आहे. तिथेही असाच मध्यभागी निसर्गाचा चमत्कार आहे. दोहोंमधला फरक हा की मॉरिशियसचा मध्यभाग उल्कापातानं झालेल्या भल्याथोरल्या विवरामुळं बनलेला आहे, तर जेजू ज्वालामुखीच्या उद्रेकानं. हा ज्वालामुखी बराच काळ धुमसत असावा, कारण अगदी कालपरवापर्यंत इथं शेती करणं अशक्य असल्याचं बोललं जातं. अर्थात हीच गोष्ट इथल्या भविष्याला कारणीभूत ठरली.
मॉरिशियसप्रमाणं आज इथली वनसंपदा आणि या बेटासारखी झाडं जगात इतरत्र कुठेच आढळत नाहीत. आम्ही वाकडी वाट करून इथं जाण्यामागं हे एक कारण होतं. आम्ही इथल्या ज्वालामुखीतून ओघळणार्या लाव्हामुळं निर्माण झालेल्या गुहेविषयी वाचलं होतं. अशा गुहा जगभरात इतर ठिकाणीही आहेत, तरीही जेजूमधली गुहा अजूनपर्यंत मानवी स्पर्शापासून बर्यापैकी दूर असल्यानं तिथली नैसर्गिक संपदा अगदी उत्तम प्रकारे जपली गेली आहे. ही उत्सुकता घेऊन आम्ही जेजूला गेलो. सुदैवानं जेजूला विमानतळ आहे. त्यामुळं तिथं जाणं फार कठीण पडलं नाही. विमानतळापासून बस व्यवस्थासुद्धा आहे. बुसानवरून बोटीनं देखील इथं जाता येतं.
बेटभर बसने प्रवास करता येतो. फक्त बस स्टॉप गुहेच्या इप्सित स्थळापासून जागा साधारण दोन अडीच किलोमीटर लांब आहे. तितकी पायपीट करावीच लागते. गुहा बरीच मोठी म्हणजे आठेक किलोमीटर लांब असल्याचं ऐकलं होतं. प्रत्यक्षात मात्र जेमतेम एखाद किलोमीटरचा भागच पाहण्यासाठी खुला आहे. नक्की आठवत नाही, पण मला वाटतं आम्ही दोन नंबरच्या गेटने आत गेलो, ते एक वेगळंच जग वाटलं. अधून मधून गळणारं उंच छप्पर, मध्येच असलेला एक प्रस्तर, ही दुनियाच वेगळी होती. थोड्या सपाट दगडांवर आम्ही बसू शकत होतो. मध्येच वटवाघळांचा थवा उडत होता. आमच्या सोबत असलेल्या एका कोरियन प्रवाशाने आम्हाला तिथला एक कोळी (स्पायडर) दाखवला. हा म्हणे जगातला एकमेवाद्वितीय प्रकारचा कोळी आहे. खरं सांगायचं तर या विषयाचा अभ्यास नसल्यानं आम्हाला त्याने त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत जे काही सांगितलं ते कळलं नाही. फक्त त्याच्या बोलण्यातून त्याला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय हे लक्षात आलं. आम्हाला ज्ञान असतं तर आणखी अप्रूप वाटलं असतं हे नक्की. आणखी एक गोष्ट म्हणजे तिथं असलेल्या फलकांवरून इथं प्राण्यांचं निराळं जग वसलेलं आहे हे समजतं. आम्हाला तसं खास काही बघायला मिळालं नाही.
जेजू बेटाच्या मध्यभागी हल्लासन नावाचा पर्वत आहे. तिथं ट्रेकिंग करून वरपर्यंत जाता येतं. आमच्यापैकी कोणीच तिथं गेलं नाही, कारण वयाप्रमाणे गुडघे बोलायला लागलेत. चार पाच हजार फूट उंच पर्वतावर चढून जाण्याचा उत्साह आम्हा कोणाकडेच नव्हता. त्या पर्वताच्या पायथ्याशी अभयारण्य आहे. तिथंही आम्ही कोणी गेलो नाही.
जेजू बेटाच्या बाबतीत खटकणारी बाब म्हणजे इथं असलेल्या इमारती. त्या एकंदर बेटाच्या सौंदर्याला नक्कीच बाधा आणतात.
इथली संस्कृती देखील काहीशी निराळी आहे. इथे अनेक ठिकाणी स्त्रिया मासेमारी करताना दिसतात. जगभरात स्त्रीप्रधान संस्कृती अनेकानेक देशांमध्ये आहेत, पण आम्ही तरी मासेमार स्त्रिया पाहिल्या नव्हत्या. त्यामुळं या गोष्टीचं विशेष वाटलं. आमच्या सोबत एक बडबड्या कोरियन प्रवासी होता. तो आम्हाला खूप छान माहिती पुरवत होता. अमेरिकेतल्या हवाई बेटांसारखं हे बेट आहे. किंबहुना याला पूर्वेकडचं हवाई असाच म्हणतात आणि इथं कोरियन जेवण अप्रतिम मिळतं. विशेषतः मत्स्याहार फारच ताजा आणि सुंदर असतो. एकदा तरी खाऊन पाहाच वगैरे वगैरे त्याची टकळी चालू होती. एकदा तर त्याने समोरचं रेस्टॉरंट सुद्धा दाखवलं. आम्ही त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या.
त्याने सांगितलेली आणखी एक गोष्ट चांगलीच लक्षात आहे. हे बेट हनिमूनसाठी चांगलंच प्रसिद्ध आहे. कोरियाच्या मुख्य भागात लग्न झालेली नवपरिणीत जोडपी लग्नानंतरच्या काळात इथं येतात. तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला की इथं तरुण मंडळींची गर्दी का आहे! आपल्याकडेही लग्नाच्या मुहूर्तांच्या दिवसांत थंड हवेच्या ठिकाणी अनेक जोडपी दिसतात. हातातल्या चुड्यांमुळं आणि भांगातल्या कुंकवामुळं ती सहज ओळखू येतात. पण इथं असं काही दिसलं नाही. यांच्या विधींविषयी अनभिज्ञ होतो. त्या कोरियन प्रवाशाला त्याबद्दल विचारलं. त्यानं त्याच्या इंग्रजीमध्ये जे काही सांगितलं त्यातून आमचं अज्ञान कमी झालं नाहीच, आमचा गोंधळ मात्र उडाला.
इथली काही पर्यटनस्थळं अगदी सुंदर आहेत. चहाच्या कपाच्या आकाराचं ‘ग्रीन टी’ वस्तूसंग्रहालय नक्कीच भुरळ घालतं. जागोजागी दिसणारे आजोबांचे पुतळे लक्ष वेधून घेतात. ही इथली खासियत म्हणावी लागेल. कारण अनेक हॉटेल्सच्या समोर दिसतात. अशा प्रकारचे पुतळे आम्ही इतरत्र कुठंही पाहिलेले नाहीत.
जेजूमधल्या एका म्युझियमवजा बगीचाचा बराच बोलबाला आहे. त्याला लव्हलँड म्हणतात. त्या भागात नेमकं काय आहे ते आम्ही सांगू शकणार नाही. कारण त्या वाटेला आम्ही गेलो नाही. पण ऐकीव माहितीवरून इतकंच कळलं की तिथे स्त्री पुरुषांच्या संबंधांचं ‘तसलं’ चित्रण आहे. त्या प्रकारातले अनेक पुतळे तिथं आहेत. सोबत सेक्स म्युझियम देखील आहे. त्याच्या ब्रोशरमध्ये जे पाहिलं ते आम्ही सांगू नये आणि तुम्ही वाचू नये या प्रकारातलं होतं.
कितीतरी प्रकारचे बगीचे या बेटावर आहेत. आम्हाला त्यातला हालीम नावाचा बगीचा पाहायला मिळाला. खरं म्हणजे याला बगीचा म्हणावं किंवा कसं हा प्रश्न आम्हाला पडला होता. एका मोठ्या खूप झाडं असलेल्या भूभागाचे छोटे छोटे भाग करावेत, तसा हा प्रकार वाटतो. असे लहान लहान सोळा बगीचे तिथं आहेत. आम्हाला त्यातलं बर्ड पार्क खूप आवडलं. रंगबिरंगी पोपट पाहणं (त्यातले काही चक्क आपल्या हातावर बसतात आणि दाणे खातात) हा तिथला खरंच खूप छान सोहळा होता. तसंच तिथलं वॉशिंग्टन पाम गार्डन देखील आम्हाला पानांच्या वेगळ्या प्रकारच्या ठेवणीमुळं आवडलं. अशा प्रकारची नारळाच्या गटातली झाडं आम्ही प्रथमच पाहत होतो.
जेजू बेटाची यात्रा हा आमच्या दक्षिण कोरियाच्या सहलीचा शेवटचा पडाव होता. तिथून आम्हाला मायदेशी परत यायचं होतं. एक नक्की की हा देश आगळावेगळा आहे. याला खूप जुना इतिहास आहे. अनेकदा आक्रमणं होऊन, परदेशाच्या सत्तेखाली भरडून निघून देखील त्याने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. पर्यटकांच्या यादीत बर्यापैकी तळाशी असणार्या या देशाला आम्ही भेट दिली याचं नक्कीच समाधान वाटतं.