• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

साहेबाची बोलती बंद

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 24, 2025
in प्रबोधन १००
0

प्रबोधनकारांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रलेखात केलेल्या शाहू महाराजांच्या उल्लेखाने त्यांना ब्रिटिश सरकारची नोटीस आली. पण प्रबोधनकारांनी बिनतोड युक्तिवादाने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बॉलसाहेबाची बोलती बंद केली.
– – –

प्रबोधनकारांना ८ सप्टेंबर १९२६ या दिवशी सकाळीच पुण्याचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बॉल यांचं बोलावणं आलं. पोलिस शिपायाने एक लांबरूंद खलिता आणून दिला. त्यात फक्त जाब देण्यासाठी मि. बॉल यांना विशिष्ट तारखेला आणि विशिष्ट वेळी येऊन भेटावं असा त्रोटक मजकूर होता. त्यामुळे काहीच लक्षात येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी लगेच कशाबद्दल जाब हवा आहे, असं छोटं पत्र टाइप करून शिपायाहाती परत पाठवलं. शिपाई तीन चार तासांतच परत आला. उत्तराने प्रबोधनकारांनाही आश्चर्य वाटलं, भाऊराव पाटलांच्या चरित्रात तुम्ही छत्रपती शाहू महाराजांची निंदा केली आहे, त्याचा जाब तुम्हाला द्यायला आहे.
यावर प्रबोधनकारांची प्रतिक्रिया नेहमीसारख्या उपरोधाने ओतप्रोत भरलेली आहे. त्यांनी लिहिलंय की ते २० वर्षं लेखन करत आहेत. १९१८ पासून ग्रंथ लिहित आलेत. १९२१ पासून प्रबोधन सुरू झालं. अनेक महत्त्वाचे विषय सरकारच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन कोणत्याही ब्राह्मणी संस्थेवर कोणती कारवाईही झाली नाही. अनेक महत्त्वाचे लेख ब्रिटिश अधिकार्‍यांपर्यंत पोचण्यापूर्वी त्यांचा अर्थातच मराठीतून इंग्रजीत अनुवाद होत असे. आता हे सगळे ट्रान्सलेटर ब्राह्मण असल्यामुळे त्यातली ब्राह्मणी संस्थांवरची टीका गाळत असत. त्यामुळे प्रबोधनकारांनी महत्त्वाच्या विषयांवर इंग्रजीतून लेख लिहिले. तरीही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं लक्ष काही केल्या गेलं नाही.
प्रबोधनकार गमतीने पुढे लिहितात, उपरोक्त निराशेत नेहमीच्या प्रामाणिक मतप्रसाराच्या एकांड्या शिलेदारी उद्योगांत मग्न असताना गेल्या ८ तारखेस अवचित पुण्याच्या डि. मॅजिस्ट्रेट साहेबांचे आमंत्रण येऊन धडकले. आनंद वाटला. २ वर्षे दादरला, १ वर्ष सातारा रोडला आणि २ वर्षे पुण्याला प्रबोधनाने काढली. या ५ वर्षांत सरकारी आमंत्रणाचा हा पहिला योग. मोठा आनंद वाटला, पण आमंत्रण कोणत्या प्रकरणी?… आश्चर्य वाटले, मनांत म्हटले, की हा भाऊराव मोठ्या दैवाचा, याचे चरित्र सरकारने सुद्धा वाचले. ज्या वेळी वाचायचे त्या वेळी वाचले नाही, पण आता वाचले.
१२ सप्टेंबरला दुपारी १२ वाचताची भेट ठरली होती. या १५ मिनिटांच्या भेटीचं वर्णन प्रबोधनकारांनी जीवनगाथेत फार खुमासदार केलं आहे. बॉलसाहेब मराठी बोलत, पण त्यांना नेहमीच्या बोलचालीची मराठी समजत असे, ग्रांथिक भाषा समजत नसे, त्यामुळे तिथे साहेबाच्या ब्राह्मण सेक्रेटरीने वाद घातला. वादाचा केंद्रबिंदू लेखाचा अनुवाद नीट केलाय की नाही, हाच होता. हा सगळा प्रसंग प्रबोधनकारांनी छान रंगवून सांगितलेला आहे.
प्रबोधनकारांनी पहिलाच बिनतोड युक्तिवाद केला, `छत्रपती शाहू महाराजांची बदनामी कशी केली? याचा पुरावा काय? भाऊराव पाटलाच्या चरित्रात त्याचा संदर्भ प्रामुख्याने येणारच. मी लिहिलेल्या हकिकतीचा पुरावा खुद्द भाऊराव पाटील द्यायला तयार आहे. त्याला बोलवा. शिवाय, या तक्रारीचे मूळ कोणते? करवीर दरबारचे असेल तर प्रिन्सेस प्रोटेक्शन अ‍ॅक्टखाली हिंदुस्थान सरकारकडून तुमच्याकडे ही तक्रार आलेली आहे काय? तशी नसेल, तर मुंबई सरकारला यात मला जाब विचारण्याचा अधिकार काय?
`मॅजिस्ट्रेट साहेबाने सांगितलं की ओरिएण्टल ट्रान्सलेटरने तुमच्या लेखाच्या भाषांतराचा तक्ता पाठवला आहे आणि त्याची चौकशी करण्याचा हुकूम आम्हाला आला आहे. प्रबोधनकारांनी भाषांतराचा तक्ता मागवून घेतला. तो वाचून त्यातलं भाषांतर कसं चुकीचं आहे, याची चार पाच उदाहरणंच दिली. त्यावरून साहेबाचा सेक्रेटरी उखडला. दोघांची चांगलीच जुंपली.
यात सरकारच्या दृष्टीने सगळ्यात आक्षेपार्ह वाक्य होतं, या प्रकरणात सर्व सूत्रे महाराजच चालवीत होते. त्याचं भाषांतर Maharaja was the wirepuller of this affair असं करण्यात आलं होतं. ते चुकल्याचा दावा प्रबोधनकारांनी केला. सूत्र म्हणजे वायर आणि सूत्रधार म्हणजे वायरपुलर असे भाषांतर चुकीचे आहे. शिवाय वायरपुलिंग या इंग्रेजी शब्दांतच एक प्रकारचा बॅडसेन्स (कुत्सित अर्थ) आहे. उपरोक्त कलमांत हा शब्द टाकतांच खाडकन त्याचा रंग बदलला, अर्थ बदलला आणि लेखकाच्या हेतूचाहि विपर्यास झाला. वास्तविक येथे कंट्रोल या क्रियापदाचीच जरूरी आहे आणि त्याची सूत्रे खुद्दांकडूनच हालत होती, याचे भाषांतर The affair was being controlled by the Maharaja himself असेच करणे प्राप्त आहे.` प्रबोधनकारांनी साहेबाला या प्रकरणातला छत्रपती शाहू महाराजांचा पवित्रा समजावून सांगितला आणि या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमीही सांगितली.
शेवटी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रबोधनकारांनी प्रश्न विचारला, `सर लेस्ली विल्सन मुंबई इलाख्याचे सूत्रे चालवीत आहेत या वाक्याचे भाषांतर Sir Leslie Wilson is the wire-puller of Bombay Residency असे केले तर चालेल काय?`या बिनतोड प्रश्नाने बॉलसाहेब गडबडला आणि सेक्रेटरीच्या तोंडाकडे पाहू लागला. ही मात्रा लागू पडल्याचं बघताच प्रबोधनकारांनी इतरही काही वाक्यांचं चुकीचं भाषांतर केल्याचं सांगितलं. त्याचे संदर्भ सांगितले. कर्मवीर अण्णांचं चरित्र लिहिण्यामागचा हेतू काय होता आणि या ल्ोखामुळे कोल्हापूर दरबारात काय घडलं असू शकेल, अशा गोष्टी समजून सांगितल्या. त्यामुळे साहेबाचं समाधान झालं आणि त्याने झालेल्या चर्चेनुसार पुढच्या अंकात खुलासा प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या.
बॉलसाहेबाने सांगितलं, माझी अशी समजूत आहे की मि. लठ्ठे यांना तुम्ही उकरून काढलेल्या जुन्या हकिकतीने वाईट वाटले असावे आणि त्यांनी परवाच्या अ‍ॅग्रिकल्चरल एक्झिबिशनला गव्हर्नरसाहेब आले असता, त्यांना काही सांगितले असावे, त्यावरून ही तक्रार निघाली असावी. प्रबोधनकारांनी साहेबाला त्यावरही आपली बाजू सांगितली, त्या डांबर प्रकरणात लठ्ठे यांचा काहीच संबंध नव्हता. आणि म्हणूनच भाऊरावाने कठोर पोलिसी छळ सोसूनही त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यास साफ नकार दिला. याची जाणीव लठ्ठे यांना का नसावी, कळत नाही. तसे म्हटले तर लठ्ठे माझेही अगदी जानी दोस्त आहेत. सत्यशोधकीय सामाजिक सुधारणेच्या अनेक क्षेत्रात आम्ही खांद्याला खांदा भिडवून कामेही केलेली आहेत. सध्याही त्यांच्या माझ्या गाठीभेटी नि पत्रव्यवहारही होत असतो.
ऑक्टोबर १९२६च्या अंकात प्रबोधनकारांनी बॉलसाहेबाच्या सूचनेनुसार संपादकीय खुलासा नावानेच स्पष्टीकरण छापलं. त्यात त्यांचा शाहू महाराजांशी असलेला ऋणानुबंध मांडला आहे. ते लिहितात, शाहू महाराजांच्या हितशत्रूंत विशेष प्रमुख वर्ग म्हटला म्हणजे जहाल चित्पावन ब्राह्मणांचा, ही गोष्ट म्हणजे काही नवीन अपूर्व नव्हे. ठाकरे यांनी शाहू महाराजांची बदनामी केली, अशी बातमी कोणी एखाद्या नाजूक आतड्याच्या प्राण्याने एखाद्या कट्टर फत्तर चित्पावनाच्या कानांत फुंकली, तर तो सुद्धा स्वप्नांतही ही गोष्ट खरी नाही, असे धाडकन उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, मग इतरांची काय कथा?
पुढे प्रबोधनकार अंधभक्तीसाठी मराठी समाजाचे कान ओढतात, व्यक्तिपूजेची एक विचित्र (Crude) भावना आम्हां महाराष्ट्रीयांच्या हाडीमासी खिळलेली आहे. एखादी व्यक्ती लोकांच्या आदरास पात्र झाली की मग ते त्या व्यक्तीच्या फक्त गुणांचेच स्तोम माजवितात, आणि दोषांवर पांघरूण घालतात. त्यांची पूज्य व्यक्ती म्हणजे सकलगुणालंकृत वाटते. कोणी दोषाविष्करण केल्यास त्यांच्या आदराचे नाजूक मानसिक तंतू तात्काळ दुखावतात. मनुष्य म्हणजे गुणदोषांची गोळाबेरीज हे तत्व ते साफ विसरतात.
शाहू महाराजांच्या संदर्भात हा मुद्दा ते पुढे नेतात, `शाहू महाराजांकडे किंवा कोणाकडेही असल्या अंधभक्तीने पाहण्याची दृष्टी आम्हाला नाही… महाराज हयात असतांना सुद्धा त्यांच्यावर प्रबोधनांत दोन तीन वेळा कडक टीका करण्याचा आमच्यावर प्रसंग आला होता. पण तेवढ्याने त्यांनी त्यांच्या अंधभक्तांप्रमाणे नाक फेंदारले नाही. उलट आम्हाला पन्हाळा लॉजमध्ये भेटीस बोलावून, त्या त्या बाबतीतल्या कारणांची व धोरणांची चिकित्सा केली… मतभेदाच्या कडाक्याच्या वादविवादांत त्यांना आपली राजकीय इझ्झत जखमी झाल्याचा संशय आला नाही… त्याच शाहू महाराजांविषयी एका सत्यनिरूपणाच्या मजकुरांत, त्यांच्या मृत्यूनंतर कोणाला तरी बदनामीचा वास यावा, हे बदललेल्या मनूच्या बदललेल्या घ्राणेंदियाचेच चिन्ह नव्हे काय? `शाहू महाराज हे अफाट महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाचे पुढारी असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा महाराष्ट्राला अधिकार आहे’, असंही प्रबोधनकार लिहितात.
हा लेख छापून आल्यानंतर प्रबोधनकार अंकाची एक प्रत घेऊन स्वत: कलेक्टर ऑफिसात गेले. बॉलसाहेबाला त्यांनी एक प्रत दिली. मागच्या वेळी जाब विचारण्याच्या घुश्श्यात असणारा साहेब यावेळेस अगदी शांत होता. चहा मागवून अर्धा तास गप्पा मारत बसला होता. तेवढ्यात कर्मवीर अण्णाही पुण्यात आले होते. प्रबोधनकारांनी झाल्या प्रकाराविषयी त्यांना पत्र लिहून कळवलं होतं. प्रबोधनकार कलेक्टर कचेरीत गेल्याचं कळताच तेही तिथे आले. तिघांचं आणखी बोलणं झालं. साहेबाच्या सगळ्या शंकांचं पूर्ण निरसन झालं. कर्मवीरांनी साहेबाला शाहू छत्रपती बोर्डिंगला भेट देण्याचं निमंत्रणही दिलं.

Previous Post

शतायुषी शि. द. यांना शुभेच्छा!

Next Post

फिरविले राऊळ जगामाजी ख्याती!

Next Post

फिरविले राऊळ जगामाजी ख्याती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.