परवाच्या राड्यात तू हात धुवून घेतलेस की नाही, असा प्रश्न जेव्हा अनेक मित्रमंडळींनी विचारला तेव्हा मी छातीठोकपणे उत्तर दिलं, हा टोक्या पहिल्यांदा कुणावरही हात उचलत नाही, पण माझ्या शिवसेना भवनावर कोण चाल करून येत असेल, तर मात्र त्याला कायमचा धडा शिकवल्याशिवाय राहात नाही.
त्या दिवशीच मी माझं आत्मचरित्र की काय म्हणतात ते लिहायला सुरुवात करणार होतो. सकाळी गणपतीच्या, रामाच्या, मारुतीच्या देवळातही जाऊन आलो होतो. म्हटलं, दुपारी सेनाभवनावर जाऊन परमपूज्य हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला वंदन करून, खाली फुटपाथवर बसून लिखाणाला सुरुवात करावी. कागद-पेन घेऊन सुरुवात करणार इतक्यात बायका-पुरुषांची एक झुंड पिसाळल्यागत घोषणा करत सेनाभवनाच्या दिशेने येताना पाहिली आणि आपली सटकली. ताबडतोब पोक्यासकट माझ्या सगळ्या गँगला धडाधड मोबाइलवरून आवतण दिलं आणि माझे मजबूत गडी पाच मिनिटात तिथं आले. बघतो तर त्या झुंडशाही गुंडागर्दीची शिवसेनेला घाणेरड्या भाषेत शिव्या देण्याची स्पर्धाच लागली होती. पोक्याला बोललो, आता यांना सोडायचं नाही. असा प्रसाद द्यायचा की जन्माची याद राहिली पाहिजे. इतक्यात बाकीचे शिवसैनिकही धावून आले आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना असे काही तुडवलेत ना की त्या पिसाळलेल्या लतकोडग्यांच्या डोळ्यासमोर तारे चमकले असतील.
च्यामारी, फक्त राममंदिराच्या हिशेबाबद्दल कोणीतरी संशय व्यक्त केला म्हणून ही राडेबाजी! तोही या बाबतीत योग्य तो सल्ला देणा-या शिवसेनेबाबत… आम्ही एरियात एवढ्या देवांची मंदिरं बांधली पण कधी कोणी एवढा खर्च कसा आला म्हणून या टोक्याला विचारलं नाही. आपला सगळा चोख कारभार असतो. पण खाई त्याला खवखवे असं रस्त्यावरून जाणारे-येणारे लोकच बोलत होते. यांच्या जागी मी असतो तर एक पत्रकार परिषद घेतली असती आणि राममंदिरासाठी जमा झालेल्या आणि आजपर्यंत खर्च झालेल्या रकमेचा पैनपैचा हिशोब दिला असता. त्यात मोर्चे कसले काढता? नशीब, तेवढ्यात पोलिसांच्या गाड्या आल्या आणि त्या सगळ्यांची वरात माहीमला घेऊन गेले. चार माणसं नाही बरोबर आणि निघाले मोर्चे काढायला? त्यात बायकांना पुढे करून स्वतः मागून ठोशे मारण्याची कुंग फू अॅक्टिंग करणार. माझे तर हात असे शिवशिवत होते की बाबरी पाडतानाचा जोश अंगात शिरला होता. आमच्या शूर रणरागिणी भिडल्या असत्या, तर त्या सगळ्यांनी पाठीला पाय लावून शिवाजी पार्कच्या समुद्रात उड्या घेतल्या असत्या. शिवसेनेच्या वाटेला जायचं काम सोपं नाही. असे आले किती गेले किती संपले भरारा, शिवसेनेचा दशदिशांत गाजतो दरारा ही घोषणा दिल्यावर उरले सुरले मोर्चेकरी जीव घेऊन पळून गेले.
बाबरी पडली त्यावेळी ती पाडण्याची जबाबदारी घ्यायला भाजपचा एकही नेता तयार झाला नव्हता. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान वाटतो, असं गर्वाने सांगितलं. त्यांनी अटकेची भीती बाळगली नव्हती. आणि यांचे नेते बसले होते झाडांच्या फांद्यांवर खिदळत एकेकाला बगलेत घेऊन. तोंडाने फक्त ‘गर्व से कहो…’ म्हणायचं आणि वेळ आली की शेपूट घालायचं. खाने को हम और मार खानेकू तुम, असं यांचं धोरण. म्हणून तर बाळासाहेब यांची भर सभेत खिल्ली उडवायचे. आता तर राज्यात सत्ता गमावल्यामुळे बिचारे इतके हताश झाले आहेत की शिवसेनेला धडा शिकवायची स्वप्नंच बघत असतात.
आता शिवसेना ५५ वर्षांची झालीय. विचाराने आणि शरीरानेही परिपक्व झालीय. आमचा तरूण मुख्यमंत्री आज सार्या देशाचा आदर्श ठरलाय. आणि हे जमवाजमवी करून पक्ष वाढवणारे आता एकेक बुरुज ढासळू लागल्यावर लटपटू लागले आहेत.
मुळात कोणाशीही लढण्यासाठी मनाची पूर्ण तयारी असावी लागते. आम्ही बाळासाहेबांचे चेले आहोत. कुणी लेचेपेचे पोटर्या खाजवणारे गणंग नाही. कधी, कुठे, कशासाठी, कुणासाठी, काय करावं याची अक्कल लागते. सोशल मीडियावर झळकता येतं म्हणून रस्त्यावर आडवं पडायची नाटकं करायची गरज नसते.
ही धुमश्चक्री सुरू असताना माझ्या नजरेसमोर शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत मुंबईतल्या कोणकोणत्या लढ्यात शिवसेनेने अंगावर आलेल्या मारकुट्यांचा कसा खरपूस समाचार घेतला याचं चित्र तरळून गेलं. अगदी परळच्या दळवी बिल्डिंगपासून आतापर्यंत केलेले राडे आठवले. आमच्या गँगने तर कारणाशिवाय कोणाचे थोबाड फोडले नाही. पण जो नडला त्याला आम्ही पाडला. कृष्णा देसाई पोटनिवडणुकीतला तो जल्लोषी प्रचार आठवला की आजही भगवा झालेला तो परळचा बालेकिल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. तेव्हा तर नऊ पक्षांविरुद्ध शिवसेना एकटी लढत होती तरी लाल बावट्याला पाणी पाजून शिवसेनेचे पहिले आमदार आमचे प्रिं. वामनराव महाडिक विधानसभेवर डौलाने गेले. केवढी ती विजयी मिरवणूक! एक टोक लालबागच्या लाल मैदानापाशी तर दुसरे टोक दादरच्या टिळक पुलावर. ही शिवसेनेची ताकद आजही संपलेली नाही. तेव्हाचा शिवसैनिक आता परिपक्व झालाय हे मी माझ्यावरून सांगतो. त्यामुळे आपली शक्ती तो फालतू राड्यात खर्च करत नाही आणि डास-मच्छर मारण्यात त्याला रस वाटत नाही. शत्रूही तुल्यबळ हवा. तर मजा येते. एक ठोसा दिला की पाठीला पाय लावून पळणारे आणि घाबरून मुंबईची पक्ष कार्यालयं धडाधड बंद करून लपून राहणारे, यांना लढवय्ये म्हणत नाहीत तर पळपुटे म्हणतात. तोंडच्या वाफा दवडणारे किती पेंढारी किती दिवस पैशाचा माज करतात हे टोक्याला माहिताय. त्यामुळे अशा स्टंटबाजांना आम्ही कधीच घाबरलो नाही. टोक्याने शिवसेनेचा गेल्या ५५ वर्षांचा इतिहास पाहिलाय. त्यामुळेच उज्वल भविष्यकाळाची त्याला खात्री आहे.